' किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री – InMarathi

किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडे किरकोळ गोष्टी म्हणजे कापलं, भाजलं,खरचटलं अशा दुखापतीसाठी कधीही दवाखान्यात जायची पद्धत नाही. चिमुटभर हळद लावली की जखमा बऱ्या होतात हा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे.

अल्पमोली बहुगुणी अशी हळद ही सदैव आपली स्वयंपाकघरात साथीदार असते, पण आजकाल या दिवसांत त्यातही भेसळ केली जाते. ती इतकी बेमालूम असते की ओळखणे कठीण असते. ती कशी ओळखावी?

हळदीशिवाय तर आपला स्वयंपाक पण अपूर्ण आहे. बघा, बटाट्याची पांढरी भाजी खाऊ वाटते का? वरण पांढुरक्या रंगाचे कसे वाटेल? मेतकुट तयार करताना हळकुंड अगदी मस्ट आहे. इतकेच नव्हे तर ओल्या हळदीचे लोणचे हा तर कित्येक लोकांचा वीक पॉईंट असतो.

 

turmeric inmarathi

 

फोडणीत तर हळदीचे स्थानमहात्म्य अढळ आहे. पोहे, भजी आमटी, चटणी, डाळीचा चटका यांना जर पिवळा रंग नसेल तर कुणी पानात ते पदार्थ पडूही देणार नाही.

हळद अतिशय औषधी आहे. ती आजीबाईच्या बटव्यातील एक हुकमी अस्त्र आहे. निर्जंतुकीकरण करणारी हळद ही घरचा छोटासा डॉक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजीबाईचा बटवा हा अतिशय गुणकारी आहे. आपल्याकडे बाळाला तेल हळद लावून मालिश केली जाते. नैसर्गिक हेअर रिमूव्हर असं त्याचं कारण सांगितलं जातं. त्याचबरोबर त्वचेचा पोत हळदीने सुधारतो म्हणून लग्नापूर्वी नवरा नवरीला पण हळद लावली जाते.

खोकला झाला, की दूध हळद प्याले की हमखास खोकला कमी होतो. गूळ आणि हळदीच्या गोळ्या करून खाल्ल्या, की त्याचा पण चांगला उपयोग होतो. मुका मार लागला की आंबेहळदीचा लेप लावला जातो.

यापूर्वी आम्ही इनमराठीवर हळदीच्या बहुगुणी असण्याची माहिती दिली होती, पण आजकाल भेसळ असलेली हळद ओळखणे ही पण एक गरजेची गोष्ट झाली आहे. कशी ओळखाल ती भेसळ?

हळदीतील भेसळ ओळखण्याचे उपाय-

 

turmeric im

 

१) खूपवेळा हळदीमध्ये पिवळ्या रंगाचे केमिकल वापरले जाते. ते पावडरीच्या रूपातच असते त्यामुळे ते सहजासहजी ओळखता येत नाही. त्यासाठी एक सोपी चाचणी आहे.

एक ग्लासभरून पाणी घ्या. त्यात एक चमचा हळद टाका. ती हळद जर ग्लासच्या तळाशी जाऊन बसली आणि पाणी जर फिकट पिवळ्या रंगाचे झाले तर ती हळद अस्सल आहे, पण तेच जर भेसळयुक्त हळद असेल तर ते पाणी गडद पिवळ्या रंगाचे होते.

२) मेटानीलची चाचणी-

एक शास्त्रीय प्रयोग करून पण हळद ही असली आहे का हे ओळखता येते. एक चिमुटभर हळद हळद एका परीक्षानळीत घ्या. त्यात तीव्र म्हणजे पाणी वगैरे न मिसळलेले हायड्रोक्लोरिक अॅसिडचे काही थेंब टाका आणि हलवा.

जर ते मिश्रण गुलाबी रंगात बदलले, तर त्यात मेटानील हे रसायन मिसळले आहे असे समजा. मेटानील हे विषारी द्रव्य आहे. ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. पोटदुखी, मळमळ, उलटीची भावना होणे हे त्याचे दुष्परिणाम आहेत.

३) खडू पावडरीची चाचणी –

 

turmeric health benefits-inmarathi05

 

कधी कधी खडूची पावडर करून पण ती हळदीत मिसळली जाते आणि हळदीचा रंग त्याला आपोआपच येतो, त्यामुळे ती भेसळ सरळपणे ओळखताही येत नाही.

त्यासाठी एका परीक्षानळीत चमचाभर हळद टाकून त्यावर पाणी आणि हायड्रोक्लोरिक अॅसिडचे काही थेंब टाका. जर द्रावणात बुडबुडे आले तर समजून जा की यात भेसळ आहे आणि फेकून द्या ती हळद.

थोडक्यात, नव्या धकाधाकीच्या जीवनात जितक्या सोयी झाल्या आहेत तितक्याच गैरसोयी, गैरप्रकार पण वाढले आहेत.

पूर्वी हळकुंडे आणून ती दळून घरातच हळद तयार करत, पण आता ते शक्य होत नाही पण म्हणून काही कसलेही भेसळयुक्त पदार्थ विकावेत असं नाही. त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. हे परिणाम दीर्घकालीन असतात.

यासाठी जागो ग्राहक जागो अभियान, भारतीय मानक संस्था (ISI), यांनी ठराविक मापदंड लावले आहेत. ज्यामुळे माणसावर भेसळयुक्त पदार्थ खाण्याची वेळ येऊ नये. आणि सुदृढ आणि आरोग्यसंपन्न आयुष्य जगता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?