' लाख चुका केल्या असतील, पण उद्धव ठाकरेंनी “या” बाबतीत नक्कीच मन जिंकलंय! – InMarathi

लाख चुका केल्या असतील, पण उद्धव ठाकरेंनी “या” बाबतीत नक्कीच मन जिंकलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान घमंडे

नाराजीनामा ते राजीनामा…शिंदे गटाचा बंड अखेर यशस्वी झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. माननीय मुख्यमंत्री हे माजी मुख्यमंत्री झाले.

हा राजीनामा देताना “मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय” असा जो आव आणलेला पाहिला तो अजिबातच पटला नाही. जे पद टिकवणं शक्यच नव्हतं त्याचा त्याग करतोय असं भासवणं हा ढोंगीपणा झाला. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि संयमी माणसाकडून हे अपेक्षित नव्हतं असं वाटून गेलं.

 

uddhav im

 

दुसरी गोष्ट अशी की त्यांनी “ज्यांना सत्तेची लालसा आहे त्यांना ती भोगू द्या…” असं म्हणणं सुद्धा मनाला पटलं नाही. कारण अडीच वर्षांत त्यांचा संयमी बाणाच पाहत आलो होतो.

ज्या व्यक्तीला २०१९ साली जनमत मिळालं होतं ते फडणवीस जर मुख्यमंत्री होणार असतील, तर त्यांना सत्ता ‘भोगू’ दे असं म्हणणं पटणार नाहीच. लालसा हा शब्द फारसा खटकला नाही. कारण महाविकास आघाडी स्थापून उद्धवजींनी डाव खेळला, तसाच तो अजित दादांसोबत जाऊन फडणवीसांनी सुद्धा खेळून पाहिला होता. तो डाव यशस्वी होऊ शकला नाही इतकंच…

राजकारणात आलेल्या प्रत्येकाला सत्तेची लालसा असतेच. प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसताना पदावर बसणं, आकडे आपल्या विरोधात आहेत हे दिसत असूनही खुर्ची न सोडणं याला सुद्धा सत्तेची लालसाच म्हणायला हवं. मात्र हे राजकारण आहे. या अशा गोष्टी घडणं साहजिक आहे. त्यामुळे काही गोष्टी चुकल्या, फसल्या म्हणून चांगल्या गोष्टी कधीच वाईट ठरत नाहीत. अशा काही गोष्टी जाणवल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देणं. मुख्यमंत्रीपद धोक्यात होतं, तेवढं सोडून जे हातात आहे ते राखून पुढे जाता आलं असतं. ते चुकीचं सुद्धा ठरलं नसतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही.

मुख्यमंत्रीपदी होते त्यामुळे विधिमंडळ सदस्य असणं भाग होतं. विधान परिषदेवर आमदार असणं आवश्यक होतं. आता त्याची गरज उरली नाही, म्हणून त्यांनी आमदारकी सुद्धा सोडली. याला त्याग म्हणता येईल. अगदी शंभर टक्के म्हणता येईल. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्याविषयी आदर वाटला, हे मान्य करायलाच हवं.

मी त्यांचा खंदा समर्थक नाही, तसा त्यांचा कट्टर विरोधक सुद्धा नाही. किंवा इतर कुणाचा कट्टर समर्थक नाही. त्यामुळे जी गोष्ट पटली त्याविषयी मोकळेपणाने बोलायला हवंच.

दुसरी गोष्ट अशी, की कोविड काळात त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेला संवाद काही प्रमाणात आठवत होता. त्यांनी भरपूर meme material पुरवलं या माध्यमातून, मात्र या संवादादरम्यान कळत-नकळतपणे त्यांनी धीर सुद्धा दिलाय हेसुद्धा मान्य करायला हवं.

फडणवीस मुख्यमंत्री असते, तर ते मैदानात उतरले असते कदाचित, मात्र हे त्यांना जमलं नसतं बहुदा! धीर देणं अगदीच महत्त्वाचं नव्हतं असं अजिबात म्हणता येणार नाही. उद्धवजी संयमी आहेत म्हणून त्यांना हे जमलं.

 

uddhav thackeray inmarathi

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसह अनैसर्गिक आघाडी निर्माण करणं योग्य की अयोग्य?, शिंदे गट म्हणजे खरंच बंड होतं की ‘ऑपरेशन लोटस’ या गोष्टी तूर्तास बाजूला ठेऊयात. आपलीच माणसं आपल्याला सोडून जातात, तेव्हा ते दुःख पचवताना त्रास होतोच. हा धक्का पचवण्यासाठी संयम आणि कणखरता असावी लागते.

