' षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं

षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

हा देश आपल्या शेतकरी बांधवांचा किंवा सैनिकांचा तसाच हा देश आपल्या वैज्ञानिकांचा असं चटकन आपल्या तोंडात का येत नाही याचं उत्तर आज माधवनचा Rocketry the nambi effect हा सिनेमा थिएटरमध्ये बघताना आला. खरंतर थिएटरमध्ये येऊन मोबाईलवर टवाळकी करत बसणारे माझ्या प्रचंड डोक्यात जातात.

काल तर चक्क थिएटरमध्ये ४५ ते ५० मधले एक काका लाऊडस्पीकरवर मोठ्याने न्यूज चॅनलवरच्या बातम्या ऐकत होते, त्यांना राष्ट्रगीत चालू असल्याचंही भान नव्हतं, ना सिनेमा सुरू झाल्याचं. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होतय तसा मनुष्य हा आणखीनच मूर्ख होत चाललाय हे या प्रसंगावरून सिद्ध झालं!

असो तर हा सिनेमा रिलीज होऊन २ आठवडे व्हायला आले तरी सिनेमाची कमाई ही अजूनही ४० करोड इतकीदेखील झालेली नाही. ज्या हिरीरीने आपण ‘द कश्मीर फाईल्स’ला सपोर्ट केला तसाच सपोर्ट या सिनेमाला कुणी का करत नाहीये याची खंत वाटली आणि आपल्या देशातले सगळे हुशार, बुद्धिवान लोकं या देशाच्या बाहेर राहणं का पसंत करतायत याचं उत्तर मिळालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरंच एक प्रेक्षक म्हणून चांगला सिनेमा बघायची आपली लायकी नाहीये हे आज पुन्हा सिद्ध झालं. मुद्दा ideology, propaganda, right left, हिंदुत्व याचा नाहीये, पण आपला भारतीय प्रेक्षक सध्या बराच गोंधळलेला दिसतोय.

त्यांना एकतर पुष्पा, KGF सारखे सिनेमे आवडतायत नाहीतर द कश्मीर फाईल्ससारखे politically charged सिनेमे आवडतायत. आणि या दोन्ही पठडीत मोडणाऱ्या सिनेमांना डोक्यावर घेऊन नाचण्याच्या नादात लोकं Rocketry सारख्या मास्टरपीसकडे सपशेल दुर्लक्ष करतायत.

 

rocketry inmarathi

 

एकीकडे आपण बॉलिवूडला शिव्या घालतोय पण त्याचवेळेस भूलभुलैया २ सारख्या सिनेमांना १७० करोड कमवून देतोय. माझ्यामते तरी सगळेच सिनेमे उत्तम असतात आणि ते उत्तम चालायलाच हवेत यात काहीच दुमत नाही पण जेव्हा Rocketry सारख्या सिनेमामागचा निर्मळ प्रामाणिक हेतू माहीत असूनही लोकं त्या सिनेमाला सपोर्ट देत नाही तेव्हा प्रेक्षक म्हणून आपण करंटे ठरतो!

आज हा सिनेमा बघताना मिक्स फिलिंग्स मनात होत्या पण सिनेमा बघून बाहेर पडल्यावर हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश समोर आला तेव्हा आपण एक भारतीय असल्याचा अभिमानही वाटला आणि शरमही वाटली.

अभिमान यासाठी की एक establish सुपरस्टार रॉकेट सायन्ससारखी क्लिष्ट गोष्ट आपल्यासारख्या सुमार बुद्धी असणाऱ्या प्रेक्षकांना समजावण्याचा प्रयत्न करतो, आणि नंबी नारायण यांच्याबाबत घडलेली गोष्ट ऐकून आपण आतून किती पोकळ आहोत, भित्रट आहोत, माणूस म्हणून किती नीच आहोत याची शरमही वाटते.

सिनेमात चुका आहेत, कोणत्या सिनेमात चूका नसतात? पण सिनेमा लोकांसमोर आणण्यामागचा हेतु साफ असेल तर त्या चुका आपण अगदी सहज नजरेआड करतो. कश्मीर फाइल्सच्या बाबतीतसुद्धा प्रेक्षकांनी हेच केलं म्हणूनच त्या सिनेमाविषयी लोकं पोट तिडकीने व्यक्त झाले आणि एक मिशन असल्याप्रमाणे त्या सिनमाला उचलून धरलं.

