' प्रेमाने पाळलेला कुत्रा हिंसक होऊ नये यासाठी काळजी घेताय ना? – InMarathi

प्रेमाने पाळलेला कुत्रा हिंसक होऊ नये यासाठी काळजी घेताय ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : – सुचिकांत वनारसे

===

पिटबुल कुत्र्याने त्याच्या मालकाच्या आईला फाडून खाल्लं! पिटबुल ही जगातील आक्रमक कुत्र्यांच्या जातींपैकी एक जात. युट्यूबवर शेकडो व्हिडिओ बघायला मिळतील. स्वतः पिटबुल समर्थक अनेक मुद्द्यांवर पिटबुलची पाठराखण करत असतात त्यामुळे तूर्तास पिटबुल चांगला की वाईट, आक्रमक की प्रेमळ या वादात पडणे मला फार महत्त्वाचे वाटत नाही कारण अगदी देशी कुत्र्यांनीसुध्दा माणसांचे जीव घेतल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत अर्थात कारणे वेगवेगळी!

लोक नेहमी काशीला गेल्याचं सांगतात, मांजर मारल्याचं सांगत नाहीत. तिथे नक्की काय घडलं, कुत्रा आक्रमक का झाला? हे आपण हजारो किमी दुरून सांगू शकत नाही. पण कुत्रा पाळतानाच्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस नक्की फॉलो करू शकतो!

पिटबुलच्या निमित्ताने…

पिटबुल असो किंवा साधा देशी कुत्रा, घरी कुत्रा पाळताना काही गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत.

१) घरातील मादी/नर कुत्र्याची नसबंदी झाली आहे का? नसेल झाली तर एकदा चांगल्या डॉ शी बोलून, कुत्र्याला दाखवून निर्णय घ्या. कुत्र्याची जात, आरोग्य, कुत्र्याची वागणूक यावरून डॉ. तुम्हाला सजेस्ट करतील.

२) तुम्ही घरातील कुत्र्याला पुरेसा वेळ देताय का? त्याला फिरायला घेऊन जाताय का? त्याला व्यायाम मिळतोय का? हे प्रश्न स्वतःला विचारा. या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतील तर आजपासूनच स्वतःमध्ये बदल घडवा. कुत्र्याला एक नवं आयुष्य द्या.

 

dog therapy IM

 

३) घरातला कुत्रा सोशलाईज होतोय का? त्याला तुम्ही नवनवीन माणसांना भेटवताय का? नवनवीन आवाज, गाड्या, गर्दी, इतर प्राणी,पक्षी यांची त्याला सवय होते आहे का? हे नसेल होत तर तुम्ही चुकताय. तुम्ही घरी आल्यावर कुत्रा जोरजोरात उड्या मारतोय, भुंकतोय, यात तुम्हाला अभिमान, कौतुक वाटत असेल तर तुम्ही चुकताय, अश्या उड्या मारताना घरातल्या वस्तू फुटू शकतात, कोणाला इजा होऊ शकते, खुद्द कुत्र्याचा पाय मोडू शकतो.

कुत्र्याच्या कोणत्या गोष्टींचं कौतुक आणि कोणत्या गोष्टी थांबवायला हव्यात यासाठी अभ्यास आवश्यक आहे. सोशलाईज झालेला कुत्रा आदर्श कुत्रा ठरेल, घरात कोंडून ठेवलेला कुत्रा नाही! घरात कोंडून ठेवलेला कुत्रा चार भिंतीत तुमच्या काही गोष्टी ऐकेल परंतु कुठेही बाहेर नेण्याच्या लायकीचा नसेल.

४) कुत्रा तुम्हाला डॉमीनेट करतोय का? करत असेल तर याची लक्षणे काय?
– तुम्ही फिरायला गेल्यावर कुत्राच तुम्हाला पुढे पुढे ओढत राहतो,
– घरात तुमच्यावर भुंकतो, चावतो!
– लहान मुलांना डॉमीनेट करतो
– मोक्याच्या जागा बळकावतो, इतर कोणाला एखाद्या ठिकाणी बसू देत नाही.
– तो जेवताना इतर कोणी जवळ गेल्यास गुरगुरतो, ई.

 

dangerous-dog feautred InMarathi

 

मग तुम्ही यावर काय उपाय केला? तुम्ही तो कुत्रा घराचा बॉस आहे हे मान्य केलं? ही चूक करू नका! तुम्ही घराचे बॉस आहात हे त्याला सांगा, जेवण करताना तुम्ही आधी जेवायचं, नंतर त्याने जेवायचं – निसर्गात कुत्री कळपात राहतात, तिथे त्यांचा एक नेता असतो, तो आधी खातो नंतर बाकीचे खातात, घरात तेच अपेक्षित आहे.

