' "शिंदे" घराण्याने इतिहासात किती महत्वाचं स्थान कमावलं आहे हे बघून थक्क व्हाल!

“शिंदे” घराण्याने इतिहासात किती महत्वाचं स्थान कमावलं आहे हे बघून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अठरा पगड जाती जमाती’ असलेल्या आपल्या महाराष्ट्राला अनेक वर्षांचा इतिहास आहे. गड किल्ले, सह्याद्री पर्वतांची रांग, ७५० किमीचा समुद्र किनारा अशी ओळख या आपल्या राज्याची आहे. याच महाराष्ट्राला जसा कित्येक वर्षांचा इतिहास आहे तसा आपल्या आडनावांचा देखील इतिहास आहे.

आपल्या राज्यात बहुतांश आडनावं ही शहर अथवा गावावरून पडली आहेत, तर काही आडनावांवर भौगोलिक, नैसर्गिक, सामाजिक, संस्कृती या घटकांचा प्रभाव आढळून येतो. वर्षानुवर्षे काही आडनावं, घराणी प्रसिद्ध आहेत, जसं की भोसले, मोहिते, पवार आणि सध्या एक आडनाव गाजतंय ते म्हणजे शिंदे, आजच्या लेखात आपण quora वर विविध मंडळींनी शिंदे आडनावामागचा इतिहास सांगितला आहे तो जाणून घेऊयात….

 

eknath im

 

सर्वप्रथम प्रसाद चव्हाण यांनी सांगितलेला इतिहास पाहू :

शिंदे आडनावाचा बराच मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात आणि आजच्या कर्नाटक प्रांतात शिंद/ सेन्द्रक हे राजघराणे इसवी सन ३३० ते इसवी सन १००० या बऱ्याच मोठ्या कालखंडात थोड्या बहुत फरकाने सत्तेत होते. चंद्रवल्ली ( जिल्हा चित्रदुर्ग ) येथिल शिलालेखात सिंद घराण्याचा उल्लेख येतो. आजच्या गोवा आणि उत्तर कोकण मध्ये सत्तेत असलेल्या कदंब घराण्यातील राजकन्येला विवाह हा अजानबाहू शिंद यांच्याशी झाला होता. ( संदर्भ. संजय सोनवणी सर ब्लॉग)

पश्चिमेकडील चालुक्य घराण्यांतील दुसर्या पुलिकेशीचा (इसवी सन ६०९-६४२) मामा श्रीवल्लभसेनानंदराव हा सेंद्रक घराण्यांतील होता. नवसरी जिल्ह्यांत बगुम्रा येथील दानपत्रांत सेंद्रक राजांची लहानशी वंशावळ आहे; तींत भानुशक्ति, त्याचा मुलगा आदित्यशक्ति, व त्याचा मुलगा पृथ्वीवल्लभनिकुंभल्लशक्ति यांचीं नांवें आहेत; व कल्चुरी किंवा चेदिशकाचें ४०६ वें वर्ष (म्हणजे इ. स. ६५५) त्यावर दिलें आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सेंद्रक महाराज पोगिल्ली हा पश्चिम चालुक्य घराण्यांतील विजयादित्याचा (इ. स. ६८०-६९७) मांडलिक होता, व त्याच्या राज्यांत वनवासी प्रांतांतील नागरखंड जिल्हा व जेदुगुर नांवाचें खेडें (हें म्हैसूरमधील शिमोगा जिल्ह्यांतील अर्वाचीन जेड्ड असावें) होतें असा म्हैसूरमधील वळगांबे येथील एका शिलालेखांत उल्लेख आहे.

या राजांनां भुजगेंद्र अथवा नागवंशाचे राजे असें एका शिलालेखांत म्हटलें आहे.( संदर्भ. केतकर ज्ञान कोष) शिंद हे घराणे स्वतःला नागवंशी मानत असत आणि आजचे शिंदे घराणे हेही नागवंशी मानतात.

शिंद घराण्याच्याया तीन वेगवेगळ्या शाखा होत्या. त्यातील एक कराड, दुसरी जुन्नर तर तिसरी शाखा ही सिंदवाडी येथील होती. मुघल आणि बहमनी काळात ही शिंदे घराण्याचे बरेच उल्लेख आहेत.

 

bahmani im 1

 

कोकणातील शिंदे रवीराव घराणे हे प्रसिद्ध घराणे बहमनी काळात होते.( संदर्भ रवीराव घराण्याची कैफियत) शिळीमकर हे सुद्धा शिंदे, सिलिंब गावावरून शिंदे घराण्याला ते नाव पडले. तसेच १२ मावळ मधील एका मावळातील देशमुखी ही शिंदे घराण्याकडे होती.

