' बौद्धधर्मीयांवरील तथाकथित हिंदू अत्याचाराचा “खोटा इतिहास” – InMarathi

बौद्धधर्मीयांवरील तथाकथित हिंदू अत्याचाराचा “खोटा इतिहास”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : हर्षद सरपोतदार

===

महंमद बिन कासीम, कुतुबुद्दीन ऐबक, बख्तियार खिलजी, तैमूरलंग इत्यादी मुसलमानी आक्रमकांनी बौद्ध मठ, बौद्ध विहार आणि नालंदासारखी विद्यापीठे उध्वस्त करून हजारो बौद्ध ग्रंथ जाळून टाकले हे सर्वांनाच माहीत आहे. पण हिंदू राजेरजवाड्यांनीही बौद्धधर्माचा विच्छेद करायचा प्रयत्न केला व बौद्ध भिक्षुंवर अनन्वित अत्याचार केले असे बिनबुडाचे आरोप अलीकडचे ‘डावे’ इतिहास संशोधक हिंदूंवर सातत्याने करत आले आहेत.

मंदिरे पाडून मशिदी उभारण्याविषयी एखादा वाद चालू झाला, की मुस्लिम मुल्लामौलवीही याच डाव्या संशोधकांच्या पुस्तकांचे दाखले (ती पुस्तके न वाचताच) देताना दिसत असतात.

 

mandir masjid IM

 

पुष्यमित्र शुंग याने बौद्धांवर अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप ‘दिव्यावदान’ (तथा दिव्यवदन) सारख्या ग्रंथांत किंवा तारानाथ (१५७५-१६३४) या तिबेटी लामाने लिहिलेल्या बौद्ध धर्माच्या इतिहासात केला गेला आहे. ‘मंजुश्री मूळकल्प’ या बौद्ध ग्रंथात पुष्यमित्राबद्दल ‘त्या दुष्टाने आमच्या धर्माचा नाश केला, मठ पाडले व गुणी भिक्षुंना मारले’ असा धावता उल्लेख आला आहे पण तपशील दिलेला नाही. (श्लोक ५३२-५३३) मात्र डी. एन. झा यांच्यासारखे कम्युनिस्ट इतिहासकार त्याचा फायदा उठवून समस्त वैदिक हिंदू समाजाने बौद्धांवर अत्याचार केल्याचा निष्कर्ष काढून मोकळे होतात. परंतु अन्य कित्येक इतिहास संशोधकांनी या आरोपांना आधार नसल्याचं विवेचन केलं आहे.

मौर्यांची राजवट उलथवून पुष्यमित्र गादीवर आला व तो बौद्ध धर्माला आश्रय देत नव्हता एवढ्याच कारणावरून हे पूर्वग्रह निर्माण करण्यात आले असावेत असा निष्कर्ष बेला लाहिरी यांनी काढला आहे. (Page 34-35, Bela Lahiri.)

एतीन लॅमोते (Etienne Lamotte, 1903-1983) हा बेल्जीयम संशोधक बौद्ध धर्माचा तज्ज्ञ मानला जातो. तो म्हणतो, ‘पुष्यमित्राने बौद्धांचा नाश कुठे, कसा केला याचा या बौद्ध ग्रंथांमधील तपशील एकमेकांशी जुळत नाही. शिवाय तसा एकही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे पुष्यमित्रावरील आरोप सिद्ध होत नाहीत.’ (History of Indian Buddhism’, Louvain University,1988.) डॉ. डी. देवाहुती (१९२९-१९८८) या संशोधकाचंही हेच मत आहे.

‘पुष्यमित्राने बौद्ध भिक्षुंची डोकी कापून आणण्यास सांगितली व त्याबद्दल बक्षीस ठेवले ही चक्क थाप आहे !’ असं ते म्हणतात. याविषयी लिहिताना ‘The Decline of Buddhism in India’ (1954) या पुस्तकात आर. सी. मित्र म्हणतात, ‘दिव्यावदान व तारनाथाचा ग्रंथ यांत पुष्यमित्राच्या अत्याचारांचे चोख पुरावे बिलकुलच दिलेले नाहीत.’

