' मैत्रिणीचं प्रेम “सीमेवर” ठेऊन लतादीदींनी पाकिस्तानला मस्त सणकावून लावली होती! – InMarathi

मैत्रिणीचं प्रेम “सीमेवर” ठेऊन लतादीदींनी पाकिस्तानला मस्त सणकावून लावली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

केवळ भारतच नाही तर साऱ्या जगासाठी गानसरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं आणि जगात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.

भारतीय संगीतविश्व लता मंगेशकर यांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. लतादीदींचं या क्षेत्रातल्या योगदानाविषयी आपण कुणीही बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घासच. खुद्द पु.ल देशपांडे यांनीसुद्धा मान्य केलंय की आकाशात सूर्य, चंद्र तारे आणि लतादीदींचे स्वर आहेत.

 

lata mangeshkar 2 IM

 

लतादीदी यांच्या गाण्याचं जितकं कौतुक होतं तितकंच कौतुक त्यांच्या हातच्या स्वयंपाकाचं, त्यांच्या मृदु स्वभावाचं आणि माणसं जोडायच्या स्वभावाचं होतं. पण तुम्हाला माहितीये का की लतादीदी त्यांच्या फार जवळच्या मैत्रिणीला चक्क भारत पाकिस्तान बॉर्डरवर भेटल्या होत्या. तो नेमका किस्सा आहे तरी काय हे आपण आज जाणून घेणार आहोत!

काही वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आणि सगळीकडेच याची चर्चा होऊ लागली. कुणी भारताची बाजू मांडली तर काहींनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली. खरंतर सगळेच पाकिस्तानी कलाकार काही वाईट नाही, पण देशहितासाठी आणि सुरक्षेसाठी कधी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात जो भारताने घेतला.

अर्थात हा वाद काही नवीन नाही. याआधीसुद्धा दोन देशात काहीतरी खुट्ट झालं की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच रद्द व्हायच्या, राजकीय दौरे रद्द व्हायचे, जो कुणी पाकिस्तानची बाजू घेईल त्याला पाकिस्तानात जायचा सल्ला दिला जायचा. मील्खा सिंगपासून दिलीप कुमार, नर्गिस सुनील दत्त अशा कित्येकांना याचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे सध्या दोन्ही देशात एकमेकांचे कलाकार फारसे येत जात नसले तरी याआधी असं चित्र नव्हते. कित्येक त्यांचे कलाकार भारतात ठाण मांडून बसायचे तर आपले काही कलाकार तिथे जाऊन लोकांचं मनोरंजन करायचे.

 

pakistani artist IM

 

लता मंगेशकर यांनासुद्धा एकदा अशीच संधी आली होती, कारण वेगळं होतं पण तरी त्यांनी पाकिस्तानमध्ये न जायचा निर्णय घेतला होता!

लता मंगेशकर यांनी पार्श्वगायक म्हणून काम सुरू केलं तेव्हा त्यांच्यावर पाकिस्तानी गायिका नूर जहां यांचा चांगलाच प्रभाव होता. लतादीदी यांना नूर जहां यांची गायकी फार जवळची वाटायची. नूर जहां यांनीसुद्धा लतादीदी यांचं कौतुक करून त्यांना पुढे जाण्यात बरीच मदत केली आहे.

कदाचित यामुळेच लता मंगेशकर यांच्या आयुष्यात काही लोकांना विशेष स्थान होतं आणि त्यापैकी एक नाव नूर जहां हे होतं. लता मंगेशकर यांना भारतात गानकोकिळा म्हणून ओळखलं जायचं तर नूर जहां यांना पाकिस्तानने मल्लिका-ए-तरन्नुम म्हणून नावाजलं होतं!

“स्कार्स ऑफ १९४७ : रियल पार्टिशन स्टोरीज” या पुस्तकात नूर जहां आणि लता मंगेशकर यांच्या अशाच भेटीविषयी सांगितलं आहे. एकेदिवशी लतादीदी नूर जहां यांना भेटण्यासाठी पाकिस्तान बॉर्डरपर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिजा नव्हता. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला.

खरंतर तेव्हा कसंही ओळख काढून लतादीदी या पाकिस्तानात जाऊन नूर जहां यांची भेट घेऊ शकल्या असत्या. पण त्यांनी तिथूनच नूर जहां यांना फोन लावला आणि शेवटी त्या दोघींनी बॉर्डरवरच भेटायचं ठरवलं.

दोघींच्या भेटीसाठी नो मॅन्स लँड मध्ये सोय करण्यात आली, तिथून नूर जहां त्यांच्या पतीसोबत आल्या अन् इथून लतादीदी. दोघींना चविष्ट खाण्याची खूप आवड होती. नूर जहां यांनी खास त्यांच्यासाठी बिर्याणी करून आणली होती.

 

lata mangeshkar noor jahan IM

 

नियमानुसार बॉर्डरवर कोणत्याच प्रकारची देवाण घेवाण करण्यास सक्त मनाई आहे. पण केवळ नूर जहां आणि लतादीदी यांच्या विनंतीखातर त्यांना वाघा बोर्डरच्या इथल्या नो मॅन्स लँडवर सोय करून दिली गेली आणि तिथेच त्या दोघींनी एकमेकांची भेट घेत बिर्याणीचा आस्वाद घेतला!

फाळणी होणं त्यावेळेस कुणीच रोखू शकलं नाही हे सत्य आहेच, पण याच फाळणीने अशा कित्येक जिवाभावाच्या लोकांना एकमेकांपासून वेगळं केलं हेदेखील तितकंच खरं आहे.

आजही दोन्ही देशांचे संबंध फारसे काही चांगले नाहीत, बॉर्डरवर किंवा काश्मीर प्रश्नावरून काहीतरी कुरबुरू सुरूच असतात. कलाकारांवर देखील काही बंधनं आहेत. पण लता मंगेशकर आणि नूर जहां यांच्यासारखे निखळ मैत्रीचे सलोख्याचे संबंध कुणी ठेवले आहेत का? याचं उत्तर नक्कीच आपल्याकडे नाही कारण आता तसे सच्चे कलाकारच फार कमी राहिलेत!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?