' शिंदे, ठाकरे आणि पवार: आजचा बंड म्हणजे १९७८ सालाचा सिक्वल! – InMarathi

शिंदे, ठाकरे आणि पवार: आजचा बंड म्हणजे १९७८ सालाचा सिक्वल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेले दोन दिवस राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड आज बातम्यांचा विषय असला तरिही हे बंड राज्याला नवीन नाही. किंबहुना १९७८ साली अगदी अशाच प्रकारे घडलेल्या एका ऐतिहासिक बंडाचा हा सिक्वल किंवा सिझन टू आहे. या दोन्ही घटनांत कमालीची साम्यस्थळं आहेत. यातलं एक महत्वाचं साम्य आहे, आज किंगमेकर, संकटमोचन अशी बिरूदं प्राप्त केलेले शरद पवार हे राजकारणी व्यक्तीमत्व! काय घडलं होतं १९७८ सालच्या त्या दिवशी?

दोन वर्षांपुर्वी पहाटेच्या फसलेल्या शपथविधिनंतर लोकमताला बाजूला सारत राजकारणाची गणितं जुळवत, लसावी काढत तीन पायाच्या सरकारनं सूत्रं हातात घेतली खरी पण खदखद पूर्ण मिटलेली नव्हती. आज तीच खदखद एकनाथजी शिंदे यांच्या बंडानं उफाळून वर आलेली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

”कर्मा स्ट्राईक्स बॅक अगेन ॲण्ड अगेन” हे आजच्या जेन झीचं लाडकं वाक्य आहे. समाजात आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटनांमधून ते सातत्यानं सिध्दही होत असतं. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती येण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

 

eknath shinde IM

 

असं म्हणतात की,”पॉलिटिक्स में कोई किसी का सगा नहीं होता” राजकारणाचा खेळ खेळायचा तर हा नियम सर्वात आधी घोटवावा लागतो. तुम्हाला इथल्या शिड्या चढायच्या असतील, सत्तेचं सिंहासन अबाधित राखायचं असेल तर या नियमाचं पालन करण्यावाचून पर्याय नाही. म्हणूनच इथली पक्षीय गणितं आणि समिकरणं सातत्यानं बदलताना दिसतात.

गेले दोन दिवस जे राजकीय नाट्य महाराष्ट्रात घडतंय आणि ज्याची चर्चा देशभरातली माध्यमं करत आहेत, ते नाट्य खरंतर या राज्याला नविन नाही. पूर्वीही एकदा अगदी हेच नाट्य या राज्यानं पाहिलं आहे. चकीत करणारं बंड या राज्यानं पचवलं आहे. योगायोगाची गोष्ट ही की, चार दशकांपूर्वी बंडाच्या केंद्रस्थानी असणारी व्यक्ती आज दुसर्‍या बाजूला आहे.

वसंतरावदादा पाटील, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व! आज शरद पवारांच्या साडेतीन जिल्ह्यांचा उल्लेख होतो त्याच पट्ट्यात सहकारी चळवळ रुजविणारं व्यक्तिमत्व. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या रुपानं सांगलीच्या ऊस शेतीला कृषी नकाशावर चमकविणारा नेता!

 

vasantdada patil IM

 

१९५२ पासून सक्रिय राजकारणात असणार्‍या वसंतरावदादांचा प्रवास टप्प्या टप्प्यानं होत गेला. १९५२ ते १९७२ या दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं. देशाचं स्वातंत्र्य नविन होतं तेंव्हाचा हा काळ. अनेक बदल या देशात रुजविले जात होते. त्यापैकीच एक सहकार चळवळ. पश्चिम महाराष्ट्रात हे काम प्रामुख्यानं केलं वसंतरावदादांनी. सत्तेवर नसतानाही दादांनी हे काम केलं.

याच दरम्यान एक हुशार, तल्लख बुध्दी असणारा आणि कष्टाळू असा तरूण दादांच्या मदतीला होता. जणू काही त्यांचा शिष्य़च. दादांची सावली बनलेला हा तरूण केवळ दादांना समाजकारणात मदत करत होता असं नाही तर बरोबरीनं राज्यातलं राजकारणही शिकत होता.