आजच्या जावळी तालुका( जिल्हा सातारा) येथील शिंदे घराण्याचे ( गाव कुडाळ, इंदवली आखाडे इत्यादी ) उल्लेख हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात येतात ( संदर्भ – शिवपुत्र संभाजी, लेखक डॉ. कमला गोखले) . पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या काळात कण्हेरखेड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील राणोजी शिंदे यांच्या कर्तबगारीने शिंदे घराणे पुढे आले आणि नंतर ग्वालेर चे स्वतंत्र राजघराणे झाले.

या व्यतिरिक्त ही शिंदे घराण्याच्या विविध शाखा इतिहासात कर्तबगार होत्या. सालपेकर शिंदे हे पाणपते शिंदे म्हणून प्रसिद्ध होते. पानिपत मध्ये त्यांनी बराच मोठा पराक्रम गाजवला होता. पिंगोरीकर शिंदे घराणे हे सुद्धा ग्वालेर च्या सरदार घराण्यांपैकी एक आहे.

आता वळूयात सिंदिया आडनावकडे. सिंदिया आडनाव हे शिंदे घराण्याला उत्तरेत गेल्यावर मिळाले. ते मूळचे शिंदेच.

नरेंद्र पाटील यांनी विस्तृतरित्या माहिती दिली आहे ती ही समजून,

इसवी सन पूर्व काळात वैशाली गणराज्य हे सूर्यवंशी राजा विशाल यांनी स्थापन केले, तिथे सुर्यवंशी क्षत्रिय राज्य करीत होते. पण नंतर जेव्हा नंद घराण्याचं राज्य तिथे आले तेव्हा अतिशय विपरीत परिस्थिती आली आणि ते नंद राजे अत्याचार करू लागले तेव्हा कित्येक सुर्यवंशी क्षत्रिय राजे दिल्ली, पंजाब महाराष्ट्र अशा ठिकाणी गेले. वैशाली गण राज्यातून आलेले म्हणून ते वैस अथवा बैस क्षत्रिय म्हटले गेले. ह्याच बैस राजघराण्यात हर्षवर्धन राजा झाला.

इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर बैसवाडा येथून श्रीरामसिंग हे दक्षिणेत महाराष्ट्र मध्ये आले.त्यांच्या दोन मुलांपैकी एक रतनसिंग है सिंदखेड येथे राहिले,आणि त्यामुळे ते शिंदे म्हटले गेले. शिंदे घराणे हे सूर्यवंशी बैस शाखेचे राजपूत घराणे आहे.श् दोन्ही मुलांची वंशावळ वाढत जाऊन आजचे शिंदे घराण्याचा विस्तार वाढत गेला, रतनसिंह यांच्या वंशातील एक पुरुष पुढे कर्नाटक मध्ये गेले. आणि श्री रामसिंह यांचा जयसिंह यांच्या वंशात पुढे रविराव हा पुरुष झाला.

शिंदे घराणे हे शेष वंशी ही आहेत,अर्थात प्रभू श्रीरामचंद्र यांचा लहान भाऊ भरत यांच्या वंशात तक्षक नावाचा राजा झाला ,जो की नाग अवतार मानण्यात येतो,तसेच लक्ष्मण यांना सुद्धा श्रीहरी च्या शेषनागाचा अवतार मानण्यात येतो. पण भरत किंवा लक्ष्मण हे मूळचे सूर्यवंशी घराण्यात आहेत आणि नंतर ते शेष वंशी मानले जातात,शेषवंश हा सुर्यवंशाचाच एक भाग आहे.

शिंदे घराण्याचे गोत्र कौंडिण्य आहे,तर वंश हा सुर्यवंश आहे.देवक समुद्री वेळ अथवा मरिदी चा वेल आहे. या घराण्याचा वेद यजुर्वेद – मध्यंदिन आहे, मंत्र गायत्री मंत्र आहे, ध्वजाचे चिन्ह श्रीसूर्यनारायण आणि शेषनाग असे आहे, गोत्राचे प्रवर अंगिरस,बृहस्पती आणि कौंडिण्य असे आहेत.

हत्यार तलवार आहे. मूळची राजधानी राजस्थान मध्ये रणथंबोर तसेच, राजस्थान मधील नागौर,कर्नाटक मध्ये पत्तदकल,बदामी आहेत. सध्याची एक शाखा ग्वाल्हेर येथे आहे. या घराण्याची कुलदैवते ही प्रामुख्याने, करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी, श्री रामवरदायिनी,श्रीतुळजाभवानी,तसेच श्री ज्योतिबा अशी आहेत.

