' उद्धव ठाकरेंच्या खास गोटातल्या मिलिंद नार्वेकरांचा हस्तक्षेप खुद्द बाळसाहेबांनाही खटकायचा! – InMarathi

उद्धव ठाकरेंच्या खास गोटातल्या मिलिंद नार्वेकरांचा हस्तक्षेप खुद्द बाळसाहेबांनाही खटकायचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“चाय से ज्यादा, कीटली गरम” ही म्हण सर्वांना माहीतच आहे. ही म्हण त्या लोकांच्या बाबतीत आहे जे की, एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचे सहकारी असतात. पण, ते स्वतःच कित्येक निर्णय घेत असतात किंवा तसा आव आणत असतात. आपल्या बॉस व्यतिरिक्त अगदी मोजक्याच व्यक्ती यांना प्रिय असतात.

काम असलं की, लोकांना जवळ घ्यायचं कसं? आणि ती व्यक्ती कामाची नसेल तर झिडकारायचं कसं? हे या लोकांना नेमकं जमत असतं. सरकारी कार्यालय असो किंवा कॉर्पोरेट ऑफिस किंवा एखादा राजकीय पक्ष असे लोक आपल्याला नेहमीच बघायला मिळतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘मिलिंद नार्वेकर’ हे महाराष्ट्रातील अशाच एका गरम केटलीचं नाव आहे जे कित्येक वर्षांपासून मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक सल्लागार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याला थोडा जरी रस असेल त्याने ‘मिलिंद नार्वेकर’ हे नाव ऐकलेलं असेल हे नक्की. शिवसेना पक्षाच्या बांधणीपासून ही व्यक्ती काम करत आहे. कोणत्या कार्यकर्त्याला बढती मिळावी आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जावा हे सर्व निर्णय मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करून घेतले जातात आणि मग जाहीर केले जातात हे महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक कित्येक वर्षांपासून बघत आहे.

 

milind narvekar IM

 

असं सांगितलं जातं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यातील संवाद हा मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत केला जातो. शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांची करिअर घडवणारा आणि फारसा मीडिया समोर कधीच न आलेला कोण आहे हा मिलिंद नार्वेकर? शिवसेना पक्षाचा त्याच्यावर इतका भरवसा का आहे? जाणून घेऊयात.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत मागील २८ वर्षांपासून ‘स्वीय सहाय्यक’ म्हणून कार्यरत आहेत. पक्षातील इतर कार्यकर्त्यांना बांधलं जाणारं शिवबंधन हे त्यांच्या हाती नसलं तरीही त्यांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांप्रमाणे पक्षात महत्व आहे.

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं पक्षातील पद वाढलं त्याप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांना देखील बढती मिळत गेली. उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारे मिलिंद नार्वेकर हे आज शिवसेनेचे सरचिटणीस आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटींचं वेळापत्रक ठरवणे, त्यांना राजकीय प्रश्नांमध्ये सल्ला देणे आणि सोपवलेलं कार्य तडीस नेणे ही त्यांची पक्षातील प्रमुख जबाबदारीची कामं म्हणता येतील. आपल्या एकनिष्ठ आणि प्रामाणिक स्वभावाच्या जोरावर मिलिंद नार्वेकर यांचं शिवसेनेतील स्थान हे अढळ आहे असं राजकीय अभ्यासक मानतात.

२००५ मध्ये राज ठाकरे, नारायण राणे सारख्या व्यक्तींनी शिवसेना सोडल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या कामाच्या पद्धतीत असलेल्या चुका मीडिया, पक्ष प्रमुखांसमोर आणल्या होत्या. पण, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या पक्षातील स्थानावर कोणताही परिणाम झाला नाही हे विशेष आहे.

सध्या गाजत असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शांत करण्याची जबाबदारी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावरच सोपवण्यात आली होती.

 

eknath shinde matter IM

 

मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोलल्या शिवाय तुम्ही शिवसेना पक्षप्रमुखांसोबत बोलू शकत नाहीत हे एक समीकरण मागच्या २८ वर्षांपासून शिवसेनेत बघायला मिळत आहे. १९९२ मध्ये मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांना भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते म्हणून भेटायला ‘मातोश्री’ बंगल्यावर गेले होते.

त्यांची बोलण्याची पद्धत आणि हुशारी उद्धव ठाकरे यांच्या लगेच लक्षात आली होती आणि त्यांनी मिलिंद यांच्यावर ‘स्वीय सहकारी’ म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवली होती.

मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कधीच कोणत्या पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही. उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यापूर्वी ते मालाडच्या ‘लिबर्टी गार्डन’ या परिसरातून ‘गटप्रमुख’ म्हणून काम करायचे. १९९२ ते २००२ हा काळ मिलिंद नार्वेकर यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा मानला जातो.

राज्याचं राजकारण कसं चालतं? राजकीय पक्षात कार्यकर्त्यांचं योगदान किती महत्वाचं असतं? हे नार्वेकरांना या काळात कळलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या इतके लोकांमध्ये मिसळत नसल्याने त्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याशी बोलण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते.

मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आलेल्या निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यामुळे ते उद्धव ठाकरे हे उपलब्ध नसतांना पक्षाचे निर्णय घेण्यात महत्वाचे मानले जातात. माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मिलिंद नार्वेकर यांचा पक्षातील निर्णयांमध्ये हस्तक्षेप हा सुरुवातीला पटायचा नाही. पण, आपल्या स्वभावाने त्यांनी शिवसेनाप्रमुखांचं सुद्धा मन जिंकलं होतं.

 

balasaheb thackrey inmarathi

मिलिंद नार्वेकर यांच्यावर झालेले आरोप:

१. निवडणूक काळापूर्वी शिवसेना पक्षातील पदांची आणि तिकिटांची विक्री करणे.

२. २०१० मध्ये पुण्यात ‘बंद’ दरम्यान दंगल घडवून आणण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे. २०१७ मध्ये सरकारने या आरोपांना मागे घेतलं होतं.

३. सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज पक्ष प्रमुखांपर्यंत न पोहोचू देणे आणि स्वतःच पक्षाचे निर्णय घेणे.

२०१८ मध्ये उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना सरचिटणीस हे पद देण्यात आलं तेव्हा शिवसैनिकांनी या गोष्टीचा तीव्र विरोध केला होता.

२०१९ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत युती करून ‘महाविकास आघाडी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा इतर पक्षांशी संपर्क साधण्यात मिलिंद नार्वेकर यांची महत्वाची भूमिका होती.

 

mahavikas aghadi inmarathi

 

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला सरकारी अधिकाऱ्यांचा गराडा वाढला आणि तेव्हापासून त्यांचं ‘मातोश्री’ वरील महत्व कमी झाल्याचं बोललं जात आहे. पण, याचं कारण हे त्यांच्यावर पक्षाने दिलेली अतिरिक्त जबाबदारी हे सांगितलं जात आहे.

शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आणि नारायण राणे यांचे वाहन चालक हे सध्या आमदार झाले आहेत. मिलिंद नार्वेकर यांना देखील येत्या काळात आमदारकी मिळेल का? या प्रश्नाने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नार्वेकर समर्थक सध्या अस्वस्थ झाल्याचं दिसून येत आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?