' जंगल सत्याग्रह आणि रा.स्व. संघ – लेखांक १ : निर्बंधभंगाची धामधूम – InMarathi

जंगल सत्याग्रह आणि रा.स्व. संघ – लेखांक १ : निर्बंधभंगाची धामधूम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले

===

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने स्वातंत्र्यलढ्याचा मागोवा घेतला जाणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या दुहेरी योगानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील ‘सविनय निर्बंधभंग’ या चळवळीशी संघाच्या संबंधाचा आढावा घेणे उचित होईल. या लेखमालेतील सर्व तपशील प्रामुख्याने रा.स्व.संघाच्या अभिलेखागारातील मूळ कागदपत्रांवर, समकालीन वृत्तपत्रांवर आणि राजपत्रांवर आधारलेला आहे.

संघाचे योगदान जवळजवळ शून्य पण संघस्वयंसेवकांचे योगदान लक्षणीय!

‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय?’ या सर्वसाधारण प्रश्नाचे उत्तर प्रथम द्यायला हवे. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान जवळजवळ शून्य पण संघस्वयंसेवकांचे योगदान लक्षणीय’ असे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे. या उत्तराने अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. या उत्तरातील मर्म समजून घेण्यासाठी प्रथम संघनिर्माते डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि पर्यायाने संघाची मनोभूमिका थोडी विस्ताराने समजून घ्यावी लागेल.

 

dr-hedgewar-inmarathi03
संघनिर्माते – डॉ. हेडगेवार

‘स्वातंत्र्य कधी आणि कसे मिळेल?’ हा प्रश्न सर्वत्र विचारला जात असता ‘आपण परतंत्र का झालो आणि आपले स्वातंत्र्य अबाधित कसे राहील?’ या प्रश्नाचे मूलभूत चिंतन डॉक्टरांनी केले, इतकेच नव्हे तर त्यावर उपाय आरंभिला. ‘नैमित्तिक’ आंदोलनात्मक काम आणि राष्ट्रनिर्माणाचे ‘नित्य’ कार्य यांतील विवेक डॉक्टरांनी सदैव जपला. मुळात अशी आंदोलने करण्याचा प्रसंगच उद्भवणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणे हे डॉक्टरांचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते. आग लागली की त्या ठिकाणी संघाने ती विझवण्यासाठी पाण्याचे बंब पाठवून तात्पुरता उपाय करावा हे त्यांना मान्य नव्हते. हिंदू समाजाची आंतरिक शक्ती वाढविण्यावर त्यांचा सारा भर होता.

डॉक्टरांच्या भूमिकेमागे आणखी एक मूलभूत विचार होता. ‘संघ आणि समाज’ यांत कोणत्याही प्रकारचे द्वैत डॉक्टरांना मान्य नव्हते. संघ ही आर्य समाज, रामकृष्ण मिशन, प्रार्थना समाज अशा संस्थांसारखी पृथक संघटना नाही. संघ ही हिंदू समाजाच्या अंतर्गत संघटना नसून हिंदू समाजाची संघटना असल्याची संघनिर्मात्याची धारणा होती.

त्यांचे हे अनोखे, मूलगामी चिंतन दोन घटनांवरून स्पष्ट व्हावे.

हैद्राबाद संस्थानातील ८५.५% असलेल्या हिंदूंवर निजाम राजवटीत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध १९३८ साली नि:शस्त्र प्रतिकार आंदोलन सुरू करण्यात आले. त्या वेळी काही हिंदुत्वनिष्ठांची नाराजी पत्करूनही डॉक्टरांनी आंदोलनात जावयाला अनुमती देणारी पत्रे संघशाखांना पाठविली नाहीत. तर ज्यांनी इच्छा प्रदर्शित केली त्यांना व्यक्तिशः पत्रातून धन्यवाद देऊन डॉक्टरांनी त्यांचे अभिनंदनच केले. “रा.स्व. संघाचा स्वयंसेवक म्हणजे हिंदू समाजाचा एक घटकच, त्याने संघात येताना आपल्या समाजघटकत्वाचा काही राजीनामा दिलेला नसतो. तेव्हा हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाने अशा चळवळीबाबत जे करणे आवश्यक ते करण्यास स्वयंसेवकही मोकळाच आहे” अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली (रा.स्व. संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\Register 1 DSC_0056).