कुत्र्याला जेवण भरवू नका, त्याचं त्याला खाऊ द्या. अपेक्षित वर्तन नसेल तर वेळप्रसंगी त्याच्यासमोरचं जेवण काढून घ्या, शांत झाल्यावर खायला द्या. खाताना तुम्ही कमांड दिल्याशिवाय खाणार नाही अश्या पद्धतीने ट्रेन करा.

यात तुम्ही कोणतेही जुलूम करत नाही, हे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि कुत्र्यासाठी चांगले आहे. उद्या तुम्ही अपंग कुत्रा घरी माणुसकी म्हणून घेऊन आलात आणि अश्या काही गोष्टी पाळल्या नाहीत, तर तो अपंग कुत्रापण तुमच्यावर वर्चस्व गाजवेल! जे आपल्याला होऊ द्यायचं नाही.

कुत्र्याशी खोट्या कुस्त्या खेळा, टग ऑफ वॉर खेळा पण त्याला जिंकू देऊ नका, दरवेळी तुम्हीच जिंकायला हवं! तुम्ही प‌ॅक लीडर आहात आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहात हा मेसेज कुत्र्याला जायला हवा. तर तो तुमच्या अधिपत्याखाली राहील. ही आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे, एकदा ट्रेन केलं आणि काम झालं असं होत नाही.

५) घरात जे वीक मेंबर असतात, म्हातारे असतील किंवा लहान बाळे असतील त्यांना प‌ॅक लीडर म्हणून घोषित करणे ही उत्तम खेळी असते जेणेकरून ते सुरक्षित राहतात. प‌ॅक लीडर नेहमी पुढे चालतो, इतर कुत्री मागे चालतात, लहान बाळाची गाडी पुढे ठेवून कुत्र्याला मागे चालायला लावणे ही ट्रिक काम करू शकते(हे मी सिजर मिलानच्या शो मध्ये पाहिलं होतं) घरातील वृद्ध व्यक्तीला सर्वात आधी जेवायला दिल्याने ती मुख्य व्यक्ती आहे असा मेसेजदेखील कुत्र्याला मिळतो.

 

dog walk inmarathi
greenshirtstudio.com

जन्म माणसाचा, पण ‘कुत्रा’ बनून जगण्यासाठी या माणसाने खर्च केले १२ लाख

कुत्रे या गूढ पुलावरून उडी मारून एका झटक्यात संपवतात आपले आयुष्य!

६) कुत्र्यांचे ग्रुमिंग : हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे! यातून कुत्र्यासोबत bonding निर्माण होतं. कुत्र्याचे केस विंचरणे, नखे कापणे, त्याच्या अंगावर टीक्स, फलिज आहेत का पाहणे त्यांचा बंदोबस्त करणे, कुत्र्याचा वास येतोय का पाहणे, वेळच्या वेळी आंघोळ घालणे अश्या अनेक गोष्टी यात येतात.

कुत्रा ट्रेन करणे, त्यासाठी हजारो रुपये खर्च करणे ही फॅशन झाली आहे. मी दिल्लीत रहायचो, तिकडे पगारावर कुत्री फिरवणारी माणसे असतात, उपयोग काय? कितीही मोठा ट्रेनर बोलवला तरी त्याने शिकवलेल्या कमांड तुम्हाला रिपीट करायच्या आहेत, तुमच्या कुत्र्याला तुम्ही फिरवायचे आहे, पण तुम्ही बेशिस्त असाल, तुम्ही नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, तुम्ही आळशी असाल तर कुत्रा चूक करणारच आहे. मुळात कुत्रा चुकत नाही, मालक चुकतो. लखनौमधल्या केसमध्ये पिटबुल दोषी नसून मालक दोषी आहे.

साधारण कुत्रा उत्तम ट्रेनिंग आणि शिस्तप्रिय पालक मिळून उत्कृष्ट बनू शकतो तर लाखो रू. खर्च करून घेतलेला महागड्या जातीचा कुत्रा फेल जाऊ शकतो. आक्रमक आणि बलदंड जातीचा कुत्रा हवाय तर मग तशी जबाबदारी पण घ्या! आयुष्यात कष्ट घ्यावेच लागतील कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?