' क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!

क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट म्हणजे भारतीयांचा अगदी जीव की प्राण! क्रिकेट विश्वातील काही घटना, किस्से, प्रसंग अशा गोष्टी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या अगदी ओठावर असतात. सचिनचे विक्रम असोत, भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वचषकांमधील आकडेवारी असो किंवा भारताने रचलेले, मोडलेले मोठमोठाले विश्वविक्रम, हे सगळं अगदी तोंडपाठ असणारी अनेक मंडळी भारतात पाहायला मिळतील.

मात्र या ऐकीव, किंवा वाचलेल्या गोष्टी तुमच्या कायम स्मरणात राहिल्या असतील, तर त्याविषयीची सत्यपडताळणी तुम्ही केली आहे की नाही, हेदेखील महत्त्वाचं ठरतं नाही का!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

क्रिकेटविश्वातील अशाच काही गैरसमजुती आहेत, ज्या आपण सत्य मानत असतो. आपल्या मनात त्या खोलवर रुजलेल्या असतात. चला जाणून घेऊया.

१. सचिनचं शतक म्हणजे भारताचा पराभव :

 

sachin tendulkar century IM

 

सचिनने शतक झळकावलं म्हणजे भारतीय संघ हरणार असा एक गैरसमज फारच प्रचलित आहे. मात्र सत्य बघायला गेलं, तर सचिनने ठोकलेल्या शंभर शतकांपैकी ७५ सामन्यात भारताचा पराभव झालेला नाही. विजय, अनिर्णित, टाय अशा निकालांची आकडेवारी या ७५ सामन्यांत पाहायला मिळते.

केवळ वनडे सामन्यांचा विचार केला, तर त्याच्या ४९ शतकांपैकी ३३ शतकं ही भारताने जिंकलेल्या सामन्यात झालेली आहेत. भारतीय संघ विजयी झालेल्या सामन्यांमध्ये सचिनची सरासरी ५० हून अधिक आहे.

२. गांगुली कर्णधार असताना भारताबाहेर भारताचा कसोटी विजय :

 

sourav ganguly IM

 

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला भारताबाहेर जिंकायची सवय लावली. हे सत्य असलं, तरी ते केवळ सामन्यांपुरतं मर्यादित आहे.

गांगुलीला भारताबाहेर कसोटी मालिका जिंकण्यात केवळ एकदाच यश आलं आहे. २००५ साली झिम्बाब्वेमध्ये जाऊन त्याने मालिका विजय मिळवला आहे.

२००२ साली इंग्लंड विरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवणं आणि २००३-०४ या वर्षांत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुद्धा हीच आकडेवारी पहिली गेली आहे. हे गांगुलीचं यश मानलं पाहिजे.

३. युवराजची पदार्पणाची खेळी :

युवराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे पदार्पण करून ८४ धावांची दमदार खेळी खेळली होती, असं तुम्ही ऐकलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तो त्याचा पदार्पणाच्या सामना नव्हता हे मात्र फार कमी जणांना माहित असतं.

खरंतर त्याचं पदार्पण केनिया विरुद्ध झालं होतं. त्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी हा त्याचा पहिला डाव होता. मात्र पदार्पणाचा सामना नव्हे!

४. बाप बाप होता हैं… :

 

sehwag and shoaib akhtar IM

 

भारताचा स्फोटक फलंदाज सेहवाग याला अख्तरने हुक मारून दाखव, पूल मारून दाखव असं असं सांगितलेलं असताना “समोर नॉन स्ट्रायकरला तुझा बाप उभा आहे, त्याला सांग” असं सचिनकडे बोट दाखवून त्याने म्हटल्याचं सांगितलं जातं. त्यांनतर सचिनने खरोखर षट्कार ठोकला आणि सेहवागने “बाप बाप होता हैं, और बेटा बेटा” असं अख्तरला सुनावलं. हा किसा आपल्याला सगळ्यांना अगदी तोंडपाठ असतो.

मात्र यावेळी सेहवाग द्विशतकाच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जातं. प्रत्यक्षात वीरू पाकिस्तान विरुद्ध चारवेळा द्विशतकनजीक पोचला, त्यातील २ सामन्यात अख्तर खेळत नव्हता, तर उरलेल्या दोन्ही सामन्यांतसुद्धा सचिनने त्याला षट्कार हाणल्याचा कुठलाही पुरावा नाही.

५. ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन देण्याचं थांबवलं… :

 

ganguly follow on IM

 

द्रविड आणि लक्ष्मण यांची दमदार फलंदाजी आणि हरभजनच्या गोलंदाजीचा चमत्कार याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध इडन गार्डनला फॉलोऑन नंतरही मिळवलेला ऐतिहासिक विजय आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आजही हा चर्चेचा विषय आहे.

मात्र यानंतर ऑस्ट्रलियाने भारतीय संघाला फॉलोऑन देणं थांबवलं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तो मोठा गैरसमज आहे. त्यानंतर स्टिव्ह वॉने ७ वेळा तर रिकी पॉन्टिंगने ४ वेळा फॉलोऑन देऊन भारतावर नामुष्कीची वेळ आणली आहे.

६. कुंबळेची जादू फक्त भारतीय खेळपट्ट्यांवर… :

 

anil kumble IM

 

कुंबळेच्या फिरकीची जादू फक्त भारतातच चालली आणि भारताबाहेर तो फारसा प्रभावी नव्हता, हादेखील एक गैरसमजच म्हणायला हवा. २००३-०४ च्या काळात ऑस्ट्रलिया आणि पाकिस्तानमधील ६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३६ गडी बाद केले आहेत.

२००२ आणि २००७ साली इंग्लंडमध्ये सुद्धा दमदार गोलंदाजी करून दाखवली आहे. फरक एवढाच, की त्याने भारताबाहेर केलेली कमाल ही तिशी पार केल्यानंतर केली आहे.

७. ए बी डिव्हिलायर्सची इतर खेळामधील प्रगती… :

क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जाणारा एबीडी हा उत्तम हॉकी खेळाडू आणि फुटबॉलपटू सुद्धा होता अशीही एक अफवा मध्यंतरी ऐकिवात होती.

त्याने देशाचं प्रतिनिधित्व सुद्धा केल्याचं मानलं जातं. मात्र त्याच्या आत्मचरित्रानुसार ही गोष्ट स्पष्ट होते, की ही निव्वळ अफवा असून यात काहीही तथ्य नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?