संघटनात्मकदृष्टया संघ तटस्थ राहिला असला तरी निजामविरोधी आंदोलनाला पुरेशा संख्येत प्रतिकारक पुरविण्याची काळजी डॉक्टरांनी घेतली. महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेचे कार्यवाह शंकर रामचंद्र दाते हे या आंदोलनाशी अगदी सुरूवातीपासून जोडले गेले होते. मे १९३८ मध्ये डॉक्टर हिंदू युवक परिषदेसाठी पुण्याला आलेले असताना दाते यांनी त्यांची भेट घेऊन निदान पाचशे प्रतिकारक उभे करणे कसे आवश्यक आहे यासंबंधी बोलणे केले.

“पाचशे लोक सत्याग्रहात भाग घेण्यासाठी पाठवायचे एवढेच ना, त्याची काळजी नको. बाकीचे तंत्र तुम्ही सांभाळा” हे डॉक्टरांनी आत्मविश्वासाने आणि सहसंवेदनेने काढलेले उद्गार दाते यांच्या कायम स्मरणात राहिले. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr Hedgewar Athavani 2 0001-A to 0001-D).

‘संघ काही करणार नाही, देशभक्तीचा संस्कार घेतलेले संघस्वयंसेवक आपले पृथक संस्थात्मक अस्तित्व न जपता समाजघटक म्हणून स्वाभाविकपणे देशहिताचे काम करतील’ हा डॉक्टरांचा विश्वास होता. त्याप्रमाणे अनेक संघ अधिकाऱ्यांनी आणि सामान्य स्वयंसेवकांनी ‘समाजघटक’ म्हणून आंदोलनात भाग घेतला. या आंदोलनासाठी फेब्रुवारी १९३९ मध्ये सातारा आणि दक्षिण महाराष्ट्र संस्थानांसाठी स्थापन झालेल्या युद्ध मंडळाचे अध्यक्ष सातारा जिल्हा संघचालक शिवराम विष्णू उपाख्य भाऊराव मोडक तर मंडळाचे एक सदस्य महाराष्ट्र प्रांत संघचालक काशिनाथ भास्कर उपाख्य काका लिमये होते (केसरी, १७ फेब्रुवारी १९३९). हिंदू महासभेचे नेते ल.ब. भोपटकर यांच्या नेतृत्वाखालील २०० प्रतिकारकांच्या तुकडीला निरोप देण्यासाठी दि. २२ एप्रिल १९३९ ला शनिवारवाड्यावर झालेल्या विशाल प्रकट सत्कार सभेत डॉक्टर व्यासपीठावर होते (केसरी, २५ एप्रिल १९३९). शिवाय भोपटकरांच्या तुकडीला निरोप देण्यासाठी डॉक्टर दुसऱ्या दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर गेले होते. या आंदोलनात भाग घेणाऱ्या शेकडो संघस्वयंसेवकांमध्ये स्वतः डॉक्टरांचा चुलत बंधू वामन हेडगेवार हाही होता. त्याला चार दिवस अंधारकोठडीत मारहाण करण्यात आली (केसरी, ९ जून १९३९).

त्या आधी एप्रिल १९३७ मध्ये पुण्यात झालेल्या सोन्या मारुती सत्याग्रहाच्या प्रसंगी डॉक्टरांचा हाच विचार प्रकट झाला होता. नजीकच्या तांबोळी मशिदीमधील नमाजात व्यत्यय येतो म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने सोन्या मारुती मंदिरासमोर वाद्ये वाजविण्यास बंदी घातली होती. या आज्ञेच्या निषेधार्थ पुण्यातील हिंदूंनी त्यावेळी सत्याग्रह केला होता. त्यावेळी काही जणांनी पुण्यात आलेल्या डॉक्टरांना प्रश्न केला, “सत्याग्रहात संघ काय करणार?” त्यावर,

“हा सत्याग्रह सर्व नागरिकांचा आहे. तेव्हा शेकडो स्वयंसेवक त्यात नागरिक म्हणून भाग घेत आहेत. पण संघाचे स्वयंसेवक म्हणून ओळखले जाणे आवश्यक असेल तर त्या प्रत्येकाला शिंगे लावतो.”

