' चीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश!

चीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चीनचा असा एक प्रांत आहे जिथे मुस्लिमांना दाढी वाढवायची परवानगी नाही. जिथे मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालायची परवानगी नाही. असा प्रांत जिथे रमजानमध्ये मुस्लिमांना रोझा ठेवता येत नाही. असा प्रांत जिथल्या मुस्लिमांवर मार्क्सवादी चीन सरकार गेली 50 वर्ष अन्याय अत्याचार करतंय.

असा प्रांत जो कधी काळी स्वतंत्र देश होता आणि ‘रिपब्लिक ऑफ चायना’मध्ये जबरदस्तीनं सामील केला गेला. असा प्रांत जिथे तुम्ही मुसलमान आहात म्हणून तुम्हाला नोकरीच्या संधी नाकारल्या जातात.

जगाच्या पाठिवर चीन असा एकमेव देश असेल जिथे तुम्ही जन्मानं मुस्लिम असणं पाप आहे.

खरं तर या प्रांताविषयी पेपरामध्ये अधून-मधून बातम्या येत असतात. बॉम्बस्फोटांमुळे, धार्मिक दंगलींमुळं चीनचा सतत धुमसणारा प्रदेश म्हणून याची ओळख…

असा हा सतत अस्वस्थ असलेला प्रांत म्हणजे चीनच्या वायव्येकडचा शिनजियांग प्रदेश.

 

xinjiang province of kashmir marathipizza
muslimnews.co.uk

प्रशासकीय आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं चीनचा सर्वात मोठा प्रांत. असा प्रांत ज्याची सीमारेषा आठ देशांना भिडते – मंगोलिया, रशिया, कझाकिस्तान, किरगीस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत (पाकव्याप्त काश्मिर). असा प्रदेश ज्याची लोकसंख्या 2 कोटींपेक्षा अधिक आहे, ज्यातील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम आहे.

18 व्या शतकात पहिल्यांदा चीनी सम्राटांची सत्ता या प्रदेशावर आली. पण चीन देशात या प्रदेशाचा समावेश माओनं केला. शिनजियांग प्रांतामधल्या संघर्षाचं मूळ कारण वांशिक आहे. हान विरुद्ध बिगरहान असा वांशिक संघर्ष. बिगरहानपैकी बहुतांश लोकसंख्या उईगूर वंशाची. उईगूर वंशातील बहुतांश लोकसंख्या मुस्लिम (सगळी नाही!). उईगूर विरुद्ध हान असा वांशिक संघर्ष सुरु झाला जेव्हा हा प्रांत जबरदस्तीनं चिनी साम्राज्यात घुसवला गेला.

मार्क्सवादी क्रांतीनंतर 1949 माओनं शिनजियांग प्रांतात सैन्य घुसवलं. तिबेटप्रमाणेच शिनजियांग प्रांतात चीनी सेना जबरदस्तीनं घुसली आणि त्यांनी हा प्रांत रिपब्लिक ऑफ चीनला जोडला तो आजपर्यंत तसाच आहे! पण त्यानंतर इथले मूळचे रहिवासी असलेल्या उईगूर मुस्लिमांची जाणीवपूर्वक गळचेपी करायला मार्क्सवादी चीन सरकारनं सुरुवात केली. चीनमधील बलाढ्य हान वंशियांच्या वसाहती या प्रदेशात वसवल्या गेल्या.

या वसाहतींना सरकारी संरक्षण देण्यात आलं. हान समाजाचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यानं साहजिकच डेमोग्राफी (धार्मिक लोकसंख्येचा समतोल) बदलत गेली. 1950 मध्ये शिनजियांगमध्ये उईगूरांची (मुस्लिम) संख्या जवळपास 90 टक्के होती, तीच आजघडीला 50 टक्क्यांहून कमी झालीय.

पाकिस्ताननं कट्टर इस्लामिक संघटनांना काश्मिरात मोकळं सोडून ज्याप्रमाणे काश्मीरची डेमोग्राफी बदलली किंवा झिओनिस्ट चळवळीद्वारे जेव्हा आणि जशी इस्रायलची निर्मिती झाली त्यातलाच हा प्रकार!

