' कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत – InMarathi

कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मे महिन्याच्या उन्हामुळे तडाख्याने लोक त्रस्त झाले होते, कधी एकदाचा पाऊस पडतोय असं प्रत्येकाच्या तोंडी वाक्य होतं, यावर्षी मान्सून लवकर येणार, वेळेआधीच येणार, मे अखेरीस येणार अशी चर्चा व्हाट्सअँप ग्रुप्स पासून ते कट्ट्यापर्यंत सुरु होती. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा चुकला आणि पावसाने अखेरीस जूनच्या शेवटाकडे आपलं दर्शन दिलं.

गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाऊस मुसळधारपणे पडतोय, अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे. गेल्या वर्षी चिपळूण महाड परिसराला पुराने वेढलं होतं. २०१९ साली कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात देखील मोठया प्रमाणावर पूर आला होता.

यंदाही पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे, काही वर्षांपासून कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात पूरजन्य परिस्थिती का निर्माण होत आहे हे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, quora वर याबद्दल विविध मान्यवर अभ्यासक मंडळींनी उत्तर दिली आहेत ती आपण पाहुयात…

 

kolhapur flood 1 inmarathi
Sirf News

 

नितीन जोगळेकर स्वतः वित्तसल्ल्गार आहेत त्यांच्या मते :

कोल्हापूर आणि सांगली येथे पूरस्थिती कशामुळे निर्माण झाली यावर एका मराठी वृत्तवाहिनीवर एक कार्यक्रम नुकताच सादर झाला ज्यातील बहुतांशी मुद्दे पटण्यासारखे होते.

थोड्या कालावधीत झालेली अतिवृष्टी हे नक्कीच मुख्य कारण आहे परंतू या जोडीला अन्य करणेसुद्धा आहेत जी सर्वांना माहित आहेत परंतू राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यावर काहीही उपाययोजना झाली नाही, होत नाही आणि होणारही नाही [निदान मला तरी असे वाटते.

१. नद्यांच्या धोकापातळीत छेदछाड करून ते कमी केली की नदीच्या काठावरील बरीच जमीन ही बांधकाम करण्यासाठी मुक्त होते. नंतर अशा जमिनीवर बांधकामे करण्यात येतात आणि नंतर जरी कितीही हरकती घेतल्या तरीही त्यावर काहीही कारवाई करण्यात येत नाही.

२. नदीच्या पत्रात कचरा टाकणे यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो.

३. घनरूप कचरा आणि विशेष करून प्लास्टिकच्या वस्तू नदीच्या पात्रात टाकणे.

४. नदीच्या प्रवाहात अडथळे करून बांधकामे करणे ज्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होतो.

 

panchganga im 1

 

५. नद्यांच्या पात्रांची सफाई होत नाही. नद्यांच्या पत्रात सातत्याने गाळ वाहून येतो. सरकारी कंत्राटदार जी सफाई करतात त्यात तो गाळ काढून काठावरच ठेवतात यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा तो गाळ पुन्हा नदीच्या पात्रात येतो आणि सफाईचा हेतूच असफल होतो.

६. धरणांच्या पाण्याची पातळी आणि साठा याचे व्यवस्थित नियंत्रण न करणे. आता कोयना आणि अलमट्टी या धरणांच्या बाबत महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्यात जो वाद सुरु आहे तो लक्षात घ्या.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणतात की कोयनेचा विसर्ग कमी करा तरच अलमट्टीचा विसर्ग वाढवू. पण जर कोयना हे प्रचंड धरण जवळपास १००% भरले असेल आणि जर पाऊस पडतच असेल तर विसर्ग कसा थांबवता येईल? अलमट्टी धरणाची उंची जेव्हा वाढवण्यात आली तेव्हाच महाराष्ट्राने त्या विरुद्ध आवाज उठवला होता परंतू त्याकडे कर्नाटकाने साफ दुर्लक्ष केले. यामुळे सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली.

वीरकुमार पाटील अनेकवर्षांपासून कोल्हापूरमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांनी याबद्दल विस्तृतपणे माहिती दिली आहे :

साधारण २००५ पासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठया प्रमाणात फटका बसायला लागला आहे. त्यानंतर २०१९ ला तर कहर झाला. आताही महापूर आलाय. प्रथम या पुराला अलमट्टी धरण कारणीभूत आहे असे वाटत होतं, पण हे अर्धसत्य आहे. सध्या या धरणातून अडीच लाख क्युसेक्स पेक्षाही अधिक पाणी सोडले आहे. म्हणजे कृष्णा, पंचगंगा, वारणा, वेदगंगा, दुधगंगा या नदीतून जेवढे पाणी ज्या प्रमाणांत जात आहे त्या प्रमाणात. तरीही कोल्हापूर, सांगली पाण्यात आहे.

हा मानवाच्या चुकीमुळे आलेला पूर आहे. बघा ना, पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात, नदीकिनाऱ्यावर तसेच पूर आल्यानंतर ज्या भागातून पाणी वाहून जाते तेथे किती बांधकाम झाली आहेत. आपण ज्याला रेडझोन म्हणतो तो शिल्लकच राहिला नाही.

