' एखाद्या ध्येयाने झापाटणं म्हणजे नेमकं काय, हे आमच्या पिढीला 'लक्ष्य'ने शिकवलं!

एखाद्या ध्येयाने झापाटणं म्हणजे नेमकं काय, हे आमच्या पिढीला ‘लक्ष्य’ने शिकवलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

आज ‘लक्ष्य’ या सिनेमाला १८ वर्षं पूर्ण झाली असं कुठेतरी पाहिलं आणि झरकन एक बराच मोठा काळ डोळ्यासामोरून निघून गेला. लक्ष्यइतका परिपक्व सिनेमा पुन्हा खुद्द फरहानसुद्धा बनवू शकणार नाही, एका पिढीचं वास्तव मांडणारा आणि त्या पिढीचं नेतृत्व करणारा म्हणून नेहमीच लक्ष्यकडे बघितलं जाईल.

आमच्या पिढीला तर या सिनेमाने आयुष्यातल्या ३ महत्वाच्या टप्प्यांचे धडे आधीच देऊन ठेवलेत, कुमारवय, तरुणपण आणि ३५ नंतर येणाऱ्या आयुष्याच्या या तीनही टप्प्यात survive कसं करावं हे या सिनेमातून शिकण्यासारखं आहे, आम्हाला ते डोस आधीच मिळाले पण पुढच्या पिढीसाठी या सिनेमाचं नाव जितकं मोठं होईल तितका हा सिनेमा त्या पिढ्यांना सतत काहीतरी देत राहील.

 

lakshya IM

 

हृतिकच्या काही मोजक्या पाहिलेल्या आणि अत्यंत आवडलेल्या सिनेमांपैकी एक लक्ष्य. कहो ना प्यार है हा एक मसालापट म्हणूनच आवडतो, पण हृतिकने खरा अभिनय मिशन कश्मीर, फिजा, लक्ष्य, गुजारीश, किंवा नवीन अग्निपथ यातच केलाय असं माझं ठाम मत आहे.

त्यातही लक्ष्य मधला हृतिक सर्वात जास्त जवळचा वाटण्यामागचं कारण म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतला असूनही त्याचे प्रॉब्लेम्स हे अगदी सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स होते.

हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहेरा मोहरा बदलून टाकणाऱ्या ‘दिल चाहता है’ नंतर फरहानला खरंतर स्वतःला सिद्ध करण्याची काही गरजच नव्हती, पण तरीही त्याने लक्ष्य केला आणि आपण या क्षेत्रात नेमके कशासाठी आलो आहोत याची पोचपावती दिली. तिथून फरहान मनात घर करून बसलाय ते फक्त आणि फक्त दिग्दर्शक म्हणून, तो अभिनय छान करतो, कविता छान सादर करतो, तो गायक म्हणूनही ठीक आहे (एका लिमिटनंतर त्याचा तो विशिष्ट आवाज नकोसा वाटतो हे खरंय) तो ऑलराऊंडर आहेच यात काही वाद नाहीच, पण तो एक दिग्दर्शक म्हणून या सगळ्याच्याही वरच्या लेवलवर आहे.

डॉन २ नंतर लोकं अक्षरशः त्याच्या दिग्दर्शनाची चातकाप्रमाणे वाट पाहतायत, त्याने अभिनयावरचा थोडा फोकस कमी करून दिग्दर्शनाकडे वळवला पाहिजे कारण सध्या इंडस्ट्रीत त्याचीच कमी आहे.

 

farhan akhtar IM

 

लक्ष्य जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याच्या लांबीवरुन बरेच वाद झाले, मला नाही वाटत फारशा लोकांनी हा सिनेमा थेटरला जाऊन बघितला असेल, ३ तास ७ मिनिटांचा हा सिनेमा शेवटच्या भागात कारगिल युद्धावर फोकस करणारा त्यामुळे बऱ्याच जणांना अत्यंत बोअर वाटला होता पण फरहानने हा सिनेमा केला त्याचं महत्व आज कळतंय.

