' सोन्याच्या विटा,आयफोन्सने भरलेलं घर, मुलाची आत्महत्या : IAS अधिकाऱ्याची थरारक गोष्ट! – InMarathi

सोन्याच्या विटा,आयफोन्सने भरलेलं घर, मुलाची आत्महत्या : IAS अधिकाऱ्याची थरारक गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘भ्रष्टाचार गेला आहे किंवा कमी झाला आहे” अशा समजुतीत आपण सध्या जगत आहोत. देश पातळीवर विचार केला तर हे प्रमाण नक्कीच कमी झालं आहे. पण, जसे चंद्रावरही डाग आहेत तसे या समजुतीला अपवाद ठरवणारे देखील कित्येक लोक अजून ‘सिस्टीम’ मध्ये आहेत.

‘संजय पोपली’ हे चंदिगढ मधील अशाच एका भ्रष्ट आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे ज्याने मनपाच्या एका कामात मोठा आर्थिक घोटाळा केला आणि भ्रष्टाचार अजून सुरू आहे याचा दाखला दिला आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाच्या निविदांमध्ये कंत्राटदारांकडून १% ‘कमिशन’ घेत या पठ्ठ्याने चक्क १२ किलो सोनं, ३ किलो चांदी, ४ आयफोन, सॅमसंगचे महागडे फोन अशी अवैध संपत्ती आपल्या घरात साठवून ठेवली होती. २० जून २०२२ रोजी ‘व्हिजिलन्स ब्युरो’ने संजय पोपलीला अटक केली आणि ही माहिती लोकांसमोर आणली.

 

sanjay popli IM

 

संजय पोपली हा चंदिगढ येथील नवांश या भागात कार्यरत आहेत. एका कंत्राटदाराकडून एका टेंडरसाठी ७ लाख रुपये रोख घेत असतांना त्याला आणि त्याचा साथीदार संदीप वत्स याला जालंधर पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.

‘व्हिजिलन्स ब्युरो’ म्हणजेच ‘दक्षता पथका’च्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की, “एका विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही संजय पोपली यांच्या घरावर धाड टाकली आणि त्यांच्या स्टोअर रूम मधून आम्हाला ही बेहिशोबी मालमत्ता हस्तगत केली.”

प्रकरण इथेच संपलं नाही. दक्षता पथक जेव्हा संजय पोपली यांच्या घरातून परतलं तेव्हा ‘कार्तिक पोपली’ या त्यांच्या तरुण मुलाने मानसिक धक्का बसल्याने आत्महत्या केली आणि या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.

 

kartik popli IM

 

संजय पोपली यांच्या घरात ३१६० ग्रामचे ४९ सोन्याचे बिस्किटं होते, ३ किलो वजनाच्या चांदीच्या ३ विटा, १८० ग्राम वजनाचे १८ चांदीचे नाणे इतकी संपत्ती जमा होत असतांना त्यांचा मुलगा कार्तिक याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं यावर सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दक्षता पथकाचे प्रभारी डेप्युटी कमिश्नर अजय कुमार यांनी संजय पोपली यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर चौकशी केली होती. अजय कुमार यांनी सांगितलं की, “जेव्हा आम्ही संजय पोपली यांना चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्यांनी स्वतः आपला कबुली जबाब लिहून दिला ज्यामध्ये त्यांनी आपल्या घरात असलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा हिशोब लिहून दिला.”

अजय कुमार यांनी संजय पोपली यांना चौकशीसाठी मोहालीला नेलं होतं. हे प्रकरण इलेक्ट्रॉनिक मीडियाने ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवण्यास सुरुवात केली आणि त्यातून पोपली कुटुंबाची बदनामी सुरू झाली.

कार्तिक पोपली यांना हे सहन होत नव्हतं. आपल्या वडिलांची परवाना असलेल्या पिस्तुलचा कार्तिकने वापर केला आणि त्यात असलेली एकमेव गोळी त्याने स्वतःला मारून घेतली.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांवर देखील ताशेरे ओढले जात आहेत की, त्यांनी जर संजय पोपली यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत हे पिस्तुल सुद्धा हस्तगत केलं असतं तर कार्तिक पोपली यांचा जीव वाचवता आला असता.

कार्तिक पोपली यांनी स्वतःला गोळी मारून घेतल्याचं कळल्यानंतर जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा पोपली यांच्या परिवाराने कार्तिक यांना दवाखान्यात नेण्यासाठी देखील मनाई केली. पण, पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर कार्तिक यांना सेक्टर-१६ येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

सेक्टर ११ येथील पंजाब दक्षता पथकाचे अधिकारी सुखविंदर सिंग यांनी संजय पोपली यांच्याविरुद्ध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी स्वतंत्र तक्रार दाखल केली ज्यावर सध्या चौकशी सुरू आहे.

 

Gun IM

 

१९९३ मध्ये संजय पोपली यांची ‘पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस’ मध्ये काम करण्यासाठी निवड झाली होती. १९९७ मध्ये संजय पोपली यांनी आपली पदोन्नती करून घेण्यासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस टाकली होती. जलालाबाद येथे कार्यरत असतांना त्यांचे एका पोलीस ऑफिसर सोबत इतके वाद झाले की, सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करन संजय पोपली यांची बदली करण्यात आली होती. या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी संजय पोपली यांना ११ वर्ष लागले होते.

२००७ मध्ये संजय पोपली हे पदोन्नतीसाठू पुन्हा कोर्टात गेले आणि २००८ मध्ये संजय पोपली यांची आयएएस ऑफिसर म्हणून स्वतःची पदोन्नती करवून घेतली.

आयएएस ऑफिसर झाल्यानंतर संजय पोपली यांना ‘औद्योगिक विस्तार’ हे खातं देण्यात आलं होतं. औद्योगिक भागात सांडपाण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सरकारने सोपवली होती. पण, संजय यांनी या पदाचा गैरवापर करत केवळ स्वतःची श्रीमंती वाढवण्याचं काम केलं.

प्रत्येक कंत्राट देतांना “माझी कमाई किती?” याकडे केवळ संजय पोपली यांनी लक्ष दिलं. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ही माहिती कळताच त्यांनी संजय पोपली यांची पेन्शन विभागात बदली केली होती. पण, तिथेही संजय पोपली यांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता.

कार्तिक पोपली यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या आईने पोलिसांना या गुन्ह्यासाठी जबाबदार ठरवलं. हे काही प्रमाणात योग्य असलं तरीही या सर्व घटनांचे खरे गुन्हेगार संजय पोपली हे स्वतःच आहेत हे नाकारता येणार नाही.

 

sanjay popli 2 IM

 

कमी काळात झटपट कमाई करण्याच्या आपल्या आमिषावर संजय पोपली यांना कधीच नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्यामुळेच ते आज जेलमध्ये आहेत.

संजय पोपली हे किती मोठ्या शिक्षेसाठी पात्र आहेत हे कायदा ठरवेलच. पण, त्यांच्या भ्रष्टाचाराची शिक्षा पूर्ण पोपली परिवार भोगत आहे हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?