' भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकण्याची क्षमता "ब्रह्मास्त्र" मधे असेल?

भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकण्याची क्षमता “ब्रह्मास्त्र” मधे असेल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

जुलै २०१४ मध्ये करण जोहर आणि अयान मुखर्जी यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली होती ती म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. आज बरोबर ८ वर्षांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या सिनेमाच्या मेकर्ससोबत प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

जेव्हापासून या सिनेमाची announcement झाली तेंव्हापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा सिनेमा रखडला आणि आज अखेर या trilogy मधल्या पहिल्या सिनेमाचं ट्रेलर पाहून सोशल मीडियावर फार संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.

 

brahmastra IM

 

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडला सतत पाण्यात बघणारा एक वर्ग आहे ज्याने या सिनेमातल्या फक्त चुकाच काढल्या तर काही सिनेप्रेमींनी या ट्रेलरचं आणि या प्रयत्नाचं थोडं का होईन कौतुक केलं आहे.

सिनेमाला इतकी वर्षं लागल्याने काही लोकं “शिळ्या कढीला उत का आणताय” म्हणून याची आलोचना करतायत तर काही लोकं सिनेमाच्या स्पेशल इफेक्टवरुन सिनेमाची खिल्ली उडवतायत.

बघायला गेलं तर सध्याच्या रिमेकच्या दुनियेत ‘ब्रह्मास्त्र’ हा तसा ओरिजीनल आणि धाडसी प्रोजेक्ट वाटतोय. सिनेमात काही त्रुटी आहेत आणि त्या असणारच कारण कोणतीच कलाकृती परिपूर्ण नसते, त्यामुळे सिनेमाबाबत पूर्वग्रह करून घेऊन त्यावर टीका करणाऱ्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो.

कालच सुशांत सिंहच्या मृत्यूला २ वर्षं पूर्ण झाली, त्याच्या जाण्यानंतर बॉलिवूडप्रती एक प्रकारचा आकस जो सामन्यांच्या मनात निर्माण झाला आहे त्याचा बॉलिवूडला चांगलाच फटका बसला आहे.

 

sushant sing inmarathi

 

हिंदीवर साऊथ सिनेमांची कुरघोडी, खोट्या राष्ट्रवादाची कुबडी घेऊन सिनेमे करत सुटलेला अक्षय कुमार आणि त्याचे सिनेमे, इंग्रजी सिनेमाची कॉपी करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट या सगळ्याचा लोकांना इतका वीट आलाय आणि यामुळेच कदाचित ‘ब्रह्मास्त्र’ची एवढी आलोचना होत आहे.

अगदी टाकाऊ म्हणावा इतका हा सिनेमा नक्कीच वाईट नाहीये हे ट्रेलरवरून स्पष्ट होतंय. गेली काही वर्षं खासकरून हिंदी चित्रपटसृष्टीत ओरिजनल कथांचा जो दुष्काळ पडलाय त्यातून बाहेर पडायला ब्रह्मास्त्र नक्कीच निमित्त ठरू शकतो, असं मला वाटतं पण तशी शक्यता फार कमी आहे.

या सिनेमाने चांगली कमाई करावी आणि हिंदी चित्रपटसृष्टिचे जुने दिवस परत यावे असं मलाही वाटतं पण ती गोष्ट इतकी सोप्पी नाहीये. या बॉलिवूडकरांच्या ढोंगीपणालाही लोकं आता सरसावले आहे.

सध्याचा प्रेक्षक स्मार्ट झालाय. राष्ट्रवादाची भावना, ऐतिहासिक पुरुष यांचं लालूच दाखवून सिनेमा चालत नसतो याचा पृथ्वीराज आणि धाकडसारख्या सिनेमावरून अंदाज आलाच आहे, त्यामुळे हाच स्मार्ट प्रेक्षक ब्रह्मास्त्रच्या बाबतीत काय प्रतिसाद देतो हे येणारा काळच ठरवेल.