बर ही बांधकामे करतांना प्रचंड भराव टाकले गेले. परिणामी पूर आल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्याला मोठा अडथळा निर्माण झाला आणि तेच पाणी आडवे पसरायला सुरू झाले.

या बांधकामावर कोणाचे बंधन नाही. पैसे खायचे आणि द्यायची परवानगी. पण त्याचा फटका सामान्य जनतेला आणि शेतीला बसतोय.एक उदाहरण बघा. शिरोळ तालुक्यातील जो राजापूर बंधारा आहे जेथे कृष्णा आणि पंचगंगा नदीचे पाणी येते. तेथे पाणी पातळी 58 फूट ही धोकादायक आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याची पुरावेळी या बंधाऱ्यापर्यंत फुग येते.

 

panchganga im

 

२०१९ मध्ये या बंधाऱ्यावर ५८ फूट पाणी होते. त्यावेळी पंचगंगा कोल्हापुरात ५७ फूट इतक्या पातळीवर वाहत होती. कृष्णेच्या पाण्याने सांगलीला वेढा दिला होता. यंदा राजापूर बंधाऱ्यावर अवघी ४८ फूट पाणी पातळी असतांनाही पंचगंगा कोल्हापुरात ५६.५ फूट इतक्या अति धोका पातळीवरून वाहत आहे.

कोल्हापुरात जर इतके पाणी असेल तर राजापूर बंधाऱ्यावरही पाणी अधिक पाहिजे ना? तस नसतानाही सांगलीत कृष्णेच्या पाण्याने थैमान घातले आहे. आता हे कसे झाले? तर या दोन्ही नद्यांसह दुधगंगा, वेदगंगा, वारणा या नद्यांवर बांधलेल्या कोयना, राधानगरी, काळम्मावाडी, पाटगाव, चांदोली आदी धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस झाली. महिनाभर जितका पाऊस पडतो तितका चार दिवसात पडला. हे पाणी नदीतून पुढे आले, पण नदीक्षेत्रात( रेडझोन) भराव टाकून बांधकाम झाल्यामुळे गतीने पुढे गेले नाही. ते तुंबून राहिले आणि आडवे पसरले. .

त्याशिवाय जिल्ह्यात अन्य भागातही मोठा पाऊस झाला. हे पाणी नदी भरल्याने पुढे सरकू न शकल्याने शेतीत घुसले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ मार्ग बंद आहेत. फक्त कोल्हापूर ते मी रहातो त्या कागलपर्यंत रस्ता सुरू आहे.

शिरोली ते तावडे हॉटेल या दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गावर ५ फूट पाणी आहे. ते शनिवार दि. २४ रोजी ८ फूट होते. आता पाऊस थांबल्याने कमी होतंय. कोकणकडे जाणार मार्ग, कागलमधून कर्नाटकात जाणार मार्ग बंद आहे. सगळी वाहतूक ठप्प आहे.

एकंदरीत काय तर जोपर्यंत पूर धारण बांधकाम होण्याचे थांबत नाही, आहे ते बांधकाम काढून तिथला भराव काढून पाण्याला पुढे जाण्यासाठी आपण मार्ग करत नाही तोपर्यंत असाच महापूर येत राहणार.

ता. क. —

हे उत्तर लिहीत असतांनाच हातात एक बातमी आली, की राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून केवळ एखाद्या १० मिनीटाच्या पावसाच्या मोठ्या सरीने स्वयंचलीत दरवाजा कोणत्याही क्षणी खुला होणार आहे. पावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून त्याची हजेरी आहे.

सध्या धरणाची दुपारी ३ ची पाणी पातळी ३४७.३७ फूट आहे. गेट ओपन होण्यासाठी अजून ०.१३ ने पाणी पातळी कमी आहे. एखादा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला की धरण भरले असे समजले जाते. ३४७.५० वर पाणी आले की ही स्थिती येते. हा प्रसंग होण्यासाठी केवळ दोन बोटे पाणी हवे आहे. अशा वेळी पाणी व हवेचा दाबही पुरेसा ठरतो.

ती ‘घटीका’ समीप आली आहे. म्हणजे महापूर कोल्हापुरात तरी जैसे थे राहणार असं वाटतंय.

कोल्हापुरात येणाऱ्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार आहे असं म्हंटल जातं, याबद्दल विनायक वावरे यांचं म्हणणं जाणून घेऊयात :

अलमट्टी धरण जबाबदार असायला ते मनुष्य गणातील नव्हे. सांगली आणि कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुरासाठी फक्त माणसं (प्रशासन) जबाबदार आहेत, अलमट्टी धरण नव्हे.

अलमट्टी धरण हे दक्षिण भारतातील दुसरे सर्वात मोठे धरण आहे. अलमट्टी धरणाची भिंत जरी विजापूर जिल्ह्यात असली तरी, धरणाचा पाणीसाठा हा बागलकोट जिल्ह्यात पसरलेला आहे.

अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर, म्हणजे तब्बल दीड किलोमीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणी असल्यास तो साठा २०० टीएमसी, आणि ५१९ मीटरपर्यंत पाणी भरल्यास तो साठा १२३ टीएमसी होतो.

त्या मानाने, कोयना धरण हे अलमट्टी धरणापेक्षा खूप जूने जरी असले तरी, अलमट्टी धरणापेक्षा कितीतरी लहान आहे. कोयना धरणाची लांबी ही ८०७. ७२ मीटर (अलमट्टी धरणापेक्षा दुप्पट) आणि उंची १०३.०२ मीटर इतकी आहे. (म्हणजे, अलमट्टी धरणापेक्षा जवळपास साडेचार पट जास्त.)

 

alampatti im

 

इतक्या अवाढव्य धरणापुढे, कोयना धरण म्हणजे अगदीच लहान. त्यामुळे, इतका पाणीसाठा जर अलमट्टी धरण प्रशासन आणि कर्नाटक सरकार साठवून ठेवत असेल तर, साहजिकच, सांगली-कोल्हापूर ला महापूराचा वेढा पडणार.

सांगली-कोल्हापूरच्या महापूरास, प्रामुख्याने कर्नाटक सरकार आणि अलमट्टी धरण प्रशासन हे जबाबदार आहेत, असा दावा कितीतरी तज्ञांनी अभ्यासपूर्वक केला आहे. ( Big dams cause for flooding in Kolhapur, Sangli: report ) काही जणांचं असंही मत आहे, की अतिवृष्टी झाल्याने, हा महापूर सांगली-कोल्हापूरला आपल्या विळख्यात घेतो. ( Heavy rains cause floods in parts of Maharashtra ) ते ही खरं असलं तरी, इतकी साठवण क्षमता असलेल्या धरणातून जर पाण्याचा विसर्ग वेळीच सोडला नाही, तरीही हि परिस्थिती ओढावतेच.

उन्हाळ्याचा शेवट आणि मान्सून ची सुरुवात, ह्या दरम्यान कर्नाटक सरकार आणि अलमट्टी धरण प्रशासन हे पाण्याचा विसर्ग सोडत नाहीत आणि त्यामुळे, धरणातील उर्वरित पाणीसाठा तसेच, कोयना धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग, चांदोली धरण (सांगली), राधानगरी धरण (कोल्हापूर), ह्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा ओघ, मान्सून चा पाऊस, ह्यामुळे अलमट्टी धरणाच्या पाण्याची फूग ही मागे, सांगली-कोल्हापूर पर्यंत येते आणि महापूराची जाचक स्थिती उद्भवते. ह्या गोष्टीवरून बऱ्याचदा तत्कालीन दोन्ही (महाराष्ट्र-कर्नाटक) सरकार मध्ये संगनमत झालेलं नाही. हे संगनमत नसल्याने, महापूरासारखा गंभीर प्रश्न नेहमी जाचक ठरत आहे.

ह्यावर एकमात्र उपाय म्हणजे, नदीजोड प्रकल्प. ह्या प्रकल्पावर अजूनही महाराष्ट्र सरकार ठोस पावले उचलत आहे आणि भविष्यात नद्या जोडून, महापूर येणाऱ्या जिल्ह्यांतील पाणी हे दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पुरवले जाऊ शकते. आपण आशा करूया, की हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास येओ आणि महापूराचे संकट कायमचे टळो.

 

river im

मग कोल्हापूरसारख्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस का पडतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दलचं देवेंद्र मिसाळ यांचं मत जाणून घेऊयात :

१) अरबी समुद्रावरून जे मान्सून वारे येते ते जास्त बाष्प युक्त असते जेव्हा हे वारे ९०० ते १२०० मीटर च्या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जाते तेव्हा वर जाते. वर गेल्यावर त्याचे तापमान कमी होऊन बाष्पयुक्त अश्या वाऱ्याचे पाण्यात रूपांतर होऊन पाऊस खूप पडतो.

२) कोल्हापूर जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास, पश्चिम घाटात येणारे तालुके जसे शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड. ह्या तालुक्यात मध्ये सरासरी २०००–२५००मिमी पाऊस पडतो.

 

sahyadri mountain range IM

 

3) तिथून मान्सून वाऱ्या मधील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्यामुळे , प्रजन्य छायेचा प्रदेश चालू होतो, त्यामध्ये कोल्हापुरातील पूर्वेकडील तालुके जसे हातकणंगले, शिरोळ, कागल ह्यांचा समावेश होतो. इथे पाऊसाची सरासरी हे ३००-६०० मिमी हे इतके कमी आहे.

महालक्ष्मीचं मंदिर, कुस्तीचा आखाडा, तांबडा पांढरा रस्सा, सुपीक जमीन अनेक उद्योगधंदे अशी सुब्बता असलेला कोल्हापूर परिसर काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा २०१९ सारखी परिस्थिती ओढवू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?