' “हा” इतिहास सिद्ध करतो की बंडखोर शिंदेंची गद्दारी नव्हे तर – ‘खुद्दारी’…! – InMarathi

“हा” इतिहास सिद्ध करतो की बंडखोर शिंदेंची गद्दारी नव्हे तर – ‘खुद्दारी’…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सुरज उदगीरकर

===

#गद्दारीनव्हेखुद्दारी!

हातात मीठ घेऊन शपथ घेतलेले आणि शिवबंधन बांधून घेतलेले चाळीसच्या वर आमदार एकाएकी फुटतात तरी कसे? खरंतर ह्या गोष्टींची आखणी आणि नियोजन खूप आधीपासून सुरू असणार ह्यात शंका नाही. आणि उद्धव ठाकरेंना ह्या प्रकाराबद्दल कसलीही कल्पना नव्हती हे स्पष्ट दिसत आहे. आणि खुद्द ठाकरेंना काहीही कल्पना नसणे ही गोष्ट खूप काही सांगून जाते.

राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष असूनही आपल्या नाकाखाली आपलेच आमदार काय करू पाहतायत हे कळत नसेल तर त्यांची स्वतःच्या पक्षावर, संघटनेवर, सरकारी यंत्रणांवर आणि खुद्द सरकारवरच कसलीच पकड कधीच नव्हती हे आता उघड आहे.

तब्बल निम्म्याहून अधिक आमदार स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याविरोधात जातात, बंड करतात म्हणजे ही गद्दारी नव्हे. मंत्रिपदाची लालसा धरून नाराज होऊन एखाद दोन जणांनी पक्ष सोडणे वगैरे प्रकार इथे झालेला नाही. इथे ह्या वेगळे होऊ पाहणाऱ्या आमदारांचा पक्षच सत्तेत आहे. तात्पर्याने ही गद्दारी नसून ह्याला हतबलता म्हणता येईल!

 

eknath shinde 2 IM

 

सध्यातरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद हवंय असं काही दिसत नाही. ते शक्यही नाही. शिवाय ते मंत्रिपदही बाळगून होते. तरीही एकनाथ शिंदे आणि पाठोपाठ साडे-तीन डझन आमदार बाळासाहेबांचे नाव घेत, आनंद दिघेंचे संस्कार सांगत बंड करते झाले. ह्याचा अर्थ काय?

सत्ता आणि मंत्रिपद असताना ते लथाडून बाहेर पडणे म्हणजे शिवसेना आमदारांमध्ये स्वतःच्याच नेतृत्वाबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या एकूण कारभाराबद्दल किती टोकाची नाराजी असेल ह्याचा अंदाज येतो.

हे सगळं प्रकरण हळू हळू तापत आता अगदी उकळत येईपर्यंत उद्धव ठाकरे सगळं अलबेल असल्यासारखे वागत होते. औरंगाबादची प्रचारसभा आणि संजय राऊतांच्या मुलाखती वगळता उद्धव ठाकरे फारसे कुठे दिसले काय, जाणवले देखील नाहीत.

अक्षरशः विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देखील उद्धव ठाकरे एखाद्या आजारी माणसाला दवाखान्यात तासभर भेट देऊन यावी तसे विधानभवनात फेरी मारून गेले.

पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचे प्रयत्न इथेही दिसले नव्हते. ते ना फारसे विधानसभेत आले, ना मंत्रालयात आले. ते फक्त फेसबुकवर लाईव्ह आले.

शिवाय संजय राऊत सारख्या उथळ शायरी करणाऱ्या आणि बालिश वक्तव्ये करणाऱ्या एका साध्या राज्यसभा खासदाराला काय म्हणून उद्धव ठाकरे इतके जवळ करून बसले असावेत? राजकारणात संजय राऊतांचा सेनेला आजवर काय फायदा झालाय ह्याचा विचार आता शिवसेना नेतृत्वाने आणि उरल्यासुरल्या शिवसैनिकांनी करायला हरकत नाही.

 

sanjay raut IM

 

आता वेळ निघून गेल्यात जमा आहे पण तरीही! राजकारणात उपद्रवमूल्य असणे चांगली गोष्ट आहे. पण संजय राऊतांचे मूल्य केवळ मीडियासमोर निरर्थक आणि बेताल वक्तव्ये करण्यापूरते दिसले आणि उपद्रव सर्वात जास्त सेनेलाच झाल्याचा दिसून येतोय.

अतिआत्मविश्वासात आणि घमेंडबाजीत पक्षाचे सर्वतोपरी नुकसान करणारे संजय राऊत सेनेचा चेहरा म्हणून पुढे येत गेले आणि एका फटक्यात ४० आमदार स्वतःकडे खेचून घेऊ शकणारे एकनाथ शिंदे मात्र बाजूला पडल्यासारखे झाले होते.

जिथे एकनाथ शिंदेंसारखा ताकदवान नेता बाजूला पडतो तिथे राज्यातल्या इतर आमदारांची काय कथा? निधी वाटपाबाबतच्या असो की राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनमानी कारभाराबाबतच्या असो, कित्येक शिवसेना आमदारांच्या तक्रारी माध्यमांच्या मार्फत सगळ्या जगाला कळल्या पण मातोश्रीचा उंबरा काही शिवू शकल्या नाहीत. त्या मधल्यामधेच विरून गेल्या! मुख्यमंत्र्यांना लक्ष देता आलं नाहीच, पण तक्रारी ऐकून घेण्यासाठी वेळही देता आला नाही.

स्वतःच्या आमदारांना इतकं प्रचंड प्रमाणात गृहीत धरण्याचा परिणाम आता समोर आहे! घुसमटलेल्या आमदारांनी आता वेगळा मार्ग धरताच त्यांना गद्दार घोषित करून मोकळे झाले. गद्दारी कसली?

 

eknath shinde 3 IM

 

जे जाऊ पाहतायत ते पदासाठी, सत्तेसाठी जातच नाहीयेत. गद्दारीची प्रेरणा एकतर पैशाचा, पदाचा किंवा सत्तेचा लोभ असतो किंवा भीती असते! इथे दोन्ही दिसत नाही. म्हणजे सध्यातरी नाही. लोभ असो वा भीती, दोन्हीमुळे एकत्र इतक्या मोठ्या संख्येने लोक बंड करत नाहीत.

बरं अजूनही एकनाथ शिंदे आणि मंडळी काय म्हणतायत? की राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सत्तेत बसायला नको. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा. जे अगदी साहजिक आहे.

महाविकास आघाडी का नको हे ही स्पष्टपणे बोलून झालंय. ह्यावर शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचा पवित्रा काय? तर म्हणे “शिवसैनिकानो संघटित राहा. राष्ट्रवादी आपल्यासोबत भक्कमपणे उभी आहे”

 

uddhav thackeray angry inmarathi

 

जी गोष्ट नको म्हणून निम्म्याहून जास्त आमदार सत्ता सोडून, पद सोडून फुटायला तयार आहेत तीच गोष्ट अजून गडद करून कागद फाटेस्तोवर गिरवून सांगण्यात काय हशील आहे? म्हणजे सत्तेचा हव्यास नेमका आहे कोणाला हे स्पष्ट दिसतंय नाही का?

हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार ह्यावर दोन्ही बाजू बाजू करतायत. फरक इतकाच की एक गट त्यासाठी सत्तेला लाथ मारायला तयार आहे तर दुसरा अजूनही सत्ता वाचवण्यासाठी तडजोड करायला तयार आहे.

असो. जैसी जीसकी सोच!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 23 posts and counting.See all posts by suraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?