' कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट...

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : पार्थ बावस्कर

===

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.”

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेंचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला.

पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

“पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!”

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

“प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?”

– असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकरांनी!

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘केसरी’चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील. आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून! ‘केसरी’चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच्या कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरु झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’ अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूंच्या धारा कोणत्या, हे समजेना. अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

“लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन! आमचे मन तुमच्या स्वाधीन! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन! लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते! लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे!

४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूंच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?…

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले?”

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने. फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

“जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धरण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

“टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

“टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्षं झाले. टिळक जाऊन १०० वर्षं झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन!

‘लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक’ हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो. लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?