' जगातील उद्योजकांना धडे देणारा १३० वर्षं जुना ‘मुंबई डब्बेवाल्यांचा’ उद्योग डबघाईला का आलाय? – InMarathi

जगातील उद्योजकांना धडे देणारा १३० वर्षं जुना ‘मुंबई डब्बेवाल्यांचा’ उद्योग डबघाईला का आलाय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोना संकटानंतर हळूहळू जनजीवन सामान्य होत आहे. राज्यात सारे अनलॉक झाले आहे. पण कोरोनाच्या काळात अनेक बदल झाले. अनेक रोजगार ठप्प झाले . मुंबई सारख्या आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या शहरावर देखील बेरोजगारीचे ढग जमले. आर्थिक संकटाने सर्वांना आपली दहशत घातली. यातून कोणत्याच वर्गातले लोक सुटले नाहीत.

काही वर्षांपूर्वी आलेला इरफान खानचा ‘द लंचबॉक्स’ हा सिनेमा आपल्याला आठवत असेल. इरफान, नवाज, बरोबरच या सिनेमात महत्वाची भूमिका होती ती मुंबईच्या डब्बेवाल्यांची. या सिनेमात डब्बेवाल्यांच्या माध्यमातून जी एक वेगळीच कहाणी आपल्याला बघायला मिळाली ती आजही खूप ताजी आहे.

 

the lunchbox IM

 

जगातील कित्येक उद्योजकांना व्यवस्थापनाचे धडे देणारा १३० वर्ष जुना मुंबईच्या डब्बेवाल्यांचा उद्योग देखील याच कोरोनामुळे थंडावला. इतका जुना आणि सुसूत्री व्यवसाय थंडावण्याची काय कारणे असावीत आणि त्यावर काही उपाय केले गेलेत का? पाहूया या लेखातून.

मुंबईत येणारी नैसर्गिक आपत्ती असो, दहशतवादी हल्ले असो, अनेक संकटे आली तरी डबेवाले प्रत्येकवेळी या संकटाना नेटाने सामोरे गेले आहेत. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या कार्यप्रणालीवर खूप मोठा परिणाम झाला. महामारीमुळे मागील एक वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा कोलमडली.

अचानक कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग थांबले. परिणामी, या काळात डबेवाल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान सहन करावा लागलं. पोटाचा प्रश्न सुटण्यासाठी आणि कुटुंबाचा आर्थिक गाडा चालविण्यासाठी डबेवाल्यांना पर्यायी उत्पन्नांसाठी सुरक्षा रक्षक, शेतीची कामे व अन्य इतर ठिकाणी कामे करावी लागत आहेत.

पूर्वी एकूण ४५०० ते ५००० डबेवाले काम करत होते. दीड ते दोन लाख डबे रोज पोहोचवण्याचे काम करत होते. आता सध्या मुंबईमध्ये फक्त २०० ते २५० डबेवाले केवळ २००० ग्राहकांना सेवा देत आहेत. थोड्या दिवसात अजून १०० डबेवाले कामावर रुजू होतील, पण ही संख्या खूपच कमी आहे.

 

dabbewala IM

 

लोकल प्रवासावरील निर्बंध आणि काही प्रमाणात ग्राहकांचा घटलेला प्रतिसाद, ऑनलाइन खाद्यपदार्थ घरी पोचवणार्‍या काही सुविधा, ऑनलाइन फूड आऊटलेट्स यांमुळे वर्षांनुवर्षे ‘मुंबईचा डबेवाला’ म्हणून असलेली ओळख पुसली गेली आहे. उत्पन्नासाठी अनेक डबेवाल्यांनी दुसरा पर्याय शोधला तरी पुन्हा डबे व्यवसायासाठी सरकारनेही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी डबेवाला संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विरार ते चर्चगेट, कल्याण, पनवेल, वाशी ते सीएसएमटी अशा तीन्ही मार्गावर जेवणाचे डबे पोहोचवणारे बहुतांश डबेवाले मुंबईच्या लोकलवरच अवलंबून आहेत. मुंबईतील साडे चार ते पाच हजार डबेवाले टाळेबंदीआधी साधारण दोन ते अडीच लाख नोकरदारवर्ग, शालेय विद्यार्थी, दुकानदार यांना डबा पोहोचवण्याचे काम करत होते.

प्रत्येक डबेवाला हा २० ते २५ डबे पोहोचवत होता. यातून प्रत्येक डबेवाल्याला १५ हजार ते १६ हजार रुपये महिन्याकाठी मिळत होते. परंतु कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि लोकलही बंदी झाली. त्याबरोबरीने हा व्यवसायही बंद झाला. उत्पन्न नसल्याने अनेक डबेवाले हे गावी गेले. परिणामी डबेवाल्यांना आर्थिक चणचणही भासू लागली.

