' वाळवंटाच्या मधोमध असणाऱ्या या शाळेत AC ची गरज कधीच भासत नाही! – InMarathi

वाळवंटाच्या मधोमध असणाऱ्या या शाळेत AC ची गरज कधीच भासत नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विचार करा, रणरणत्या वाळवंटात ५० अंशावर भडकलेल्या पार्‍यात भर दुपारी जिथे श्वास घेणंही मुश्किल तिथे अशा उष्म्यात जैसलमेर मधील मुली शाळेत बसून अगदी आरामात शिकतात हे सांगितलं तर आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाही.

जैसलमेर पासून थोड्या अंतारावरील कनोई गावात हा चमत्कार पहायला मिळतो. राजकुमारी रत्नावती शाळा रणरणत्या उन्हातही पूर्ण क्षमतेनं चालू असते आणि याचं कारण आहे या शाळेची रचना. पिवळ्या वाळूच्या दगडांनी बनविलेली ही वास्तू आधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमूना आहे कारण या इमारतीत वातानुकुलित यंत्रणा नसूनही इमारत आतून थंड रहाते.

बालवाडी ते दहावीपर्यंतच्या ४०० मुली या शाळेत शिक्षण घेतात. शाळेव्यतिरिक्त या इमारतीत कापड संग्रहालय, पेरफॉर्मन्स हॉल त्याचप्रमाणे कारागिरांना त्यांची कलाकुसर विकण्यासाठी प्रदर्शनाची जागा इत्यादी सोयी आहेत. शाळकरी मुलींच्या मातांना विणकाम, कापड अशा पारंपारिक कलांचे प्रशिक्षण देण्याची सोय याठिकाणी आहे.

 

jaisalmer AC IM

 

CITTA या ना नफा संस्थेचे संस्थापक मायकेल डौबे यांच्या कल्पनेतून ही इमारत साकारण्यात आली आहे. ही इमारत कल्पनेतून मूर्त स्वरुपात आणण्यासाठी वास्तुविशारद डायना केलॉगला दहा वर्षांहून अधिक काळ लागला.

२०१४ साली डायनानं भारतभ्रमंती केली. या भ्रमंतीत भारतीय वाळवंटातील भरभराटीचे जीवन पाहिले आणि ती थक्क झाली. मूळची अमेरिकेत रहाणारी डायना देशाबाहेर प्रथम पाऊल ठेवत होती. हे पाऊलही पर्यटक म्हणून नव्हे तर वास्तुविशारद म्हणून ठेवताना तिला अनेक गोष्टी नव्यानं शिकाव्या लागल्या.

जेंव्हा तिला या प्रकल्पाची माहिती देण्यात आली तेंव्हा वाळवंटाच्या मध्यभागी अशा प्रकारची वास्तू उभारणं हे शक्य नसल्याचं तिचं मत होतं. मात्र, जेंव्हा ती भारत दौऱ्यावर आली आणि तिनं राजस्थानातील एकाहून एक सुंदर इमारती पाहिल्या, तेंव्हा तिचं हे मत बदललं.

इथल्या इमारतींनी तिला आत्मविश्र्वास मिळवून दिला की तीसुद्धा अशाच प्रकारची एखादी सुंदर रचना वाळवंटात उभी करू शकेल. राजवाडे वगैरे तर आहेत पण अगदी इथल्या विहिरीदेखील स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं एक आश्चर्य आहेत असं तिचं मत आहे.

ही शाळा अंडाकृति असून अत्यंत देखणी अशी ही इमारत स्त्री शक्तीला समर्पित करण्यात आलेली आहे. ही इमारत साकारताना तिने इथल्या संस्कृतीचं, वातावरणाचं बारकाईनं निरिक्षण केलं. पहिल्यापासूनच तिचं ठामपणे ठरलं होतं की, पाश्चात्य कल्पना लादायची नाही. ही इमारत इथल्या संस्कृतिचाच भाग वाटली पाहिजे.

