' असेही अज्ञात "बाबासाहेब" : स्वतःचं शिक्षण अर्धवट राहिलं म्हणून गरीब मुलींसाठी उभारली शाळा

असेही अज्ञात “बाबासाहेब” : स्वतःचं शिक्षण अर्धवट राहिलं म्हणून गरीब मुलींसाठी उभारली शाळा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

औपचारिक शिक्षणाचं महत्त्व आपण सगळेच जाणतो. ठराविक वर्षांपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यावर बाहेरच्या जगात गेल्यानंतर आपलं खरं शिक्षण सुरू होतं हे बरोबर आहेच, पण त्याला औपचारिक शिक्षणाचा पाया असणं महत्त्वाचं असतं.

आपल्या जडणघडणीत, व्यक्तिमत्त्व विकासात, सुसंस्कृत बनण्यात औपचारिक शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो. असं असलं तरी हे पूर्णतः खरं मानून चालणार नाही. कारण, कुठल्याही आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक याची निवड आपणच केलेली असते.

कधीकधी अगदी शिक्षित म्हणावीत अशी माणसंही त्यांच्यातल्या नकारात्मकतेमुळे लोकांना आवडेनाशी होतात, तर एखाद्या अशिक्षित तरीही आपल्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या, यातून आपल्याला काय चांगलं करता येईल असा विचार करणाऱ्या माणसाचं आपल्याला अप्रूप, कौतुक वाटतं.

नांदेडच्या सगरोली गावातील बाबासाहेब केशव नारायणराव देशमुख यांनी आपलं शिक्षण अपुरं राहीलं तरी आपल्या गावातल्या बाकी मुलांचं असं होऊन नये म्हणून आपल्या गावात तब्बल ६०,००० गरीब मुलांसाठी शाळा उभारली. हे करण्यासाठी त्यांना कुणाकडून प्रेरणा मिळाली? त्यांनी ही शाळा उभारण्यासाठी काय काय केलं याचा थोडक्यात आढावा घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बाबासाहेब केशव नारायणराव देशमुख यांचा जन्म एका जमीनदार कुटुंबात झाला. नांदेड जिल्ह्यातील सगरोली या गावात बाबासाहेबांच्या वडिलांची हजार एकरांची जमीन होती. अशी एकूण परिस्थिती असतानादेखील बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही.

भारताला जरी १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मराठवाडा, पूर्वीचं आंध्र प्रदेश आणि कर्नाटक त्यानंतरही निजामाच्या अंमलाखाली होतं. १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा स्वतंत्र झाला.

बाबासाहेबांचा नातू रोहित देशमुख यासंदर्भात म्हणाला, “निजामाचं सरकार होतं तेव्हा या भागात फार कमी शाळा होत्या आणि निजामाच्या सरकारने ज्या मर्यादा घातल्या होत्या त्यानुसार मुलींना शिकायला परवानगी नव्हती.”

शाळांच्या अभावामुळे बाबासाहेबांनी स्वतः कुटुंबापासून दूर जाऊन हैद्राबादमध्ये शिक्षण घेतलं, पण वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांना १०वी पर्यंतच शिक्षण घेऊन गावी परतावं लागलं.

रोहित म्हणाला, “आपल्या जमिनीचे ते एकमेव संरक्षक होते आणि त्यांनाच तिची काळजी घ्यावी लागणार होती. त्यांनी जरी शिक्षण त्यागलं असलं तरी शाळांच्या अनुपलब्ध्दतेमुळे जेव्हा त्यांच्या मुलीला ४थीच्या पुढे शिक्षण घेता आलं नाही तेव्हा शैक्षणिक सुविधांची कमतरता त्यांना बोचत राहिली.” पण गावात मुलींना शिक्षण मिळावं म्हणून काय मार्ग काढता येईल याबाबत बाबासाहेबांनी हार मानली नाही.

त्यांनी त्यावेळी पुण्याला काही तुरळक भेटी दिल्या तेव्हा ते महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणाचे अग्रणी असलेल्या महर्षी कर्वे यांच्याकडे गेले. यासंदर्भात त्यांनी महर्षी कर्वे यांचं मार्गदर्शन घेतलं. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि अशांसारख्या समाजसुधारकांनी कुठल्याही पायभूत सुविधा किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही मुलींच्या शिक्षणासाठी किती प्रयत्न केले हे महर्षी कर्वे यांनी त्यांना सांगितलं.

बाबासाहेब देशमुखांची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे तर बरीच मोठी जमीन होती. महर्षी कर्वे यांच्याशी झालेल्या चर्चेने प्रेरित होऊन शाळा उभारणीसाठी बाबासाहेबांनी १०० एकर जमीन दान केली. १९५९ साली त्यांनी ‘संस्कृती संवर्धन मंडळ’ (एसएसएम) नावाची एनजीओ उभा

रली. या एनजीओद्वारे त्यांनी शिक्षणाद्वारे मुलींचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्या स्थानिक भागात ‘श्री छत्रपती शिवाजी हाय स्कुल’ नावाची पहिलीवहिली निवासी शाळा सुरू केली.

