' “भारत माझा देश आहे…” शाळेत घोकलेल्या आपल्या लाडक्या प्रतिज्ञेच्या जन्माची कहाणी…. – InMarathi

“भारत माझा देश आहे…” शाळेत घोकलेल्या आपल्या लाडक्या प्रतिज्ञेच्या जन्माची कहाणी….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी एक महत्वाचे काम आपण करतो, क्रमिक पुस्तकांची खरेदी. ती पुस्तकं आणली की त्याचा करकरीत वास मनात भरून घेत पुस्तकांना कव्हर घालायचं आणि सगळं पुस्तकं वाचून काढायचं हा क्रम सगळ्यांचाच असतो. जेव्हा पुस्तकं वाचायला हातात घेतो तेव्हा सर्वप्रथम असते ती प्रतिज्ञा… भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत.

प्रार्थना म्हणताना, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला झेंडा वंदन करताना ही प्रतिज्ञा म्हणतोच. वय वाढल्यानंतर या ओळीची थोडीशी मस्करी पण करतो. पण प्रतिज्ञा मात्र कायम लक्षात राहते.

 

pledge im

 

आजवर आपण अभ्यासलेल्या धड्यांचे लेखक धड्यांच्या सुरुवातीला किंवा अनुक्रमणिकेत दिसतात. पण ही प्रतिज्ञा इतकी वर्षे आपल्या क्रमिक पुस्तकात आहे पण त्याचा लेखक कोण हा प्रश्न कधीच कसा नाही पडला कुणाला? त्याचे नाव ना अनुक्रमणिकेत आहे न प्रतिज्ञेच्या वर किंवा खाली. कुठेही या लेखकाचा उल्लेख आढळत नाही.

कुणी लिहिली आहे ही प्रतिज्ञा?

भारताचा राष्ट्रीय खेळ, राष्ट्रध्वज, पक्षी, प्राणी, फुल,फळ खेळ आहे तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे. राष्ट्रगीत तर ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. रवींद्रनाथ टागोर यांची रचना किती छान वाटते पण प्रतिज्ञा मात्र काहीशी उपेक्षित राहिली आहे नाही का? याचा लेखक कुणालाही माहिती नसावा.  जाणून घेऊयात, याच काहीशा अज्ञात लेखकाबद्दल…

भारताची ही प्रतिज्ञा लिहिणारे लेखक म्हणजे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदमेरी व्यंकट सुब्बाराव! यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली.

ते आंध्रप्रदेशातील अन्नेपथी गावचे रहिवासी होते. विशेष म्हणजे त्याकाळात त्यांचे संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषेत पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण झाले होते. तेव्हा तर आता इतका शिक्षणाचा मूलमंत्र सर्वत्र पोचलेला पण नव्हता. पण ते उच्च शिक्षित सरकारी अधिकारी होते.विशाखापट्टणम या जिल्ह्याचे ते कोषागार अधिकारी होते.

ही नोकरी करत असतानाच ते कथा कविता लिहायचे. त्या काळात त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, कविता प्रसिद्ध केल्या होत्या. आणि ते सारे साहित्य लोकप्रिय पण झाले होते.

प्रत्येक माणसाची मुळातच एक वृत्ती असते. तशी त्यांची वृत्ती राष्ट्रप्रेमी होती. त्यातूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यामधूनच या प्रतिज्ञेचा जन्म झाला.

आपल्या जिल्ह्यातील शाळेतील मुलांना म्हणायला त्यांनी ही प्रतिज्ञा लिहिली आणि त्यांच्या शिक्षण खात्यात काम करणाऱ्या मित्राला ही प्रतिज्ञा दाखवली. त्याला ती इतकी आवडली, त्याने ती प्रतिज्ञा आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षण मंत्री पी.व्ही.जी.राजू यांच्याकडे पाठवली. त्यांनाही ही प्रतिज्ञा मनापासून आवडली. त्यांनी हे प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.

 

pledge 1 im

 

जसा कोणत्याही कंपनीमध्ये एच. आर. हा विभाग असतो तसेच केंद्र सरकारकडेही मनुष्यबळ विकास खाते असते. त्याच्या अंतर्गत शिक्षण विभाग येतो. हे खाते शिक्षण पद्धतीत नवनवे बदल, सुधारणा, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुचवत असते. त्यासाठी एका समितीची स्थापना केलेली असते. केंद्रीय शिक्षणमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात.

१२ ऑक्टोबर १९६४ रोजी बंगळूरू येथे या समितीने घेतलेल्या मीटिंगमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री एम.सी. छागला यांनी ही प्रतिज्ञा शाळा कॉलेजमध्ये आणि राष्ट्रीय दिवसांच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना राहावी याकरिता घेतली जावी असे स्पष्ट निर्देश दिले.

२६ जानेवारी १९६५ पासून ही प्रतिज्ञा देशपातळीवर लागू करावी अशी सूचना मांडली. मग या प्रतिज्ञेचे सर्व भाषात भाषांतर करण्यात आले. देशातील सर्व क्रमिक पाठ्यपुस्तकात या प्रतिज्ञेला समाविष्ट करण्यात आले.

ही प्रतिज्ञा केवळ पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा न राहता तिला देशपातळीवर राष्ट्रीय प्रतिज्ञेचा मान मिळाला. तेलगु भाषेत सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिली होती. पण नंतर ती देशपातळीवर पोहोचली.

 

pledge in school im

 

२०१२ साली आपल्या या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुब्बरावांच्या मित्रांनी साजरे केले. टाईम्स ऑफ इंडियाने त्याची छोटीशी बातमी केली होती.

आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांच्या नावे ओळखले जाते. वंदे मातरम् हे राष्ट्रगान बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. पण आपण ही प्रतिज्ञा रोज वाचतो, म्हणतो. पण या प्रतिज्ञेचा लेखक आजवर अंधारातच आहे.

जसे राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांच्याखाली त्या त्या कवींचे नांव दिले जाते तसे या प्रतिज्ञेखाली सुब्बाराव यांचे नाव येणे आवश्यक आहे. म्हणजे भारताची प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या प्रतिज्ञेचा निर्माता माहिती होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?