' प्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा! – InMarathi

प्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक –  आदित्य कोरडे
===

 

bebi-nanda-marathipizza01

 

ओळखलंत का हा फोटो कुणाचा आहे?

ही आहे बेबी नंदा.

बेबी नंदा हे नाव ऐकलं तर कदाचित काही जुन्या माणसांचेच डोळे स्मृतीच्या कवडशांनी चमकू लागतील. बाकीच्यांना ती नंदा म्हणूनच माहित. मास्टर विनायक ह्या मराठीतल्या अत्यंत नावाजलेल्या अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याची ती मुलगी. त्यांच्याच अनेक चित्रपटात ती बाल कलाकार – बेबी नंदा म्हणून चमकल्यामुळे त्याकाळी ती ह्या नावानेच प्रसिद्ध झाली. माझे आई बाबा नेहमी तिला बेबी नंदा म्हणत. त्यामुळे मला सुद्धा तिचा उल्लेख करताना बेबी नंदा म्हणायचीच सवय पडली. इतकी कि कुणी नंदा म्हटले तर तो नक्की कुणाबद्दल बोलतो आहे, ह्याचा मला संभ्रम पडे.

(तीच गोष्ट बेबी शकुंतलाची. खरंतर हि अत्यंत सौंदर्यवती मराठी अभिनेत्री पण तिने लवकर लग्न करून चित्रसंन्यास घेतला. ती बहुधा तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. रामशास्त्री मधली तिची लहानपणच्या रामशास्त्र्याच्या बायकोची भूमिका आणि ‘दोन घडीचा डाव’ हे गीत इतके गाजले कि नंतर तिचा उल्लेख कायम बेबी शकुंतला असाच होत राहिला)

 

babi-nanda-marathipizza02
बेबी शकुंतला आणि राम मराठे

 

मास्टर विनायक आणि त्यांची हंस पिक्चर्स (आधीची ‘नवयुग पिक्चर्स’) हि त्यांच्या काळातली अत्यंत नावाजलेली नावं. ’ब्रह्मचारी’, ‘डॉ.कोटणीसांची अमर कहाणी’, ‘माया मच्छिंद्र’ असे अनेक गाजलेले सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. ते दिनानाथ मंगेशकरांचे स्नेही होते.

मंगेशकरांच्या मृत्यू नंतर त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या मंगेशकर कुटुंबाला साह्य केले आणि १३ वर्षांच्या लताला सुरुवातीच्या काळात जम बसवायला मदत केली. त्यांच्याकडेच लताने ‘पहिली मंगळागौर’ ह्या चित्रपटात काम केले होते. ह्याच चित्रपटात बेबी नंदा लताच्या लहान बहिणीची भुमिका करीत होती.

लताचे पहिले वहिले फिल्मी गीत ‘नटली चैत्राची नवलाई’ ह्याच सिनेमातले, ते बऱ्यापैकी गाजलेही पण १३ वर्षांच्या लताचा आवाज अजून खूपच कोवळा होता आणि त्याला ‘लतापण’ यायला अजून बराच वेळ आणि तयारी हवी होती.

असो… तर मराठी मास्तर विनायकांच्या नंतर त्यांच्या ह्या मुलीने अखिल भारतीय कीर्ती मिळवली. तिच्या काळात नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन अशा एका पेक्षा एक सुंदर आणि अभिनय कुशल अभिनेत्रींची चलती होती, पण त्यात सुद्धा तिने स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले. एव्हढेच नाही तर तिची कारकीर्द हि खूप मोठी (१९४८ ते १९८३) आणि नि:संशय यशस्वी कारकीर्द होती. १९४८ ते १९५६ ह्या काळात तिने बालभूमिकाच केल्या त्यासुद्धा मराठीतून.

१९५६ साली तिचे काका, ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. शांताराम ह्यांनी तिला ‘तुफान और दिया’ ह्या हिंदी सिनेमात संधी दिली. आई वारल्या नंतर अनाथ झालेल्या भावा बहिणींची ही कहाणी. त्यातली तिची लहान, अश्राप, ‘परिस्थितीशी झगडणाऱ्या भावावर’ खूप प्रेम करणाऱ्या लहान बहिणीची चटका लावणारी भूमिका इतकी हृदयस्पर्शी होती कि आज हा पिक्चर तिच्यासाठी आणि गाजलेल्या गाण्यांसाठीच ओळखला जातो.

तिला तिच्या ह्या पहिल्याच मोठ्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे फिल्म फेअर पारीतोषिकही मिळाले. ह्यानंतर आलेल्या ‘भाभी’, ‘ काला बाजार’, छोटी बहन’ मध्य परत तिने लहान बहिणीच्याच भूमिका केल्या आणि हे सगळे चित्रपट लई म्हणजे लैच चालले. नुसते चालले नाही तर नंदाच्या भूमिकाही तुफान गाजल्या.