उद्या आमच्या मुलांना एक उत्कृष्ट सिनेमा म्हणजे काय दाखवायला काहीतरी आहे याचं समाधान आहे. आजही हा सिनेमा मी पापणी न लवता बघतो. करण प्रमाणेच मलाही माझ्या आयुष्याचं लक्ष्य तसं उशिराच ध्यानात आलं, पण त्या ध्येयापर्यंत जायचा मार्ग सुखावह होण्यासाठी या सिनेमाने मला आणि माझ्यासारख्या कित्येक तरूणांना खूप मदत केलेली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अमीर बापाचा करण ज्याच्याकडे अंघोळीसाठी गीझर ऑन करायलासुद्धा नोकर आहे, ती गोष्ट आपल्याकडे नाही पण इथेच फरहानने सर्वात मोठ्या मुद्द्याला हात घातला एक असा दुर्गुण जो सगळ्यांकडे असतो श्रीमंत, गरीब, अगदी मध्यमवर्गीयांकडेही तो म्हणजे आळस, मग तो अंथरुणातून नोकराला गीजर ऑन करायला सांगणारा करण असो किंवा स्वतःचा चहाचा कपसुद्धा न विसळणारा सामान्य तरुण असो.

त्या वयातला बेफिकिरपणा, प्रत्येक गोष्ट लाईटली घेण्याच्या स्वभावाला फरहानने खूप उत्तमरित्या सादर केलं आहे त्यामुळे बड्या बापाचा मुलगा असूनसुद्धा करण शेरगिल हा सगळ्यांमध्ये दडलेला आहे हे ठसवण्यात फरहान यशस्वी होतो.

 

hrithik 2

 

सध्याच्या फिल्म आणि सिरिजमधली उच्चभ्रू सोसायटीतल्या मुलांची प्रेमप्रकरणं जितकी बीभत्सपणे दाखवली जातात त्याचा एक टक्कासुद्धा तुम्हाला लक्ष्यच्या लव्हस्टोरीच्या अॅंगलमध्ये सापडणार नाही. बेफिकीर करण आणि जबाबदार आणि समंजस रोमिला उर्फ रोमि यांच्यातल्या रोमान्सला फरहान ग्लोरीफाय करू शकत होता, पण मी आधी म्हंटल्याप्रमाणे फरहान हा एक परिपक्व माणूस आहे, त्यामुळे रोमि आणि करण यांच्यातला रोमान्ससुद्धा त्याने त्याच मॅच्युरिटीने दाखवला आहे.

करणला सतत आयुष्याचं ध्येय ठरवण्यासाठी मागे लागणारी रोमि त्याच्यावर तितकंच प्रेम करते हे दाखवण्यासाठी फरहानने यात २ टोकं गाठली आहेत. एक म्हणजे “अगर मै कहूं” गाण्यामध्ये करणसोबत मजा मस्ती करणारी रोमि आणि दुसरं म्हणजे जेव्हा करण आर्मीचं प्रशिक्षण अर्धवट सोडून आल्यावर रोमिला जेव्हा भेटायला जातो तो सीन.

तो सीन जितका बखुबी लिहिलाय की आजही तो बघताना आपणही नकळत हळवे होतो. “जो आदमी खुदके फैसलेकी इज्जत नही कर सकता वो मेरी इज्जत क्या करेगा?” या शब्दांत जेव्हा रोमि करणला खडेबोल सुनावते तेव्हा त्यांच्या नात्यातल्या मॅच्युरिटीची जाणीव होते आणि इथेच फरहान एक दिग्दर्शक म्हणून आणि जावेद अख्तर हे कथालेखक म्हणून अजरामर होतात. तो सीन ज्या पद्धतीने मांडलाय त्याला खरंच तोड नाही!

 

hrithik and preity IM

 

यानंतर कथेतला तिसरा भाग म्हणजे कारगिल युद्ध, रोमि सोडून गेल्यानंतर लाइट हार्टेड असा लक्ष्य हा एकदम बॉर्डरसारख्या सिनेमाचं रूप धारण करतो. इथेही फरहान आणि जावेद साहेब यांनी ज्या कामालीने सिनेमातला हा भाग लिहिलाय त्याचं कौतुक फारसं झालं नाही.

बऱ्याच लोकांना सिनेमातला नेमका हाच भाग फार रटाळ वाटला. पण खरंतर हा भाग म्हणजे या सिनेमाचं सर्वोच्च शिखर आहे. खरंतर इथे मोठमोठे स्टंट आणि साहसदृश्य टाकून फरहानला युद्ध दाखवता आलं असतं पण भारतीय आर्मीचं खूप बेसिक आणि तितकंच प्रभावशाली चित्रण त्याने केलं आणि त्यातूनही त्याने तितकीच देशभक्ती दाखवली जेवढी बॉर्डरसारख्या कमर्शियल सिनेमात होती.

