' एका नेत्याची हत्या झाली आणि शिवसेनेला पहिला आमदार मिळाला – InMarathi

एका नेत्याची हत्या झाली आणि शिवसेनेला पहिला आमदार मिळाला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज शिवसेना एक राष्ट्रीय पक्ष म्हणून सर्वत्र ओळखला जातो. भाजप आणि शिवसेनेची युती तर कितीतरी जुनी आहे. अगदी ”बहुत पुराना याराना लागता है” असं म्हणावं इतकी जुनी!

आज शिवसेना आणि भाजप एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. त्यात शिंदेगटानेही घरचा आहेर दिल्याने शिवसेनेच्या गोटात किती आंमदार राहणार? हा प्रश्न भेडसावतोय.

 

eknath im 1

 

पण तुम्हाला माहीत आहे का शिवसेनेचा जन्म एका नेत्याच्या हत्त्येने झाला आहे. काय आहे हे प्रकरण?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

एकेकाळी मुंबई मध्ये गिरण्यांची संख्या लक्षणीय होती. गिरणी कामगार वर्ग हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होता. नारायण सुर्वे यांच्या कविता त्याच वातावरणात जन्माला आल्या. मुंबईची ओळख कामगारांची मुंबई कष्टकरी लोकांची मुंबई अशी होती.

आता मात्र मुंबई फक्त झगमगती मुंबई, मायापुरी मुंबई अशी ओळखली जाते. कामगारांचे, कष्टकरी लोकांचे प्रश्न कुणालाही आठवत नाहीत. ना नेत्यांना ना सरकारला. पण एक काल असा होता की याच कामगारांच्या प्रश्नासाठी नेते सरकारला धारेवर धरत होते. विविध मोर्चे,आंदोलने केली जात.

अशाच कामांसाठी कम्युनिस्ट पक्ष हा कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. आणि नेते कम्युनिस्ट नेते. या कम्युनिस्ट नेत्यांनी कामगारांच्या प्रश्नावर आयुष्य बेतले. बरेच प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केला. त्यातीलच एक होते, कृष्णा देसाई!

रत्नागिरीतील एका खेड्यातून कृष्णा देसाई नोकरीसाठी म्हणून मुंबईमध्ये आले आणि हळूहळू डाव्या चळवळीत सहभागी झाले आणि पुढे ते महानगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक झाले. नंतर १९६७ साली आमदार पण झाले.

 

krushna desai im

 

अत्यंत आक्रमक असलेले कृष्णा देसाई हे आपल्या कामासाठी चांगलेच प्रसिद्ध होते.

त्याचवेळी शिवसेनेचाही उदय झाला होता. मराठी लोकांसाठी काम करणारी संघटना असाच शिवसेनेचा दरारा होता. मुंबईमध्ये शिवसेना हळूहळू हातपाय पसरायला लागली होती.

महानगरपालिकेत प्रजा समाजवादी पक्षासोबत युती करून पहिल्याच प्रयत्नात आपले ४२ उमेदवार निवडून आणले होते. पण तरीही विधानसभेत काही शिवसेना पोहोचू शकली नव्हती.

पण ५ जून १९७० रोजी कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा निर्घृण खून झाला. काही अज्ञात लोक त्यांच्या कार्यालयात आले आणि त्यांना बोलावून ललित राईस मिलच्या परिसरात कृष्णा देसाई यांच्यावर गुप्तीने हल्ला करून त्यांना ठार मारलं.

त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा त्यात हात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.

लाल बावटा संघटनेच्या यशवंत चव्हाण यांनी थेट बाळासाहेब ठाकरे याचं नाव घेऊन या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार ठरवलं. त्यांच्या बरोबरीने दुसरं नांव घेतले गेले ते वसंतराव नाईक यांचं! भले हा आरोप कधी सिद्ध झाला नाही पण संशय देखील मिटला नाही.

ऑक्टोबर १९७० मध्ये कृष्णा देसाई यांच्या मृत्यूमुळे रिकामी झालेली परळमधील जागा पोटनिवडणूक घेऊन भरायची ठरवली आणि त्या जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार नुसता उभाच केला नाही तर निवडूनही आणला.

वामनराव महाडीक हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सहकारी या जागेवर निवडणुकीसाठी उभे राहिले. आणि ते निवडून आले. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे मैदानात उतरले. त्या प्रचार सभांमधून त्यांनी डाव्या पक्षांवर कडाडून हल्ला चढवला.

 

balasaheb inmarathi

 

कृष्णा देसाई यांची पत्नी त्या जागेवर निवडणुकीला उभी राहिली होती. अतिशय अटीतटीची झालेली ही निवडणूक मात्र देसाईंच्या पत्नीला जिंकता आली नाही.

याच निवडणुकीत जिंकलेल्या वामनराव महाडिकांच्या रूपाने शिवसेनेला विधानसभेत प्रवेश करता आला.

 

vamanrao im

 

आज जरी शिवसेना एक राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जात असला तरीही एक काळ असा होता की शिवसेनेला मुंबई वगळता कुठेही फारशी ओळख नव्हती. आणि ती ओळख मिळवण्यासाठीच खूप प्रयत्न करावे लागले. आणि त्याचमुळे कृष्णा देसाई यांच्या खुनाचा संशय हा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर घेतला गेला.

आज ना कृष्णा देसाई हयात आहेत ना बाळासाहेब ठाकरे! पण इतक्या वर्षानंतरही कृष्णा देसाई यांच्या मृत्यूसाठी संशयाची सुई शिवसेनेकडेच जाते कारण त्या जागेवरून शिवसेनेचा विधानसभेत झालेला चंचूप्रवेश. सामान्य लोकांना या पिढीला तर कृष्णा देसाई माहीत देखील नाही.

आज एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पार हादरली आहे. बरेचसे आमदार आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यातील कुणीही शिवसेनेवर नाराज नाही तर मविआ वर त्यांचा राग आहे असं स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे भविष्य काय हा प्रश्न मात्र उत्तरासाठी काळावरच सोडलेला चांगला. नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?