काल परवा आलेली बेबी नंदा, बलराज सहानी, रेहमान, देवानंद अशा मातब्बर माणसांसमोर उभी राहायला कचरत तर नव्हतीच उलट ही कोल्हापूरची पोरगी त्यांच्यापुढे चांगली शड्डू ठोकून उभी राहत होती आणि कधी मधी अभिनय करताना त्यांनाच धोबी पछाडही घालत होती. (तुफान और दिया मधला राजेंद्र कुमार म्हणजे तिच्या पुढे पाला पाचोळा – तसा तो कुणापुढेही, कुणा पुढे का? असाही पाला पाचोळाच…पण ते एक असो) आता ती कायम लहान बहिणीच्याच भूमिकाच करणार कि काय! अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते.

१९६० साली आलेल्या कानून मध्य तिने राजेंद्रकुमारच्या प्रेयसी कम वाग्दत्त वधूचे काम मस्त केले होते. दिसली हि छान होती, पण छोट्या बहिणीच्या प्रतिमेचा पगडा अजून इतका होता कि तिची फारशी दाखल घेतली गेली नाही. कानून खूप चालला पण तो नाना पळशीकर, ओमप्रकाश, अशोककुमार ह्यांचे अभिनय, स्टोरीचे वेगळेपण, एकही गाणे नसणे अशा अभिनव गोष्टी आणि दिग्दर्शनामुळे.

अशात १९६१ साली आलेल्या ‘हम दोनो’ मध्ये तिने देवानंदच्या बायकोची भूमिका केली. साधना जरी नायिका असली तरी नंदाची भूमिका अगदीच दुय्यम नव्हती आणि मुख्य म्हणजे ती बहिण नव्हती.

 

babi-nanda-marathipizza03
movies.ndtv.com

 

साधना हि माझी अत्यंत आवडती नायिका, पण हम दोनो मध्ये ललिता पवार नंतर ज्याच्या अभिनयाने आपण भारावून जातो अशी नंदाच होती. (देव आनंदवर आम्ही कधीही तो छान अभिनय करतो म्हणून प्रेम केले नाही – नाहीतर त्याच्यावर प्रेम करणे अशक्यच होते. आणि त्यानेही कधी आमचा विश्वासघात केला नाही. आयुष्यभर त्याने कधीच अभिनय केला नाही. तो देव आनंदच राहिला…ते हि एक असो) आता ती अत्यंत सुंदर, मोहक दिसू लागली होती. लहान बहिणीचे निष्पाप कोवळेपण हळू हळू लोप पावत चालले होते.

पण ती कधी हि मादक, उत्तान भासली नाही. नूतन, साधना, नंदा आणि हॉलीवूडची ऑड्री हेपबर्न ह्या अशा नायिका होत्या ज्या कधीही मादक उत्तान भासल्या नाहित. म्हणूनच कि काय कोण जाणे त्या लोकांच्या (पक्षी माझ्या) मनात आजही घर करून आहेत.

१९५९ साली आलेल्या ‘बरखा’ ह्या सिनेमातले ‘ एक रात मे दो दो चांद खिले ‘ ह्या मुकेश आणि लताने गायलेल्या, राजेंद्रकृष्णाने लिहिलेल्या आणि चित्रगुप्तने संगीत दिलेल्या गाण्यात ती अशी दिसली की, त्याकाळी प्रत्येकाला आपली प्रेयसी किंवा बायको असावी तर अशीच असावी असे नक्की वाटले असणार. हे गीत श्रवणीय तर आहेच पण प्रेक्षणीयही आहे. त्यातले तिचे विभ्रम, संकोच, लज्जा केवळ अप्रतिम!

ते कशाला बघाच – एक रात में दो चांद

 

 

ह्या गाण्यात नायक अनंत कुमार – म्हणजे राम मराठे ह्यांचा भाऊ अनंत मराठे, तिच्या डोक्यावरचा पदर नीट करताना (काढताना नाही) किंचित ढळतो तेव्हा ती ज्या निगुतीने तो सावरून घेते ते पाहिलंत – आजतर नायिकाच फक्त ब्लाउज आणि मोठाला परकर – त्याला म्हणे घागरा म्हणतात घालून बोडक्या डोक्याने प्रेमाची आवस मागत फिरते. काळाचा महिमा अन काय!

१९६५ साली आलेला ‘तीन देवीया’ हा तिचा आणि देवानंदचा तिसरा सिनेमा.

ह्यात ती इतकी लोभस आणि सुंदर दिसली, की मला तर खूप टेन्शन आलं होतं कि देवानंद तिला सोडून त्या भंगार सिमी किंवा कल्पनाशी (खरेतर सिमी गरेवालचा उल्लेख करताना सिम्मी निम्मी असे लिहिणार होतो, पण निम्मी हि ह्या चित्रपटात नव्हती आणि ती खूप चांगली नायिका होती, वाक्यात पंच यावा म्हणून असा अन्याय करणे बरे नव्हे…) तर लग्न करणार नाही ना? पण देवानंदने माझी निराशा केली नाही. (म्हणूनच तर तो देवानंद आहे.)