गेल्या वर्षभरापासून टाळेबंदीचा असल्याने याचा फटका डबेवाल्यांना बसत आहे. यामुळे व्यवसाय होत नसल्याने गेली अनेक वर्ष डबे पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांनी उत्पन्नसाठी दुसऱ्या व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.

 

mumbai dabbewala IM

 

मुंबईत गेली ३५ वर्ष डबे पोहोचवण्याचे काम करणारे लक्ष्मण टकवे (५७ वय) यांनी सांगितले की डबे सेवा ठप्प झाल्याने उत्पन्नासाठी त्यांनी आपल्या गावी कामशेतकडे जाण्याचा निर्णय घेतला. डबे पोहोचवण्यातून महिन्याला १५ ते १६ हजार रुपये उत्पन्न मिळत असे. करोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली व गावी जाऊन भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे ते म्हणाले.

मुंबईला येऊन पुन्हा डबे विकण्याचा विचार आहे. परंतु लोकल प्रवासावर बंदी असल्याने ते करणार कसे, असा प्रश्न आहे. तर मालाडला राहणारे शिवाजी मेदगे हे गेली २४ वर्ष डबे पोहोचवण्याचे काम करत होते. परंतु कोरोनामुळे डब्याच्या व्यवसायावरच गदा आली आणि आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे त्यांनी मालाडमध्ये खासगी कंपनीचा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी पत्करली आहे.

पहिली लाट ओसरल्यानंतर आणि लोकल प्रवासाची परवानगी मिळाली तेव्हा रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि सकाळी डबे पोहोचवण्याचे काम करत होते. परंतु दुसऱ्या लाटेतही लोकल प्रवासावर बंधने येताच त्यांना सुरक्षा रक्षकाच्या नोकरीवरच अवलंबून राहावे लागल्याचे ते सांगतात.

घरी पत्नी, दोन मुले व आई असून संपूर्ण कुटुंबाची मदार त्यांच्यावरच असल्याचे शिवाजी म्हणाले. लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यास डब्यांच्या व्यवसायात उतरू, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

 

dabbewala 3

 

परिस्थिती अशी कितीही बिकट असली तरी हरतील ते डबेवाले नाहीतच. या ही संकटावर त्यांनी उपाय शोधला आहे. कोरोनाच्या पडत्या काळाचा धडा घेत, डबेवाले आधुनिकतेकडे कूच करत आहेत. माहिती तंत्रज्ञान, ऑनलाइन जगाचे ज्ञान घेऊन ‘आधुनिक डबेवाला’ (mumbai dabbawala) बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तर, आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी नवीन रोजगाराची निर्मिती करण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय कितपत चालू होईल याची श्वाश्वती जरी नसली तरी कमीत कमी एक ते दोन उत्पन्नाची साधने असणे आवश्यक असल्याचे डबेवाल्यांना गरजेचे वाटू लागले आहे.

लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एक वेगळे आणि नवीन उत्पन्नाचे साधन म्हणून लवकरच ‘सेंट्रल किचनची’ सुरवात करण्यात येणार आहे. या किचनच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न करण्याकडे जास्त लक्ष देण्यात येणार असून ग्राहकांसाठी कमी किंमतीत योग्य व पूरक आहार (दुपारचे जेवण) वेळेवर संपूर्ण मुंबईमध्ये देण्याचा मानस आहे.

या किचनच्या माध्यमातून जवळपास २०० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच, भविष्यात हा व्यवसाय अनेक राज्यात व शहरात केला जाण्याची ही योजना आहे. यासह अनेक हॉटेलसोबत करार करून त्यांच्या डिलिव्हरी डबेवाला करणार आहे.

पडत्या काळात डबेवाल्यांनी आरोग्य विमा, स्वछता, विश्वास तसेच कामगारांच्या दृष्टीने भविष्यातील नियोजन, बचत या गोष्टी शिकल्या आहेत, असे मुंबई डबेवाला संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

 

mumbai dabbewala foundation IM

 

जगभरात आधुनिकता वाढत चाललेली आहे. त्याप्रकारे डबेवाल्यांनी सुदधा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने डबेवाला संघटनेने आधुनिक पद्धतीने कामे जलद व सोप्या पद्धतीने करता येतात. याचे संपूर्ण ज्ञान डबेवाल्यांना कसे देता येईल व आधुनिक डबेवाला कसा तयार होईल याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे.

डबेवाल्यांचे काम करण्यासाठी तरूणांचा सहभाग कमी आहे. आधुनिकता आल्यास आणि सेंट्रल किचनची सुरूवात झाल्यास तरूणांचा सहभाग नक्कीच वाढेल अशी आशा आहे.

अर्थात जरी १३० वर्षे जुना व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असला तरी ‘कोशिश करनेवालोंकी हार नाही होती…’ याचीही शिकवण या डबेवाल्यांनी आपल्याला देऊन पुन्हा एक नवा लढवैया आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे हे निश्चित!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?