' छत्रपती शिवाजी महाराजांचे “गुरू” कोण? त्यावरचे एक विवेचन! – InMarathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे “गुरू” कोण? त्यावरचे एक विवेचन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – चिन्मय भावे 

===

महाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला आणि त्याला अजूनही भडकता ठेवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. या वादाच्या वणव्यात छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांना हवे तसे वापरले गेले आहे.

 

shivaji-dadoji-ramdas-marathipizza00

 

“छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर राजे… त्यांचा गुरु कोण?” यावरून आजच्या राजकारणात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कट्टर हिंदुत्ववादी रंगात रंगवल्याचा आरोप शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर अनेकदा केला गेला आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा हा वाद उकरून काढला गेला.

श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना शरद पवारांनी केलेले  विधान पाहूया – पवार म्हणाले होते,

शाळेत शिकवला जाणारा इतिहास शिक्षकाने जे शिकवला त्यावर आधारित होता. शिक्षण देण्याचे काम वरिष्ठ वर्गाला होते. त्यामुळे त्यांनी त्याना हवा तसाच इतिहास मांडला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता वरिष्ठ वर्गातले लेखक कोण हे स्पष्ट लिहीले असते तर तपासणे शक्यही झाले असते. हे खरे आहे की शिवाजी महाराजांची मांडणी विविध राजकीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या रंगात झाली आहे.

कोणाला गो-ब्राम्हणप्रतिपालक महत्त्वाचे वाटले, कोणाला हिंदुत्ववादी (आजच्या संदर्भात) तर कोणाला कुळवाडीभूषण.

काही जण आजच्या संवैधानिक संज्ञेत छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतात, मग त्यांच्या पदरी असलेल्या मुस्लिम अधिकाऱ्यांची नावे येतात.

अफझलखानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे नाव येते (पंताजी गोपीनाथचे नाव वगळून) मग एक पाऊल पुढे टाकून अफझलखान, औरंगजेब सर्वांना सेक्युलर सिद्ध करण्यात येते.

 

 छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी

हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!

ही सगळी मांडणीच “खरा इतिहास” आहे, “बामणी काव्यावर उपाय आहे” म्हणून मांडण्यात येते आणि शिवशाहीर पुरंदरे इतिहासाचे विकृतीकरण करणारे म्हणून मांडले जातात.

रियासतकार सरदेसाई सुद्धा हिंदुत्ववादी आहेत असे शेजवलकरांच्या हवाल्याने एक गृहस्थ आग्रहाने सांगत होते, जे दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासांचा विरोध करतात त्यांना शेजवलकर इतिहासकार आहेत हे मान्य आहे हेही भाग्यच समजले पाहिजे!

कोकण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते अगदी घट्ट – या समुद्रकिनाऱ्यावर त्यांचे खास प्रेम… माझ्या दर्या फिरस्ती या प्रकल्पासाठी माहिती घेताना शेजवलकरांचे संकल्पित शिवचरित्राचा आराखडा वाचत आहे.

शेजवलकरांच्या नजरेतून शिवाजी महाराज, त्यांच्या स्वराज्याचे अधिष्ठान आणि त्यांना समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव गुरुस्थानी होते का हे पाहण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करतो आहे.

दादोजी व समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा प्रश्नच खरंतर अडचणीचा आहे. याचे कारण गुरु या शब्दाची सापेक्षता …!

कोणत्या बाबतीत कोण कोणाचे गुरु? गुरु कोणाला मानावे आणि शिक्षक कोणाला मानायचे यावर आज फेसबुकवर तुम्हाला एकवाक्यता दिसणार नाही. कोणी म्हणते नोकरी म्हणून अभ्यासक्रम शिकवणारा शिक्षक आणि आयुष्याला निष्काम वृत्तीने दिशा देणारा गुरु!

गुरु ही व्यापक संकल्पना आहे आणि गुंतागुंतीची देखील गोष्ट आहे त्यामुळे ज्या प्रश्नाचे उत्तर ठामपणे सापडले आहे म्हणून लोक वितंडवाद घालतात, द्वेष पसरवतात तो प्रश्नच भक्कम नाही, म्हणजे तू देव मानतोस का हा प्रश्नही तसाच आहे.

