' बलाढ्य व्हिडिओकॉनच्या दिवाळखोरी मागची कथा एखाद्या थरारक सिनेमासारखी आहे – InMarathi

बलाढ्य व्हिडिओकॉनच्या दिवाळखोरी मागची कथा एखाद्या थरारक सिनेमासारखी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

स्कॅम म्हटलं की आपल्यासमोर एकच नाव येतं ते म्हणजे हर्षद मेहता स्कॅम. पण तुम्हाला माहितीये का की एका टिव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीवर भारतातील सर्वात आर्थिक दिवाळखोरी जाहीर करायची वेळ आली होती.

ज्या कंपनीने भारतात सर्वप्रथम रंगीत टीव्ही सेट आणले, ज्याने एक मोठा काळ एलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वावर राज्य केलं त्यांच्यावर इतकी नामुष्कीची वेळ का यावी? ती नेमकी कंपनी कोणती आणि यातून आपण काय धडा घ्यायला हवा हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!

टेलिव्हिजन म्हणजे इडियट बॉक्स अशी एकेकाळची समजूत सध्या पुसली गेली आहे. हाच इडियट बॉक्स आता स्मार्ट बनलाय आणि या औद्योगिक विश्वातल्या क्रांतीमध्ये टीव्ही ही अशी गोष्ट आहे जी सतत काळाप्रमाणे बदलली आहे.

 

television in india IM

 

सुरुवातीच्या काळात जेव्हा टेलिव्हिजन भारतात आला तेव्हा आजच्या आयफोनप्रमाणे तो स्टेट्स सिम्बल बनला होता. आजकाल सारखं सर्रास प्रत्येक घरात टीव्ही नसायचा. पण हळूहळू ते चित्रदेखील बदललं. ब्लॅक अँड व्हाईट का होईना घरोघरी टेलिव्हिजन सेट्स दिसू लागले.

सुरुवातीला ठराविक काही वेळच दूरदर्शनवर कार्यक्रम प्रसारित व्हायचे, हळूहळू २४ तास टेलिव्हिजन सुरू झाला आणि पाहता पाहता अन्न, वस्त्र, निवाराप्रमाणे टीव्हीची गणना मूलभूत गरजांमध्ये होऊ लागली.

या क्षेत्रात आणखीन मोठी क्रांती आणली ती कलर टेलिव्हिजनने. असं म्हणतात की भारतात पहिला कलर टीव्ही हा व्हिडिओकॉन या कंपनीने आणला. यात अतिशयोक्ति अजिबात नाही.

एक काळ असा होता की देशातल्या बहुतांश घरात टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव, एसी हे सगळं व्हिडिओकॉन कंपनीचं असायचं. Consumer Electronics या क्षेत्रात व्हिडिओकॉनने स्वतःचं स्थान अगदी भक्कम केलं होतं, पण नेमकं असं या कंपनीच्या बाबतीत काय घडलं की त्यांनी एकेदिवशी दिवाळखोरी जाहीर केली.

 

videocon IM

 

९०००० करोडचं मूल्य असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीचा शेयर अचानक २५० वरुन थेट २० रुपयांवर का आला? आर्थिक दिवाळखोरीपर्यंत तर ठीक आहे पण या कंपनीच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ का आली?

आजच्या लेखातून आपण याच व्हिडिओकॉन कंपनीच्या उदय आणि अस्ताविषयी जाणून घेणार आहोत.

वेणुगोपाल धूत यांनी त्यांच्या करियरची सुरुवात आपले वडील नंदालाल धूत यांच्या गंगापुर इथल्या साखर कारखान्यापासून झाली. वेणुगोपाल यांची औद्योगिक क्षेत्रातली दूरदृष्टी आणि त्यांची जिद्द एवढी सक्षम होती की १९८६ मध्ये त्यांनी त्यांच्या ३ भावांना एकत्र घेऊन अधीगम ट्रेडिंग लिमिटेड ही कंपनी सुरू केली.

ही कंपनी पिक्चर ट्यूब तयार करून इतर कंपन्यांना विकत असे. आपल्या या व्यवसायाला आणखीन मोठं करायचं ध्येय समोर ठेवून त्यांनी या कंपनीचं नामकरण करून व्हिडिओकॉन ही कंपनी सुरू केली.

यानंतर कलर टेलिव्हिजन सेट्स बनवण्याचं लायसन्स मिळाल्यानंतर लगेचच व्हिडिओकॉनने कलर टीव्ही बनवायला सुरुवात केली. १९९० पर्यंत व्हिडिओकॉनने फक्त टेलिव्हिजनच नव्हे तर एसी, फ्रीज, मायक्रोवेव या सगळ्या प्रॉडक्टची निर्मिती करायला सुरुवात केली, आणि बघता बघता या कंपनीने भारतभर आपलं जाळं पसरवलं.

