' जहाज बुडाल्यास….! : बर्मुडा ट्रॅंगल सफारीसाठी दिली जातीय ही विचित्र ऑफर…! – InMarathi

जहाज बुडाल्यास….! : बर्मुडा ट्रॅंगल सफारीसाठी दिली जातीय ही विचित्र ऑफर…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बर्मुडा ट्रँगल! खरंतर हे एवढंच म्हटलं तरी हे काय आहे याचा संदर्भ आपल्याला लागतो. आजवर बर्मुडा ट्रँगलपाशी बरीच माणसं गेली आहेत. पण त्यातलं कुणीही तिथून परत आलेलं नाही. हे असं का घडतं याचं गूढ कैक वर्षं कायम आहे. आजवर कुठल्याही तज्ञमंडळींना ते सुटलेलं नाही.

अशात एखादी कंपनी जर लोकांना बर्मुडा ट्रँगलची सफर घडवून आणण्यासाठी जाहिरात करत असेल तर? जहाज बुडणार नाही पण समजा ते बुडालं तर लोकांना त्यांचे परत करू अशी अजब आणि भयानक ऑफर देत असेल तर? काय आहे हा सगळा प्रकार? जाणून घेऊ.

विश्वातल्या गूढांचा शोध घेणं हा खगोलशास्त्रज्ञांसाठी नेहमीचाच अभ्यासाचा विषय असतो. शास्त्रज्ञांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांनाच ज्याचं केवळ कुतूहलच नाही तर भयही वाटतं असं एक ठिकाण म्हणजे बर्मुडा ट्रँगल!

 

Bermuda-triangle-InMarathi

 

हा असा एक भुलभुलैय्या आहे जिथे एखादी व्यक्ती गेली की ती परतच येत नाही हे आपल्याला माहितीये. आपल्या लहानपणीही आपण किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनी बर्मुडा ट्रँगलचं अगदी रंगवून रंगवून वर्णन करून एकमेकांना घाबरवलेलं असतं. 

गेल्या १०० वर्षांमध्ये बर्मुडा ट्रँगलमध्ये ७५ विमानं आणि १००हून अधिक छोटी-मोठी जहाजं गायब झाली आहेत. या घटनांमध्ये १०००हून जास्त लोक मरण पावले आहेत. त्यामुळे बर्मुडा ट्रँगलला ‘डेव्हील ट्रँगल’ असंही म्हटलं जातं. यात अमेरिकेतील एका नौदल जहाजाचाही समावेश होता. जहाजासकट त्यातली ३०६ माणसं बर्मुडा ट्रँगलमध्ये गायब झाली होती.

हे असं का घडतं त्यामागचं नेमकं कारण आजवर कळू शकलेलं नाही. पण याबद्दल लोकांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. एलियन्स आणि वाईट शक्तींमुळे हे घडतं असं काही लोकांना वाटतं. बर्मुडा ट्रँगल हा माणसाच्या चुकांचा परिणाम आहे असंही म्हटलं जातं.

याखेरीज, या घटनांची काही वैज्ञानिक कारणंही सांगितली जातात. ही अशी ख्याती असलेल्या बर्मुडा ट्रँगलवर सफर घडवून आणण्याची एक भयानक ऑफर युएसमधील व्हर्जिनिया इथल्या एका कंपनीने लोकांना दिलीये.

नॉर्वेजियन प्राइमा लाइनर नावाच्या एका जाहाजातून पुढील वर्षी २८ मार्चला न्यू यॉर्कवरून बर्मुडा ट्रँगलपर्यंत ही सफर घडवून आणली जाणार आहे. ही सफर करण्यासाठी इच्छूक असलेल्यांना दीड लाख रुपये द्यावे लागतील. या पॅकेजनुसार ५ दिवस, ५ रात्री प्रवास करून लोक बर्मुडा ट्रँगलवर पोहोचतील.

 

prima bermuda triangle tour im

 

या सफरीत ग्लास बॉटम बोटवर ट्वायलाईट बर्मुडा ट्रँगल क्रूझची सोयही असणार आहे. चर्चा, प्रात्यक्षिकं आणि प्रश्नोत्तरांचं सत्रदेखील असणार आहे. मिररच्या वृत्तानुसार, युकेच्या संरक्षण मंत्रालयात काम केलेले निक पोप, वेस्ट मिडलँड्सचा लेखक निक रेडफर्न असे पाहुणे वक्तेही त्यावेळी तिथे असतील असं समजतंय.

या सफरीविषयी कंपनीच्या वेबसाईटवर लिहिलंय, “या मनोरंजक क्रुझवरुन बर्मुडाचं नाईटलाईफ कसं असतं ते पहा. या ग्लास बॉटम बोटीवरून बर्मुडा ट्रँगलमध्ये तुम्ही कधीही विसरणार नाही अशी चित्तवेधक सफर अनुभवा.”

 

bermuda triangle tour

 

कंपनीच्या वेबसाईटवरील जाहिरातीत, “या बर्मुडा ट्रँगल सफरीत गायब होण्याची चिंता करू नका. हे जहाज परतेल याची १००% हमी आणि जर तुम्ही गायब झालातच तर तुम्हाला तुमचे पैसे परत दिले जातील.” अशी अजब आणि भयानक ऑफर दिली गेलीये.

आपलं जहाज इथे गायब होण्याची शक्यता फारच दुर्मिळ असल्याचं या कंपनीने म्हटलंय. ही ऑफर गमतीने दिली गेलीये की पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी हे हुशारीने केलं गेलंय हे कळू शकलेलं नाही.

पण अशी ऑफर देताना लोक गायब झाले तर त्यांना पैसे कसे परत मिळतील हा साधा प्रश्न लोकांना पडणार नाही असं कंपनीला कसं बुवा वाटलं नसेल असा प्रश्न पडतो. बर्मुडा ट्रँगलच्या या क्रूझविषयी एएनआयने केलेल्या एका ट्विटवर एका व्यक्तीने नेमका हाच प्रश्न विचारला आहे. “ज्या प्रवाशाने बुकिंग केलंय तो गायब झाल्यावर ते कोणाला पैसे परत देणार आहेत?” असा प्रश्न या व्यक्तीने विचारलाय. काही जणांनी यावर मिम्सही केलेत.

कॉमन सेन्स वापरला तरी कुणीही या ऑफरवर अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि बुकिंग करणार नाही. पण तरीदेखील हे असंच घडेल असं गृहीत धरून चालता येणार नाही.

या ऑफरमध्ये कंपनीने जरी जहाज परतेल याची खात्री दिली असली तरी त्याचा कुठलाही खात्रीशीर पुरावा लोकांसमोर ठेवलेला नाही. या बाबीकडे लोकांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. उगीच प्रलोभनाला बळी पडून उत्साहाच्या भरात भलताच निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्यच टांगणीला लावू नये इतकीच अपेक्षा आपण करू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?