आपल्या या शिष्याचा, त्याच्या हुशारीचा दादांना अभिमानही होता आणि त्याच्यावर अगदी डोळे बंद करून ठेवण्यासारखा विश्र्वासही होता. या तरूणाचं नाव होतं, शरद पवार!

अवघ्या तिशीतला हा तरूण भविष्यात राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या राजकीय पटलावर चमकण्याची महत्वाकांक्षा बाळगून होता. ही महत्वाकांक्षा ज्या राजकीय नाट्यानं वास्तवात आली तिला त्या काळात, “पाठीत खंजीर खुपसला” आणि “गद्दारी” या भाषेत दुषणं दिली गेली.

स्वत: दादा ही बोच आणि ही पलटी कधीच विसरूही शकले नाहीत आणि माफही करू शकले नाहीत. आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. कदाचित ही घटना लोक विसरूनही गेले आहेत आणि नविन पिढीला यातलं फ़ारसं काही माहित असण्याची शक्यता नाही. मात्र राजकारण हा सारीपाटाचा असा खेळ आहे, जिथे नव्यानं जुन्या चाली खेळाव्या लागतात. आज खेळाडू बदलले असले तरिही खेळ तोच जुना आहे, १९७८ चा!

 

sharad pawar inmarathi

 

मुख्यमंत्री, युतीचं सरकार आणि निष्ठावंत मानलं गेलेल्यांचं बंड. गोष्ट तीच आहे फक्त चेहरे बदलले आहेत.

१९७८ साल, हा तोच काळ होता जेंव्हा कॉंग्रेसमध्ये फूट पडून त्याची दोन शकलं झाली होती, कॉंग्रेस एस आणि आय अशा दोन नावांनी एकाच पक्षाच्या दोन चुली झाल्या होत्या. कॉंग्रेस एस ला ६९ आणि आय ला ६५ जागा मिळाल्या. त्या काळात झपाट्यानं लोकप्रिय झालेल्या जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या. मात्र कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं दोन्ही कॉन्ग्रेसना सरकार स्थापनेसाठी युती करण्यावाचून पर्याय उरला नाही.

कॉंंग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले आणि नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले.

सरकार स्थिर होतच होतं की, शरद पवार यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी ३८ आमदारांसह वेगळे होत बंड पुकारलं आणि सर्वात तरूण मुख्यमंत्री ही बिरुदावली मिरवत हातात राज्याची सूत्रं घेतली. त्यांची ही बंडाळी वसंतराव दादांसाठी मोठा धक्का होता.

त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवारांनी गुपचूपपणे आमदार फ़ोडण्याऐवजी थेट वसंरवादादांशी बोलायला हवं होतं. काल ज्यांनी बंड करुन सत्ता हातात घेतली होती आज त्यांच्यासमोर अगदी तसंच एक बंड उभं आहे.

या दोन्ही घटनांतील आणखी एक साम्य म्हणजे कालपासून जसेे अनेक आमदार नॉट रिचेबल झाले आहेत, अर्थात त्यांनी संपर्क करण्याचं टाळलं आहे, त्याचप्रमाणे त्याकाळी लॅंडलाईन फोनच्या वायर्स कापून टाकण्यात आल्या होत्या, जेणेकरून कोणत्याही बंडखोर आमदाराशी संपर्क केला जाऊ नये.

 

pawar im

 

खरंतर याचा एक ट्रेलर अजित पवार यांच्या बंडाच्या रुपानं २०१९ सालीही येऊन गेला. पण राजकारणात कसलेल्या, इथले छक्केपंजे, नियम कोळून प्यायलेल्या शरद पवारांनी नेहमीच्याच हुशारीनं परिस्थिती हाताळत हे बंड मोठं होऊ न देता पेल्यातलं वादळ ठरविलं.

आज अवघ्या दोन वर्षात पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे यांच्या रुपानं त्याच घटना घडत असताना राज्यातील राजकारणात किंगमेकरची भूमिका निभावणार्‍या शरदराव पवारांची खेळी काय असेल? हे म्हणूनच बघण्यासारखं असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?