बॉर्डर किंवा तत्सम सिनेमे आणि लक्ष्यमध्ये एकच फरक तो म्हणजे लक्ष्यमधलं आर्मीचं चित्रण, कारगिलची परिस्थिति, जवानांमधलं नातं, हे सगळं खूप subtle होतं. तर बॉर्डरसारख्या सिनेमात त्याच गोष्टी ड्रमॅटिक करून दाखवल्या जायच्या, लक्ष्यमध्येही तोच अँगर आहे फक्त तो प्रेझेंट करताना लाऊड वाटत नाही.

जेव्हा बऱ्याच जवानांचा मृत्यू होतो आणि एका कँटिनमध्ये बसून वॉर कव्हर करायला आलेली रोमिला ‘शांती आणि अमन’ यावर एक वाक्य फेकते तेव्हा चिडलेला एका मृत सैनिकाचा सहकारी जो खवळतो ते खूप नॅच्युरल होतं, फरहान त्या सीनमध्ये भारी भरकम डायलॉग टाकून तो सीन आणखीन लाऊड करू शकला असता पण त्यातही त्याने त्या जवानांना एक ह्युमन इमोशनचा टच दिला त्यामुळेच ते सीन्स आजही लक्षात आहेत.

 

lakshya army IM

 

लक्ष्यमध्येही पाकिस्तान कीती नीच मानसिकतेचा आहे ते फक्त ओम पुरी यांच्या एका डायलॉगमधून दाखवण्यात आलंय “पाकिस्तानी हार जाये तो फिर एकबार पलटके आता है, जीत जाओगे तो लापरवाह मत होना!”

आपल्या शेवटच्या मिशनवर जाणारा करणला रोमिलासोबत रोमान्स करताना फरहान दाखवू शकला असता, पण तसं न करता करण हा त्याआधी एक फोन आपल्या वडिलांना करतो आणि ज्यांना तो इतकेदिवस आपल्या आयुष्याचा व्हिलन समजत होता त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं करतो. या सीनमध्ये बमन आणि हृतिक दोघांनी अक्षरशः रडवलं आहे यार, आजही तो सीन बघताना अंगावर काटा येतोच.

जो आनंद कथेने, अभिनयाने दिला तितकंच ते कथानक प्रत्येकात रुजवण्यात मदत केली ती शंकर-एहसान-लॉय या संगीतकारांनी. ३ तासाचा सिनेमा असूनही यात गाणी कीती तर फक्त ५, तीही सिचुएशनला अनुसरून, मै ऐसा क्यु हूं हे आजही फक्त शानच्या आवाजासाठी आणि हृतिकच्या थक्क करणाऱ्या डान्स स्टेपसाठी आवडतं.

एखाद्या संभाषणातून गीत कसं निर्माण होऊ शकतं याचं धडधडीत उदाहरण म्हणजे अगर मैं कहूं, लक्ष्यचं टायटल ट्रॅक ऐकलं की नसानसात जोश संचारतो खासकरून त्यातली शेवटची परेड आणि त्याला दिलेलं विशिष्ट म्युझिक आजही ऐकताना शहारे येतात.

 

lakshya song scene IM

 

कंधो से मिलते है कंधे बॉर्डरच्या संदेसेची आठवण करून देतं, आणि शेवटचं हरीहरन आणि साधना सरगम यांच्या आवाजातलं कितनी बाते ऐकताना आणि त्याचं चित्रीकरण बघताना रोमि आणि करणच्या मच्युअर रिलेशनशीपची आठवण करून देतं!

लक्ष्यला १८ च वर्षं पूर्ण झालीयेत तर त्याबद्दल एवढं लिहावसं वाटतंय, आणखीन नंतरचं तर विचारायलाच नको, शोलेसारख्या काही सिनेमांनी इतिहास घडवला आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ति म्हणजे लक्ष्य.

असो आज हा सिनेमा पुन्हा बघितल्याशिवाय झोप लागणार नाही, अजूनही बरंच काही मांडायचं राहून गेलं असल्यास क्षमस्व! असा चित्रपट होणे नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?