– असे मार्मिक उत्तर डॉक्टरांनी दिले होते. त्या सुमारास डॉक्टरांनी भिंतीवर शोभेसाठी लावावयाची वनगायीची शिंगे नागपूरला नेण्यासाठी विकत घेतली होती, त्याचा संदर्भ या उत्तरात डोकावला होता (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes – 5, 5_141). डॉक्टरांनी स्वतः या सत्याग्रहात भाग घेऊन लाक्षणिक अटक करवून घेतली होती. पण संघटना म्हणून संघाला त्या सत्याग्रहात गुंतविण्यास त्यांनी नकार दिला होता.

डॉक्टरांनी स्वतःच घालून दिलेल्या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आढळून येतो. ‘साम्राज्यांतर्गत स्वराज्य’ या संकल्पनेवर घुटमळत असलेल्या काँग्रेसने डिसेंबर १९२९ च्या लाहोर काँग्रेसच्या वेळी ‘स्वातंत्र्य’ हेच आपले ध्येय निश्चित केले आणि दि. २६ जानेवारी १९३० हा दिवस ‘पूर्ण स्वराज दिन’ असा पाळला जावा असे आवाहन केले.

सुरुवातीपासून ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ हेच ध्येय उराशी बाळगणाऱ्या डॉक्टरांना अत्यानंद झाला. “रा.स्व. संघाच्या सर्व शाखांनी ता. २६/१/३० या दिवशी आपापले संघस्थानी आपापल्या शाखेच्या सर्व स्वयंसेवकांची सभा भरवून राष्ट्रध्वजाचे म्हणजे भगव्या झेंड्याचे वंदन करावे, व्याख्यान रूपाने सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे काय व तेच ध्येय आपल्यासमोर ठेवणे हे प्रत्येक हिंदवासियाचे कसे कर्तव्य आहे हे विशद करून सांगावे व काँग्रेसने स्वातंत्र्याच्या ध्येयाचा पुरस्कार केल्याबद्दल तिचे अभिनंदन करून समारंभ आटपावा’ असे निर्देश दिले (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, A Patrak by Dr. Hedgewar to the swayamsevak – 21 Jan 1930).

डॉक्टरांची ही भूमिका समजल्यास ‘संघाने काय केले’ हा प्रश्न मुळातच निकाली लागतो. आता जंगल सत्याग्रहाची पार्श्वभूमी समजून घेऊ.

सविनय निर्बंधभंगाची चळवळ

भारताची भावी राज्यघटना कशी असावी हे गोलमेज परिषद बोलावून किंवा मध्यवर्ती विधिमंडळात ठरावयास पाहिजे होते. पण असे न करता भारतीय लोक स्वराज्यास पात्र आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी ब्रिटिश सरकारने दि. ८ नोव्हेंबर १९२७ ला सायमन आयोगाची घोषणा केली. त्याला सर्वत्र विरोध झाला. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळांवर तसेच सरकारी समित्यांवर बहिष्कार, कर भरण्यास नकार यासह सविनय निर्बंभंगाच्या कार्यक्रमाची घोषणा महात्मा गांधींनी डिसेंबर १९२९ च्या लाहोर काँग्रेसला केली. त्या घोषणापत्रात पुढील उल्लेख होता,

“आमच्या लोकांकडून मिळणारा महसूल आमच्या उत्पन्नाच्या सर्वस्वी प्रमाणाबाहेर आहे. आमचे सरासरी प्रतिदिन उत्पन्न सात पैसे (दोन पेन्सहून कमी) आहे आणि आम्ही भरत असलेल्या अवजड करांचा वीस टक्के हिस्सा शेतकरीवर्गाकडून मिळणाऱ्या जमिनीच्या महसुलातून येतो. गरिबांना सर्वाधिक जाचक ठरणाऱ्या मिठावरील करातून तीन टक्के हिस्सा येतो” (आर.सी मजुमदार, हिस्ट्री ऑफ द फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया खंड ३, फर्मा के एल मुखोपाध्याय, प्रकाशन वर्ष नाही, पृ. ३३१).

दि. १४ ते १५ फेब्रुवारी १९३० ला झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकारी समितीने सविनय निर्बंधभंग पुकारण्याचा अधिकार गांधींना दिला. चोवीस दिवसांत २४१ मैलांचे अंतर कापत गांधी आणि त्यांच्या सोबत असलेल्या ७९ सत्याग्रहींनी दि. ६ एप्रिलला दांडी येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेले चिमूटभर मीठ उचलले आणि मिठाचा निर्बंध मोडला. या आंदोलनाने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. आता देशभरात ठिकठिकाणी लोक कढईत समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करू लागले. निर्बंधभंग केला म्हणून देशभरात साठ हजार लोकांना अटक करण्यात आली (मजुमदार, पृ. ३३८, ३३९).

