' अण्णा भाऊ साठेंच्या एका लावणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटून उठली होती!

अण्णा भाऊ साठेंच्या एका लावणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटून उठली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक महत्त्वाची चळवळ आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक उठाव, चळवळी झाल्या, पण त्या इंग्रजांच्या विरुद्ध होत्या. पण ही चळवळ थोडीशी वेगळ्या प्रकारची होती. या चळवळीमुळे दिल्लीपासून महाराष्ट्रपर्यंत सर्व राजकारण ढवळून निघाले.

१९३७-१९३८ मध्ये काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेचे आश्वासन दिले. पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका बदलली. वेगवेगळे लोक पण सर्वांची एकच मागणी, एकच मुद्दा : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे. यात केंद्राकडून दार कमिशन समिती स्थापन करण्यात आली.

मुंबईमध्ये उद्योगधंदे प्रचंड प्रमाणात इतर भाषकांचे होते व मुंबईमध्ये सर्वभाषिक लोक राहत होते. त्यामुळे मुंबई वेगळी ठेवून विदर्भासह महाराष्ट्र ठेवावा अशी बरीच मतमतांतरे होत होते. यातच समितीचा अहवाल निराशाजनक होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिकच जोर धरू लागली.

 

sanyukta maharashtra inmarathi

 

मुंबई महापालिकेमध्ये आचार्य अत्रे व भंडारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव मांडला. ८ नोव्हेंबर १९५५ रोजी त्रिराज्याचा ठराव पास झाला आणि प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पोलिसांच्या अत्याचाराने अधिक जोर वाढला होता. पुढे नेहरूंनी घेतलेला निर्णय आणखी दुर्दैवी होता. तो म्हणजे मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा! हा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर मुंबई अक्षरश: पेटलीच. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लोकांनी दिल्लीला मोर्चा काढला. मग सरकारही थोडे नरमले.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार होता. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात विचारवंतांबरोबर कलाकारही सहभागी झाले होते. सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचे महत्वाचे कार्य शाहिरांच्या पोवाड्यांनी केले. ते या लढ्यातील बिनीचे शिलेदार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कवने गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. या शाहिरांनी दिल्लीचे तख्तही हादरवले.

यातीलच एक आघाडीच नाव होते ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी, यासाठी डफावर थाप मारून ‘माझी मैना गावाकडं राहिली.. माझ्या जिवाची होतीया काहिली’ हे खुमासदार रूपक अण्णाभाऊंनी रचले. या गीतामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा अण्णाभाऊंनी जनमानसापर्यंत पोहोचवला. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात मराठी बोलीचा अस्सल बाज जागवला. या चळवळीची तीव्रता इतकी होती की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णाभाऊ साठे, अमर शेख व द. ना. गव्हाणकर यांच्या कलापथकावर तत्कालीन सरकारने बंदी घातली होती.

अण्णाभाऊंच्या काव्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार-शेतकरी वर्गाच्या स्थितीचे भेदक विश्लेषण होते. त्यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली…’ ही लावणी तर तेव्हाच्या लढ्यात स्फुल्लिंग चेतवणारी ठरली. सीमाभागातील जनतेचे दु:ख, आण्णाभाऊ यांनी या लावणीतून मांडले आहे.

 

majhi maina 2 IM

 

‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली’ ही लावणी माहीत नाही असा एकही माणूस निदान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले.

तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्वच प्रकारात लेखन केलं. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते.

पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचे आहे.

त्यांनी १९४४ ला `लाल बावटा` पथक स्थापन केलं आणि बघता बघता ते शाहीर झाले. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांची ख्याती आपल्या पोवाड्यातून पार रशिया पर्यंत पोहोचवली. पुढे त्या पोवाड्याचं रशियन भाषेमध्ये भाषांतर झालं आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.

 

annabhau sathe IM

 

१६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी है देश कि जनता भुकी है” असा भर तूफान पावसात ते शिवाजी पार्क वर नारा देत राहिले. अण्णाभाऊ यांच्या नुसत्या लेखणीत कामगार वर्गासाठी माया नव्हती तर ते त्यांच्या साठी रस्त्यावर उतरून लढत होते.

अण्णाभाऊंच्या बहुतेक लावण्या ह्या त्यांच्या लोकनाट्याच्या कथानकाची गरज म्हणून निर्माण झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला प्रश्नोत्तरातून त्यांची लावणी आकारास आलेली दिसते.

‘माझी मैना गावावर राहिली’ ही लावणी त्यांनी छक्कड या सहा ओळींच्या एका विभागात लिहिलेली आहे. ही लावणी रूपकात्मक आहे संयुक्त महाराष्ट्राच्या अभूतपूर्व लढ्यानंतरही महाराष्ट्राला मिळू न शकलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग या भागातील जनता म्हणजे मैना होय.

या मैनेच्या विरहामुळे शाहीर व्याकूळ होतो ते शाहिराचे मन यातून व्यक्त झाले आहे. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही हे भाग मिळविण्यासाठी सर्वांना एकजुटीचे आवाहनही त्यांनी केले ते म्हणतात, “आता वळू नका । रणी पळू नका। कुणी चळू नका। बिनी मारायची अजून राहिली। माझ्या जिवाची होतिया काहिली.”

‘मैना रत्नांची खाण ।

माझा जीव की प्राण

नसे सुखाची वाण ।

तिच्या गुणांची छक्कडच गायिली ।

माझ्या जीवाची होतीया काहिली।’

अखेर मुंबई महाराष्ट्राची झाली. महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारली. एवढे सारं घडलं तरी अंतरीची तगमग थांबत नाही. मराठी माणसाची मैना गावाकडेच राहिलीय!

बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव व इतर मराठी प्रदेशाची झाली आहे. सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या लावणीत अण्णा भाऊंनी बेकीबद्दल असलेली चीड आणि एकीची असलेली गरज मंडळी आहे. म्हणून शिवशक्तीला शाहीर विनवणी करून आपलं मैनेचं कवन लावणीरूपात पुरे करताना म्हणतात

‘आता वळू नका । रणि पळू नका । कुणी चळू नका । बिनी मारायची अजून राहिली । माझ्या जीवाची होतीय काहिली…।’

 

annabhau sathe 2 IM

 

अण्णांनी पोवाडे, लावण्या, किसानगीते, मजूर गीते, छक्कड, गण लिहिले तसेच लोकनाट्येही लिहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या लोकनाट्यांनीही चळवळीत मोठी धमाल उडवून दिली. तमाशातील झगडा या लावणीच्या प्रकाराचा उपयोग अत्यंत कुशलतेनी त्यांनी करून घेतला.

महाराष्ट्राची अस्मिता जागती ठेवण्यासाठी अण्णांनी घराकडे दुर्लक्ष करून लढ्याला सर्वस्व वाहिलं. नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तमाशाचा ढाचा बदलला. पूर्वीचे पारंपरिक अध्यात्म, पौराणिकता, आख्यानवजा स्वरूप बदलले.

माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा असा चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग, धग आहे. जनतेची कदर करणारा कलावंत आहे. त्यांचे साहित्य वैचारिक असून, त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे.

बहुजन चळवळीचे नायक आहेत. अण्णा भाऊ ‘दलित कथेचे शिल्पकार’ आणि ‘जय भीम, लाल सलाम’ संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. ‘माझा रशियाचा प्रवास’मधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली. संयुक्त महाराष्ट्राच्या रूपाने त्यांच्या या समर्पणाची इतिश्री झाली. ते खरे लोककवी होते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?