प्रश्नकर्त्याच्या लेखी देव या शब्दाची कोणती व्याख्या अभिप्रेत आहे आणि त्या श्रद्धेशी निगडित कोणते आचार अपेक्षित आहेत यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे.

इतिहासाला दोन बाजू असतात. एक निव्वळ घटना आणि त्यांची समकालीन, विश्वासार्ह साधनांनी केलेली शहानिशा व दुसरे म्हणजे त्या घटनांच्या साखळीचे विश्लेषण करून काढलेले निष्कर्ष.

विश्लेषणाला राजकीय दृष्टी असू शकते. भाष्यकार म्हणून लिहीत असताना आपापल्या विचारसरणीची झापडे सगळेच लावत असतात. बरेचदा खूप सजगपणेही हे घडत असते, तर शाहीर, कादंबरीकार नायकाचे स्तुतीपर चित्रण करत असतात.

कालांतराने त्यातला अतिशयोक्तीचा भाग समजून घेऊन त्याचंही सांस्कृतिक विश्लेषण केलं जातं.

शेजवलकरांच्या विश्लेषणावर येण्याआधी मला काय वाटते ते मांडतो.

 

T S Shejwalkar

 

शिवाजी महाराज लोकोत्तर युगपुरुष. काळाच्या पुढचा विचार करणारे. रयतेच्या बाबतीत कनवाळू, धार्मिक प्रेरणा असलेले पण तरीही परधर्म-सहिष्णू. शून्यातून स्वराज्य उभे करणारे. मला ते स्वयंप्रकाशी वाटतात.

शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांचे बाळकडू त्यांना नक्कीच मिळाले. भोवतालच्या विविध लोकांकडून प्रेरणा घेतली असेलच, पण त्यांनी उभं केलेलं स्वराज्य कोणा एका गुरूच्या मार्गदर्शनामुळे घडलं आहे असं नाही म्हणता येणार.

चंद्रगुप्त मौर्याच्या मागे ज्या पद्धतीने चाणक्याची दृष्टी होती असे म्हंटले जाते त्या दृष्टीने शिवाजी महाराजांच्या मागे कोणत्याही जातीचा कोणीही एक गुरु नाही. दादोजी नाही… समर्थ रामदास नाही आणि संत तुकारामही नाहीत.

शिवाजी महाराजांचा दृढनिश्चय हा त्यांनी जे पाहिलं आणि वाचलं त्याचा परिपाक आहे. कोणत्याही एका माणसाला शिवाजी महाराजांच्या गुरुपदी आजच्या राजकारणाच्या सोयीने बसवणे गैर आहे.

याची दुसरी बाजू अशी की शिवचरित्र मांडत असताना समर्थ रामदास आणि दादोजी त्याज्य आणि द्वेषाचे धनी असल्याप्रमाणे केला जाणारा विखारी प्रचार आणि मग संदर्भ सोडून दिले जाणारे दाखले…!

जितेंद्र आव्हाड याला “वैचारिक संघर्ष” मानतात. पण पुतळे उखडणे, दमबाजी करणे, ब्राम्हण-मराठा तेढ पसरवणे, हेतूवर-निष्ठेवर आरोप करणे ही काही वैचारिक संघर्षाची लक्षणे नाहीत.

ऐतिहासिक लेखनातील त्रुटी समोर आणताना शैक्षणिक संशोधन करणे, प्रबोधन करणे यात माणसाची जात पाहून, त्याच्या हेतूवर संशय घेऊन तेढ पसरवणे येत नाही.

मला शिवाजी महाराजांवर चित्रपट यावा असे फार वाटते, हे मी फेसबुकवर व्यक्त केले, तेव्हा त्यात दादोजी दाखवणार का असे मला अनेकांनी विचारले. याचे उत्तर मी शोधतो आहे.

माझे आडनाव भावे असल्यामुळे शिवभक्तीवर प्रश्नचिन्ह लावले जाणे ही आजची स्थिती आहे. त्यातून कऱ्हाडे असलेले शेजवलकर वाचले हे त्यांचे मरणोत्तर सुदैव मानले पाहिजे. पाहूया शेजवलकर वाचत असताना काय काय सापडले ते.