१९९१ मध्ये भारताने liberalization policy जाहीर केली आणि एका झटक्यात भारतीय उद्योगविश्वाचा चेहेराच बदलला. जगभरातल्या वेगवेगळ्या कंपन्या आणि ब्रॅंडसाठी भारतीय मार्केट खुलं झालं आणि हळूहळू स्पर्धा जोर धरू लागली.

 

liberalization IM

 

या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला आणखीन काही मोठं करावं लागणार असा विचार करून वेणुगोपाल यांनी आपल्या व्यवसायाचा पसारा आणखीन वाढवायचं ठरवलं.

Consumer Electronics पुरतं मर्यादित असलेल्या व्हिडिओकॉनने आता गॅस, टेलिकॉम आणि D2h या क्षेत्रातसुद्धा शिरकाव करायला सुरुवात केली, आणि इथेच व्हिडिओकॉन आणि वेणुगोपाल यांच्या या स्वप्नाला ग्रहण लागायला सुरुवात झाली. अशा पद्धतीच्या Aggressive Expansion मुळेच आज व्हिडिओकॉनचं नाव फारसं कुठेच दिसत नाही. १० दगडांवर पाय ठेवणाऱ्या व्हिडिओकॉनला हा पसारा चांगलाच महागात पडला.

ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात व्हिडिओकॉनने पाय पसरायला सुरुवात केली त्या क्षेत्रात भांडवल खूप लागतं तेसुद्धा लिक्विड कॅशच्या स्वरूपात आणि हे बिझनेस वाढायलासुद्धा एक ठराविक काळ जावा लागतो.

व्हिडिओकॉनकडे या सगळ्या गोष्टी होत्या, पण Consumer Electronics मधून मिळणारा पैसा हा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी पुरेसा नव्हता, आणि याचसाठी वेणुगोपाल धूत यांनी बँकेकडून मोठमोठी कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि तो सगळ्या पैसा हे वेगवेगळे उद्योग उभे करण्यासाठी वापरला, पण हे सगळं वरवरचं चित्र होतं, आतून कंपनीची अवस्था फारच बिकट झाली होती.

 

venugopal dhoot IM

 

२०१३ मध्ये व्हिडिओकॉन कंपनीवर ३७००० करोड रुपयांचं कर्ज होतं. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशीच काहीशी अवस्था व्हिडिओकॉनची झाली होती. वेगवेगळे उद्योग उभे करण्याच्या नादात कंपनी त्यांच्या मुख्य ध्येयापासून फार दूर गेली होती.

Consumer Electronics मध्ये अव्वल असूनही व्हिडिओकॉनच्या कोणत्याही बिझनेसमधून नफा होताना दिसत नव्हता. Lg, Sony, Samsung, Godrej सारख्या कंपन्यांनी मार्केटमध्ये एंट्री घेऊन व्हिडिओकॉनचं धाबं दणाणून सोडलं होतं. या सगळ्याच कंपन्यांची प्रॉडक्ट सगळ्याच बाबतीत व्हिडिओकॉनपेक्षा सरस होती.

या सगळ्याच चांगलाच फटका व्हिडिओकॉनला बसत होता. ३७००० हजार करोडचं कर्ज आता ५०००० करोड इतकं झालं होतं, आणि काहीच दिवसांत ज्या कंपनीची प्रोडक्ट्स देशातल्या बहुतांश घरात असायची त्या कंपनीने आजवरची सर्वात मोठी आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली.

व्हिडिओकॉनच्या ९०००० करोड रुपयांच्या दिवाळखोरीची बातमी वणव्यासारखी पसरली, आणि कित्येक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला डोलारा कोसळू लागला. यामध्ये कित्येक गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सोसावं लागलंच पण कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

आजच्या जमान्यात प्रत्येक कंपनीवर भलंमोठं कर्ज आहे, एयरटेल, रिलायन्स, टाटा अशा मोठमोठ्या कंपन्यावर करोडो रुपयांचं कर्ज आहे पण तरी या कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत, मग व्हिडिओकॉनच्या बाबतीत असं काही का घडलं नाही?

७ एप्रिल २०१० मध्ये व्हिडिओकॉनने टेलिकॉम बिझनेसची सुरुवात केली आणि त्यांना त्याचं लायसन्सदेखील मिळालं, टेलिकॉम क्षेत्रात व्हिडिओकॉनची घोडदौड सुरू झाली, पण यश ही व्हिडिओकॉनच्या नशिबी नव्हतंच असंच म्हणावं लागेल.

 

telecom IM

 

२०१२ साली २जी स्पेक्ट्रम स्कॅम अंतर्गत आधी दिलेल्या तब्बल १२२ कंपन्यांची टेलिकॉम लायसन्स रद्द करण्यात आलं, आणि या १२२ कंपन्यांमधलं एक मोठं नाव होतं ते म्हणजे व्हिडिओकॉन!