 

tulja im

 

काही इतिहासकारांच्या मते कर्नाटक मध्ये जो सेंद्रक वंश होता.राजस्थानथे साधारण इसवी ३०० ते ४०० मध्ये नागवंशाच राज्य होऊन गेले,राजस्थान, रणथंब ही शिंद्यांची राजधानी सांगितली जाते तर बदामी सुद्धा सांगितली जाते,चालुक्य काळात पुन्हा हे घराणे भरभराटीस आले,यदवांशी काही काळ लढाया झाले तर कदम-कदंब – चालुक्य अश्या राजघराण्यांशी संबंध होते.आज ही शिंद्यांच्या देव्हार्यात नागाची आणि श्रीसूर्याची पूजा अर्चना मोठ्या मनीभावाने केली जाते.! सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले.

सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वशृत असे मध्यभारत कालीन घराणे आहे. ते मुळच सिंध पंजाब प्रांताचे राजे होते. पुढे तापीच्या दक्षिणतिरी खानदेशी वसाहती केल्या. सेंद्रक घराण्यातील भिल्लशक्ती व जयशक्ती यांचे पूर्वकालीन ताम्रपट आजतागायत त्यांच्या स्मृती करीत आहेत. शिंध्यांच्या कुळस्वामी कोल्हापूरजवळ ज्योतिबा वाडी येथे असून रत्नागिरीस देऊळ आहे. त्याची प्रत्येक चैत्र्यात जत्रा भरते.

सेंद्रक घराण्यात,ताथवडाकर शिंदे, दसपटीचे शिंदे, कुडाळकर शिंदे, तोरगळकर शिंदे,नेसरीकर शिंदे, घेडवाडकर शिंदे,कण्हेरखेडकर शिंदे,म्हैसाळकर शिंदे, मळणगावकर शिंदे,पिंगोरकर शिंदे, धारवाडकर शिंदे सरकार ही घराणी उदयास आली.

कण्हेरखेडचे पाटील जनकोजी राव शिंदे होते ते राणोजीराव शिंदे यांचे वडील तर शिवशाहीत नेसरीकर घराणे होते,वेडात मराठे वीर दौडले सात या नेसरीतीळ लढाईत प्रतापराव गुजर यांच्यात सोबत विठोजी शिंदे हे सरदार होते, विठोजीराव शिंदे हे शेद्रे बेंद्रे सातारा या गावचे, शाहू छत्रपती यांच्या पहिली पत्नी अंबिकाबाई या शिंदे घराण्यातील, सतराव्या शतकात राणोजीरावांच्या पासून शिंद्यांची जी घोड दोड सुरू झाली ती शेवट १८१८पर्यंत म्हणजे एक शतक चालली.

 

shinde im 1

 

मराठ्यांच्या प्रत्येक रणसंग्रामत शिंदे घराणे हे अग्रगण्य होते, शिव पूर्व काळात शिंद्यांची घराणी, चालुक्य राष्ट्रकूट,बहामनी, व नंतर आदिलशाही या काळात सुद्धा आपला दरारा कायम राखून होती, रुस्तमराव, झुजारराव,रविराव हे मानाचे किताब या घराण्याकडे होते,  सह्याद्रीच्या रांगेतील ताथवडा या किल्ल्याची किल्लेदारी, पुरंदर, धारवाड चंदगड, तोरगल,तिकोना किल्ल्याची किल्लेदारी या घराण्याकडे होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या लढ्यात हे घराणं सक्रिय झाले, यात काळोजी शिंदे ताथवडा, फुलाजी शिंदे तिकोना, विठोजी,यमाजी,महिमाजी शिंदे,बाजीराव शिंदे तानाजीराव शिंदे असे अनेक शूर सेनानी होऊन गेले.