जंगल सत्याग्रह

मिठाच्या सत्याग्रहाचे पडसाद मध्य प्रांत आणि वऱ्हाडात उमटले. मध्य प्रांताचे मराठीभाषक आणि हिंदीभाषक असे दोन भाग होते. मराठीभाषक भागात नागपूर, वर्धा, चांदा (वर्तमान चंद्रपूर) आणि भंडारा जिल्हे होते. तर हिंदीभाषक भागाचे नर्मदा (निमाड, हुशंगाबाद, नरसिंहपूर, बेतूल आणि छिंदवाडा जिल्हे), जबलपूर (जबलपूर, सागर, दमोह, सिवनी आणि मंडला जिल्हे) आणि छत्तीसगढ (रायपूर, बिलासपूर आणि दुर्ग जिल्हे) असे तीन विभाग होते. अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा हे जिल्हे वऱ्हाडात होते.

वऱ्हाडात दहीहंडा (जि. अकोला) आणि तेथून पाच किमी अंतरावर असलेल्या भामोड (जि. अमरावती) येथील खाऱ्या विहिरींच्या पाण्यापासून मिठाची निर्मिती सर्वप्रथम १३ एप्रिल १९३० ला करण्यात येऊन दि. १३ मे १९३० पर्यंत वऱ्हाडातील मिठाचा सत्याग्रह चालला (के.के .चौधरी संपादक, सिव्हिल डिसोबीडियन्स मूव्हमेंट एप्रिल-सप्टेंबर १९३० खंड ९, गॅजेटियर्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार, १९९०, पृ. ८७३, ९२१). तथापि, मिठागरे नसलेल्या आणि समुद्रापासून दूर असलेल्या मध्य प्रांत व वऱ्हाडसारख्या प्रांतांनी दुसरे जाचक निर्बंध मोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

सन १९२७ चा ‘इंडियन फॉरेस्ट्स ऍक्ट’ वऱ्हाडातील लोकांना आणि विशेषकरून शेतकऱ्यांना अतिशय जाचक झाला होता. हा कायदा होण्यापूर्वी लाकूडफाटा, सरपण आणि चारा यांच्यावर निर्बंध अगर कर नसे. परंतु जंगलाची वाढ आणि संरक्षण करण्याचे निमित्त करून सरकारी नियंत्रण सुरू झाले आणि ही स्थिती पालटली. शेतकऱ्यांच्या सोयीकडे दुर्लक्ष करून सरकारी तिजोरी भरण्याचे खात्याने धोरण स्वीकारले. मुक्या जनावरांचे अन्न महाग आणि दुर्मीळ झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यातच अधिकाऱ्यांच्या अरेरावीची भर पडली. या अन्यायाविरुद्ध लोकांनी सरकारकडे तक्रारी केल्या. परिषदा भरवून ठराव पास करून ते सरकारकडे पाठविले. प्रांतिक विधिमंडळातून लोकप्रतिनिधींनी या विषयाला वाचा फोडली परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. निर्बंधभंगाशिवाय दुसरा उपाय उरला नाही म्हणून माधव श्रीहरी उपाख्य बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली वऱ्हाड युद्धमंडळाने जंगलचा निर्बंधभंग करण्याचे ठरविले. जंगलाच्या बंद भागातील गवत बिगरपरवाना कापून आणणे एवढेच निर्बंधभंगाची स्वरूप होते. निर्बंधभंगाचे क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील पुसद ठरले आणि प्रारंभ दिन १० जुलै १९३० हा ठरला (चौधरी, पृ. ९५७).

