' महाराष्ट्रातला हा एक बीच अख्ख्या गोव्याला भारी पडेल! – InMarathi

महाराष्ट्रातला हा एक बीच अख्ख्या गोव्याला भारी पडेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो, पूर्वी सहलीला जायचे म्हटलं, की लोणावळा, खंडाळा, माथेरान किंवा मालवण, तारकर्ली नाहीतर गणपतीपुळे आठवायचं. गोवा तर अगदी परमप्रिय ठिकाण असायचं, या सगळ्याचं कारण एकच आहे, शहरी धकाधकीत हरवलेले निसर्ग आणि शांतता! यामुळेच की काय पण आपलीही पावले नकळत अशा जागांच्या शोधत भटकतात.

काही जागा या माहिती असतात तर काही नवीन आणि अनगड असतात. आता गोव्याचाच विषय घ्यायचा झाला तर शांत , निसर्गरम्य आणि मनाला तजेला देणारे ठिकाण म्हणून गोवा सर्वांनाच आवडतो. तेथील भुरळ पाडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तेथील समुद्र किनारे जे स्वच्छ तर आहेतच पण त्या बरोबरच खिळवून ठेवणारे पण आहेत.

आता तुम्हाला जर कुणी सांगितलं, की गोव्यासारखेच समुद्रकिनारे इथे महाराष्ट्रात आहेत तर तुमची उत्सुकता नक्कीच वाढेल. मित्रांनो, गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखा आणि तेवढाच सुंदर असा समुद्रकिनारा महाराष्ट्रात आहे, तो ही अगदी सारख्या आकाराचा!

 

devghali beach im

 

हा किनारा आहे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गावातला ‘देवघळी बीच’. वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर आणि समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या झालेला विकास आदींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये राजापूर तालुक्‍यातील कशेळी गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रकाशझोतात आले आहे.

समुद्र किनारी नव्याने विकसित केलेला सनसेट पॉईंट पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यातून हौशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून कशेळी येथील देवघळी बीच वरील सनसेट पॉईंटला सध्या ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’म्हणून पहिली पसंती मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आणि मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला तालुका आहे.

समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या कशेळीला श्री कनकादित्य सूर्य मंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. यात शांत समुद्राची भर पडली आहे.

कशेळीच्या सागर तिरावरून समुद्रामध्ये बुडणाऱ्या सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्‍य अधिक रोमांचक वाटते. काही वर्षांपूर्वी या किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झालेला नसल्याने कशेळीकडे पर्यटकांचा फारसा ओढा नव्हता, मात्र दोन वर्षांपूर्वी हा भाग पर्यटनदृष्ट्या विकसित झाला.

देवघळी बीचवरील सनसेटपॉईंटही चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात आला. सनसेट पॉईंटला जाण्यासाठी चांगले रस्ते बनविण्यात आले. पथदीप, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था आदी सुविधा निर्माण केल्या.

येथे काळ्या दगडांवर बसून रौद्ररूप धारण करून फेसाळत, तुषार उडवत किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा अनुभवही सहज घेता येतो. अन्य ठिकाणचे समुद्र किनारे सपाटीवरून पाहण्याची संधी मिळते, मात्र कशेळी येथील देवघळी बीच उंचावरून पाहणे आनंदमय आहे.

कशेळीच्या सनसेट पॉईंट वरील सूर्यास्ताची अनुभूती घेण्यासाठी दरदिवशी शेकडोच्या संख्येने पर्यटक कशेळीला भेटी देतात.

रत्नागिरीकडून गोव्याकडे जाणारा सागरी महामार्ग कशेळी येथून जातो. या महामार्गावरील कशेळी बांध येथील दोन डोंगराच्या मधोमध असलेल्या खाडीकिनारा आणि त्यातील जलसाठ्याचा उत्कृष्टरित्या उपयोग करीत गावचे ग्रामस्थ सुधाकर ठाकरे यांनी पर्यटकांसाठी नौकानयन सुविधा निर्माण केली आहे.

 

devghali beach im1

 

होडी मधून फेरफटका मारत असताना होडीतूनच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्‍य अनुभवण्याची संधी मिळते.

एका बाजूला किनाऱ्यावर समुद्राचे फेसाळत येणाऱ्या पाण्याची गाज तर दुसऱ्या बाजूला उंचच्या उंच सुळक्‍यासारखे डोंगर यामध्ये स्वच्छ, शांत परिसरामध्ये फिरताना पर्यटक सुखावतो.

कशेळीबांध परिसरात झाडीमध्ये खाडीभागाच्या किनाऱ्यावर विविध जातीच्या देशी-विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते. त्यामध्ये बदक आणि बगळे प्रजातीतील पक्ष्यांचा समावेश आहे.

