' धक्कादायक! कोरोनात डोलो६५० चा खप वाढण्यामागे होता एका व्यापक प्लॅन…! – InMarathi

धक्कादायक! कोरोनात डोलो६५० चा खप वाढण्यामागे होता एका व्यापक प्लॅन…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२० आणि २०२१ या दोन वर्षांच्या ‘कोरोना’ काळात कित्येक उद्योग बुडाले तर कित्येक उद्योगांची भरभराट देखील झाली. वैद्यकीय शाखा हे इतके वर्ष सेवाभाव असलेलं क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं. पण, जेव्हा एखाद्या वैद्यकीय वस्तू किंवा सेवेची मागणी ही कोटींच्या पटीत जाते, तेव्हा त्या मागणीकडे वैद्यकीय शाखा सुद्धा ‘व्यवसाय’ म्हणूनच बघते हे आता आपल्याला पुरतं कळलंय.

पावसाळा आला की, दुकानदार जसे छत्रीचा साठा, दर वाढवतात तसंच कोरोना काळात मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन्स यांच्या बाबतीत करण्यात आलं. सामान्य नागरिक तेव्हा दवाखान्यात जागा, सेवा मिळवण्यासाठी अक्षरशः हतबल झाला होता.

बँगलोरच्या मायक्रोलॅब्स लिमिटेड या औषधी तयार करणाऱ्या खासगी कंपनीने सुद्धा कोरोना काळाकडे एक व्यवसाय संधी म्हणून बघितलं आणि त्यांनी ‘डोलो ६५०’ ही तुमच्या अंगदुखीचं निवारण किंवा तीव्रता कमी करणारी गोळी बाजारात आणली. या गोळीचा पर्याय उपलब्ध होईपर्यंत लोकांना अंगदुखीसाठी ‘कॉम्बीफ्लाम’ ही एक गोळी माहीत होती.

 

corona test 5 inmarathi

 

‘कॉम्बीफ्लाम’ची मक्तेदारी मोडायची असं मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने ठरवलं आणि त्यांनी ते सर्वकाही केलं जे इतर क्षेत्रातील कंपन्या आपल्या स्पर्धक कंपनीच्या वस्तूची मागणी कमी करण्यासाठी करतात.

आज घराघरात पोहोचलेली ‘डोलो ६५०’ ही कोरोना यायच्या आधी कोणाला माहीत देखील नव्हती आणि कोरोना नंतर प्रत्येक डॉक्टर अंगदुखी, कणकण, कमी ताप या सर्वांसाठी केवळ डोलो ६५० हीच गोळी लिहून देऊ लागले. असं का? याचा विचार करायला त्या काळात आपल्याकडे वेळ नव्हता.

कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावर कित्येक लसीकरण केंद्रांवर डोलो ६५० ही गोळी मोफत देण्यात आली होती. २ वर्ष आधी कुठेच चर्चेत नसलेली डोलो ६५० ही गोळी अचानक लोक सोबत बाळगू लागले, एखाद्या स्नॅक्स प्रमाणे घेऊ लागले. कोरोना काळात ‘डोलो क्रांती’ आणण्यासाठी मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने नेमकं कोणता मार्ग अवलंबला? जाणून घेऊयात.

 

dolo 650 inmarathi

 

मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीवर आणि त्यांच्या ४० वितरण क्षेत्रांवर आयकर विभागाची धाड पडल्यावर हे सत्य बाहेर येत आहे की, ‘डोलो’ला इतक्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी कंपनीने १००० कोटी रुपयांची तरतूद किंवा व्यवसायिक भाषेत ‘मार्केटिंग बजेट’ तयार केलं होतं. मायक्रोलॅब्सच्या वतीने भारतातील डॉक्टरांना भेटणाऱ्या विविध ‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह’ मार्फत ही रक्कम डोलो ६५० चा प्रचार करण्यासाठी वापरण्यात आली होती.

आयकर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ या संस्थेने नुकतीच ही माहिती जाहीर केली आहे. आयकर विभागाच्या झालेल्या धाडीत त्यांना १.२ कोटी रोख रक्कम आणि १.४ कोटींचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने सापडले असल्याने हा संशय अधिक बळावला गेला आहे.

आयकर विभागाने मायक्रोलॅब्स लिमिटेड कंपनीला या संदर्भात लिहिलेल्या ईमेलचं कोणतंही स्पष्टीकरण दिल्याने त्यांच्याच अडचणीत वाढ होणार असल्याचं अर्थतज्ञांनी सांगितलं आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कंपनीच्या कागदपत्रांच्या पाहणीत त्यांना डॉक्टरांसोबत झालेल्या रोख व्यव्हाराच्या नोंदी, डिजिटल व्यव्हार झाल्याचे तपशील सापडल्याने आयकर विभागाने संबंधित बँक खाती गोठवत ही माहिती जाहीर केली आहे.

मायक्रोलॅब्स लिमिटेड कंपनीने ‘सेल्स आणि प्रमोशन’च्या नावाखाली आपल्या वैद्यकिय प्रतिनिधींमार्फत डॉक्टरांना प्रवास खर्च, भेटवस्तू वाटण्यात आल्या आणि हा खर्च एकूण १००० कोटींचा झाला होता हे आता सिद्ध झालं आहे. हे पैसेच कारण होतं ज्यामुळे कोरोना काळात डॉक्टर, मेडिकल दुकानदार हे ‘डोलो ६५०’चं नाव लोकांना सुचवत गेले आणि २०२० या एका वर्षात ३५० कोटी गोळ्यांचा खप झाला.

 

gift making inmarathi

इन्कम टॅक्सचा छापा नेमका कधी, कसा, का : खूपच इंटरेस्टिंग प्रक्रिया असते ही!

औषधांच्या पाकिटावर का असते रिकामी जागा? वाचा, तुम्हाला माहित नसलेलं कारण

आयकर विभागाने जाहीर केलेल्या माहितीत हे देखील जाहीर केलं आहे की, “मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीचे एकूण ५० देशांमध्ये वैद्यकीय उत्पादन करण्याच्या कंपन्या आहेत. पण, त्यांच्या हिशोब ठेवण्यात खूप अनियमितता आढळली आहे. काही उत्पन्न हे कंपनीने दाखवले नाहीत किंवा प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा खूप कमी दाखवले. काही उत्पादन केंद्रांचा खर्च हा अपेक्षेपेक्षा अधिक दाखवण्यात आला.

मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने आयकर विभागाच्या कलम ३५ (२एबी) अंतर्गत टॅक्स वाचवण्यासाठी आपला संशोधन खर्च त्या उत्पादन केंद्राच्या उत्पादन क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक दाखवला. ही तफावत ३०० कोटी रुपये इतकी असल्याने त्याची माहिती काढणं हे आता गरजेचं झालं आहे.”

आयकर विभागाच्या ‘आयटी ऍक्ट’ मधील कलम १९४सी अंतर्गत ‘टॅक्स डिडक्शन सोर्स (टीडीएस)’चा देखील कंपनीने अवमान केल्याचं अहवालात सांगितलं आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर छोट्या उत्पादकांना टीडीएसचा परतावा न केल्याचा आरोप देखील मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीवर करण्यात आला आहे.

डोलो ६५० ही गोळी लोकांच्या अंगदुखीसाठी उपयोगी आहे. भारतीयांना बऱ्यापैकी त्याची आता सवय झाली आहे. मायक्रोलॅब्स लिमिटेडच्या अव्यवस्थित आर्थिक व्यव्हारांमुळे या गोळीचं उत्पादन थांबवलं जाऊ नये अशी इच्छा सध्या व्यक्त केली जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?