' पावसाळ्यात फिरायला जाताना या ८ गोष्टींची काळजी न घेणं धोक्याचं ठरू शकतं – InMarathi

पावसाळ्यात फिरायला जाताना या ८ गोष्टींची काळजी न घेणं धोक्याचं ठरू शकतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वैशाख संपत येतो, उन्हाळ्याची काहिली काही कमी होत नाही, तापलेल्या सार्‍या जीवांना एकच प्रतीक्षा असते ती म्हणजे पावसाची… आणि मग… एक उनाड दिवस येतो, गार वारे वाहू लागतात आणि “तो” येतो.

अचानक धो धो पाऊस कोसळायला लागतो. अचानक आत्तापर्यंत भूमिगत असलेल्या बेडकांची ड्युटी सुरु झाल्याने ते प्रगट होउन डरांव डरांव सुरु करतात.

अवघा सभोवताल असा फुलतो आणि घरोघर वर्षाविहाराचे प्लॅन सुरु होतात.निरनिराळी पुस्तके, वर्तमानपत्राच्या पुरवण्या, वेबसाईट, पावसाळी सहलींच्या आणि फोटोंच्या वार्तांकनाने सजतात, नवीन लोकेशन्स सर्च होतात.

हटके लोकेशन्स बघण्याचा हट्ट होतो मग एखाद्या जोडून आलेल्या सुट्टीला किंवा वीकएंडला कुटुंबीय एखाद्या गाडीत बसून धबधब्याकडे, कॉलेज गोअर्स एखाद्या गड-किल्ल्याकडे आणि जेष्ठ नागरिक एखाद्या पठारावर सहलीचे आयोजन करतात.

 

rain im

 

उत्साहात वर्षा सहलींचे आयोजन होते. पण मित्रांनो बरेचदा उत्साहाच्या भरात आपण काही महत्वाच्या गोष्टी नजरेआड करतो, ज्या पावसाळी सहलीला जाताना करणे गरजेचे असते.

उत्साहाच्या भरात काही गोष्टींचे भान ठेवले जात नाही आणि मग दुर्दैवी बातम्या येऊ लागतात. धबधब्यातून पडून मृत्यू, एखाद्या पाण्याच्या लोढ्यांबरोबर वाहून गेलेली व्यक्ती, धुक्यात वाट चुकून एखाद्या डोंगरावर किंवा गडावर अडकलेले युवक, एखाद्या कड्यावरुन पाय घसरुन झालेले दुर्दैवी मृत्यू… एक ना दोन , मन विषण्ण करणार्‍या या बातम्या.

खरेतर थोडी काळजी घेतली तर शंभर टक्के हे सर्व अपघात टाळता येतात. कसे? चला पाहुयात,

१) पावसाळी सहल आखताना आपल्यासमोर दोन पर्याय असतात १) आषाढ २) श्रावण. पावसाच्या या पूर्वार्धात थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे.

उत्तरार्धात मात्र तेच पावसाळी सौंदर्य जास्त चांगल्या पध्दतीने अनुभवता येते.एन पावसातील ट्रेक किंवा सहलीचे नियोजन करताना खुप काळजी घेतली पाहिजे. जेथे जायचे त्या ठिकाणाची सखोल माहिती असणे फार गरजेचे आहे.

त्याकरीता विविध वेबसाइट वर शोधून सम्बंधित ठिकाणा बद्दलची माहिती गोळा करावी. तेथे जाऊन आलेल्या दो-चौ जणांशी बोलून तेथील मार्गाबद्दल चौकशी करावी, फ़ोटो पहावे, नकाशा पहावा, वाटेवरील खाणा खुणांची माहिती घ्यावी व आपल्यासोबत येत असलेल्या इतर सवंगड्यांना ती द्यावी. भटकंतीला जायच्या ठिकाणचा, पायथ्याच्या वाडीतील एखाद्या गावकऱ्याचा संपर्क क्रमांक आपल्याकडे असावा.

२) पावसाळ्यात शक्यतो सोप्पी श्रेणी असलेले गड किल्ले अथवा घाटवाटांची निवड करावी. ज्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करावे लागत असेल अथवा जेथे दरड कोसळण्याची शक्यता असते अथवा दरड कोसळून अपघात झाल्याचा इतिहास असतो अश्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे.

वाटांचा अंदाज घेउनच ट्रेक करावेत. ट्रेक प्लॅन करताना, नेहमी “प्लॅन बी” तयार ठेवावा. हाच काळ अनेक पक्षांचा आणि प्राण्यांचा प्रजननकाळ असतो. त्यामुळे बहुतेक अभयारण्ये पर्यटकांच्या वावरासाठी बंद केलेली असतात. सहाजिकच अश्या अभयारण्याच्या परिसरात असलेलया गड, किल्ल्यांना भेट देणे टाळावे.

३) पावसाळ्यातील चिखलामुळे निसरड्या झालेल्या वाटेमुळे तसेच रॉकपॅचवर शेवाळ साठल्यामुळे शक्यतो अवघड गड किल्ल्याच्या वाटेला जाऊ नये.