 

chhatrapati-shivaj and dadoji kondhdev

 

दादोजी कोंडदेव – पृष्ठ ३७१ (संकल्पित शिवचरित्र प्रस्तावना, आराखडा व साधने)

१. रायरी बखरीप्रमाणे दादोजी मलठण गावचा हिशेबनीस. शहाजीने आपल्या नावाने जहागिरीचा कारभार पाहण्यास सांगितले व शिवाजीला देखरेखेखाली पाठवले – पादशहानामा i.b. १५०

२. शाहजीकडील हिंगणी बुर्डी देऊळगावचा तो कुलकर्णी-कानूंगो होता – तारिख इ शिवाजी

३. पुणे, इंदापूर, सुपे भागात शांतता आणण्याचे काम केले, त्यापूर्वी पुणे जहागीर ओसाड पडली होती. जंगली श्वापदांचा नायनाट करून शेतीला उत्तेजन देण्याचे काम दादाजीने केले. मलिक अंबरची महसूल पद्धती काही फेरफार करून लागू केली – ९१ कलमी बखर भाग २१

४. युद्ध आणि राजनीतिशास्त्राचे शिक्षण शिवाजी महाराजांना देण्याची व्यवस्था केली – Ibid section २१

५. बारा मावळे अधिपत्याखाली आणण्याचे काम केले – सभासदाची बखर पृष्ठ क्रमांक ४

६. शिवदिग्विजय (११७-१८) आणि चिटणीस बखरीत (६४) दादोजीला स्वराज्याची संकल्पना मान्य नव्हती – शाहजी प्रमाणे शिवाजीने आदिलशहाच्या अखत्यारीत कर्तृत्व दाखवावे असे त्याला अभिप्रेत होते असे मांडले गेले आहे हेही शेजवलकर नमूद करतात
दादोजी कोंडदेवाचा मृत्यू कसा झाला याबाबत असलेला संभ्रम शेजवलकर स्पष्ट नमूद करतात.

– शिवाजीने विजापूरच्या प्रदेशावर हल्ला केल्यावर दादाजीने विषप्राशन केले असे साने,सरकार, राजवाडे, फॉरेस्ट म्हणतात तर
शरीरास व्यथा होऊन दादाजी कोंडदेऊचा मृत्यू झाला असे शिवचरित्र साधने खंड १, लेख ८१, पृष्ठ ९२ मध्ये दिसते.

थोडक्यात शेजवलकरांच्या मते दादोजी कोंडदेव हा स्वराज्याची दृष्टी देणारा गुरु नव्हे आणि द्वेष करावा असा त्याज्य बामणीही नव्हे. अतिशय वस्तुनिष्ठपणे त्यांनी विविध उल्लेख व्यक्तिपरिचय करताना मांडलेले दिसतात.

बाल-शिवाजी बरोबरचा पुतळा हटवला कारण जेम्स लेनच्या पुस्तकात दादाजीला शिवाजीचे पितृत्व देणारी कुजबूज पुण्यात असल्याचा उल्लेख होता अशी मांडणी केली जाते. याला कोणतेही संदर्भ, लेन हा हलकटपणा करत असताना देत नाही.

मी लहान असताना पुरंदरे लिखित महाराज हे सचित्र-शिवचरित्र वाचले होते. त्यात दीनानाथ दलालांची खूप सुंदर चित्रे आहेत. तिथे नांगराचा सोन्याचा फाळ फिरवणारा शिवाजी दिसतो.

ते चित्र पाहिले तेव्हा वडिलांच्या चाकरीत असलेला एक आदरणीय वयोवृद्ध अशीच दादाजीची प्रतिमा निर्माण झाली.

 

dadaji kondhdev inmarathi

 

दादाजीला गुरु मानले नाही तरी ट्रेनर, इस्टेट मॅनेजर या स्वरूपात पाहणे अनैतिहासिक ठरत नाही आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक ब्राम्हणांचे (इतर सर्व जातींप्रमाणेच) योगदान आहे.

त्यामुळे दादाजी “पेरण्याची” देखील काही गरज नाही. आता शेजवलकर दादाजींचा निष्ठेबद्दल काय लिहितात ते पाहू –

दादोजी कोंडदेव एरवी मुसलमान राज्यातील फारसी जाणणारा नोकर (नोकर हा ब्रिगेडचा आवडता शब्द आहे) तरीही त्याची निष्ठा यजमानाच्या मुलाचे कल्याण स्वतःचा बाप पाहणार नाही अशा तर्हेने पाहण्याची व त्यासाठी जीव तोडण्याची….!