 

the kashmir files 1

 

माधवनच्या या rocketry बाबतीतसुद्धा मला अशीच काहीशी अपेक्षा होती पण काल थिएटरमध्ये लोकांचा निरुत्साह पाहून स्वतःला प्रश्न विचारावासा वाटला की खरंच “Do we really deserve a better cinema in this country?”

rocketry मधली नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.

ज्या माणसाने आपल्या देशासाठी नासाची ऑफर नाकारली आणि भारताला विज्ञान क्षेत्रात प्रगतीपथावर आणण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, त्याच्या देशभक्तीवर साऱ्या देशाने जे प्रश्नचिन्ह उभं केलेलं ते खरंच योग्य होतं का? याचं उत्तर द्यायचा प्रयत्न हा सिनेमा नक्कीच करतो.

याबरोबरच आपली न्यायव्यवस्था आणि नंबी नारायण यांच्याबाबतीत रचलेलं षडयंत्र हे किती पोकळ आहे, बेगडी आहे हेसुद्धा या सिनेमातून प्रभावीपणे मांडलं जातं.

अर्थात रॉकेट सायन्सविषयी आपल्याला फारसं कळत नसल्याने काही काही सीन्स आपल्याला कळत नाहीत, त्यातली तांत्रिक गोष्ट, त्यांच्या छोट्या छोट्या प्रयोगामागची वैज्ञानिकांची उत्सुकता आनंद हे आपल्याला तितकंसं कळत नाही, पण माधवनने हे रॉकेट सायन्स बरंच सोपं आणि सामान्य माणसाला कळेल अशाच स्वरूपात सादर केलं आहे.

सिनेमातली आवडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे २ तास ३८ मिनिटांच्या सिनेमात दीड तासाहून अधिक वेळ हा नंबी नारायणन यांच्या कामावर, त्यांच्या यशस्वी प्रयोग आणि मोहिमांवर लक्षकेंद्रित करण्यात आला आहे.

 

nambi narayanan IM

 

नंबी नारायण हे नाव आपल्यापैकी कित्येकांना ठाऊकही नसेल किंवा ज्यांना ठाऊक असेल ते फक्त त्यांच्याविरुद्ध रचलेल्या षडयंत्राच्या निमित्ताने लक्षात राहिलं असेल. पण हीच गोष्ट माधवनने कटाक्षाने टाळून नंबी यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या अचीव्हमेंट, त्यांनी दिलेलं योगदान यावरच जास्त प्रकाश टाकला आहे.

याच धर्तीवर आधारीत मध्यंतरी रॉकेट बॉइज नावाची एक सिरिज आली होती ज्यात विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला होता, त्या सिरिजपेक्षा कैक पटीने उत्तम असा मधवनचा rocketry जमून आलाय हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो.

नंबी यांचं आयुष्य, त्यांचं इस्रोमधील योगदान बघताना आपल्याला अभिमान वाटतोच पण जेव्हा त्यांच्यावर देशद्रोही म्हणून ठपका लागला आणि त्यांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागला ते पाहताना आपल्याला आपलीच माणूस म्हणून लाज वाटते.

ज्या पद्धतीने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा छळ करण्यात आला, तो सगळा प्रवास बघताना आपण एक समाज म्हणून किती कोत्या आणि जजमेंटल वृत्तीचे आहोत याची जाणीव झाली.

खासकरून जेव्हा नंबी आणि त्यांच्या पत्नीला भर पावसात रिक्षातून बाहेर हाकलून देण्याचा सीन तर तुमच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय रहात नाही.

कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन याबाबतीत हा माधवनचा पहिलाच प्रयत्न आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे, कारण त्याचं काम लाजवाब आहे. असे फार कमी अभिनेते आहेत जे उत्तम दिग्दर्शनसुद्धा करतात, त्यात आता माधवनचं नाव नक्कीच घेतलं जाईल.