यापाठोपाठ व्हिडिओकॉनच्या इतरही बिझनेसवर असाच भयानक परिणाम दिसू लागला. कोळशाचा तुटवडा, मायनिंगवर आलेली बंदी आणि कामगार संप यामुळे त्यांचा ऑइल बिझनेसमधला काही भाग त्यांना  ONGC ला विकावा लागला.

Consumer Electronics मधली वाढती स्पर्धा, तेलाचे वाढते दर, टेलिकॉम लायसन्स रद्द होणे, D2h चं डिशटीव्हीमध्ये झालेलं मर्जर अशा चहूबाजूनी व्हिडिओकॉनची कोंडी झाली आणि एकवेळ अशी आली की कंपनीच्या वॅल्यूएशनपेक्षा त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या रकमेने आभाळाला हात टेकले!

ही तर खरी सुरुवात होती व्हिडिओकॉनच्या अस्ताची, इथूनच खरे कंपनीतले घोटाळे उघडकीस यायला सुरुवात झाली. १५ मार्च २०१६ या दिवशी अरविंद गुप्ता नामक व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आणि त्यात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद केली की ICICI बँकची CEO चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन कंपनीला ३२५० करोडचं एक faulty loan दिलेलं होतं.

 

chanda kocchar IM

 

ICICI बँकेचे एक मोठे गुंतवणूकदार या नात्याने अरविंद गुप्ता यांनी ही गोष्ट नजरेस आणून दिली आणि सगळ्यांचं लक्ष या स्कॅमकडे आकर्षित करायचा प्रयत्न केला. पण या पत्राकडे तब्बल २ वर्षं कुणीच लक्ष दिलं नाही. जेव्हा व्हिडिओकॉनने दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा सरकारची नजर या पत्रावर पडली.

हा स्कॅम नक्की आहे तरी काय?

वेणुगोपाल धूत आणि दीपक कोचर (चंदा कोचर यांचे पती) यांनी भागीदारीमध्ये एक कंपनी सुरू केली होती जिचं नाव होतं Nupower. पण २०१२ मध्येच वेणुगोपाल यांनी या कंपनीतला त्यांचा शेयर दीपक कोचर यांना विकून त्यातून एक्जिट घेतली होती.

यानंतर ICICI बँकची CEO चंदा कोचर यांनी supreme energy या कंपनीला ३२५० करोडचं कर्ज दिलं होतं आणि या supreme energy या कंपनीचे खरे मालक दुसरे तिसरे कुणी नसून वेणुगोपाल धूतच होते!

supreme energy ला कर्ज मिळाल्यानंतर ते Nupower या कंपनीला ६४ करोड रुपये कर्ज म्हणून देते. पण supreme energy ची एवढी रक्कम परत करण्याची ऐपत कधीच नव्हती. supreme energy ला मिळालेल्या ३२५० करोडच्या कर्जापैकी २८१० करोड रुपये इतकी रक्कम Non Performing Asset म्हणून घोषित करण्यात येते.

एकंदरच चंदा कोचर यांनी कर्ज म्हणून दिलेली रक्कम वेणुगोपाल धूत हे दीपक कोचर यांच्याच कंपनीत गुंतवतात, ज्याणेकरून इथून तिथून पैसा शेवटी कोचर यांच्याकडेच आला होता.

 

videocon scam IM

 

ही केस अजूनही कोर्टात सुरू आहे आणि यावर अजूनही निर्णय येणं बाकी आहे. एकेकाळी ज्या कंपनीने एलेक्ट्रॉनिक्स विश्वावर राज्य केलं त्याच व्हिडिओकॉन कंपनीच्या दिवाळखोरीमधून आपण काय शिकायला हवं?

पाहिली गोष्ट म्हणजे अपयशामागे एकच कारण नसतं, कोणतीही कंपनी बंद होण्यामागे बरीच कारणं असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुसरी गोष्ट म्हणजे एकाचवेळी १० गोष्टी करू नका, त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये तुम्ही निपुण आहात त्यावरचा तुमचा फोकस ढळतोच, पण इतरही गोष्टींकडे नीट लक्ष अजिबात देता येत नाही.

तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फसवणूक किंवा गैरव्यवहारासारखे पर्याय टाळा. तुम्ही एकाच वेळेस काही जणांना मूर्ख बनवू शकता पण एकाच वेळेस सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही.

स्कॅम हा काही दिवस लपून राहतो पण कालांतराने तो जगासमोर येतोच, त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान तर होतंच पण समाजातील तुमची प्रतिमा कायमची मलिन होते आणि स्कॅमस्टर म्हणून ठपका तुमच्या माथी कायमचा मारला जातो.

 

scam im

 

त्यामुळे व्हिडिओकॉनच्या या केसस्टडीमधून तुम्ही या गोष्टी शिकल्या तर नक्कीच तुमच्या विचारांत आणि कृतीत फरक पडेल आणि एक माणूस म्हणून आणि एक उद्योजक म्हणूनही तुम्ही यशस्वी व्हाल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?