सुरुवातीला तिथे ३७ विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या छोट्या झोपड्या होत्या. एससी, एसटी आणि बाकी वंचित समाज घटकांना शैक्षणिक सुविधा देण्यावर संस्थेने मुख्यत्वे भर दिला. हळूहळू संस्थेची ताकद वाढली आणि अधिक स्वयंसेवक संस्थेशी जोडले गेले. सगळ्याची अधिक चांगली पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली.

‘लँड सिलिंग कायदा’ आल्यानंतर बाबासाहेबांना आपल्या जमिनीचा काही भाग द्यावा लागला. त्यांनी ५० एकरने जागा वाढवली. त्यानंतर गावकऱ्यांनीही ५० एकर जमीन दिली. चांगला २०० एकरांचा कॅम्पस तयार झाला.

 

school im5

 

त्यांनी अधिक चांगल्या पायाभूत सुविधा पुरवल्या, चांगल्या शिक्षकांची नेमणूक केली. शिक्षकांनी अगदी समर्पित भावनेने शिकवावं म्हणून त्यांच्यासाठी कॅम्पसवर राहण्याची व्यवस्था केली.

या आदर्श कॅम्पसचा राज्यभरात प्रसार करण्याची एकही संधी बाबासाहेबांनी दवडली नाही. माफक स्वरूपात देणग्या मागायलाही त्यांनी संकोच बाळगला नाही.

रोहितच्या म्हणण्यानुसार, “सगळ्या वंचित लहान मुलांसाठी मोफत शिक्षण होतं आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमधले विद्यार्थीही शाळेकडे खेचले गेले. या लहान मुलांचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर होते आणि त्यांना ही फी परवडणारी नव्हती. मुलांना अन्न देण्याकरता शाळेने देणगीच्या रक्कमेऐवजी कापणीनंतरचं धान्यं स्वीकारलं.”

मुलांची वाढती संख्या पाहून १९६३ साली बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण देणारी ‘छत्रपती शिवाजी कनिष्ठ प्राथमिक शाळा’ सुरू केली. रोहित पुढे म्हणाला, “मात्र मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असं बाबासाहेबांना वाटायचं.

मुलांच्या क्षमतांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना खेळ खळता येणं फार महत्त्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण निधीच्या कमतरतेमुळे आणि कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीची त्यांनी मागणी न केल्यामुळे शाळेला खोखो, कबड्डी, मल्लखांब आणि अशा बाकी पारंपारिक भारतीय खेळांवर भर द्यावा लागला.”

“कालांतराने विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि बहुमान मिळवला.”, असंही रोहितने सांगितलं. आमच्या शाळेतील शिक्षण हे वर्गांपुरतंच मर्यादित नसून स्विमिंग, स्केटिंग, फुटबॉल आणि पारंपरिक खेळही मुलं इथे शिकतात.

याव्यतिरिक्त मुलांना संगीत, लोहाराचं काम, रंगरंगोटी करणे, कार्पेंटरी, बेकरी, लहान व्यवसायांची उद्योजकता, विजेची उपकरणं कशी वापरायची याचंही शिक्षण दिलं जातं.

 

school im4

 

आजच्या घडीला या शाळेच्या कॅम्पसमध्ये १० हॉस्टेल्स, ३ मोठी मैदानं, धावपटूंसाठी सुविधा, आणि बाकीही अनेक मैदानी खेळ आणि इतरही खेळ आहेत. या शाळेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत इथे ६०,००० विद्यार्थी शिकले आहेत.

हॉस्टेल बोर्डर्सकडून देखभालीसाठी नाममात्र शुल्क आकारलं जातं. शाळा मात्र कुठलंही शुल्क आकारत नाही. यातले ४०% विद्यार्थी अनाथ, वंचित आणि दारिद्र्यरेषेखालील आहेत. संस्थेचा जो स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम असतो त्याद्वारे या मुलांना हॉस्टेलच्या सुविधा मोफत मिळतात.

मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा आणखीन एक फायदा असा झाला की गरिबी आणि पालकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाअभावी मराठवाड्यात बालविवाहाची जी जाचक प्रथा सुरू होती तिला यामुळे आळा बसला.

सुशिक्षित असूनही केवळ स्वत:च्याच आनंदापुरता विचार करणारेच बहुतेकजण असतात. अशात, एका शिक्षण अर्धवट राहिलेल्या व्यक्तीने थेट महर्षी कर्वेंची भेट घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेणं, मुलींपासून, गोरगरीब आणि समाजातील वंचित घटकातल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतके अथक प्रयत्न करणं, अगदी स्वतःची शेकडो एकरांची जमीनही सहज दान करणं ही बाब मोठमोठी शैक्षणिक प्रशस्तिपत्रकं नसतानाही त्यांच्याकडे मुळात असलेली सामाजिक जाणीव, त्यांच्यातली विलक्षण निस्वार्थ वृत्ती दाखवून देते. बाबासाहेबांच्या या कार्यासाठी त्यांना सलाम!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?