बर्‍याचदा आपण जाणार असू त्या गडाच्या किंवा धबधब्याच्या वाटेत ओढे असतात. त्यातील पाण्याचा अंदाज घेऊन किंवा स्थानिक लोकांची मदत घेऊन योग्य जागी ओढे ओलांडावेत.

 

torna fort IM
commons.wikimedia.org

क्वचित जाताना पाणी कमी असले तरी एनवेळी पडणार्‍या पावसामुळे अचानक ओढ्याची पातळी वाढून धोकादायक परिस्थिती होते. अशावेळी पाणी ओसरण्याची वाट बघणे हिताचे असते. अशावेळी दोरखंड, प्लास्टिकची ताडपत्री, चाकू आशा वस्तु देखील सोबत ठेवाव्यात.

अंधार पडायच्या आधी पायथ्याला पोहोचण्याचा प्रयत्न करावा. उशीर झालाच तर अंधारात वाट शोधण्यासाठी (टॉर्च) असलेला बरा.

४) पावसाळ्यातील एन भरात वहाणारे धबधबे पाहून भान हरते. याच मनस्थितीत काही वेडी साहसे केली जातात. बरेच धबधब्याचे वेगळ्या अँगलने फोटो काढण्याच्या नादात नसलेल्या वाटांनी चढायचा प्रयत्न करतात.

चिखल भरलेल्या वाटांनी चढणे जरी सोपे असले तरी उतरणे प्राणघातक ठरू शकते. जर ट्रेकसाठीचा प्रवास सार्वजनिक वहानाने केला जाणार असेल तर कदाचित एन वेळी दरड कोसळ्याने रस्ता बंद होउन वहातुक बंद होऊ शकते हे लक्षात ठेवूनच नियोजन करावे. स्वत:चे वाहन असल्यास ते सुस्थितीत आहे का ते तपासून घ्यावे. शक्यतो दुचाकीवरून प्रवास टाळावा.

५) सरत्या पावसात बिळात पाणी जाउन उन्हे खाण्यासाठी बाहेर आलेल्या सापांची बर्‍याचदा गाठ पडते. साप दिसला कि लगेच घाबरुन जाण्याची गरज नाही तसेच त्याला मारायला जाण्याची घाईही करु नका.

शक्य झाल्यास साप विषारी किंवा बिनविषारी आहे ते ओळखायला शिका यामुळे ट्रेकमधे पुरेसा सावधपणा बाळगता येईल. सह्याद्री परिसरात याच काळात जळवांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. यासाठी बरोबर हळदीची पुडी बाळगणे सोयीचे . तसेच साबण बरोबर असल्यास साबण लावलेल्या पायावर जळवा टिकत नाहीत.

६ ) सहलीसाठी सॅक पॅक करताना एका मोठ्या जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत सर्व सामान पॅक केलेले चांगले. एकच भली मोठी पाण्याची बाटली घेण्यापेक्षा दोन बाटल्या असाव्यात जेणेकरून बॅग मधील सामानाचा तोल सांभाळला जाईल.

कॅमेरा कापडात गुंडाळून ठेवण्यापेक्षा कॅमेरा बॅग मध्ये नेहमी आर्द्रता शोषून घेणाऱ्या सिलिका जेल च्या पुड्या ठेवाव्यात मोबाईल ट्रेकमधे तर अपरिहार्यच. ट्रेकला जाताना मोबाईल पुर्ण चार्ज आहे याची खात्री करावी. तसेच दुर्गम भागात बहुतेकदा रेंज नसते, तिथे शक्य तितका कमी वापर करावा. कितीही स्मार्ट म्हणले तरी मोबाईलची बॅटरी वेगाने संपते.

७ ) ट्रेकसाठी घातले जाणारे कपडे विशेषतः पावसाळ्यात हि फार महत्वाची गोष्ट आहे. शक्यतो पटकन वाळतील असे कपडे असावेत, कपड्यांचा जादाचा जोड बरोबर असावा. पावासाळी ट्रेकमधे बुट घालावे कि न घालावे याचे उत्तर हे आहे की यासाठी चांगली ग्रीप असलेल्या सँडल वापराव्यात.

 

trekking-inmarathi
thefortsofsahyadri.blogspot.com

८ ) पावसाळयातील बदलत्या वातावरणात कधी कुणाची तब्येत बिघडेल सांगता येत नाही. सर्दी ताप तर नेहमीचे आजार आहेत. त्यामुळे ग्रुप मधील एक अथवा दोन व्यक्तींकडे औषधांचा साठा असावा. प्रथमोपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तर उत्तम.

पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणात तहान लागत नाही परंतू चालल्यामुळे, चढल्यामुळे शरीरातील पाणी वापरले जाते. अशावेळेस पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन पायात वात येण्याचा संभव असतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे.

तेव्हा मित्रांनो सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून जर पावसाळी भटकंती केलीत, तर तुम्ही पावसाचा आणि निसर्गाचा आनंद सहज लुटू शकता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?