' बाळासाहेब आणि पवारांनी एकत्रितपणे मासिक सुरु केलं, अन् एक विचित्र भाकीत खरं ठरलं

बाळासाहेब आणि पवारांनी एकत्रितपणे मासिक सुरु केलं, अन् एक विचित्र भाकीत खरं ठरलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पु. ल. देशपांडे यांचे व्यक्ति आणि वल्ली हे अजरामर पुस्तक आणि त्यातील एकेक वल्ली माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे विरळाच. अशीच वल्ली व्यक्तिमत्वे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील होती आणि आहेत. त्यांचे किस्से आणि कहाण्या आजही त्यांच्या हजरजबाबीपणा आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.

आज आपण असाच एक किस्सा पाहणार आहोत. घटना आहे १९६० मधील. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करायचे. पण, अचानक त्यांनी ही नोकरी सोडली आणि कधीही नोकरी करायची नाही असे ठरवले होते.

 

balasaheb inmarathi

 

असे असले तरी कोणे एकेकाळी त्यांनी शरद पवार, भा. कृ. देसाई (भा.कृ. देसाई हे रामकृष्ण बजाज यांचे सचिव होते. त्याचबरोबर ‘शिवसेने’च्या स्थापनेत बाळासाहेबांसोबत वैचारिक बैठका त्यांनी घेतल्या होत्या. त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेवरही चांगल प्रभुत्व होतं.), शशीशेखर वेदक यांच्यासोबत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक सुरू केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का?

नोकरी सोडल्यावर बाळासाहेबांनी या इतर तिघांसोबत मासिक सुरू करण्याचा निर्णय पक्का केला. पण या कहाणीतील खरी गम्मत वेगळीच आहे. काय आहे ती कहाणीमागची कहाणी? चला जाणून घेऊ!

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणातील माइल स्‍टोन. दोघेही एकमेकांचे कट्‍टर राजकीय विरोधक होते. त्याआधी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ३० ऑक्टोबर १९६६ ला त्यांची पहिली सभा शिवाजी पार्क येथे झाली.

ही सभा शरद पवार यांनी तिथे कठड्यावर बसून ऐकली होती. हा किस्सा पवार यांनीच एक मुलाखतीत सांगितला होता. त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय आंदोलनांच्या व्यासपीठावर पवार-ठाकरे द्वयी एकत्र आली होती.बाळासाहेब बऱ्याचदा खासगीत आणि जाहीर सभांमध्ये शरद पवारांना शरदबाबू अशी हाक मारत. मात्र, राजकीय विरोधाच्यावेळी त्यांनी शरद पवारांवर ते मैद्याचं पोतं असल्याची टीकाही वारंवार केली होती.

 

balasaheb and sharad pawar IM

 

पवारांनीही बाळासाहेबांवर टीका केली असली तरी त्यांनी कधी त्यांच्याविरुद्ध विखारी शब्द वापरले नव्हते.”पवार-ठाकरे यांचा राजकारणातला उगमही सारख्याच काळात झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. तर, शरद पवार हे १९६७ साली बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

परंतु, तारुण्‍यात असताना या दोघांनी एकत्र येऊन आंतराष्‍ट्रीय दर्जाचे मासिक सुरू केले होते. त्याचीच ही गोष्ट … हा किस्सा खुद्द शरद पवार यांनीच आपल्या राजकीय आत्मचरित्रात सांगितला आहे. तर, मासिक काढण्याचे ठरल्यावर मासिकात काय असावं, काय नसावं. यासाठी चर्चा बैठका सुरू झाल्या.

चर्चेअंती मासिकाचे नावही फायनल करण्यात आले,’राजनीति’. अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘टाइम’ मासिकाच्या तोडीचा त्‍याचा दर्जा असावा, यावर सगळ्यांचे एकमत झाले तसेच मासिकावर चौघांची मालकी समान राहील, हे देखील निश्चित करण्‍यात आले.

मासिकाच्या मार्केटिंग, डिझाईनपासून सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या. मासिकाचा पहिला अंक जवळपास पूर्ण झाला आणि बाळासाहेबांनी तिघांजवळ एक विचार बोलून दाखवला. बाळासाहेबांच्या एक भगिनी होत्या. असे म्हंटले जायचे की त्यांना भविष्यातील गोष्टींचा अंदाज येत असे. त्यांच्याकडे दिव्यशक्ति होत्या. आणि त्या जे सांगतील ते खरं ठरत असं मानल जायचं, हे बाळासाहेबांनी शरद पवार आणि इतर दोन सहकाऱ्यांना सांगितलं.

 

pawar and thackrey IM

 

मग मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली. त्याचबरोबर पहिली पत्रिका सिद्धिविनायकासमोर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. विशेष म्हणजे मासिकाला उज्ज्वल भवितव्य असून, ‘एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही’, असंही त्यांनी सांगितलं.

दिलेल्या सल्ल्याचं पालन करत चौघांनी प्रत्येक गोष्ट केली. आता प्रतीक्षा होती मासिकाबद्दलच्या प्रतिक्रियांची…पण बरेच दिवस झाले तरी मासिकाबद्दल काहीच खबर समाजात नव्हती. बाजारातील कोणत्याही स्टॉलवर ते मासिक दिसत नव्हतं.

मग चौकशी केली असता कळल की, त्या मासिकाची कुणीच मागणी न केल्यानं ती मासिके विक्रेत्यांच्या कपाटात पडून आहेत. मासिक निघाल्यावर ते चाललंच नाही आणि तो प्रकल्प अखेर गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर चौघांना “बाजारात एकही प्रत राहणार नाही,” या भाकिताचा खरा अर्थ समजला.

मित्रांनो तुम्ही कधी अशी भाकिते अनुभवली आहेत का? असल्यास तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि वाचत रहा इनमराठी!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?