आता हे वाचल्यावर काहींना शेजवलकर संघी, बामणी (कऱ्हाडे होतेच जन्माने) आणि हिंदुत्ववादी इतिहासकार असल्याचा साक्षात्कार होईलही पण त्यांच्या कामाची उंची आणि ब्राम्हण्यावर त्यांनी केलेल्या समीक्षेमुळे असले आरोप शेजवलकरांवर लावणे कठीण आहे.

आता समर्थ रामदासांच्या बाबतीत शेजवलकर काय लिहितात ते पाहू –

तावत्कालपर्यंत सनातनी असलेल्या मराठ्यांचे तत्कालीन प्राप्त कर्तव्य कोणते याचा विचार समर्थानी मांडला.

स्वधर्मावर हल्ला करणाऱ्या म्लेंछांचे पारिपत्य करणे, सर्व जातीच्या मराठ्यांना एकत्र आणणे, जर तसे न येता म्लेंछांचेच साहाय्यकर्ते राहतील तर त्यांचे शासन करणे व अशा रीतीने आपले कर्तव्य पार पाडणे याचेच नाव महाराष्ट्र धर्म वृद्धितें पाववून रक्षिणे असा अर्थ रामदासांनी सांगितला व शिवाजीने आचरणात आणला.

 

Samarth_Ramdas_Swami inmarathi

 

ज्यांना रामदासाचे सांगणे आधीचे वाटत नसून छत्रपतींचे करणे हेच पूर्वीचे वाटत असेल त्यांनी शिवाजीच्या आचरणावरून बोध घेऊन आपले तत्त्वज्ञान रामदासांनी बनवले असेही म्हटल्यास हरकत नाही.

पण शिवाजीसारख्या युगपुरुषाचे कार्याला आपल्या उपदेशाने बळकटी देण्याचे कार्य रामदासांनी केले एवढे तरी त्यांना म्हणावेच लागेल (पान ३५-३६)

पुढे शेजवलकर स्पष्टपणे लिहितात की, दासबोधाची निर्मिती १६५९ मध्ये सुरु झाली आणि दहा वर्षे एकांतात काढून हा ग्रंथ निर्माण झाला त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कामगिरीवर तो बेतलेला असणे शक्य वाटत नाही.

दुसऱ्या बाजूला हनुमानदास आणि रामदासांच्या इतर शिष्यांनी प्रत्येक पावली शिवाजी महाराज कसे रामदासांचे मार्गदर्शन घेत आणि त्यांनी विरक्त वाटून स्वराज्य सोडण्याची इच्छा केली असे अतिशयोक्त वर्णन केले आहे, त्याचाही समाचार घेतला आहे.

चाफळला त्यांची भेट झाली असावी आणि समकालीन असल्याने दोन परस्परांचा आदर करणारी, परस्पर पूरक काम करणारी दोन स्वतंत्र स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्वे आहेत अशी मांडणी शेजवलकर करतात.

संत तुकारामांना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवणाऱ्यांच्या विश्लेषणातील कल्पनेच्या भराऱ्यांचाही शेजवलकर समाचार तिथेच घेतात.

 

shivaji mharaj and sami samrth InMarathi

 

समर्थ रामदासांनी प्रपंच महत्त्वाचा, प्रवृत्ती महत्त्वाची अशीच मांडणी केली आहे. जरी त्यांनी अद्वैताचाच उपदेश केला असला तरीही त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन माध्व संप्रदायाप्रमाणे द्वैत होता असे शेजवलकर प्रतिपादन करतात.

शिवाजीच्या आचरणातही हेच द्वैत दिसते असे ते सांगतात.

एकीकडे “मराठा होऊन ब्राम्हणावर तलवार केली त्याचा नतीजा तोच पावला” असे शिवाजी महाराज एका वाईट मराठ्याबद्दल त्याच्या आत्महत्येचा उल्लेख करताना सांगतात ( राज खंड ८ लेख २४). तर दुसरीकडे “ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो” (राज खंड ८ लेख ३१) असेही ते लिहितात.