शिंदे घरण्याच्या शाखा: १)ताथवाडकर, २)पिंगुरीकर, ३)कुडाळकर(सातारा, सिंधुदर्ग) ४)वेंगुर्लाकर, ५)दसपटी चिपळूनकर, ६)मजरे दादरकर, ७)पेढांबेकर, ८)तिवरेकर,९)नांदीवेसकर,  १०मोरवणेकर, ११)दळवटणेकर, १२)कुंभार्लीकर, १३)नेसरीकर, १४)नुलकर, १५)तळेवाडीकर, (नेसरी व आटपाडी), १६)तळसंदेकर, १७)तोरगलकर, १८)संबरगीकर,१९)निपाणीकर,२०)मुंगळीकर, २१)जमखंडीकर,२२)सांबरेकर, २३)बदामीकर, २४)बेंगलोरकर, २५)शिमोगाकर,(कर्नाटक), २६)तंजावरकर (तामिळनाडू ),२७)ग्वाल्हेरकर मध्यप्रदेश ),२८)बडोदेकर (गुजरात), २९)कण्हेर खेडकर,  ३०)जांबकर ३१)आकाडकर,३२)कोरेगावकर,३३)हुमगावकर, ३४)कोपार्डेकर,३५)जखणगावकर,३६)खटावकर, ३७)अपसिंगेकर,३८)वाईकर,३९)लिंबकर, ४०)राणंदकर, ४१)कराडकर, ४२)आसू शिंदेवाडीकर,४३) सालपेकर, ४४) आसनगावकर, ४५) ल्हासुर्णेकर ४६)माथेरानकर,४७)नेरळकर ,४८)पुणेकर, ४९)वेळेकर,५०)पुनाळेकर(मावळप्रांतकर) ५१)तिन्ही वाघोली गांवकर,(वाघोली पुणे,वाघोली सातारा,वाघोली कवठेमहंकाळ,)५२)नाशिककर,५३)सिन्नरकर, ५४)पुणतांबेकर, ५५)संगमनेरकर, ५६)अहमदनगरकर, ५७)संजीवनी टाकळीकर,५८)वारीकर(कोपरगाव), ५९)श्रीगोंदाकर, ६०)चांदाकर (नेवासा),६१)बुलढाणाकर,६२)नागपूरकर , ६३)मोहपेकर,६४)नळगावकर,६५)अमंळनेरकर, ६६)धुळेकर ,६७)मळंणगावकर,६८)तिसंगीकर, ६९)कूंडलापुर कर ७०)घाटनांद्रेकर,७१)खरसिंगकर, ७२)भिलवडीकर,७३)पलुसकर,७४)तासगावकर, ७५)बेंद्रीकर, ७६)आरवडेकर ,७७)माजंर्डेकर,७८)वाघापुरकर, ७९)कवठेएकंदकर,८०)बेणापुरकर, ८१)जरंडीकर,८२)जतकर, ८३)देवीखिंडकर,

८४)चिंचणीकर,८५)मनेराजुरीकर,८६)उपळावीकर,८७बोरगावकर (वाळवा)८८) इस्लामपूरकर, ८९) करंजवडेकर,(वाळवा). ९०) टोप संभापूरकर, ९१)शिराळाकर,९२)आष्टाकर, ९३)म्हैसाळकर,९४)नरवाडकर, ९५)कवठेगूलंदकर,९६)मल्लेवाडीकर, ९७)बुधगावकर , ९८)धाराशिवकर, ९९)तेरकर,१००)ढोकीकर, १०१)उस्मानाबादकर, १०२)माढाकर,१०३)टणुकर,१०४)करमाळाकर, १०५)सांगोलाकर,१०६)पंढरपूरकर, १०७)मंगळवेढेकर ,१०८)तोंडलेबोंडलेकर,१०९)माळशिरसकर, ११०)अकलूजकर,११२)दौलताबादकर,(औरंगाबाद ),

११३)लोनिकंद ११४) तांबवे कोपर्डे

…….इ. १६८ गावे ९६कुळी मराठा शिंदे घराण्यातील शिंदे यांची आहेत

विश्वनाथ यादव इतिहास संशोधक आहेत त्यांच्या मते,

सातवाहनांवर संशोधन सुरु असता मी नाणी, शिलालेख ते ताम्रपट सध्य अभ्यासत आहे. त्यातुन अनेकदा खुपच रोचक माहिती पुढे येते. काही आडनावांचेही मुळ समोर येत असुन जातीव्यवस्थेबाबतही काही उलगडे होत आहेत. यापैकी “शिंदे” ह्या आडनावाबद्दल:

आपल्याला महारष्ट्रातील बरेच राजवंश माहित नसतात. यापैकीच एक राजवंश म्हनजे “शिंद” राजवंश. या वंशाची सुरुवात सन ३३० च्या आसपास झाली. ते नागवंशी राजघराणे होते व या वंशातील राजे स्वता:स “फणींद्र” असे संबोधन लावत असत. फणींद्र म्हणजे सर्पांचा राजा.

