' गुजरात दंगल प्रकरणी मोदींविरुद्ध कोर्टात गेलेल्या तिस्ता सेटलवाडांचा इतिहास माहितीये का? – InMarathi

गुजरात दंगल प्रकरणी मोदींविरुद्ध कोर्टात गेलेल्या तिस्ता सेटलवाडांचा इतिहास माहितीये का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुजरातमधील गोध्रा इथं २००२ मध्ये मोठी दंगल उसळली होती. २७फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसमधील आगीत तब्बल ५९जणांचा मृत्यू झाला होता. गोध्रा अग्नितांडवातील सर्व मृत हे कारसेवक होते, जे अयोध्येवरुन येत होते. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती.

या घटनेची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगाने म्हटलं होतं की, एस-6 या डब्यात जी आगीची दुर्घटना घडली ती आग लागली नव्हती तर लावली गेली होती. दंगलीप्रकरणी गुजरात पोलिसांवर निष्क्रीयतेचा ठपका ठेवण्यात आला होता. तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दंगल थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप होता. इतकंच नाही तर दंगलखोरांवर कारवाई न करण्याचे आदेश दिल्याचाही आरोप होता.

नुकतीच यासंबंधी सुप्रीम कोर्टाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावत मोदी यांनी क्लीन चिट दिली. गुजरात दंगलीदरम्यान झाकिया जाफरी यांचे पती आणि काँग्रेस नेते एहसान जाफरी यांची हत्या करण्यात आली होती. तर आता गुजरात एटीएस अॅक्शन मोडमध्ये आली असून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे.

 

zakia zafri godhra gujrath riots narendra modi inmarathi

 

गुजरात दंगल पीडित झाकिया जाफरी यांच्यासह तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या एनजीओने पंतप्रधान मोदी आणि इतरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खोटे आरोप करून कायदेशीर कारवाईत अडथळा आणल्याच्या एका ताज्या प्रकरणात सेटलवाड यांचा ताबा, गुजरातच्या विशेष तपास पथकाने (एटीएस) आता अहमदाबाद गुन्हे शाखेकडे दिला आहे.

‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव असलेल्या सेटलवाड यांच्यावर खोटी तथ्ये आणि कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटलवाड यांचे नाव घेतले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

२००६ मध्ये, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या तीस्ता सेटलवाड यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यापैकी गुजरात दंगलीतील मृतदेह पुरण्यात आलेल्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावणे, बनावट पुरावे गोळा करणे आणि उत्खनन करणे, परदेशातून आलेल्या पैशांचा गैरवापर आणि फसवणूक करणे असे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहेत. मात्र, या तीस्ता सेटलवाड नेमक्या आहेत तरी कोण? आणि त्यांचा गुजरात दंगलीशी काय संबंध? हा धागा नेमका काय आहे ते जाऊन घेवू.

कोण आहेत तिस्ता सेटलवाड?

गुजरात दंगलग्रस्तांच्या लढ्यात तिस्ता सेटलवाड एक प्रमुख चेहरा आहेत. तीस्ता सेटलवाड यांचा जन्म १९६२ मध्ये महाराष्ट्रात झाला. तीस्ताने मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांचे वडील अतुल सेटलवाड हे वकील होते तर आजोबा एम सी सेटलवाड हे देशाचे पहिले ऍटर्नी जनरल होते तसेच जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या हंटर कमिशनमधील तीन भारतीय सदस्यांपैकी एक होते.

तिस्ता यांनी कायद्याचे शिक्षण मधेच सोडून पत्रकारितेच्या जगात प्रवेश केला आणि काही वर्षातच प्रसिद्ध पत्रकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले .१९९३ मध्ये त्यांनी भारतातील जातीय राजकारणाविषयी माहिती आणि विश्लेषण देण्यासाठी ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ हे मासिक मासिक सुरू केले. त्यासोबतच सबरंग कम्युनिकेशन्स नावाची संस्थासुद्धा स्थापन केली. पत्रकार जावेद आनंद हे त्यांचे पती आहेत.

 

teesta im

 

सेटलवाड यांनी काही सहकाऱ्यांसह सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस नावाची एनजीओ सुरू केली. दंगलग्रस्तांना कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मोदींना पहिल्यांदा क्लीन चिट मिळाल्यानंतर तीस्ता यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि गुजरात दंगलीच्या चौकशीची मागणी केली. त्यांनी गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली होती. २००७ मध्ये तीस्ता यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.पद्मश्री व्यतिरिक्त त्यांना २००२ मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारही मिळाला आहे

२०१३ मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील १२ रहिवाशांनी तीस्ता यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली होती. दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मिळालेल्या कोटयावधींची रक्कम तीस्ता यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेला फायद्यासाठी वापरली असल्याचे आरोपकर्त्यांनी म्हटले आहे.

गुलबर्ग सोसायटीत म्युझियम बांधण्यासाठी तीस्ता यांनी परदेशातून सुमारे दीड कोटी रुपये जमा केल्याचा आरोप गुलबर्ग सोसायटीतील लोकांच्या वतीने करण्यात आला होता. त्या पैशांचा योग्य वापर झाला नाही.

२०१४ मध्ये क्राईम ब्रँचने तीस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली होती.एनजीओच्या विदेशी कनेक्शनचा खुलासा त्यांचा माजी सहकारी रईस खान पठाण याने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला होता.

सेटलवाड यांच्यावर काँग्रेसच्या सांगण्यावरुन भाजप आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपप्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. खरे तर गृहमंत्र्यांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्याकडून पद्मश्री परत घेण्याची मागणी केली आहे.

तिस्ता सेटलवाड यांना काँग्रेसच्या काळात तुष्टीकरणामुळे पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेचा हवाला देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

२००२ च्या गुजरात दंगलींबाबत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सेटलवाड यांच्या मोहिमेमागे काँग्रेसचाच हात असल्याचा आरोप भाजपने केला. अहमदाबाद शहर गुन्हे शाखेत दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात सेटलवाड यांना गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर आणि अहमदाबादला नेल्यानंतर भाजपने सेटलवाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

 

narendra modi inmarathi

जेव्हा आर आर पाटलांनी प्लॅनिंग करून राज ठाकरेंची अटक घडवून आणली होती

तो दुर्दैवी काळ, जेव्हा या राज्यात भूकबळींचा आकडा गेला १ कोटींवर…

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे की सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते.भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने छुप्या हेतूने दंगलीसंदर्भात प्रकरण तापवणाऱ्यांना फटकारताना सेटलवाड यांचे नाव घेतले. पात्रा म्हणाले की, न्यायालयाने हे ही स्पष्ट केले आहे की प्रक्रियेचा गैरवापर करणाऱ्या सर्वांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

तिस्ता सेटलवाड यांनी त्यांच्या बाजूने मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि दावा केला की ही अटक बेकायदेशीर आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद पोलिसांनी सेटलवाड यांना त्यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांना आपल्या सोबत नेले.

सेटलवाड यांचे वकील विजय हिरेमठ यांनी आरोप केला की, त्यांना गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेताना आम्हाला या प्रकरणाची अगोदर माहिती देण्यात आली नव्हती. बळजबरीने घरात घुसून त्यांना सोबत नेण्यापूर्वी मारहाण केली गेली.

मित्रांनो आता तिस्ता सेटलवाड यांचे पुढील भवितव्य काय असेल किंवा त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल अथवा त्या काय भूमिका घेतील हे येणारा काळच सांगू शकेल तोवर wait & WATCH

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?