' संयुक्त महाराष्ट्र घडवून आणणारे अज्ञात “उद्धव”…! – InMarathi

संयुक्त महाराष्ट्र घडवून आणणारे अज्ञात “उद्धव”…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हैदराबाद संस्थानाच्या निजामाचं, हैदराबादसह महाराष्ट्रातील मराठवाड्यावर सुद्धा राज्य होतं. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला, मात्र मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९४८ पर्यंत वाट पाहावी लागली होती. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला.

याच मराठवाड्यातील लातूरमध्ये १९४५ साली घडलेली एक घटना आज जाणून घेऊयात. एकीकडे भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आहे, हे जाणवू लागेललं असताना लातूरमध्ये महाराष्ट्र परिषदेचं अधिवेशन सुरु होतं.

या अधिवेशनाचे अध्यक्ष होते फुलचंद गांधी. सावकारी नियंत्रण कायद्याने जोर धरलेला असताना, त्याला विरोध करणारा एक सावकार अधिवेशनाचा अध्यक्ष आहे, हे एका तरुणाला रुचलं नाही. त्याने विद्यार्थ्यांना एकत्र करत अधिवेशनात शिरून एक धाडसाची गोष्ट केली.

‘भक्षक कधीही रक्षक होऊ शकत नाही’ अशी पत्रकं या अधिवेशनात वाटण्यात आली. या तरुणाने अधिवेशनात मोठं वादळ आणलं होतं. महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनात थेट अध्यक्षाला भिडणाऱ्या या तरुणाचं नाव होतं उद्धव; उद्धवराव पाटील!

 

uddhavrao patil IM

 

उद्धवराव पाटील यांच्या लढ्याला यश आलं. फुलचंद यांनी माघार घेतली. त्या दोघांच्यात चर्चा झाली. फुलचंद यांनी उद्धव पाटील यांच्या दोन अटी मान्य केल्या.

पहिल्या अटीनुसार त्यांनी सावकारी सोडली. दुसऱ्या अटीनुसार शेतकऱ्यांच्या हडप केलेल्या सगळ्या जमिनी परत करण्यात आल्या. अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाने फुलचंद यांना धूळ चारली.

अशी झाली जडणघडण :

उस्मानाबादमधील परांडा इथल्या इर्ला गावात उद्धव यांचा जन्म झाला. ३० जानेवारी १९२० हा त्यांचा जन्मदिवस आहे. कुटंब शेती करणारं. घरखर्च आणि जीवन शेतीवरच अवलंबून होतं. घरात शिक्षणाचा पत्ता नव्हता. तुळजापुरातील भोसले कुटुंबाने उद्धव यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.

काठी येथे प्राथमिक आणि उस्मानिया विद्यापीठात माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गणितात बीए, त्यानंतर एलएलबी करून उच्चशिक्षित झाले. वकिली सुरु केली, मात्र त्यात त्यांचं मन फार रमलं नाही.

वकिलीला राम राम ठोकत सावकारीच्या विरोधात तरुणांना एकत्र करण्याचं काम त्यांनी सुरु केलं. इथूनच एका खमक्या नेतृत्वाची सुरुवात झाली असं म्हणता येईल.

स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्य :

नाना पाटील यांनी १९४२ साली ब्रिटिशांविरोधात सशस्त्र आंदोलन केलं. त्यांचे सहकारी जी डी लाड यांच्या हाताखाली उद्धव पाटील तयार झाले. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा भाग झाले. याशिवाय निजामाविरुद्ध बंड पुकारलं. शिंद्री रेल्वे स्थानकावर १०-१५ तरुणांनी निजामाच्या पोलीसांवर हल्ला केला. अवघी काही काडतुसे आणि २ स्टेन गन यांच्या साहाय्याने थेट ५०० जणांवर हल्ला करण्यात आला.

 

hydrabad muktisangram IM

 

या पोलिसांनी एका वाड्यात आश्रय घेतला. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली या गटाने पोलिसांना तिथेही सळो की पळो करून सोडलं. रात्री हॅन्डबॉम्बने हल्ले करता त्यांना जेरीस आणलं. ते पोलिसांच्या हाती मात्र लागले नाहीत.

अखेर निजामाला भारत सरकारची मदत मागावी लागली. सोलापूरच्या कलेक्टरच्या मदतीने या पोलिसांची सुटका करण्यात आली. पुढे मराठवाड्यातील इर्ले गाव हे निजामाच्या राजवटीतून स्वतंत्र होणारं पहिलं गाव ठरलं. उद्धव पाटील यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होत असताना, इर्लेमध्ये तिरंगा फडकावला.