या शिंद राजघराण्याचा प्रथम उल्लेख प्रथम चंद्रवल्ली शिलालेखात येतो. सन ८०५ च्या नेसरी ताम्रपटातही येतो. नेसरी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. या घराण्याचे उल्लेख/इतिहास वर्णणारे अनेक शिलालेखही विविध ठिकाणी सापडले आहेत. यावरुन कळणारी माहिती अशी:

 

saatvahan inmarathi 1

१. या घराण्याचा आद्य पुरुष अजानुबाहु शिंद असे असुन त्याचा जन्म सेंद्रक प्रदेशातील अहिछ्त्र गावी झाला.(अही म्हनजे नाग). सेंद्रक प्रदेश हा कर्नाटकातील म्हैसुर प्रांतात होता. त्याचे लग्न कदंब वंशातील राजकन्येशी होवुन त्याला तिच्यापासुन ३ मुले झाली. त्यांनीच शिंद राजवट महाराष्ट्रात येवुन सुरू केली.

२. या राजवंशाच्या तीन शाखा झाल्या व त्यांच्या द्न्यात असलेल्या राजधान्या जुन्नर, कर्हाटक (आजचे क-हाड), तसेच सिंदवाडी (बेल्लारी जिल्हा) येथे होत्या.

३. या राजघराण्याने जवळपास ३३० ते इ.स. १००० पर्यंत कधी स्वतंत्र तर कधी राष्ट्रकुटादि बलाढ्य राजांचे मांडलिक म्हणुन सत्ता गाजवली.

४. या राजांच्या ध्वजावर नागचिन्ह असुन ते स्वत:स नागवंशोद्भव म्हनवत.

५. हे सर्वच राजे कट्टर शिवभक्त असुन आपल्या वंशाची सुरुवात शिव आणि सिंधु नदीच्या मिलनातुन झाली असे मानत असत.

६. या शिंद राजांनी महाराष्ट्र ही आपली कर्मभुमी बनवली त्यामुळे बहुसंख्य शिंद महाराष्ट्रात आले असे दिसते.

७. महाराष्ट्रातील सर्वच शिंदे आडनावाची घराणी ही याच शिंद राजवंशाशी निगडीत आहेत असे मानता येते.

असे असले तरी, सर्वच शिंदे एकजातीसमुह म्हणुन राहीलेला दिसत नाही. सध्याचे मराठे, ओ.बी.सी. ते दलितांत शिंदे हे आडनाव आढळते. म्हणजे एकच वंश विविध जातींत वाटला गेल्याचे वरकरणी चित्र दिसते. त्यामागील कारणांचा विचार करणे अगत्याचे आहे कारण त्यामुळे जातीव्यवस्थेत एखाद्या वंशाचे कसे विभाजन घडु शकते हे लक्षात येइल.

१. इ.स. १००० पर्यंत तरी हा राजवंश कोणत्या-ना-कोणत्या स्वरुपात सत्तेत होता याचे पुरावे लेख, ताम्रपट ते शिलालेखांत आहे. सन ३३० ते १००० या काळात शिंद लोकांची जनसंख्या वाढणे अपरिहार्य आहे.

२. सर्वच राजे असु शकत नाहीत, त्यामुळे काही जमीनदार, वतनदार बनले असावेत.

३. कालौघात काही अन्य व्यवसायांत पडल्यामुळे त्या त्या व्यवसायांवरुन त्यांच्या वेगळ्या जाती बनणे सहज स्वाभाविक आहे.

४. सामाजिक कारणांमुळे, तत्कालीन रीतिरिवाज व धार्मिक कारणांमुळे जे जातीबहिष्क्रुत झाले त्यांना अपरिहार्यपणे शुद्रातिशुद्रात ढकलुन अस्प्रुष्य बनवल्यामुळे हीन व्यवसाय स्वीकारणे भाग पडल्याचे दिसते.

५. परंतु सारेच “शिंदे” मुळच्या एकाच वंशाशी निगडीत आहेत. नागवंशीय आहेत. शिंद वरुनच शिंदे हे नाव रुढ झाले हे उघड आहे कारण अन्य कोणत्याही प्रकारे या आडनावा ची उपपत्ती लागत नाही.

आज एखाद्याच्या आडनावावरून त्याची जात ओळखली जाते. ज्या पद्धतीने जातीला आपल्याकडे इतिहास आहे त्याच पद्धतीने आडनावांचा इतिहास देखील आहे. ही आडनावं फक्त महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. जात धर्म आणि प्रदेश अशा गोष्टींवर नावं आणि आडनावं बदलत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?