ह्या पिक्चर मधली त्यांची हि दोन गाणी बघाच- ऐसे तो ना देखो आणि लिखा है तेरी आखों में

 

 

 

आज देखील हि गाणी पहिली कि माझ्या मनात कालवाकालव होते.

१९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ पासून तिची शशी कपूर बरोबर जोडी जमली त्याआधीही त्यांचे दोन चित्रपट, ‘चार दिवारी’ (१९६१) आणि ‘मेहेंदी लगी मेरे हाथ’ (१९६२) आले होते पण ते चालले नाहीत. ‘जब जब फुल खिले’ने इतिहास घडवला. त्यातले ‘ ये समा ..समा है ये प्यारका’ हे गीत इतके गाजले, की आजही नंदा म्हटले कि हे गाणंच डोळ्यासमोर येतं.

ह्याच साली आलेला मनोजकुमार बरोबरच ‘गुमनाम’ चालला खरं पण कौतुक मात्र हेलन आणि मेहमूदचे जास्ती झाले.

 

babi-nanda-marathipizza04

तिने जितेंद्र, राजेश खन्ना ह्यांच्या बरोबर हि कामं केली आणि त्यांच्याबरोबरचे जवळ जवळ सगळे सिनेमे गाजले. इत्तेफाक मधली तिची भूमिका निगेटिव टच दाखवून गेली. तर १९७० साली आलेल्या ‘नया नशा’ मध्ये तिने अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या स्त्रीची शोकात्म भूमिका उत्तम केली होती. पण चित्रपट फार चालला नाही बहुधा तिच्या प्रतिमेला ती भूमिका शोभली नाही (मला तसे वाटत नाही पण लोकांना तसे वाटले असणार, नाहीतर सिनेमा खूप चांगला होता (आज सलमान खानचे तद्दन भिकार पिक्चर चालतात आणि असे चांगले चालत नाहीत…लोकांची अभिरुची (हीनता) दुसरं काय! )

१९७० ते १९७४ हा हळू हळू तिचा प्रभाव आणि सौंदर्य उतरत चाललेला काळ होता. ’शोर’(पुन्हा मनोज कुमार- हाय रे कर्म) ‘जोरुका गुलाम’ (राजेश खन्ना ) ह्यांचं यश फसवं होत आणि हे तिलाही कळत होत म्हणून तिने नंतर काम करणे जवळ जवळ बंदच केलं.

१९८२ साली तिने ‘प्रेमरोग’ मध्ये केलेली कुलभूषण खरबंदाच्या पत्नीची आणि अकाली विधवा झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेच्या आईची भूमिका लक्षणीय होती.पोरीच्या काळजीने जीव तुटणाऱ्या आईची तडफड तिने फार उत्तम दाखवली होती.

तिने कधीही लग्न केले नाही. तशा प्रिया राजवंश किंवा आशा पारेख, परवीन भाभी ह्याही अविवाहित राहिल्या पण नंदा बद्दल कधीही, कुठेही, कसल्याही वावड्या उठल्या नाहीत. तिचे नाव कधी कुणाशी वेगळ्या अर्थाने जोडले गेले नाही. सिने जगतात हा एक अपवादात्मकच प्रकार आहे.

ती आणि साधना, आशा पारेख, बबिता, सायराबांनू ह्या जिवलग मैत्रिणी. त्यांनी १९९२ मध्ये तिला मनमोहन देसाईशी लग्न करण्याची गळ घातली होती आणि ती तयारही झाली होती म्हणे, पण मनमोहन देसाईने घराच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली. (… कि तो अपघात होता कोण जाणे!) आणि मग पुढे तिने कधीही केलेच नाही.

३ मार्च २०१४ ला ती वारली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले खरेखुरे शालीन सोज्वळ सौंदर्य लोप पावले.

 

babi-nanda-marathipizza05
mid-day.com

 

असे म्हणतात कि प्रत्येक मुलीच्या मनात स्वप्नाचा एक राजकुमार असतो तसेच मुलाच्याही मनात एक आदर्श प्रेयसीची प्रतिमा असते. खरं खोटं मला माहित नाही (म्हणजे प्रत्येकाच्या मनात असते कि नाही हे मला माहित नाही). माझ्या मनातली आदर्श प्रेयसी कधी नंदा तर कधी साधनाचे रूप घेऊन येते. (बायको! हे वाक्य फार मनावर घेऊ नको. लेखाचा शेवट जरा बरा व्हावा म्हणून लिहिलेलं आहे. अन्यथा तूच माझ्या स्वप्नांची राजकुमारी… नंदा शप्पथ सॉरी, आईशप्पत!)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?