 

r madhavan IM

 

सिनेमात पंचांगमचा उल्लेख बीप करून दाखवला आहे आणि पंचांगचं चित्रसुद्धा धूसर करण्यात आलं आहे. ही गोष्ट तेवढी महत्वाची नसली तरी ती खटकण्यासारखी आहे. सगळेच वैज्ञानिक नास्तिक नसतात, आणि विज्ञानाला अध्यात्माची जोड ही कायमच असते.

इस्रोने पंचांगाची मदत जरी घेतली असेल तरी त्यात त्यांचं contribution कमी होत नाही किंवा त्यांची हुशारि कमी होत नाही. हा मुद्दा आपली लोकं कधी समजून घेणार?

ओव्हरऑल सगळ्याच बाबतीत सिनेमा वरचढ आहे. काही क्लिष्ट गोष्टी आणि सीन्स सोडले तर हे रॉकेट सायन्स म्हणजे काय हे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यात संपूर्ण टीम यशस्वी झाली आहे.

ज्याप्रकारे दंगलच्या वेळेस आमीर खानच्या physical transformation चा गाजावाजा करण्यात आला होता अगदी तसंच trasnformation माधवनने या सिनेमासाठी केलं आहे. फरक फक्त इतकाच आहे आमीरने त्याच्या त्या गोष्टीला सेलिंग पॉइंट बनवून आर्थिक नफा कामावला आणि माधवनने सिनेमा, कथा याला सेलिंग पॉइंट ठेवून कित्येक भारतीयांची मनं जिंकली.

माधवनची राजकीय मतं आणि त्याचा हिंदू धर्मावर तसेच कर्मकांडावर असलेला विश्वास यावरून त्याला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं,  पण त्याला नेमकं काय करायचं आहे, आणि लोकांच्या बदलत्या आवडीनुसार त्यांना काय दिलं पाहीजे याची त्याला चांगलीच जाण आहे.

तब्बल ३ वर्षांनी शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर एका वेगळ्याच भूमिकेत बघताना खूप बरं वाटलं, आणि हा रोल त्याने केवळ आणि केवळ नंबी नारायणन यांच्याखातरच केला हेदेखील त्यातून स्पष्ट होतं, एकाही सीनमध्ये त्याचं स्टारडम आपल्याला दिसत नाही!

 

shahrukh khan 3 IM

 

इतरही कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. बरेच नवीन चेहेरे आपल्याला यात दिसतात पण प्रत्येकाने जीव तोडून मेहनत घेतल्याचं दिसून येतं. आणि माधवन बाबतीत काय बोलायचं. सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या ३ मोठ्या जवाबदाऱ्यांसोबतच त्याने अभिनयातसुद्धा कमाल केली आहे.

नंबी नारायणन यांचं परफेक्ट बेअरिंग, कोणत्याही prosthetic शिवाय जमून आलेला लुक आणि जिवावर बेतेल असं physical transformation असं सगळंच छान जमून आलंय. भल्या भल्या कलाकारांना एवढं सगळं एकत्र करणं शक्य नसतं जे माधवनने करून दाखवलं आहे.

शिवाय जे धाडस एकवटून ‘टीम रॉकेट्री’ यांनी हा सिनेमा आपल्यासमोर मांडलाय यासाठी त्यांचे आणि सिनेमातील सगळ्या कलाकारांचे, तंत्रज्ञानांचे आभार मानावे तितके कमीच आहेत!

 

rocketry 3 IM

 

देशासाठी एवढं मोठं योगदान देऊनही देशद्रोह्याची वागणूक कित्येक वर्षं सहन करत लढणारे नंबी नारायण जेव्हा शेवटी म्हणतात की “माझा या देशातल्या चांगल्या लोकांवर आणि चांगुलपणावर विश्वास आहे!” त्यावेळेस आपण एक नागरिक म्हणून कुठे नालायक ठरलो हे प्रकर्षाने जणावतं. त्यांचे ते शब्द म्हणजे आपल्यासारख्या कित्येक बेफिकीर लोकांच्या तोंडावर एक जबरदस्त चपराक आहे.

ही चपराक मारणाऱ्या माधवन आणि त्याच्या टीमचे मनःपूर्वक आभार!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?