छत्रपती राजाराम महाराजांच्या रक्षणार्थ औरंगजेबाचे गर्वहरण करणारी लढवय्यी राणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इतिहास हा कोणाच्या आवडीचा विषय तर कोणाच्या नावडीचा. शाळेत असताना आपण सगळ्यांनी या विषयाचा कधी मनापासून तर कधी जबरदस्ती, फक्त परीक्षेसाठी म्हणून अभ्यास केला.

शाळेत असताना या विषयांचं फारसं महत्त्व वाटायचं नाही, पण पुढे जसं जसे आपण मोठे होतो, तसं तसं आपल्याला या इतिहासाचं महत्त्व कळतं. 

शाळेत आणि त्यापुढील आयुष्यात आपण सगळ्यांनीच शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे किस्से वाचले, पण त्यापुढील इतिहास कमी जणांना माहित असतो.

शिवरायांच्या पराक्रमी पुत्रांनी देखील मुघलांविरुद्धचा लढा चालूच ठेवला होता, ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेकांनी मदत केली त्याचप्रमाणे राजाराम महाराजांना मदत करणाऱ्या शूर राणीची ही कथा…

इतिहासात आपल्याला प्रत्यक्ष लढाईत उतरणाऱ्या खूप कमी राण्यांची नावं माहित असतात. तुम्हाला सर्वांना राणी लक्ष्मीबाई तर माहीतच आहे, तिच्या पराक्रमाची गाथा आपण अनेकदा इतिहासात ऐकली आहे.

पण तुम्हाला माहित आहे का? राणी लक्ष्मीबाई सारखीच शूर आणि पराक्रमी राणी भारतीय इतिहासात होऊन गेली आहे, या राणीने खुद्द मुघल बादशाह औरंगजेब याला सुद्धा जेरीस आणले होते.

चला तर जाणून घेऊया काय आहे ही कहाणी!

त्या राणीचे नाव आहे- केलाडी साम्राज्याची राणी चेन्नमा!

 

keladi-chennmma-marathipizza01
twitter.com

 

राणी चेन्नमा सुरुवातीच्या काळात तिच्या सुसंस्कृतपणामुळे ओळखली जात असे. परंतु या स्त्रीने इतिहास बदलला आणि स्त्रियांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. भारतीय इतिहासातील लढवय्या स्त्रियांमध्ये तिला मानाचे स्थान दिले जाते.

आपल्या राज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा तिने धैर्याने सामना केला आणि प्रजेची रक्षणकर्ती राणी म्हणून राणी चेन्नमा पुढे नावारूपाला आली.

राणी चेन्नामाने कर्नाटकाच्या किनारपट्टीवर वसलेल्या ‘केलाडी’ या छोट्याश्या प्रांतावर २५ वर्ष (१६७१ ते १६९६) राज्य केले.

ती लिंगायत समाजाच्या सदप्पा शेट्टी यांची पुत्री होती. तिचे लग्न सोमेश्कारा नायक या राजाबरोबर झाले आणि त्यांच्या मृत्यू नंतर तिने राज्यकारभार आपल्या हाती घेतला.

प्रजेच्याही मनात तिच्याबद्दल आदर होता. त्यांच्या प्रत्येक सुख दु:खात ती जातीने लक्ष घालीत असे. शरणागती पत्करणे हे तिच्या रक्तातच नव्हते जणू! आपल्या राणीचा हाच खंबीरपणा पाहून सैन्य देखील अगदी जीवाची बाजी लावून युद्धात उतरायचे.

 

keladi-chennmma-marathipizza02
alchetron.com

 

तिचा हाच खंबीरपणा एकदा मुघल बादशाह औरंगजेबाच्या अंगाशी आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती राजाराम यांनी मुघलांच्या कैदेतून पळ काढला.

छत्रपती राजाराम यांना राणी चेन्नमा हिने आपल्या राज्यामध्ये आश्रय दिला. हे औरंगजेबाला सहन झाले नाही आणि त्याने तत्काळ युद्ध करण्याचा प्रस्ताव दिला.

राणी चेन्नमाने देखील सरळ सरळ युद्धामध्ये उतरत औरंगजेबाच्या पुरुषी वर्चस्वाला हादरा दिला.

एका स्त्रीवर सहज विजय मिळवू शकू आणि छत्रपती राजारामांना पुन्हा कैद करू अशा अविर्भावात लढाईस गेलेल्या मुघल सेनेला कसलेल्या केलाडी सैन्याने लवकरच सळो की पळो करून सोडले.

या मानहानीकारक पराभवामुळे औरंगजेबाचे मात्र चांगलेच गर्वहरण झाले.

जर राणी चेन्नमाने छत्रपती राजाराम यांना मुघल साम्राज्याच्या कैदेतून सुटका करण्यासाठी मदत केली नसती तर चेन्नमा राणी आणि मुघलांमध्ये कधीच युद्ध झाले नसते आणि मुघल साम्राज्य कधीच पराभूत झाले नसते.

 

battle inmarathi
rajras.in

 

राणी चेन्नमाने आपल्या शेजारील राज्यांसोबत शांतीपूर्वक धोरण अवलंबले. भारतात नव्याने पाउल ठेवणाऱ्या पोर्तुगीजांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आणि आपले राज्य समृद्ध केले.

पोर्तुगीज मसाले आणि तांदूळ केलाडी बंदरातून निर्यात करत असत, यामुळे त्यांना व्यापार करणे सुलभ होतं असे. राणी चेन्नमाने पोर्तुगीजांना आपल्या प्रांतात येऊन राहण्यास आणि चर्च उभारण्यास परवानगी दिली होती.

राणीच्या कृपाशीर्वादामुळे खुश झालेले पोर्तुगीज तिला रेईना दि पिमेंता म्हणजेच ‘द पेपर क्वीन’ म्हणत असत. तिचे साम्राज्य १७६३ पर्यंत टिकून होते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती खूप शिस्तबद्ध होती. न्याय करताना ती कोणाचीही हयगय करत नसे.

 

rani chennama inmarathi
justhistory.com

 

चेन्नमा राणी एक धार्मिक वृत्तीची स्त्री आणि तिच्या काळातील व्यावहारिक प्रशासक म्हणून ओळखली जात होती. कर्नाटक राज्यामध्ये आजही लोक तिची आठवण काढतात. 

अशा शूर- पराक्रमी राण्या त्याकाळातील प्रगत विचारसरणी दाखवतात. त्यांनाही युद्ध प्रशिक्षण दिले जायचे ही गोष्ट यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होते. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्या कधीच घाबरल्या नाहीत.

“चूल आणि मूल” ही विचारसरणी असलेल्या समाजाला या स्त्रियांची कामगिरी नक्कीच प्रेरणा देणारी आहे. आणि ती प्रेरणा घेण्यासाठी आपला पराक्रमी, अभिमानास्पद इतिहास वाचणे, समजून घेणे गरजेचे आहे.

अशा अनेक अज्ञात राण्यांना मानाचा मुजरा!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “छत्रपती राजाराम महाराजांच्या रक्षणार्थ औरंगजेबाचे गर्वहरण करणारी लढवय्यी राणी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?