' “आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास – InMarathi

“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

हा विषय सुरू करण्याआधी “मध्यपुर्व” ही संकल्पना समजून घेऊ. मध्यपुर्व म्हणजेच गल्फ राष्ट्रं. यामध्ये सौदी अरेबिया, इराक, कतार, येमेन, बहारीन, इराण, कुवेत अशी राष्ट्रं येतात. इराण आणि सौदी अरेबिया यांमधे सुन्नी शिया या कट्टर धार्मिक वादाबरोबरच मध्यपुर्वेत वर्चस्व कोण गाजवणार हा देखिल मुद्दा आहे.

 

gulf-states-marathipizza
rjgeib.com

२००९ मध्ये एका छोट्या घटनेतून या घडामोडींना सुरुवात झाली. मध्यपुर्वेतील बहुतांश राष्ट्रांमधे हुकूमशाही राजवट वर्षानुवर्षे सुखाने नांदत होत्या, परंतु जनतेमध्ये असंतोष ठासून भरला होता. ट्युनिशीयातील मोहम्मद बाऊअजीजी नावाच्या एका फळविक्रेत्याने हुकूमशहाच्या जुलूमशाही कारभारा विरोधात स्वतःला पेटवून घेतले आणि या घटनेने जनतेमध्ये भडका उडाला. जनतेने रस्त्यावर उतरून २३ वर्षांची हुकूमशाही राजवट उलथून टाकली आणि हे लोण हळूहळू इतर अरब राष्ट्रात पसरले.

फेसबुक, व्हॉटस्ऍपचा वापर करून लाखोंचे मोर्चे निघू लागले तर काही ठिकाणी गृहयुद्धांना सुरुवात झाली. यामध्ये होस्नी मुबारकची इजिप्त मधील आणि गद्दाफीची लिबिया मधील राजवट लोकांनी उखडून फेकली. या क्रांतीकारी घटनांनाच “Arab Spring” म्हणतात. या बंडखोरांना आणि हुकूमशहांना शस्त्रास्त्रं विकून फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकने पैसा कमावला.

पण Arab Spring चळवळ सगळ्या देशांत यशस्वी झाली नाही कारण त्याची कारणं वेगळीच होती. सिरीया मध्ये शिया पंथिय राष्ट्रपती असादला हटवण्यासाठी अमेरिकने सुन्नी बंडखोरांना मदत सुरु केली. पण अमेरिकन बाहुला सिरीया मध्ये सत्तेवर यावा हे व्लादिमीर पुतीनला कसे रूचावे ? रशियाने असादला आपला पाठिंबा पैसा व शस्त्रास्त्रांच्या रूपात सुरू केला. आज देखिल सिरीया पेटलेलेच आहे.

 

siriya-marathipizza
edition.cnn.com

येमेन मध्ये अली सालेह हा हुकूमशहा राज्य करत होता (याने आपल्या कार्यकाळात अंदाजे दोन ते चार लाख कोटी रूपये कमावले) आणि २०११ मध्ये आपल्या मुलाला लष्करप्रमुख करण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्यावर मोहसेन अहमार या पदसिद्ध लष्करप्रमुखाने बंड केले. येमेन सैन्यदलाची निष्ठा सालेह व अहमार यांच्या मध्ये विभागली गेली आणि येमेन मध्ये आंतरिक गृहयुद्ध सुरु झाले व याचा परिणाम म्हणून लष्कराचा धाक कमकूवत झाला.

याचा फायदा घेण्यासाठी हौदी वंशाचा बंडखोर अब्दुल मलीक हौदी उभा राहिला, कारण हौदी लोकांबरोबर पक्षपात केला जातो आणि त्यांचा विकास झाला नाही हि त्यांची मुख्य तक्रार होती. हौदी लोक शिया पंथिय आहेत आणि हुकूमशहा सुन्नी, हौदी बंडखोरांनी शिया बहुसंख्याक राज्यं हस्तगत करायला सुरुवात केली त्यामध्ये येमेनची राजधानी “सना” देखिल येते. इराणने आपली लढाऊ जहाजं येमेनच्या एडन जवळील समुद्रात आणून तसेच शस्त्रास्त्रं पैसा याद्वारे शिया पंथिय हौदींना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये जाती बरोबर आणखी एक कारण म्हणजे येमेन सौदी अरेबियाच्या सीमारेषांना भिडलेले आहे. उत्तरेतून हिजबोल्हा तसेच कतीफी सारख्या अतिरेकी संघटनांद्वारे व दक्षिणेला आपला समर्थक सत्ताधारी येमेन मध्ये आणुन सौदी अरेबियावर दबाव ठेवणे हि इराणची उत्कृष्ट खेळी होती आहे.

हे लक्षात आल्यावर सौदी अरेबिया हे इराण म्हणजेच हौदींना रोखण्यासाठी येमेन हुकूमशहा सालेहच्या मागे उभे राहिले. सौदी अरेबियाने हौदी बंडखोरांच्या प्रदेशात हवाईहल्ले सुरु केले. यात सालेह विरुध्द अहमार युद्ध सुरूच होते. सालेहने हौदी बंडखोरांचे ठिकाण म्हणुन अहमार असलेले ठिकाण दाखवले आणि सौदी विमांनानी बाँब टाकले. या हल्ल्यात अहमार सुदैवाने बचावला. या मधुन धडा शिकलेल्या लष्करप्रमुखाने हौदी बंडखोरांशी हातमिळवणी केली. म्हणजे आता हौदी बंडखोर तसेच अहमार यांच्या युती विरुध्द हुकूमशहा सालेह असा लढा सुरू झाला.