 

pushyamitra shung IM

 

‘Against the Grain’ या पुस्तकातील ‘The destruction of Buddhist Sites’ या निबंधात डी. एन. झा यांनी ‘राजतरंगिणी’ चा दाखला देऊन अशोक पुत्र जलौक हा शिवभक्त हिंदू होता व त्याने कित्येक बौद्ध मठ-विहार पाडून टाकल्याचं नमूद केलं आहे. पण राजतरंगिणीमध्ये असं काहीही नाही. ‘एकदा बौद्ध विहारामधील वाद्यांच्या गजरामुळे राजाची झोपमोड झाली व रागाच्या भरात त्याने तो विहार पाडून टाकण्याचा आदेश दिला’ एवढंच त्यात म्हटलं आहे. (तरंग १ श्लोक १४०) मात्र नंतर त्याने तो पुन्हा बांधून दिला हेही आवर्जून सांगितलं आहे. (तरंग १, श्लोक १४७) पण याचा उल्लेख झा करत नाहीत.

उलट बौद्धांचाच वैदिक धर्मियांना मोठा जाच असल्याचा उल्लेख कल्हण याच ग्रंथात करतो. (तरंग १, श्लोक १७७ ते १८४) पण झा त्याबद्दल मौन बाळगतात. पतंजलीच्या महाभाष्यात ‘ब्राह्मण व श्रमण यांची एकमेकांशी चढाओढ असे’ असा एके ठिकाणी उल्लेख आहे. त्याचा दाखला देऊन याच निबंधात झा त्यांना एकमेकांचे ‘शत्रू’ ठरवतात. एकूणच झा यांच्या या मांडणीवरून त्यांचा ‘अजेंडा’ लक्षात येतो.

प्रसिद्ध बौद्ध भिक्षु हुएन त्संग याच्या प्रवासवर्णनाचं मराठी रूपांतर डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘जिज्ञासापुरुष हुएन त्संग’ या पुस्तकात केलं आहे. त्यात वैदिक हिंदूंच्या एकाही समकालीन अत्याचाराचं वर्णन नाही. उलट काश्मीर किंवा जालंधर सारख्या प्रदेशांच्या हिंदू राजांनी हुएन त्संग याला कशी मदत केली याचीच वर्णनं त्याने ‘भारतातील प्रवास’ या प्रकरणात केली आहेत.

काश्मिरात तर राजाच्या आश्रयाने तो दोन वर्षं मुक्काम ठोकून राहिला होता. (हा राजा प्रवरसेन किंवा हिरण्य यापैकी एक असावा. हे दोघेही शिवभक्त व विष्णुभक्त होते. मात्र तरीही ते बौद्ध मठांना देणग्या देत असत. ‘राजतरंगिणी तरंग ३ पहा.) त्याचप्रमाणे लाहोरच्या पश्चिमेला एक मोठी आमराई असून तिथे एक वृद्ध ब्राह्मण वास्तव्यास होता. त्याचा वेदांचा व प्रज्ञामूल, शतशास्त्र अशा बौद्ध ग्रंथांचा सखोल अभ्यास होता. त्याच्याजवळ महिनाभर राहून हुएन त्संग याने हे ग्रंथ समजून घेतले. (पृष्ठ ४९, साळुंखे.)

 

huwen tsang IM

 

परतीच्या प्रवासात कपिश राज्याजवळील नरसिंहपूर येथे हुएन त्संग याला लुटारूंनी पकडलं. त्यांच्या तावडीतून निसटून जात असताना त्याला शेत नांगरत असलेला एक ब्राह्मण दिसला. त्या ब्राह्मणाला ही हकीगत कळल्यावर त्याने गावकऱ्यांना बोलावून आणलं व लुटारूंवर हल्ला करून त्यांना पळवून लावलं. मग त्या रात्री हुएन त्संग याची राहण्याजेवण्याची व कपड्यालत्त्यांची सोय ब्राह्मणाने त्या गावातच केली. (पृष्ठ १७६, साळुंखे.) भारतातील मुक्कामात हुएन त्संग याने अनेक धर्मपरिषदांना उपस्थिती लावली. त्यात अनेकांशी त्याचे वाद झाले, चर्चा झाल्या. महायानी नसलेल्या सर्वांनाच तो ‘पाखंडी’ म्हणतो.

‘सम्राट हर्षवर्धन याने कान्यकुब्ज इथे आयोजित केलेल्या परिषदेत थेरवादी पाखंडी बौद्ध भिक्षुंनी मला ठार मारण्याचा कट केला, पण तो उघडकीस आला. तेव्हा हर्षवर्धनाने कठोर शब्दांत त्यांची निर्भत्सना केली व त्यांना हाकून लावले’ असं तो सांगतो. (पृष्ठ १०३, साळुंखे.) या प्रवासवर्णनातील अशा अनेक उल्लेखांवरून वैदिक हिंदूंपेक्षा बौद्ध धर्मातील अनेक पंथच एकमेकांशी शत्रुत्वाने वागत असत असं दिसून येतं.