असे झाले भाई :

उद्धव यांनी स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसतर्फे कामाला सुरुवात केली. ते सक्रिय होते. तत्कालीन काँग्रेसमध्ये ब्राम्हण नेत्यांचा वरचष्मा होता. त्यामुळे शेतकरी प्रश्न सोडवणं त्यांना कठीण जाईल असं उद्धव यांना वाटत होतं. इर्लेमध्ये तिरंगा फडकावण्याआधी म्हणजेच ३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.

डाव्या विचारसरणीच्या या पक्षातील लोक एकमेकांना कॉम्रेड म्हणतात. या कॉम्रेडचा मराठी शब्द म्हणून उद्धव यांना भाई अशी उपाधी लागली, ती कायमची!

राजकीय प्रवास :

स्वातंत्र्यपूर्व काळात १९५२ मध्ये भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली. शेकापच्या निशाणीवर उद्धव पाटील यांनी उस्मानाबाद, तुळजापूर मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यांनी निवडणूक जिंकत संसदेत एंट्री मारली.

भाई एसटीने आणि बैलगाडीने प्रवास करत असत. राजकारणात सक्रिय झाल्यावर सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. १९५७ मध्ये हा लढा शिगेला पोचलेला असताना त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिलेल्या फुलचंद गांधी यांचा पराभव करत ते पुन्हा संसद सदस्य झाले.

या काळात त्यांचं तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक राजकारण सुद्धा पाहायला मिळालं. फुलचंद यांच्याकडून सुद्धा अनेक गोष्टी शिकल्या असल्याचं त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं होतं. त्यांनतर १९५८-५९ च्या काळात त्यांनी मुंबईचं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा भूषवलं. शहरी लोकांना मात्र हे फारसं रुचलं नाही.

खुद्द आचार्य अत्रे यांनी सुद्धा त्याच्यावर टीका केली.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झुंजारपणा त्यांनी कायम ठेवला. यंत्र मात्र अत्रे आणि उद्धव पाटील यांच्यात मैत्री झाली. अत्रेंनी अनेकदा उघडपणे त्यांची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं.

 

acharya atre inmarathi
youtube

 

आणीबाणी आणि देशातील दुष्काळाच्या काळात सुद्धा ते सक्रिय होते हे पाहायला मिळालं. सरकारी बाकांवर बसणाऱ्यांवर शाब्दिक हल्ले, फटकारे, सत्ताधार्यांवर सतत असणारा आसूड ही त्यांची ओळख होती.

एक विचारवंत राजकारणी म्हणूनही त्यांनी नाव कमावलं. सध्याचे देशातील एक मोठे नेते असणाऱ्या शरद पवार यांनी सुद्धा त्यांचं एक उत्तम विरोधीपक्षनेता म्हणून कौतुक केलं होतं.

१९६२ च्या निवडणुकीत मात्र त्यांना काँग्रेसचे तुळशीराम पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधक असणाऱ्या काँग्रेस आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या उमेदवाराला नाकारून भाई उद्धव पाटील यांना पाठिंबा दिला. ते राज्यसभेचे सदस्य झाले.

पुढे १९६७ साली पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवून ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले. विरोधी पक्षात असूनही त्यांना लोक लेखा समितीचा प्रमुख करण्यात आलं. यातच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं यश आहे असं म्हणायला हवं.

झंझावाती आयुष्याचा शेवटही नाट्यमय झाला :

उद्धव पाटील ते भाई उद्धवजी पाटील असा प्रवास केलेल्या आणि पुढे राजकारणात मोठं नाव मिळवलेल्या उद्धवजींचा आयुष्याचा प्रवास झंझावाती राहिला. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्यांना ग्रासलं. याच दरम्यान १९८३ साली त्यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.

 

uddhavrao patil 2 IM

 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोठं नाव असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा उद्धव पाटील यांच्यामुळे संयुक्त महाराष्ष्ट्र साकार झाल्याचं या कार्यक्रमात म्हटलं. त्यांनी नेहरूंविरोधात प्रतापगडावर काढलेला मोर्चा हे मोठं यश असल्याचं सुद्धा यावेळी चव्हाण म्हणले होते.

आयुष्यात कायमच गरीब आणि शोषितांसाठी झटलेल्या उद्धव पाटील या झुंझार राजकारण्याचं १२ जुलै १९८४ साली कर्करोगाच्या आजाराने निधन झालं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?