ब्रह्मास्त्रमध्येसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला खटकू शकतात आणि या सिनेमाच्या मेकर्सच्या म्हणण्याप्रमाणे हा सिनेमा काही आपली  संस्कृती आणि हिंदू कल्चर सेलिब्रेट करणारा नक्कीच नाहीये हे ट्रेलरवरून स्पष्ट होतंय, पण बाहुबली नंतर एका हिंदी सिनेमात आपल्या हिंदू संस्कृती आणि पुराणाचा होणारा हा वापर सुसह्य आहे, अर्थात त्याचा वापर सिनेमात कसा केला गेलाय हे तो बघितल्यावरच सांगता येईल. पण हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीची गाडी रुळावर आणण्यात मदत नक्कीच करू शकतो!

या सिनेमाच्या ट्रेलरविषयी बोलायचं झालं तर काही स्पेशल इफेक्ट आणि संवाद वगळता सिनेमाचा ट्रेलर फ्रेश आहे, नवीन कन्सेप्ट आहे आणि त्याचं बऱ्यापैकी चांगलं execution केलेलं दिसतंय.

काही स्पेशल इफेक्ट अगदीच बालिश वाटतात खरे, पण आपण याची तुलना इतर हॉलीवूड पटांशी न केलेलीच बरी, कारण त्यांच्या सिनेमाचं बजेट आणि आपल्या सिनेमांचं बजेट यात प्रचंड तफावत असते हे मी वेगळं सांगायची गरज नाही.

 

brahmastra trailer scene IM

 

ट्रेलरमध्ये दाखवलेल्या लव्ह स्टोरीच्या अॅंगलवरूनसुद्धा बरीच लोकं नाराज आहेत, आणि याबाबतीत असलेल्या नाराजीशी मी देखील सहमत आहे. हिंदी सिनेमाने त्यांच्या या भ्रमातून बाहेर पडायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. यातूनही ते शिकतील अशी आशा आपण व्यक्त करू शकतो.

ट्रेलर बघताना आणखीन एक जमेची बाजू प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे याचं बॅकग्राऊंड म्युझिक. प्रितमने या सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे आणि ट्रेलरच्या काही कमकुवत बाजू आपण दुर्लक्षित करू शकतो ते केवळ याच्या बॅकग्राऊंड स्कोरमुळे याबाबतीत नक्कीच सिनेमा सरस आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल.

शिवाय सिनेमा सप्टेंबरमध्ये येणार असून तब्बल ३ महिन्यांआधी याचा ट्रेलर रिलीज केला आहे, त्यामुळे या सिनेमाचा आणखीन एक ट्रेलर आपल्याला येत्या काळात बघायला मिळू शकतो.

ब्रह्मास्त्रचा ट्रेलर हा काही अगदी जगावेगळा नाही किंवा अगदीच टुकारही नाही. तगडी प्रोडक्शन कॉस्ट, रणबीर, आलिया आणि अमिताभ बच्चनसारखे लोकप्रिय स्टार्स, वेगळी कॉन्सेप्ट, उत्तम संगीत, बरे स्पेशल इफेक्ट असा सगळा मालमसाला या सिनेमात आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला या उदासीनतेतून बाहेर काढण्यासाठी हा सिनेमा एक उत्तम संधी आहे.

 

alia ranbir amitabh IM

 

भारतीय प्रेक्षक हा कायमच चांगल्या आणि वेगळ्या प्रयोगाला मनापासून दाद देतो, त्यामुळे ब्रह्मास्त्रच्या बाबतीत असाच काहीसा प्रतिसाद बघायला मिळेल अशी आशा आपण करू शकतो.

बॉलिवूडला आपण कायमच नेपोटीजम, टुकार सिनेमे, कथानक, कंटाळवाणे रिमेक यावरून खडेबोल सुनावतो पण जेव्हा याच बॉलिवूडमध्ये ‘ब्रह्मास्त्र’सारखा प्रयोग केला जातो त्याचं खुल्या मनाने स्वागतसुद्धा आपण केलंच पाहिजे.

सिनेमा कसा असेल? तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल का? हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच. पण जर या सिनेमाला प्रेक्षकांनी खुल्या मनाने प्रतिसाद दिला तर नक्कीच ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहेरा बदलणारं आणि बॉलिवूडविश्वाला वेगळी कलाटणी देणारं खरंखुरं ‘ब्रह्मास्त्र’ ठरेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?