' मोदी - छ. शिवाजी महाराज, मोदी - डॉ. आंबेडकर : या विचित्र तुलना कधी थांबणार?

मोदी – छ. शिवाजी महाराज, मोदी – डॉ. आंबेडकर : या विचित्र तुलना कधी थांबणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

आपल्या देशात व्यक्तिपूजा ही काही नवीन नाही. मग ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असो. त्या व्यक्तीने काही चांगलं कार्य केलं असेल तर तिला अक्षरशः दैवत्व प्राप्त होईपर्यंत लोकं कौतुक करतात.

अर्थात त्याच व्यक्तीच्या काही चुका समोर आल्या की त्या व्यक्तीला अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोलसुद्धा केलं जातं ही गोष्टसुद्धा विसरून चालणार नाही. पण एकंदरच सगळ्याच बाबतीत आपल्याकडची लोकं टोकाच्या प्रतिक्रिया देण्यात माहीर आहेत.

अशाच काही अतिशय लोकप्रिय व्यक्तिपैकी एक म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी या नावभोवती जे वलय निर्माण झालंय ते आजवरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय नेत्याच्या भोवती निर्माण झालेलं नाही.

 

narendra modi inmarathi

 

आज मोदी हे एक फक्त नाव नसून ते एक ब्रॅंड बनले आहेत यात अतिशयोक्ती अजिबात नाही. मोदींचे जेवढे समर्थक आहे तेवढेच विरोधकही, यात काहीच नवीन नाही.

राजकीय व्यक्तिमत्व म्हटलं की हे सगळं आपसूक आलंच, पण खासकरून मोदींच्या बाबतीत २ टोकाची मतं देणारी माणसंच आपल्याला दिसतात. एका गटातली माणसं इतक्या टोकाची टीका करतात की पुढच्या काही वर्षात मोदी हे देश विकून खाणार आहेत अशा आविर्भावात टीका करतात तर काही मोदी समर्थक त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करतात.

आपल्याला चांगलंच आठवत असेल काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोमध्ये मोदींचा चेहेरा पद्धतशीरपणे लावून श्रीमानयोगी आणि जाणता राजा अशा काही उपमा देऊन तो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. शिवाय “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” असं एक पुस्तकदेखील मध्यंतरी प्रकाशित करण्यात आलं होतं.

 

narendra modi IM

 

यावरून प्रचंड गदारोळही झाला, मोदींवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. आत्ता हे सगळं आठवण्यामागचं कारण काय? तर आता मोदींची तुलना थेट घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली गेली आहे, आणि तीसुद्धा एका ज्येष्ठ संगीतकाराने. नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘आंबेडकर अँड मोदी- रिफॉमर्स आयडियाज परफॉर्मर्स इंप्लीमेंटेशन’ या पुस्तकासाठी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांनी एप्रिल महिन्यात एक मोठी प्रस्तावना लिहिली होती ज्यात त्यांनी आंबेडकर आणि मोदी यांची आणि त्यांच्या कार्याची तुलना केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. इलैयाराजा हे स्वतः बहुजन समाजाचा हिस्सा आहेत, त्याही ही गोष्ट फारशी बाहेर येऊ दिली नाहीये. शिवाय त्यांचे वडीलही comunist विचारधारेचे अनुयायी होते, तरी इलैयाराजा यांनी अशी बाजू घेतल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे.

या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं कौतुक केलं, शिवाय भेदभावाविरोधात आंबेडकरांनी जो लढा दिला त्याचंही गुणगान केलं. याच प्रस्तावनेत ते पुढे म्हणाले की “पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांबद्दल बऱ्याच गोष्टी मला समजल्या!”

 

ilyaraja modi ambedkar IM

 

इतकंच नव्हे तर तिहेरी तलाख संदर्भात मोदींनी घेतलेला निर्णय बघून बाबसाहेबांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं असतं असंही इलैयाराजा पुढे म्हणाले, यामुळेच तामिळनाडूमध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे.

भाजप आणि काही सहकारी संघटनांनी इलयाराजा यांना पाठिंबा दिला आहे तर काही द्रविडपंथिय आणि बहुजन संघटनांनी त्यांच्यावर जहरी टीका करून त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे.

नुकतंच राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी ४ लोकांची नामांकनं जाहीर केली गेली त्यातलं एक नाव संगीतकार इलैयाराजा यांचं असल्याने पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

या सगळ्या वादावर इलैयाराजा स्पष्टीकरण देत म्हणाले की “मला या माझ्या वक्तव्याला राजकीय रंग द्यायचा नाही, मी मोदींना मत द्या असंही म्हणालो नाही किंवा त्यांना मत देऊ नका असंही म्हणालेलो नाही!” असं इलयाराजा यांच्या बंधुनी सांगितलं आहे.

इलैयाराजा हे त्यांच्या कालातीत संगीतासाठी ओळखले जातातच शिवाय ते त्यांच्या तापट स्वभावासाठीसुद्धा लोकप्रिय आहेत. कित्येक प्रेस कॉन्फरन्स किंवा कार्यक्रमात ते बऱ्याचदा भडकले आहेत.

 

ilayaraja IM

शिवाय स्वतःच्या गाण्यावर फक्त स्वतःचाच हक्क असल्याप्रमाणे त्यांनी स्वतःची गाणी रेडियो वाहिनीवर सादर करण्यासाठीसुद्धा एकेकाळी नकार दिला होता. शिवाय कित्येक कार्यक्रमात त्यांनी गायकांनी आपलं गाणं गाण्यापासून रोखलं आहे.

एवढं होऊनही तामीळ जनता इलैयाराजा यांच्यावर भरभरून प्रेम करते हे त्यांच्या अजरामवर गाण्यांमधून आपल्याला समजलं असेलच. इतकंच नव्हे तर, त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

तरी इलैयाराजा यांनी जी तुलना केली आहे ती अयोग्यच आहे असं मी म्हणेन कारण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आयडॉल आहेत त्यामुळे अशा महापुरुषांची तुलना आपण कुणाशीच न केलेली बरी!

नरेंद्र मोदी ग्रेट आहेत, त्यांचं काम उत्तुंग आहे, त्यांची लोकप्रियताही प्रचंड आहे, आज भारताचे इतर देशांशी संबंध सुधारण्यात मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. देशासाठी मोदी अहोरात्र झटत आहे हे सगळं मान्य आहे आणि त्याचं कौतुकही आहेच पण म्हणून या महापुरुषांशी मोदींची तुलना करणं हे नक्कीच खटकणारं आहे.

 

narendra modi 3 IM

 

इलैयाराजा यांच्या मनात कदाचित तशी भावना नसेलही पण एक पब्लिक फिगर या नात्याने आपण काय बोलतोय किंवा लिहितोय याचं भान आपल्याला नक्कीच असलं पाहिजे.

इलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.

खरंतर व्यक्तिपूजा ही खूप घातक असते आणि कित्येक राष्ट्रांची यामुळे राखरांगोळी झाल्याचंही आपण पाहिलं आहे. त्यामुळे कुणी सेलिब्रिटी असो किंवा एक सामान्य माणूस आपण आपली मतं ही आपल्यापुरतीच मर्यादित ठेवली पाहिजेत आणि आपण कुणीच व्यक्तिपूजेचं समर्थनही करता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?