पुष्यमित्राप्रमाणेच ‘मिहिरकुल’ या शिवभक्त राजाने बौद्ध भिक्षुंना देशोधडीस लावलं व त्यांचे शेकडो मठ पाडले असा एक आरोप काही बौद्ध ग्रंथांत व झा यांच्यासारख्या संशोधकांकडून केला जातो. पण मिहिरकुल हा एक हूण राजा होता व उत्तरायुष्यात तो हिंदू बनला हे प्रथम लक्षात घ्यायला हवं. त्याने बौद्धधर्मियांवर चिडण्याचं कारण काय याविषयी हुएन त्संग याने लिहून ठेवलं आहे. हुएन त्संग म्हणतो त्याप्रमाणे मिहिरकुल हा ‘शाकल’ (म्हणजे सियालकोट) देशाचा राजा असताना त्याने बौद्ध धर्मगुरूंना पुढील निरोप पाठवला.

‘माझ्या मनात बुद्धांच्या धर्माविषयी आदर आहे. तो धर्म मला समजून घ्यायचा आहे. तरी तो समजावून सांगण्यासाठी एखाद्या प्रख्यात विद्वान भिक्षुला माझ्याकडे पाठवावे.’ असा तो निरोप होता. तेव्हा पूर्वी याच राजाचा एक क्षुल्लक सेवक असलेला व नंतर बौद्ध बनलेला भिक्षु राजाकडे पाठवण्यात आला.

त्यामुळे राजा संतप्त झाला व तो स्वतःचा अवमान समजून त्याने भारतातून बौद्धधर्म नष्ट करण्याचा, सर्व भिक्षुंना ठार मारण्याचा व बौद्ध मठ-विहार पाडून टाकण्याचा आदेश दिला. (पृष्ठ ८६, साळुंखे.)

 

bauddha dharma IM

 

बौद्धधर्माची कशी शकले होत गेली आणि बुद्धाच्या अनुयायांनीच बुद्ध तत्वांचा पराभव करून भारतातून बौद्धधर्म कसा नाहीसा करून टाकला हे बौद्ध विद्वान पं. राहुल सांकृत्यायन यांनी ‘महायान, वज्रयान आणि चौऱ्यांशी सिद्ध’ या त्यांच्या ग्रंथात तपशीलवार सांगितलं आहे. बौद्धधर्म ऐन भरात असताना बौद्ध विहार म्हणजे विलास आणि चैन करण्याची ठिकाणे बनून गेली होती.

याबाबतीत दामोदर कोसंबी म्हणतात, “पुढल्या काळात बौद्ध मठांना एवढ्या प्रचंड देणग्या मिळत की त्यातून व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि तांडेवाल्यांना कर्जे देऊन व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळवता येत असे. या आर्थिक कारणामुळे बौद्ध धर्म टिकून राहिला. पण पुढे अर्थव्यवस्थेचा प्रेरक होण्याऐवजी जेव्हा तो तिच्यावरील भार ठरू लागला, तेव्हा ही पद्धत आणि तिला उचलून धरणारे मठही नाहीसे झाले.” (पृष्ठ २१४, कोसंबी.)

तात्पर्य, बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला तो काही अंशी स्वतःच्या अधःपातामुळे आणि बऱ्याच अंशी मुसलमानी विध्वंसामुळे. हिंदुधर्मीयांचा त्याच्याशी दूरान्वयेही संबंध नाही.

संदर्भ :-

१. ‘Arya Manjushree Moolkalp’, An Imperial History of India, K.P.Jayaswal, 1934.

२. ‘Indegenous States of Northern India’, Bela Lahiri, University of Kolkata, 1974.

३. कल्हणकृत ‘राजतरंगिणी, अनु. डॉ. अरुणा ढेरे व प्रशांत तळणीकर, चिनार प्रकाशन, २०१७.

४. ‘प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता’, डी. डी. कोसंबी, डायमंड पब्लिकेशन, पुणे, २००६.

५. ‘जिज्ञासापुरुष हुएन त्संग’, डॉ. आ. ह. साळुंखे, लोकायत प्रकाशन, सातारा, २०१४.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?