 

Yemen-marathipizza
independent.co.uk

यामध्ये काही घटनांनंतर महत्वाची घटना म्हणजे हुकूमशहा सालेह मस्जीद मध्ये नमाज पढत असताना बाँबस्फोट झाला आणि समझोत्याच्या कागदावर सह्या करण्यास टाळाटाळ करणारा सालेह चाळीस टक्के भाजल्यावर तयार झाला. २०११ मध्ये सालेहने पद सोडले मन्सूर हादी या व्यक्ती साठी! हादीने आधीचा लष्करप्रमुख बडतर्फ करून मुबारक नावाचा नवीन लष्करप्रमुख घोषित करुन येमेन एकसंध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मन्सूर हादीने असंतोष मिटवण्यासाठी सहा राज्यांना पुर्ण स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु अल हौदीने तो धुडकावून लावला व शस्त्रांच्या बळावर २०१४ मध्ये राजधानीचे पुर्ण राज्य ताब्यात घेतले.

हा लाजीरवाणा प्रसंग टाळण्यासाठी येमेन राष्ट्रपतीने आपले सगळे सैन्य उत्तरेला हौदी बंडखोरांच्या विरोधात उतरवले आणि याचा फायदा घेत दक्षिणेला अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा संकटात असलेल्या राष्ट्रपतीने शेवटी युनोच्या मदतीने अल हौदी बरोबर एक शांतता करार केला. ज्यामध्ये हौदींना सत्तेमध्ये मोठा वाटा मिळाला. परंतु सत्तेमध्ये असलेल्या हौदींनी हळूहळू पुर्ण येमेन गिळंकृत करू नये, म्हणून मन्सूर हादीने अहमद मुबारक या लष्करप्रमुखाला पंतप्रधान करण्याचा घाट घातला, परंतु अल हौदीने हा कट उधळला, संविधान देखिल धुडकावून लावले आणि लष्करप्रमुखाला अटक केली. मन्सूर हादीने कंटाळून राजीनामा दिला व त्यांना हौदी बंडखोरांनी तात्काळ नजरकैदेत टाकले. २०१५ मध्ये मन्सूर हादी यांनी सगळ्यांना तुरी देत पळून जाऊन सौदी अरेबिया गाठले व सौदी अरेबियाच्या मदतीने मन्सूर हादि कडून सुरू झाले Operation Decisive Storm.

 

operation-decisive-storm-marathipizza
chowrangi.pk

आता सौदी अरेबिया operation अंतर्गत येमेन मध्ये हवाई हल्ले करते, या proxy war मध्ये सौदी अरेबिया बरोबर छुप्या पद्धतीने जॉर्डन, सुदान, इजिप्त, मोरोक्को, सेनेगल हि सुन्नी राष्ट्रं तसेच यांना शस्त्रास्त्रं विकणारे अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड सामील आहेत तर दुसऱ्या बाजुला हौदी बंडखोरांच्या मागे इराण उभा आहे.

सौदी अरेबियाचे हल्ले बेभरवशी आहेत. त्यामुळे हॉस्पिटल, शाळा, औद्योगिक इमारती यांचे अपरिमीत नुकसान तर झाले आहेच, परंतु हजारो नागरिक देखिल मृत्युमुखी पडले आहेत. २०१५ मध्ये अल हुदायधाह बंदर उध्वस्त झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे दळणवळण ठप्प आहे. याचा परिणाम म्हणून भूकबळींची संख्या इतकी आहे कि हे कदाचित २१ व्या शतकातील सर्वात मोठे मानव निर्मित संकट आहे. जवळजवळ तीस लाख लोक निर्वासित आणि भूकबळींच्या छायेत आहेत. त्यात चार लाख मुलं आहेत व जवळपास दहा हजार मुलं मृत्युमुखी पडली आहेत.

पाश्चिमात्य मिडिया मध्ये येमेन प्रश्नाला आपापल्या लागेबांध्यांमुळे कवरेज मिळत नाही. जे मिळते ते हौदींना खलनायक म्हणुन मिळते कारण अमेरिकन प्रभाव. अमेरिका जगात प्रतिवर्षी ३३% शस्त्र विकते. फक्त २०१५ मध्ये अमेरिकने सौदी अरेबियाला जवळपास सव्वा लाख कोटी रूपयांची शस्त्रास्त्रं विकली आहेत.

या सगळ्यात दिवसेंदिवस अमेरिकेवर जागतिक दबाव वाढतो आहे. अमेरिका अरबांना हॉस्पिटल शाळा यावर हल्ले करण्याचे टाळायला सांगते, परंतु अरब ऐकत नाहीत त्यात भर म्हणुन सौदी अरेबियाने सुन्नी देशांची मिळून एक मुस्लिम लष्करी आघाडी उभी केली आहे इराण वर दबाव टाकण्यासाठी.

 

saudi-marathipizza
pinnacledigest.com

 

हा आतापर्यंतचा येमेन या आंतरराष्ट्रीय विषयावरचा थोडाफार घटनाक्रम आहे. पुढे बघू काय होतं.

ता. क. : येमेन युद्ध जगासाठी सुद्धा चिंताजनक आहे. कारण हौदी बंडखोर माथेफिरु आहेत. त्यांनी काही महिन्यापुर्वी सौदी अरेबिया वर मक्का आणि मदिनेच्या दिशेने रॉकेट हल्ला केला होता. सुदैवाने ती थोडी दुर अंतरावर पडली, नाहीतर जगभरात आगडोंब उसळला असता.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?