पहिल्या एक-दोन दिवसात या दोन्ही आघाड्यांवर काहीसे मागे पडलेले माजी मुख्यमंत्री नंतर मात्र कणखर झाले. त्यांच्या हृदयाच्या आजाराचा पूर्वेतिहास पाहता हे निभावून नेणं कठीण होतं. ते त्यांनी पूर्ण केलं, याबाबतीत त्यांना श्रेय द्यायला हवंच.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या म्हणण्याखातर त्यांनी हे शक्य केलं, असाही एक मतप्रवाह आहे. हे खरं असेलही. तरीही स्वतःचं स्वतःच सारं सोसावं लागतं हेसुद्धा सत्य आहे.

राजकारणात आले तरीही उद्धव ठाकरे ‘राजकारणी’ होऊ शकले नाहीत. छक्के-पंजे खेळणं, ओळखणं, डाव-प्रतिडाव यात ते कमीच पडलेत. तो त्यांचा नैसर्गिक पिंड नाही. मात्र हीच गोष्ट आज त्यांना इथवर घेऊन आली आहे असं म्हणायला हवं. एका खुर्चीच्या मोहापायी ते बरंच काही गमावून बसले.

उद्धवजींनी वारंवार असं म्हटलं आहे, की अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची बोलणी झाली होती. आता अमित शहा या व्यक्तीवर शंभर टक्के विश्वास ठेवणं अशक्य आहे हे खरंय; मात्र या निवडणुकीचा प्रचार ‘देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री असतील’ असं सांगून झाला होता.

हा प्रचार करण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा सहभागी होते. त्यावेळी या अडीच वर्षांविषयी कुठलीही वाच्यता न करणारी शिवसेना अचानक मुख्यमंत्री पदावर दावा सांगू लागली, म्हणजे अशी काही बोलणी झाली होती यावर शंका घ्यायला वाव आहे. म्हणजे शक्यता उरते, ती खुर्चीच्या मोहाची!

फोटोग्राफर असणाऱ्या, मनाने कलाकार असणाऱ्या एका ‘राजकारण्याला’ वापरून घेऊन शरद पवारांनी डाव साधला असं म्हणायला हवं. त्यांचा हा डाव यशस्वी झालाय, यात काहीच शंका नाही. त्यांना महाविकास आघाडीचा शिल्पकार मानलं गेलं. सरकार पाच वर्षं टिकलं असतं, तर त्यांची पत वाढणार होती. सरकार कोसळलं, त्यात सेनेचं आणि काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान झालं. म्हणजे पवारांसाठी गमावणं कमी आणि कमवणं जास्त असा हा एक व्यवहार होता.

 

sharad pawar and uddhav thackrey featured IM

 

तो खेळ संपला. “आम्ही पूर्ण प्रयत्न केले”, असं म्हणत विरोधी पक्षनेतेपद हातात घेऊन विरोधी बाकांवर जाऊन बसायला ते मोकळे आहेत. जनतेने सत्ता दिली नव्हतीच, संधीचं सोनं करत ती अडीच वर्षं उपभोगता आली. आता विरोधी पक्षात असताना, सर्वाधिक संख्याबळ आहे. जिथे बसायचं होतं तिथेच येऊन बसले. म्हणजे त्यांचं गेलं काहीच नाही. जे मिळालं तो बोनस होता.

या सगळ्यात उद्धवजींचा मात्र बळी गेला. हा शिवसेनेचा आणि ठाकरे कुटुंबाचा राजकीय आत्मघात तर ठरणार नाही ना?

मला राजकारण थोडं फार कळू लागलं त्याकाळापासून, उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण ही दोनच नावं अशी आठवतात, ज्यांना संयमी, सुस्वभावी आणि सुसंस्कृत म्हणता येईल.

देशात भाजप सरकारला ‘मोदी सरकार’ असं नाव पडलं, तशी किमया महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’लाच करता आली हेदेखील सत्य आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं, यात एका अनैसर्गिक आघाडीचा अंत झाला आणि जनमत असणारे देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला याच दोन गोष्टींचा आनंद आहे.

बाकी उद्धवजींविषयी वैयक्तिक राग किंवा तिरस्कार असण्याचं काहीही कारण नाही. फ्लोअर टेस्टला सामोरं न जाता राजीनामा देऊन त्यांनी नाचक्की टाळली, तसाच त्या पदाचा मानही राखलाय…. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?