जरी इमारत आधुनिक असली तरी ती इथल्या भूमिशी प्रामाणिक असली पाहिजे. यासाठी मग इथली संस्कृती जाणून घेण्यासाठी डायनाने आजूबाजूच्या गावात चिक्कार भटकंती केली.

 

diana archeology IM

 

एका बाजूला भटकंती आणि इथे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती यांचा अभ्यास चालू असतानाच दुसरीकडे कच्चं रेखाटन चालू होतं. डायना सांगते की अगदी पहिल्यापासूनच अजाणता रेखाटनात अंडाकृती आकार येत होता. जेंव्हा तिचा प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला आणि तिनं रेखाटनाचा विचार केला तेंव्हा ती ही कच्ची रेखाटनं समोर घेऊन बसली आणि तिच्या लक्षात आलं की नकळतपणेही तिचा मेंदू अगदी योग्य ट्रॅकवर काम करत होता.

या इमारतीचा अंडाकृती आकारच योग्य ठरणार होता म्हणून मग तो निश्चित करुन पुढील संरचना करण्यात आली. या आकाराचा व्यावहारिक अर्थ हा होता की अशा प्रकारच्या आकारामुळे इमारतीत असणार्‍या विविध विभागातील अंतर कमी होणार होतं. जेणेकरुन आतल्या आत विद्यार्थिनी आणि शिक्षकांना ये जा करणं सोपं जाणार होतं.

डायनाने आपल्या भटकंतीत पाहिलं होतं की चारही बाजूंनी इमारत आणि मधोमध अंगण हे बहुतेक सगळ्या भारतीय इमारतीत आहे. तिने तीच संकल्पना आपल्या डिझाईनमध्येही समाविष्ट केली. ही अंडाकृती, लंबगोल संरचना ही आणखीन एका गोष्टीचं प्रतिक आहे आणि ती म्हणजे, खेडेगावातील स्त्रिया या एकत्रित कामं करताना मग ते शिवण टिपण असो, निवडणं असो की गप्पा मारणं जेवणं असो त्या कायम असं वर्तुळ करुन बसतात.

मुलंही नेहमी गोलाकृती उभं राहून खेळ खेळतात. यामुळे परस्परांत एक संवाद आपोआप घडत रहातो. या इमारतीवर सौर पॅनेल बसविलेली आहेत जेणेकरुन वीजेच्या बाबतीत शाळा स्वयंपूर्ण असेल. याशिवाय ही पॅनेल्स इमारतीवर छताचं काम करत इमारतीला थंडावा देण्याचं कामही करतात.

 

jaisalmer 3 IM

 

रात्री भू औष्णिक ऊर्जा वापरून ही कूलिंग सिस्टिम दिवसभर शाळेची इमारत थंड ठेवते. या इमारतीच्या अंगणाच्या पोटात ३.५ लाख लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. इमारतीच्या भिंतीना आतून चुन्याचं प्लॅस्टर केलेलं आहे ज्यामुळे इमारतीचे पृथ्थकरण होते.

बांधकामासाठी बाहेरून सामग्री न मागवता स्थानिक वाळूचा दगड वापरला आहे. हा दगड दिवसा उष्णतेपासून संरक्षण देतो आणि संध्याकाळी जेंव्हा वातावरं थंडगार बोचरं होतं तेंव्हा उबदारपणा देतो. २०१४ साली या इमारतीचं बांधकाम चालू झालं आणि ते पूर्ण होण्यासाठी २०१८ उजाडावं लागलं.

ही इमारत एकप्रकारचं आव्हानच होतं जे स्थानिक कंत्राटदार करीम खान आणि वास्तुविशारद डायना यांनी समर्थपणे पेललं आहे.

इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि दुर्दैवानं कोविडने सगळं जग बंद पाडलं. त्यामुळे ही शाळा मुलींनी गजबजायला पुन्हा दोन वर्षं वाट पहावी लागली. अखेर गतवर्षीपासून ही शाळा सुरु झालेली आहे. तुम्ही कधी इथे फिरायला गेलात तर एकदा नक्की या शाळेला अवश्य भेट द्या!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?