याकूतबाबांची भेट घेणारे, त्यांना मानणारे, पण ३०० वर्षे जंजिरा हबशाकडे राहील असे याकूत बाबांनी सांगूनही, हल्ला करत राहणारे शिवाजी राजे (शिवदिग्विजय ९१-२) व चिंचवडकर देवांना आदर देतानाही “राजकारणात लुडबूड नको” असे स्पष्टपणे बजावणारे शिवाजी महाराज (शिवचरित्र साधने ३७३) हेच द्वैत दाखवतात.

मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे शेजवलकरांच्या मते अधिष्ठान काय?

शेजवलकर शिवाजी महाराजांना पाचशे वर्षांच्या हिंदू-मुसलमान लढ्याचा अन्वयार्थ समजलेला “कर्ता पुरुष” मानतात.

हा निबंध टोकाच्या कट्टर हिंदुत्ववादी आणि आजच्या काळात शिवाजी महाराजांना सेक्युलर करू पाहणाऱ्या डाव्या अशा दोघांसाठी झणझणीत अंजन घालणारा आहे.

शेजवलकर लिहितात –

 

chatrapati_shivaji_maharaj_1 inmarathi

 

शिवाजीने निश्चित केलेली गोष्ट म्हणजे या देशात हिंदूचेंच स्वतःचे राज्य असले पाहिजे. मुसलमान राजवट कितीही चांगली कल्पिली तरीही तीत हिंदू मुस्लिम संघर्षाचा प्रश्न सुटणार नाही.

राजकीय अंतिम निर्णय घेणारी सत्ता हिंदूच्याच हातात असली पाहिजे त्याशिवाय या कठीण प्रश्नाचा निकाल लागणार नाही. मात्र जवाहरलाल ज्या अर्थी आज नाक मुरडतात त्या अर्थी हे राज्य धार्मिक नव्हते.

मुसलमानांच्या वैयक्तिक उत्कर्षाला वाव होता. शिवाजी दर्ग्यांना भजे व देणग्या देत असे. त्याचा मुख्य दर्यासारंग व अनेक सैनिक मुसलमान होते, पण देऊळ पडून मशीद केली असेल ती पाडून पुन्हा देव स्थापण्यास तो कचरत नव्हता.

 

“१६६८ मध्ये त्याने सप्तकोटीश्वर मंदिर पुन्हा उभे केले जे पूर्वी पोर्तुगीजांनी फोडले होते.”

विनयाच्या संयमाच्या भाषेत हिंदू संघटन करत असताना, मराठीयांचे गोमटे करणे, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची उमेद त्याने आणली. त्याची दृष्टी विशाल होती.

पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, डच यांच्याकडून नकाशे करणे, किल्ले बांधणे, समुद्री व्यापारात भाग घेणे अशा अनेक गोष्टी आत्मसात करायला तो तयार होता.

पोर्तुगीज कारिगराच्या मदतीने (कसा दे पालबोरा ) च्या मदतीने त्याने दारूखाना ओतला होता. शिवाजी मराठीचा संरक्षक, प्रसारक होता म्हणून त्याने राजव्यवहारकोश असे ग्रंथ लिहून घेतले.

“त्याला माणसांची उत्तम पारख होती. तो फारसा फसवून घेत नसे.”

मराठा म्हणजे ब्राम्हण, मावळे, हेटकरी, भंडारी, कुणबी, मराठा, भंडारी, मुसलमान, रामोशी, ख्रिस्ती, मुसलमान हे सगळेच अभिप्रेत होते.

(जवळजवळ असंच वाक्य पुरंदरे लिहितात पण तरी त्यांच्या माथी बामणी काव्याचा शिक्का आहेच) त्याने ट्युडर पद्धतीचे मराठी सार्वभौम स्वराज्य उभे केले.

शिवाजी बहुजनांचा राजा होता. हिंदूधर्मसंरक्षक असला तरीही साम्राज्यवादी नव्हता.

त्याचा हेतू हिंदूचे स्वतंत्र राष्ट्र मुसलमान शासकांच्या नाकावर टिचून उभे करण्याचा होता, हे ज्यांना कळत नाही ते साम्यवादी शिवाजीच्या संस्कृत व हिंदी कवींच्या आश्रयदात्याचे हिंदुत्वप्रसारक कार्य समजू शकणार नाहीत हे उघड आहे .

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता…

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?