' स्त्रियांचं जगणं हराम करणारा “हरम” : मुघलांचा विचित्र, भावनाशून्य प्रकार – InMarathi

स्त्रियांचं जगणं हराम करणारा “हरम” : मुघलांचा विचित्र, भावनाशून्य प्रकार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात कितीतरी मुघल शासक होऊन गेले. आजही त्यांनी बांधलेले गडकिल्ले त्यांच्या कहाण्या सांगतात. गोवळकोंडा किल्ला असो किंवा कुतुबमिनार. सगळीकडे मुघलांनी आपली छाप ठेवली आहे.

सन १५२६ ते १७०७ पर्यंत मुघलांचे शासन भारतावर होते. तो एकछत्री अंमल नव्हता. वेगवेगळे मुघल राजे होते ते आपापल्या राज्याचे भार संभाळत होते. या सर्वांनी केवळ भारतावर राज्यच केलं असं नाही तर काही वेगळ्या चांगल्या गोष्टीपण केल्या.

मुघलांमुळे आपल्याला फारसी अरबी भाषा माहीत झाल्या. सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली असेल? तर मुघल होते म्हणूनच शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकले. ते नसते तर कदाचित स्वराज्याची गरज वाटलीच नसती. महान नायकाने जन्म घेण्यासाठी खलनायक लागतात – तसंच काहीतरी!

मुघल साम्राज्य हा इतिहासप्रेमी आणि संशोधक लोकांसाठी खूप वेगळा विषय आहे. मुघलकालीन कला, बांधकाम स्थापत्यशास्त्र हे खरोखर बारकाईने अभ्यासावे असे आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा एक अभ्यासाचा विषय आहे की मुघलांनी भारताला काय वेगळेपण दिले?

त्याकाळात हरम हा एक वेगळाच विषय होता. हा शब्द आपण कमीच ऐकला असेल. हरम म्हणजे जिथे शाही स्त्रिया रहात असत त्याला हरम असे म्हटले जाई.

 

mughal harem im

 

आपल्या मराठा साम्राज्यात जसा राणीवसा असायचा तसाच हा मुघल बादशाहांचा राणीवसा किंवा याला जनानखाना असं म्हणून आपण ओळखतो. या ठिकाणी कोणत्याही पुरुष माणसास येण्याची मुभा नव्हती.

हरम म्हणजे शाही महालात असलेली गुप्त खोली. अरबी भाषेत या शब्दाचा अर्थ आहे वर्जित क्षेत्र किंवा पवित्र जागा, पण खरोखर ही जागा पवित्र होती का? हा एक वेगळा विषय होईल.

अबुल फझल हा अकबराच्या दरबारी नवरत्नांपैकी एक होता. त्याने ऐने अकबरी या पुस्तकाचे लेखन केले. तो लिहितो, मुघल साम्राज्यातील प्रत्येक बादशहाने आपल्या महालात राजस्त्रीयांसाठी हरम बनवला होता.

त्याच्या मते, याची सुरुवात बाबरने केली. पण त्याची खरी सुरुवात अकबराने केली असं पण एक मत आहे.

कारण बाबर, हुमायून यांना चारपेक्षा जास्त बायका आणि कित्येक अंगवस्त्रे म्हणून ठेवलेल्या रखेली होत्या. त्यामुळे ते एका जागी हरम बनवू शकले नव्हते.

अकबराची गोष्ट वेगळी होती. अकबराने एखाद्या स्त्रीशी लग्न केलं, तर ते कायमसाठी असे. त्याने कधीही राणीवशात आलेल्या स्त्रीला तलाक दिला नव्हता. त्यामुळे असं मानलं जायचं, की अकबराच्या हरममध्ये स्त्री पालखीत बसून यायची आणि तिरडीवरून जायची.

अकबराबाबत असा एक प्रवाद मानला जातो, की तो अतिशय स्त्रैण होता. त्याला एखादी मुलगी दिसली ती आवडली तर तिला तो हरममध्ये आणायचाच.