तुर्किश भाषेशी उईगूर भाषेचं कमालीचं साम्य आहे. मध्य आशियाई मुस्लिम आणि विशेषत:  तुर्कीशी हा वंश आपलं नातं सांगतो. 18 व्या शतकात पहिली चीनी राजवट या देशानं अनुभवली होती. त्यानंतरही पूर्व तुर्कस्तान म्हणून शिनजियांग प्रांत हा स्वतंत्र देश अस्तित्वात होता. चीनची Protectorate होता असं म्हणूयात. पण ज्याप्रमाणे सैन्य घुसवून जसं तिबेट चीनला जोडण्यात आलं तसाच हा देशही जोडण्यात आला. देशाचा प्रांत झाला!

कम्युनिस्ट चीन देशाचा भाग झाल्यानंतर या प्रांतातील उईगूर मुस्लिमांवर भाषिक आणि धार्मिक बंधनं येऊ लागली. चिनी भाषा, लिपीची सक्ती झाली. नोकरीसाठी चिनी येणं आवश्यक करण्यात आलं. उईगूरांचं प्राबल्य कमी करण्यासाठी जबरदस्तीनं हान वंशियांच्या वसाहती वसवण्यात आल्या. इस्रायलनं गाझा पट्टीत अशाच ज्यूंच्या वसाहती वसवल्यात. विशेषत: जगभरातील विस्थापित ज्यू जे इस्रायलच्या आश्रयाला जाऊ इच्छितात त्यांना इथे वसवण्यात येते. अशा वसाहतींना पूर्णत: लष्करी (पोलिस नव्हे) संरक्षण असते. चीननंही तेच केलं.

तेव्हापासूनच चीन सरकारविरुद्ध स्वातंत्र्य चळवळी या प्रांतात जोर धरु लागल्या. या चळवळींना जोर तेव्हा आला जेव्हा शेजारच्या सोव्हिएत युनिअनची शकलं पडली. सोव्हिएत युनियअनची शकलं पडू शकतात तर मग बलाढ्य चीनची का नाही अशा विचारांनी जगभरातल्या मुस्लिम राष्ट्रांनी उईगूर मुस्लिमांच्या स्वातंत्र्यलढ्याला खतपाणी घालायला सुरुवात केली.

जोरजबरदस्तीनं झालेल्या सामीलीकरणाच्या क्षणांपासूनच इथले उईगूर मुसलमान हे स्वत:ला चिनी समजत नाहीत. ते शिनजियांगला पूर्व तुर्कस्तान असा स्वतंत्र देश मानतात. चीन सरकार लष्करी दडपशाहीनं या भागात सत्ता गाजवतं!

शिनजियांगच्या अनेक प्रांतात मुस्लिम अल्पसंख्य होत जात आहेत. जाणीवपूर्वक हान वंशियांचं स्थलांतर चीन सरकार करतंय. सत्तेच्या चाव्या हानवंशीयांच्याच हातात आहेत. नोकरीमध्ये हान वंशियांना प्राधान्य दिलं जातं. उईगूर मुस्लिमांना दुय्यम प्रकारच्या नोकऱ्या कराव्या लागतात. खुद्द शिनजियांगची राजधानी उरुम्कीमध्ये हानवंशीयांचं प्राबल्य आहे.

स्वत:च्याच भूमीत अल्पसंख्यांक होत जाण्याचा प्रवास उईगूरवंशीय अनुभवत आहेत. त्यामुळं चीन सरकारच्या दडपशाहीविरोधात इथे 50 हून अधिक वर्ष असंतोष धुमसतोय.

