' व्हॅक्युम क्लिनर मधला “अश्लील ऐवज” आणि २ देशांमधील ३ दशकांच्या वैमनस्याची कहाणी…! – InMarathi

व्हॅक्युम क्लिनर मधला “अश्लील ऐवज” आणि २ देशांमधील ३ दशकांच्या वैमनस्याची कहाणी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थायलंड आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान तब्बल तीन दशकं बेबनाव होता. अलिकडेच या दोन्ही देशांनी जुनं विसरुन नव्यानं मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन देशांदरम्यान तीन दशकं वैमनस्य येण्याचे कारण ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल.

या वर्षाची सुरवात थायलंडसाठी चांगली झाली म्हणावं लागेल कारण तब्बल तिन दशकं सौदी अरेबियाशी बिघडलेले संबंध सुरळीत करण्यात अखेर या देशाला यश मिळालं आहे. दोन देशांदरम्यान इतका दीर्घकाळ बेबनाव असणं म्हणजे अक्षरश: लहान मुलांमध्ये असते तशी कट्टी असण्याचं हे विचित्र आणि दूर्मिळ उदाहरण आहे.

मात्र अखेरीस थायलंडला सौदी अरेबियाच्या मनातील थायलंडबाबत असणारि अढी, राग दूर करण्यात यश आलं आहे. मात्र या नव्या मैत्रीची सुरवात, पहिलं पाऊल उचललं सौदीच्या राजकुमारानं. त्यानं भूतकाळात घडलेल्या घटनेला विसरून जात थायलंडच्या पंतप्रधानांना आदरानं आमंत्रण पाठविलं आणि थायलंडच्या पंतप्रधानांनी ते स्विकारून नव्या अध्यायाला सुरवात केली.

 

thailand saudi arabia IM

 

दोन देशातील संबंध बिघडण्यास साधारणपणे आर्थिक, राजकीय कारणं कारणीभूत असतात. मात्र या दोन देशातले संबंध बिघडण्यास कारण झाली एक चोरी. वाचून आश्चर्य वाटलं नां? पण हे खरं आहे आणि हा एक प्रकारचा गिनिज रेकॉर्ड मानला जातो.

या सगळ्याची सुरवात झाली, १९८९ साली. सौदीच्या राजकुमार फैजल बिन फहद यांच्या महालात एक चोरी झाली आणि महागडे दागिने चोरीला गेले, ज्यात एक निळा हिराही होता. या चोरीत तब्बल ९१ किलोचं सोनं आणि ५० कॅरटचा अमूल्य आणि दूर्मिळ असा हा हिरा, ज्याला ब्ल्यु डायमंड म्हणून ओळखलं जात असे, तो चोरीला गेल्यानं राजकुमार चिडला.

ही चोरी महालात काम करणार्‍या क्रिआंग क्राई नावाच्या थाई कर्मचार्‍याने केल्याचा आरोप ठेवण्यात आला. हे दागिने चोरून त्यानं व्हॅक्युम क्लिनरमधे लपवले होते. हे चोरी केलेले दागिने क्रिआंगने आपल्या मायदेशी, घरी कसे पाठवले? याचीही रंजक कथा आहे.

चोरी केल्यानंतर त्यानं थायलंडला के लॅपॅन्ग प्रांतातल्या आपल्या घरी एक कुरियर पाठवलं. हे कुरियर करताना त्याने सोबत एक पाकिट पाठवलं ज्यात पैसे आणि एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत लिहिलं होतं की, सदरच्या पार्सलमधे काही अश्लिल सामग्री असल्यानं कृपया बॉक्स उघडून त्याची तपासणी करू नये.

ही त्याची युक्ती कामी आली आणि थाई अधिकार्‍यांनी लाच घेऊन पार्सल न उघडता, न तपासताच पुढे पाठविलं. यानंतर काही दिवसांनी तो थायलंडला परतला. परतल्यानंतर त्याने हळूहळू या सर्व दागिन्यांना अगदी कमी भावात एक एक करुन विकायला सुरवात केली.

 

blue diamond IM

 

मात्र त्यानं दागिने विकायला सुरवात करायला आणि सौदी प्रशासनानं चोरीचा रिपोर्ट करायला एकच गाठ पडली. याचा एक रिपोर्ट रॉयल थाई पोलिसांकडे आला आणि त्यांनी त्या दिशेने तपासाला सुरवात केली. सौदी प्रशासनानं सांगितल्यानुसार हा कर्मचारीही संशयाच्या परिघात असल्यानं पोलिस त्यादृष्टीनं तपास करत होते.

क्रिआंग पोलिसांच्या हाती लागला आणि त्याच्याकडे सर्व दागिने जप्त केले गेले. त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. दागिने जप्त केल्यानंतर थाई पोलिसांचा चमू हे दागिने परत करण्यासाठी सौदीला गेला. आता हे प्रकरण मिटेल असं वाटत असतानाच एक नविनच वळण या प्रकाराला लागलं.

चोरीचे दागिने परत घेताना सौदी अधिकार्‍यांनी ते बारकाईनं तपासले असता त्यांच्या लक्षात आलं की अर्ध्याहून अधिक दागिने नकली आहेत शिवाय या दागिन्यात तो सुप्रसिध्द ब्ल्यु डायमंडही नाही. आता या प्रकाराची तपासणी करण्यासाठी सौदीच्या राजघराण्याचे निकटवर्ती म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते मोहम्मद अल रुवैली बॅन्कॉकला आले.

आता हे प्रकरण निकालात निघेल असं वाटत असतानाच या प्रकारानं आणखिन एक दुर्दैवी आणि नाट्यमय वळण घेतलं. बॅन्कॉकमधेच रुवैली यांची अतिशय रहस्यमयरित्या हत्या झाली. इतकंच नाही तर त्या पाठोपाठ तीन सौदी अधिकार्‍यांचीही हत्या झाल्याने हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळतच गेलं.

या सगळ्या प्रकारामुळे दोन्ही देशातले संबंध बिघडले. तीन दशकं एकमेकांच्या वार्‍यालाही न उभे रहाणारे हे देश एक नवा अध्याय चालू करत आहेत आणि याला कारण आहेत सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान. त्यांनी हा मनमुटाव दूर करत थायलंडच्या पंतप्रधानांना आमंत्रण दिलं आणि त्यांनीही ते अगत्यानं स्विकारलं.

 

blue diamond 2 IM

चोरी केलेल्या क्रिआंगचं पुढे काय झालं?

या चोरीसाठी क्रिआंगला थायलंडमधेच पाच वर्षांची शिक्षा झाली. मात्र त्याच्या चांगल्या वर्तनामुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली आणि तिनच वर्षात म्हणजे २०१६ साली त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली. कारावासातून बाहेर आल्यावर क्रिआंग अध्यात्मिक मार्गाला लागला आणि बौध्द भिख्कू बनला.

आता या दोन्ही देशातलं वैमनस्य दूर झालेलं असलं तरी तो दुर्मिळ असा ब्लू डायमंड मात्र आजतागायत सापडलेला नसून तो रहस्यमयरित्या गायबच आहे.

 

blue diamond 3 IM

 

एका हिऱ्यामुळे इतकी वर्षं एकेमकांशी शत्रुत्व बाळगून असणारी राष्ट्र आणि त्या चोरीची ही थरारक गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंटमधून जरूर कळवा शिवाय तुम्हालासुद्धा अशी काही रंजक माहिती ठाऊक असेल ती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?