काही राजकीय सोयीसाठी त्याने एखाद्या सामान्य दिसणाऱ्या मुलीशी लग्न केलं तर ती नाममात्र पत्नी असायची. तिला कधीही अकबराच्या बिछान्यावर जायला मिळत नसे. आपल्या सगळ्या इच्छा मारून ती मुलगी त्या हरममध्ये तडफडत आपलं आयुष्य ढकलायची. ती जगली काय मेली काय याची दाद फिर्याद पण कुणी घेत नसे.

त्या हरममध्ये फक्त किन्नर लोकांनाच प्रवेश असायचा, कारण त्यांच्यापासून या स्त्रीयांना कसलाही धोका नसायचा, पण त्या किन्नरांना तिथली दासी स्पर्शपण करू शकत नसे. अगदी मायेने पण तिने त्या किन्नरांना स्पर्श करायची मुभा त्यांना नव्हती.

हरमचं बांधकाम एकदम कलात्मक असायचं. तिथे असलेलं वातावरण अतिशय सुगंधी आणि चमकदार ठेवलं जायचं. बादशहा येणार म्हटलं, की आधीच सुगंधी असलेल्या या महालात अजून सुगंध पसरवला जायचा.

अंघोळीसाठी वापरायच्या द्रव्यात त्या त्या ऋतूनुसार केवडा, गुलाब अशा सुगंधी द्रव्यांची रेलचेल असायची. त्याला मालिश करून या स्त्रिया अंघोळ घालत. मग नृत्य गायन अशा कला होत.

बादशहाच्या शेजारी बेगम बसत असे. आणि मदिरेचे चषक रिते होत. हा सारा खेळ मध्यरात्रीपर्यंत चालायचा आणि मग ते शय्यागृहाकडे जात, पण त्यावेळी एखाद्या देखण्या दासीकडे बादशहा आकृष्ट झाला आणि त्याने तिच्याबरोबर रात्र घालवायची इच्छा व्यक्त केली, तर ती अर्थातच पूर्ण व्हायचीच.

 

mughal harem im2

 

यावर राणीने तोंड वाईट करणे, धुसफुसणे रागावणे असे काहीही प्रकार करणे वर्ज्य होते. थोडक्यात सांगायचं, तर हरम हा एक सोनेरी पिंजरा होता. तिथे फक्त महिलाराज होतं.

सम्राटाची नजर आपल्यावर जावी म्हणून अतिशय विकृत खेळ्या खेळायला पण या स्त्रिया मागेपुढे पाहत नसत. अनारकली आणि जहांगीर यांची कथा वाचली तर या कपटी बायकांच्या मनोवृत्तीचा अंदाज नक्की येईल.

कल्पना करा, दिवसभर या बायका त्या हरममध्ये काय करत असतील? प्रत्येक कामासाठी दासी असायच्या. छान आवरून बसायचं? ते कुणासाठी?

बादशहा येईल तेव्हा येईल. तोवर त्या सारीपाट खेळत असतील, बुद्धिबळ खेळत असतील, त्या काळात मनोरंजनाची काय साधने होती? आता मोबाईल आहे, टीव्ही आहे, पुस्तके वाचून कसाही वेळ घालवता येतो, पण गर्दीत हे एकटेपण कशा सोसत असतील त्या बायका? मोठ्या लोकांची मोठी दु:खं!

 

mughal harem im1

 

पती म्हणून असलेला बादशहा हजार बायकांनी घेरलेला. कधी त्याची मर्जी असेल तेव्हा वाटणीला यायचा. या बायका पुढे बादशहा मेल्यावर पुनर्विवाह पण करू शकायच्या नाहीत म्हणजे ती परवानगी नव्हतीच. त्यांनी उर्वरीत आयुष्य सोगगारमध्ये ढकलायचं असा नियमच होता.

या हरम मध्य बायकांचं आयुष्य हराम करायची ताकद होती. बादशहा दरमहा भत्ता द्यायचा, त्यात या बायका आपल्या गुलामांचे पगार, कपडेलत्ते, दागदागिने सारे काही या बायका घेऊ शकतील अशी सोय होती.

जहांगीरच्या काळात पण हे हरम होतेच पण औरंगजेबाच्या काळात मात्र हे पूर्ण बंद झाले. कारण औरंगजेब काही रसिक माणूस नव्हता, पण त्यामुळे निदान बायकांची कुचंबणा तरी थांबली हे ही नसे थोडके.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?