' "चिनमधल्या चिमण्या संपवा!" - माओचा आदेश निसर्गाचा संहार करून गेला

“चिनमधल्या चिमण्या संपवा!” – माओचा आदेश निसर्गाचा संहार करून गेला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज शहरी भागात फारसा न आढळणारा एक पक्षी म्हणजे चिमणी! चिऊताई म्हणून ओळखला जाणारा हा छोटासा पक्षी आपल्यासाठी फार जवळचा आणि जिव्हाळ्याचा असतो. एक घास चिऊचा, एक घास काऊचा असं म्हणत, लहान मुलांना जेवण भरवणं असो, किंवा चिमणीच्या पिल्लाची गोष्ट असो, चिमणी हा अगदी रोजच्या बोलण्यातील, रोजच्या व्यवहारातील जीव आहे.

sparrow killing 1 im

मात्र याच चिमण्या सध्या फारशा पाहायला मिळत नाहीत. त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत का? अशी शंका यावी इतकी त्यांची संख्या शहरी भागात कमी झाली आहे. या चिमण्या नाहीशा झाल्या, खरोखरंच संपून गेल्या तर? विचारही करवत नाही ना? केवळ तुम्हाला आवडतं म्हणून चिमणीचं अस्तित्व टिकून राहावं असं नाहीये बरं का!

सजीवांप्रमाणेच चिमणीसुद्धा निसर्गाचा समतोल राखण्यात मोलाचा वाटा उचलते. तसं झालं नाही, तर नेमकं काय होईल? चला जाणून घेऊया, एका सत्य घटनेवरून…

एक चुकीचा निर्णय…

मानवजातीचा एक चुकीचा निर्णय त्यांनाच किती धोकादायक ठरू शकतो, याचं एक मोठं उदाहरण म्हणजे चीनमध्ये १९५८ साली घडलेली ही घटना. एक-दोन नव्हे तर तब्बल अडीच करोड लोकांना यावेळी आपला जीव गमवावा लागला होता. या सगळ्या मागचं कारण होतं, चीनमधील एक चळवळ!

sparrow killing 3 im

‘द ग्रेट स्पॅरो कॅम्पेन’ असं या चळवळीचं नाव होतं. या चळवळीची सूरूवात चीनमध्ये १९५८ साली झाली. ‘पीपल्स रिपब्लिक’ या पक्षाचे संस्थापक माओ झेडॉंग यांनी एक निर्णय घेतला.

चीनची अर्थव्यवस्था ही संपूर्णतः कृषिप्रधान होती. या अर्थव्यवस्थेला औद्योगिक आणि आधुनिक स्वरूप देण्याचा त्यांचा मानस होता.

सर्वात वर असणारी ब्रिटनची अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या क्रमांकावर असणारी अमेरिकेची अर्थव्यवस्था मागे टाकण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. यामुळे पुढे नेमकं काय घडणार आहे, याची मात्र कुणालाही कल्पना नव्हती.

माओ झेडॉंग यांच्याविषयी

माओ झेडॉंग यांना माओ सेतुन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांना चीनमध्ये फिकर मानाने पाहिलं जातं. एक महान क्रांतिकारक, एक उत्तम राजकारणी, रणनीतीकर, सैनिक अशा भूमिका त्यांनी बजावल्या आहेत. चीनमधील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मान होता.

अशा या माणसाने चीनला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न सत्यात आणायचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ही त्यांची फार मोठी चूक ठरली.

sparrow killing 2 im

स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात…

ब्रिटनची अर्थव्यवस्था गाठण्याचं आणि जमल्यास त्यांनाही मागे टाकण्याचं स्वप्न १५ वर्षात सत्यात उतरवण्याचा मानस झेडॉंग यांच्या मनात होता.

‘द ग्रेट लीप फॉरवर्ड’ या नावाने एक नवी सुरुवात करण्यात आली. हीच एका मोठ्या ऱ्हासाची सुरुवात ठरली. चार किट अभियान हा याचाच एक भाग होता. शेतातील धान्य नष्ट करणारे चार प्राणी, म्हणजेच चिमण्या, उंदीर, माशा आणि डास यांचा संपूर्ण नायनाट करणं.

प्रत्येक चिमणी वर्षाला साडे चार किलो धान्य खात असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला होता. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर धान्य संपवण्याचं काम चिमण्या करत असत. हे धान्य संपुष्टात आलं नाही, तर शेतीसाठी लागणारी जमीन कमी असेल, आणि तीच जमीन औद्योगिक प्रगतीसाठी वापरता येईल असा विचार करण्यात आला. याशिवाय हे धान्य निर्यात करता येईल अशीही योजना होती.

sparrow killing 4 im

चिमण्या संपवण्याचे अभियान..

चिमण्यांना संपवण्यासाठी सैन्याचा सुद्धा वापर करण्यात आला. प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालयं, ऑफिस, कारखाने अशा सगळ्याच ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना या कामात सहभागी करून घेण्यात आलं.

चिमण्या जमीनीवर उतरू नयेत म्हणून ढोल वाजवले जात. या आवाजाला घाबरून त्या जमिनीवर येत नसत. हवेत उडत राहिल्याने त्यांचा मृत्यू होत असे. चिमण्यांची घरटी नष्ट करणं, त्यांची अंडी फोडून टाकणं या गोष्टी युद्ध पातळीवर करण्यात आलं. ही मोहीम इतकी मोठी होती की पहिल्याच दिवसात जवळपास दोन लाख चिमण्या संपवण्यात आल्या.

===

या हॉटेलात लोकांनी वापरलेल्या टूथ ब्रश, कंगव्यापासून थेट वीज निर्मिती केली जाते! वाचा

चीनचा विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी : बुटक्यांचं प्रदर्शन, भुतांचं शहर आणि…

===

चिमण्या संपवण्याची ही मोहीम मोठ्या प्रमाणावर चालली, आणि अखेरीस दोन वर्षांत चीनमधील चिमण्या संपून जाण्याच्या मार्गावर होत्या.

sparrow killing 5 im

चिमण्यांचा नायनाट तर झाला पण…

चिमण्यांचं समूळ उच्चाटन करण्यात चीनला यश आलं. मात्र याचा परिणाम फारच भयंकर झाला. चीनमध्ये मोठी टोळधाड आली. कीटकांनी शेतांवर चढवलेला हल्ला, हा चिमण्या संपल्याचा एक मोठा परिणाम होता. हे लवकरच चीनमधील जनतेला लक्षात आलं.

कीटक हे चिमण्यांचं अन्न आहे. चिमण्याच नाहीशा झाल्या, तर कीटकांची संख्या वाढत जाईल हे सगळ्यांनाच लक्षात आलं. १९६० साली चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला. या दुष्ष्काळाच्या अनेक कारणांपैकी चिमण्यांचा नायनाट करणं हेदेखील एक मुख्य कारण होतं.

या दुष्काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. चिमण्या संपवून टाकण्याचा निर्णय मनुष्याच्या जीवावर उठू शकतो असा विचार कुणीही केला नव्हता. मात्र हा एक चुकीचा निर्णय फारच धोकादायक आणि जीवघेणा ठरला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?