हिंगणघाटचा दरोडा

देशात असे वातावरण असताना डॉ. हेडगेवार काय करत होते? ऑगस्ट १९०८ पासून सरकारी गुप्तचरांचा ससेमिरा डॉक्टरांच्या मागे होता. संघ सुरू झाल्यावरही तो चालूच होता. सन १९२६ ला नागपूर आणि वर्धा अशा दोन्ही ठिकाणी संघशाखा उत्तम चालू लागल्यानंतर पंजाबमधील उरलेली पण मूळ मध्य प्रांतातील डॉक्टरांच्या क्रांतिकार्यातील माणसे व साहित्य आणण्याची योजना करण्यात आली. ही योजना दत्तात्रय देशमुख, अभाड आणि मोतीराम श्रावणे या डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी आखली व १९२६-२७ या काळात क्रियान्वित केली. या कामी डॉक्टरांचे क्रांतिकार्यातील सहकारी गंगाप्रसाद पांडे यांचा पुढाकार होता. निरवानिरव झाल्यावर गंगाप्रसाद १९२७ च्या सुमारास आजारी पडल्याने वर्ध्याला येऊन राहिले. त्यांनी स्वसंरक्षणासाठी बाळगलेले पिस्तुल त्यांच्या स्नेह्याच्या हाती गेले. सन १९२८ मध्ये हिंगणघाट (जि. वर्धा) येथील स्थानकावर सरकारी थैली लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यात पिस्तुलाचा उपयोग करण्यात आल्याची वार्ता वृत्तपत्रांत आली. हे पिस्तुल आपलेच हे ओळखून गंगाप्रसाद यांनी ते आपल्या स्नेह्याकडून परत आणले.

या पिस्तुलाचे धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचतील हे ओळखून डॉक्टर घटनेच्या तिसऱ्या दिवशी त्यांचे उजवे हात म्हणून विख्यात असलेले वर्ध्याचे हरी कृष्ण उपाख्य आप्पाजी जोशी (मध्यप्रांत काँग्रेसचे कार्यवाह, अ.भा . काँग्रेस समितीचे सभासद, वर्धा जिल्हा संघचालक) यांच्याकडे गेले. दोघे रात्री गंगाप्रसाद यांच्या घरी गेले. तेथे टपून बसलेल्या गुप्तचराला डॉक्टरांनी चोप दिला आणि दोघेजण ते पिस्तुल घेऊन अंधारात पसार झाले.

इथून पुढे डॉक्टर व आप्पाजी यांच्या घरावर, ते जातील त्या संघशाखेवर व हालचालींवर कडक पहारा बसला. लोकांना त्यांच्या घरी फिरकण्याची भीती वाटू लागली. सन १९३० च्या प्रारंभी डीएसपीने आप्पाजींना भेटीला बोलाविले. “तुम्ही काँग्रेसमध्ये असून तुमचे लोक सत्याग्रहात भाग न घेता शाखेवर जातात. तरुण आहेत, जहाल आहेत. डॉक्टरांचे क्रांतिकारकाचे नेतृत्व आहे. तरी (सत्याग्रहात तुम्ही) भाग घेत नाहीत यावरून त्यांना अहिंसा मान्य नाही असा सरकारला संशय का न व्हावा? साऱ्या वस्तू तुमच्याजवळ आहेत व तशी इन्फॉर्मेशन आहे” असे डीसीपीने आप्पाजींना सांगितले. “हे जर खरे असेल तर पहारा ठेवून आमच्याजवळ असलेले सामान सापडेल काय? हा काय तमाशा चालविलेला आहे तो थांबवा” असे प्रत्युत्तर आप्पाजींनी डीसीपीला दिले.

 

Appaji Joshi RSS Shrirang Godbole InMarathi
आप्पाजी जोशी

 

याचा परिणाम म्हणून डॉक्टर आणि आप्पाजींवरील कडक पहारा उठला. बाहेरचा अभियोग पूर्ण होऊन आरोपींना शिक्षाही झाल्या. आपण आता क्रांतिकारक नाही हे सरकारला दाखविणे आवश्यक होते. आपण जंगल सत्याग्रहात भाग घेण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतल्याचे आप्पाजींनी फेब्रुवारी १९३० मध्ये डॉक्टरांना हाती पत्रातून कळविले. संघाच्या अधिकारी शिक्षण वर्गानंतर पाहू असे डॉक्टरांनी उत्तर पाठविले. वर्ग संपल्यानंतर आप्पाजींनी पुन्हा प्रश्न काढला. आप्पाजींची प्रकृती व काम ही कारणे देत डॉक्टरांनी लगेच होकार दिला नाही. आप्पाजींनी पुनः पत्र लिहिल्यावर मात्र डॉक्टरांनी लगेच होकार दिला. दोघांनी भेटून सत्याग्रहाला जाण्याचे ठरविले (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes – 5 5_84-91).

(अपूर्ण)

(पुढील भागाची लिंक : जंगल सत्याग्रह आणि रा. स्व. संघ: लेखांक २ : सरसंघचालकपदाचा त्याग

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?