' तब्बल ११ वेळा निवडून येणाऱ्या निरलस गणपतराव देशमुखांची पडद्यामागची कहाणी

तब्बल ११ वेळा निवडून येणाऱ्या निरलस गणपतराव देशमुखांची पडद्यामागची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

समाजकारण किंवा राजकारण करतो म्हणून येत नसते ते रक्तातच असावे लागते. हे दाखवून दिले आहे एका खर्‍या लोकमानसात रुजलेल्या, शेतकरी आणि कामकरी लोकांचा नेता म्हणून बिरुद मिरवलेल्या, सलग ११ वेळा आमदार होवून रेकॉर्ड करणार्‍या आणि ‘ओके’ आमदाराला धूळ चारणार्‍या एका आदर्श नेत्याने!! आणि ते होते ‘गणपतराव देशमुख’, महाराष्ट्रातील दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या सांगोल्याचे आमदार.

पुण्यात विद्यार्थी दशेत असतानाच गणपतराव देशमुख यांच्यावर शेकापचे मोरे, जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले.

निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून ते शेतकरी कामगार पक्षाच्या झेंडय़ाखाली राजकारणात आले आणि पुढे मृत्यूपर्यंत त्यांचे पक्षासोबतचे बंध कायम राहिले. १९६२ साली सांगोला मतदारसंघातून ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले.

 

ganpat im 1

 

या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरा वेळा ते निवडून आले. परंतु गणपतराव यांची ओळख या आकडेवारीहून खूप मोठी आहे. सार्वजनिक जीवनातील आपले सबंध आयुष्य सभ्यता, साधी राहणी आणि मानवी विचारांची कास धरून जगलेला हा नेता. आपल्या ५२ वर्षे आमदारकीचा बहुतांश काळ ते विरोधी बाकावर बसले.

राजकीय महत्त्वाकांक्षेतून ना त्यांना कधी शेकापसारखा छोटा पक्ष सोडावा वाटला ना कुणा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जावे वाटले. कधीतरी एकदा आमदार बनलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ता, संपत्ती, डामडौल, पेहराव,भाषा यात पडत जाणारा बदल हा जनतेच्या नित्य अनुभवाचा असताना गणपतराव या राजकीय पटावर तब्बल ५२ वर्षे तसेच साधे सामान्यांमधले राहिले. मोटारी, बंगले, पुण्या-मुंबईत सदनिका, नातेवाईकांचे सत्तेचे जाळे असा कुठलाही मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही.

१९६२ साली मंत्रालयात येण्यासाठी एसटीची पायरी चढणाऱ्या या लोकनेत्याने शेवटपर्यंत याच सरकारी वाहनाने प्रवास केला. प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी राहिल्याने त्यांना सर्वाधिक निवृत्ती वेतन मिळत होते. परंतु ही सारी रक्कम त्यांनी पुन्हा समाजासाठी वापरली. आमदार म्हणून मिळणाऱ्या वर्तमानपत्रांची रद्दी विकून ती रक्कम पुन्हा सरकारदरबारी भरणारा हा नेता होता.

१० ऑगस्ट १९२६ साली जन्मलेल्या या नेत्याचे कर्तुत्व वर्षांमध्ये आणि काळामध्ये मोजता येण्यासारखे नव्हतेच. पेशाने वकील असलेले गणपतराव वकिली व्यवसाय सोडून समाजकार्याकडे व राजकारणाकडे वळले होते. १९५० पासून विद्यार्थिदशेत असताना ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी १९९०,२००४ व२००९ साली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले होते.

 

vidhansabha IM

 

आयुष्यभर त्यांनी आपला वेळ, आपली राजकीय ताकद जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालविली होती. जनमानसात आबासाहेब म्हणून परिचित असलेल्या गणपतरावानी दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे यासाठी कायम संघर्ष केला.

तत्त्वनिष्ठ राजकारणामुळे त्यांनी शेकाप पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विचार केला नाही. त्यामुळे नेहमी विरोधी बाकावर असणारे गणपतराव (आबा) तालुक्याच्या टेंभू, म्हैसाळ, नीरा-उजवा इत्यादी पाणी योजनांचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी शेवटपर्यंत पाणी परिषदा, पाण्यासाठीचे आंदोलने, मेळावे घेत राहिले.

कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता. त्यातही गणपतरावांचा सक्रिय सहभाग होता. टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला.

तालुक्याला पाणी मिळावे यासाठी आयुष्यभर झटणारे आबासाहेब चळवळीतील खरे ‘पाणीदार आमदार’ म्हणुनही ओळखले जावू लागले. जनसामान्यांसाठी विविध वेळेला केलेल्या आंदोलनामुळे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता अशा रीतीने गणपत आबा दोनवेळा मंत्री झाले होते. मंत्रिपद गेल्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला.

 

sharad pawar IM

 

आमदार असूनही ते नेहमी एसटीने प्रवास करत होते. एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखले जाते. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीही देशमुख यांचं कौतुक केलं होतं.

अकरा वेळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचा दहावेळा निवडून येण्याचा विक्रम मोडला होता. त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीमुळे त्याना महाराष्ट्र विधान मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार, वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब पाटील समाज भूषण पुरस्कार,

यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, रयत माउली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार, भारती विद्यापीठ पुणे यांचा जीवन साधना गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळात ५५ वर्षाच्या कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा २०१७ मध्ये सन्मान झाला होता. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला होता.

 

ganpat im

भाजपचा विरोध पत्करून बाळासाहेब प्रतिभा पाटीलांच्या पाठीशी उभे राहिले होते

एका नेत्याची हत्या झाली आणि शिवसेनेला पहिला आमदार मिळाला

३० जुलै २०२१ रोजी ९४ वर्षांचे असताना पित्ताशयाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ‘राजकारणातील एक पिढी संपुष्टात आली’ असे वाटण्यामागे, त्यांचे ९४ वर्षांचे वय, एवढे एकच कारण नव्हते. त्यांच्या जाण्याने राजकारणात सभ्यता, साधेपणा आणि काही वैचारिक चौकट बाळगत जगणाऱ्यांची एक पिढी संपुष्टात आली.

सध्याच्या राजकारणात राजकारणातून कधीच हरवलेली सचोटी, सभ्यता, साधेपणा लोकांच्या प्रश्नांसाठी सतत झगडणारा, त्यांच्या जगण्याशी समरस झालेला नेता ही दुर्मिळ झालेली गोष्ट त्यांच्या जाण्याने आता जवळपास संपुष्टात आली आहे. अशा “जनसामान्यांचा लोकनेता” म्हणून ओळखल्या जाणार्‍या माननीय गणपतराव देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातून शेतकरी, कष्टकरी यांचा खरा आवाज हरपला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?