 

china-muslim-marathipizza01
bbc.com

स्वतंत्र तुर्कस्तानच्या मागणीसाठी बहुतेकदा इथं शांततापूर्वक आंदोलन होतात. तिआनमेन चौक ते अगदी बिजिंग ऑलिम्पिकदरम्यानही चीनपासून स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन झाली. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी बरीच आंदोलन कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण कम्युनिस्ट चिनी सरकारच्या अनेक बंधनांमुळं याला आवश्यक अशी प्रसिद्धी मिळत नाही. आंदोलनं दडपली जातात. शक्यतो चिघळवली जातात आणि दोष उईगूर मुस्लिमांवर घातला जातो.

चीनमध्ये कुठेही घातपात झाला तरी कुऱ्हाड उईगूर मुस्लिमांवर कोसळते…!

ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक चऴवळ हा जहाल गट शिनजियांग प्रांतात सक्रीय आहे. चीनच्या अनेक भागात हा गट घातपाती कारवाया करुन हानवंशियांना टार्गेट करतो असा आरोप चीन सरकार करतं. मात्र आजवर एकाही हल्ल्याची जबाबदारी या गटानं स्वीकारलेली नाही. अमेरिकेनंही ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक चऴवळीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केलंय. अत्यंत क्रूर संघटना असं या संघटनेचं वर्णन केलं जातं.

मात्र मुस्लिम ब्रदरहूडच्या भावनेनं पाकव्याप्त काश्मिरमधले अनेक दहशतवादी गट उईगूर मुस्लिमांच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करतात. चीन सरकारविरोधातल्या इस्लामिक दहशतवादी गटांच्या कारवाया खुद्द पाकिस्तान सरकारही थांबवू शकलं नाहीये!

अफगाणिस्तानमधल्या अनेक दहशतवादी संघटनांचा शिनजियांग प्रांतात घडणाऱ्या घातपाती कारवायांमागे हात असतो. त्यामुळं शिनजियांग प्रांतात लष्करी राजवट असल्यासारखंच चित्र आहे. शिनजियांग प्रांतात अनेक मुस्लिम संघटनाही सक्रीय आहेत. चीन सरकारवर धार्मिक आणि सांस्कृतिक दहशतवादाचा या संघटनांचा नेहमीच आरोप असतो.

बॉम्बस्फोट, धार्मिक दंगलींनी शिनजियांग प्रांत नेहमीच धुमसत असतो. दाढी वाढवणं, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणं, बुरखा घालणं, रमझानमध्ये रोजा पाळणं अशा अनेक धार्मिक विषयात चीन सरकारचा हस्तक्षेप असतो आणि त्यामुळं उईगूर मुसलमानांचा प्रचंड राग चीनी सरकारवर आहे.

पण चीननंही शिनजियांगचा प्रश्न आजवर धूर्ततेनं हाताळलाय.

एकीकडे चीनमध्ये धार्मिक गळचेपी, शिनजियांगमध्ये लष्करी राजवट तर दुसरीकडे चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कोरिडोरच्या माध्यमातून पाकिस्तानला कुरवाळणं, पाकिस्तानवर आणि भारत-विरोधी दहशतवादी गटांवर आर्थिक गंगाजळीची बरसात करणं अशा अनेक चालींमुळं शिनजियांग प्रांताचा प्रश्न बऱ्याच अंशी निकालात लागलाय.

दुसरीकडे दुटप्पी-चीन सरकार शिनजियांगमधील जनता कशी राष्ट्रभक्त आहे हे सांगण्यात मग्न दिसते, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर शक्य तेवढं ऑल इज वेलचं चित्र रंगवताना दिसते. तुटेपर्यंत ताणायचं पण तुटू द्यायचं नाही असं भलतंच धोरण उईगूर मुस्लिमांविषयी चीन सरकारनं स्वीकारलंय.

भारताविरोधी दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानला मदत, ईशान्य भारतात लुडबूड, नक्षलवादाला खतपाणी घालण्यासाठी आर्थिक गंगाजळी असे अनेक फास भारताविरोधात चीननं आवळलेत. त्यामुळं शिनजियांग प्रांत भारताच्या दृष्टीनं सामरिकदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येईलच. अर्थात भारतीय गुप्तचर यंत्रणाही गप्प बसत नाहीत, मात्र प्रत्येक गोष्ट उघडही करता येत नाही!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?