' चटणीच्या मागे आहे तिच्या चवीइतकाच ‘मसालेदार’ इतिहास! – InMarathi

चटणीच्या मागे आहे तिच्या चवीइतकाच ‘मसालेदार’ इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय जेवणात चटणीला फार महत्त्व दिले जाते. जेवणात पानात डाव्या हाताला छोटासा चमचा चटणी असतेच. मग ती सुकी असेल किंवा ओली पण ती जागा आजवर दुसरा कुठलाही पदार्थ घेऊ शकला नाही. लोक सलाड, कोशिंबिरी करतील पण चवीसाठी चटणीला पर्याय नाही.

गरिबीत पण माणसे चटणीभाकरी खाऊन सुखाने राहू शकतात. रोजच्या जेवणात एखादी ओली किंवा सुकी चटणी आवश्यकच असते. शेंगदाण्याची, तिळाची, सुक्या खोबऱ्याची,जवसाची, कोरट्याची या सुक्या चटण्या तर लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, हिरव्या चिंचेची चटणी, भेळेसाठी पिकलेल्या चिंचेची चटणी, ओल्या खोबऱ्याची, पुदिन्याची, कैरीची या सगळ्या ओल्या चटण्या. बघा, या चटण्या नसत्या तर? आपल्या जेवणातील कितीतरी गंमत कमी झाली असती. नाही का?

थोडक्यात जेवणाला चव देणारी चटणी कधी आणि कशी अस्तित्वात आली हा प्रश्न कधी कुणाला पडला आहे का? ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी आणि नसेल त्यांच्यासाठीही ही चटणीची खमंग कहाणी.

 

chutney 2 IM

 

चटणी चवीला तिखट चरचरीत असलेला अधूनमधून तोंडी लावण्यासाठी केला जाणारा पदार्थ. लाल, हिरव्या मिरच्या वापरून या चटण्या बनवल्या जातात. सुक्या चटण्या बनवताना लाल मिरचीची पूड वापरली जाते. चवीसाठी त्यात धने, जिरे घातले जातात. याशिवाय टोमॅटो, खजूर यांचीही चटणी करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बंगालमध्ये मोहरीची चटणी करतात आणि तिला कासुंदी असे म्हणतात. लग्नकार्यात मासे करतात त्यांच्यासोबत ही कासुंदी खातात. इडली चटणी, डोसा चटणी हे सारे प्रकार चटणीशिवाय कसे लागतील? समोसा खाताना आंबट गोड चटणी हवीच. चटणीशिवाय भेळेची, पाणीपुरीची कल्पना करून बघा. या चटण्यांचे नाना प्रकार कसे शोधले गेले? चटणीशिवाय आपलं आयुष्य सपक होऊन गेलं असतं.

आता आपण बहुतांश चटण्या मिक्सर वापरून बनवतो पण पाटा वरवंटा किंवा खलबत्ता किंवा उखळात केलेल्या चटणीची चवही खूप छान लागते. पण या चटणीचा शोध लागला कसा?

असं म्हटलं जातं की, चटणी हा शब्द संस्कृत शब्द चाटण या शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजे जेवताना भाजी आमटी आपण जास्त घेतो पण चटणी थोडीशीच घेतो. आणि खाताना पण थोडीशीच खातो. चाटून.. म्हणून ती चटणी.

या पदार्थाबाबत एक किस्सा पण सांगितला जातो, मुघल सम्राट शाहजहान आजारी पडला. तेव्हा ह्कीमाने त्याला इलाज म्हणून चरचरीत मसालेदार पदार्थ जो पचायला पण हलका असेल तो खायला सांगितला, त्याच्यासाठी पुदिना, कोथिंबीर, जिरे, जवस, लसूण, सुंठ अशा पदार्थांचा मिळून वाटून एक पदार्थ बनवला.

 

chutney 3 IM

 

तो खूप न खाता थोडा थोडा खायचा सल्ला हकीमाने दिला. यातच चाटचा पण उल्लेख सापडतो पण तो प्रश्न तितकाच कठीण जसा कोंबडी आधी की अंडं आधी.. पण चटपटीत चाट बरोबर चटणी हा मामला पण बराच जुना आहे.

इतिहासकारांनी तर चटणी ही होमो सेपियन्स लोकांनी बनवलेल्या पदार्थाचे सर्वात जुने रूप असावे. इंग्रजांनी यावर जास्तच शोधाशोध केली. त्यांच्या मते चटणी म्हणजे एक विविध फळे मसाले यांच्यापासून तयार केलेलं घट्ट वाटण.

हे विशेषकरून भारतात तयार केलं जातं. खासकरून मुस्लीम लोक याचा जास्त वापर करतात. आता हा पदार्थ जगभर पोहोचला आहे.

संशोधक असेही सांगतात चटणी मध्ये असलेले पाचक गुण हे शरीरात थंडावा देण्यासाठी पण उपयुक्त आहेत. बंगालमध्ये तर टोमॅटो, कच्ची पपई, याचा पण सर्रास वापर केला जायचा. तिखट आणि गोड दोन्ही प्रकारच्या चटण्या करण्यावर भर दिला जायचा.

टोमॅटो हा तर परदेशी फळाचा प्रकार. पण बंगाली लोक त्याचेही चाहते. त्याची चटणी बनवताना जास्तीत जास्त मसाले वेगवेगळे पदार्थ अगदी सुका मेवा पण घालत. थोडक्यात माणूस जितका श्रीमंत तितके तो चटणीमध्ये जास्त मसाले घालायचा. बघा, चटणी हा स्टेट्स सिम्बॉल असेल असा कधीतरी विचार केला असेल का कुणी?

 

chutneys IM

 

चटणी करताना त्या त्या प्रदेशातील हवामानाचा, तिथे मिळणाऱ्या अन्न घटकांचा पण विचार केला जातो. त्या त्या प्रदेशात चटणीला वेगवेगळी नांवे आहेत. महाराष्ट्रात ठेचा, आंध्रप्रदेशात पचडी, तमिळनाडूमध्ये थोगयल, तर केरळमध्ये छाम्मथी आणि दक्षिणेत पोडी अशी वेगवेगळी नांवे आहेत.

महाराष्ट्रात चवीने खाल्ले जाणारे मेतकूट हा पण त्यातीलच एक प्रकार. शेजवान चटणी तर तरूण पिढीच्या आवडीचा मामला. प्रत्येक प्रदेशातील खासियत असलेल्या चटण्या, त्या तयार करण्याची कृती आपल्या एका क्लिकवर समोर येतं. पण त्यातही त्या प्रदेशातील जी चव असते ती मात्र खूप प्रयत्नांनी येते.

जोवर खवय्ये आहेत तोवर या सगळ्या कृती आणि व्हरायटी हे कायम राहील आणि कायम वाढत राहील यात शंका नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?