पक्ष्यांच्या शांत पाण्यातील जलक्रीडा अनुभवताना, किलबिलाट आणि हवेतील कसरती पाहताना मनाला आनंद मिळतो. काठावरील मोठमोठ्या झाडांवर सायंकाळी परतीच्या पक्ष्यांचे थवेही पाहायला मिळतात.

देवघळी बीच बरोबरच आणखी काही पाहण्यासारखे कशेळी मध्ये असेल तर ते आहे, ‘कनकादित्य सूर्य मंदिर.’ समुद्र्किनार्‍यापासून ३ किलोमीटर अंतरावर असणारे हे सूर्य मंदिर गावाच्या प्राचीनतेची साक्ष देते.

आदित्य म्हणजे सूर्य. भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्याचे प्राचीन मंदिर हे प्रसिद्ध व सर्वात मोठे असे देवालय आहे.

 

devghali beach im2

 

येथील सूर्यनारायणाची मूर्ती ८०० वर्षांपूर्वीची आहे. हे मंदिर पुरातन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून मंदिरातील जी आदित्यची मूर्ती आहे, ती सुमारे १००० वर्षांपूर्वी सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टण क्षेत्रात असलेल्या सूर्य मंदिरातून आणली गेली असावी.

प्रभासपट्टण हे श्रीकृष्णाचे वस्तीस्थान म्हणून ओळखले जाते. कशेळी गावी ही मूर्ती कशी आली याबद्दल काही दंतकथा प्रचलित आहेत.

काठेवाडातील वेरावळ बंदरातून कोणी एक व्यापारी माल घेऊन दक्षिणेस चालला होता. त्याच गलबतात आदित्याची मूर्ती होती. त्याचे जहाज कशेळी गावच्या समुद्र किनाऱ्या जवळ आल्यावर एकदम थांबले. ते पुढेही जाईना व मागेही जाईना.

शेवटी अनेक प्रयत्नानंतर त्याच्या मनात असे आले, की जहाजावर जी आदित्यची मूर्ती आहे तिला येथेच स्थायिक होण्याची इच्छा आहे. मग त्याने होडीमधली ती मुर्ती उतरवून कशेळीच्या किनाऱ्यावर आणून ठेवली.

कशेळीच्या समुद्र किनाऱ्यावर एक नैसर्गिक गुहा काळ्या दगडाच्या खडकात निर्माण झालेली आहे. त्या गुहेतच त्या व्यापार्‍याने ती मूर्ती आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज लगेचच सुरू झाले.

कशेळीला कनका नावाची सूर्योपासक राहत असे. तिला ही मूर्ती समुद्रावरील गुहेत ठेवल्याचे स्वप्न पडले स्वप्नात आलेले सूर्यनारायण तिला म्हणाले की, मी समुद्र किनाऱ्यावर येऊन राहिलो आहे, तू मला गावात नेऊन माझी स्थापना करून मंदिर बांध.

कनकाबाईने नंतर गावकऱ्यांना बोलावून ही हकिकत सांगितली. ग्रामस्थ मंडळींना समुद्रावर जाऊन तपास करताना तेथील गुहेत ही मूर्ती दिसली. त्यांनी नंतर समारंभपूर्वक वाजत गाजत मुर्ती गावात आणली.

पुढे कनकेने गावकर्यांच्या मदतीने मंदिर बांधून तिची स्थापना केली. मूर्ती ज्या गुहेत सापडली त्या गुहेला “देवाची खोली” किंवा देवघळ असे नाव नंतर पडले.

 

kanakaditya temple im

 

मंदिरात प्रवेश करताच जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांच्या सुंदर कोरलेल्या मूर्ती दिसू लागतात. लाकडी खांबावर वेलबुट्टी, नक्षी, विविध देवतांच्या लाकडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत.

यामध्ये षडानन, वरूण, श्रीकृष्ण, वायू, मेंढ्यावर स्वार झालेला अग्निनारायण आदी देवता आहेत तर समुद्रमंथनासारखे प्रसंगही कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या द्वारावर शेषशायी विष्णूची भव्य लाकडी प्रतिमा असून शेजारी गरुड व लक्ष्मी आहेत. वरती दशावतार आहेत.

मंदिरात खुद्द कनकादित्याची काळ्या पाषाणातील अप्रतिम मूर्ती असून त्याच्या साठी खास चांदीचा रथ आहे. कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा ताम्रपट आहे.

तांब्याचे जाड पत्रे एका काडीत ओवले असून तो ताम्रपट बघण्यासारखा आहे. या दानपत्राचा कालावधी शके १११३ म्हणजे इ.स. ११९१ मधील आहे.

तेव्हा मित्रांनो, बीचवर शांत आणि निखळ असा अनुभव घ्यायचा असेल तर गोव्याला कशाला जायचे? कशेळी इथल्या ‘बटरफ्लाय’ बीच सारखे अनेक समुद्र किनारे आपल्या कोकणात आहेत. मग वाट कसली पाहताय पावसातून सुटका झाली की आपली बॅग पॅक करा आणि चला भटकंतीला!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?