' भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात या गोष्टी तयार ठेवा! – InMarathi

भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात या गोष्टी तयार ठेवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेले अडीच महिने उन्हामुळे वैतागलेले आपण आतुरतेने पावसाची वाट बघतोय. हवेतला उष्मा थोडा कमी झाल्याचा जाणवत असला तरी अद्याप पावसाची चिन्ह दिसत नाहीयेत. पण तरी आता लवकरच पाऊस येईल या विचाराने सगळेच जरा सुखावलेत.

कडाक्याच्या उन्हानंतर पाऊस आला की आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. रोजच्या रुटीनमध्ये नवी तरतरी येते. पाऊस पडताना चहा-भजी-वडे खाण्याचा आनंद औरच असतो.

ट्रेकिंगचे, फिरायला जायचे प्लॅन्स होतात. पण हे सगळं असलं तरी दरवर्षीप्रमाणेच पावसाळ्यातल्या नेहमीच्या समस्याही सुरू होतात. पाऊस जास्त पडला की होणारे लोकलचे गोंधळ, रस्त्यावरच्या चिखलामुळे बाहेर जायला नकोसं वाटणं आणि तरी जावं लागणं, आयत्या वेळी छत्री विसरणं-तुटणं, डासांचा प्रादुर्भाव होणं अशा एक ना अनेक गोष्टी व्हायला सुरुवात होते.

 

rainy season IM

 

पावसाळ्यात अशीच एक हमखास निर्माण होणारी समस्या म्हणजे भितींना ओल येणं. पावसाचं पाणी भिंतींमध्ये झिरपून भिंती अशा ओल्या झाल्या की नंतर त्यांना दिलेल्या रंगाचे पोपडे पडतात. घरोघरी हे घडतंच त्यामुळे आपल्याकरता हा नवं नाही. अशा प्रकारे भिंतींना ओल आल्यामुळे केवळ भिंतीच खराब होत नाहीत तर घरात किडेही येऊ शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच काही गोष्टी करणं आपल्याला शक्य आहे. पाऊस अवघ्या ४-५ दिवसांमध्ये येईलच. त्या आधी जमेल तितकी तयारी नक्की तयार ठेऊ.

भिंतींनी ओल येण्यामागची कारणं :

१. जमिनीखालची आर्द्रता वरच्या भागात येते आणि त्यामुळे भिंती खराब होतात.

२. पावसाचं पाणी जर बाहेरून सारखंच भिंतींवर पडत राहीलं तर भिंतींना ओल येते

३. घराच्या छतांवर पाणी साचतं आणि ते भिंतींमध्ये झिरपून भिंती ओलसर होतात. यामुळे भिंती, दरवाजांना तडेही जातात.

४. ड्रेनेज पाईप ब्लॉक झाल्यामुळे पाणी साचू शकतं आणि त्यामुळेही भिंतींना ओल येते.

 

leakage IM

 

यंदाच्या पावसात भिंतींना ओल येऊ द्यायची नसेल, पावसाच्या पाण्यामुळे गळती होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी पावसाळ्याआधीच करा :

१. जिथे जिथे पाणी साचतं तिथे प्लास्टर करा :

गॅलऱ्यांच्या छतावर, घराच्या पुढच्या भागात, दरवाजांच्या आजूबाजूला जिथे जिथे पाणी साचतं तिथली साफ सफाई करून तिथे प्लास्टर करा. बऱ्याचदा इमारतींना बाहेरून लावलेले रंग वॉटरप्रूफ नसतात आणि त्यामुळेही पावसाचं पाणी घराच्या आतल्या भिंतींमध्ये झिरपतं.

त्यामुळे पाऊस येण्यापूर्वीच घराच्या भिंतींना बाहेरून वॉटरप्रूफ कोटिंग करून घ्या. गेल्या वर्षी भिंतींच्या ज्या भागांतून गळती झाली होती तिथलं प्लास्टर काढून टाका. ते प्लास्टर फुगलेलं असल्यामुळे पटकन काढून टाकता येईल.

 

plastering in wall IM

 

नंतर तिथे सिमेंटमिश्रित वॉटर प्रोटेक्शन केमिकल लावा आणि तिथल्या भागांमध्ये वॉटर प्रोटेक्शन करून घ्या. हे वॉटर प्रोटेक्शन केमिकल्स हार्डवेअरच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात.

२. घराच्या दरवाजांना, भिंतींना कुठे चिरा गेल्या आहेत का ते बघा आणि त्या सील करा :

घरात बऱ्याचदा दरवाजे, खिडक्यांच्या चौकटींना चिरा पडायला सुरुवात होते आणि हळूहळू भिंतींवरही चिरा पडलेल्या दिसायला लागतात. या अशा चिरांमुळेच भिंतींना ओलावा येतो, भिंतींतून गळती होते. याच कारणामुळे भिंतींतून सगळ्यात जास्त गळती होते.

त्यामुळे भिंतींना, दारांना, खिडक्यांच्या चौकटींना पडलेल्या चिरा सील करणं गरजेचं असतं. पावसाळा सुरू होण्याआधी जर हे सिलिंग केलं गेलं तर सिमेंट सुकायला पुरेसा वेळ मिळेल आणि पाऊस येईपर्यंत अगदी व्यवस्थित डागडुजी झालेली असेल.

३. पावसाळ्याआधीच पाईप्सची डागडुजी करून घ्या :

 

pipes repair IM

 

ज्या पाईप्समधून पावसाचं पाणी घरात झिरपतं त्या पाईप्सची डागडुजी पावसाळ्यापूर्वीच करून घ्या. दरवाजांमधून पाण्याची गळती होण्यामागे पाईप्स व्यवस्थित नसणे हे एक मोठं कारण असतं.

उन्हाळ्यातच हे पाईप्स साफ करून घेणं चांगलं. जर पाऊस येण्याआधीच त्यांची आवश्यक ती डागडुजी केली तर पाऊस येईपर्यंत त्यांना सेट व्हायलाही वेळ मिळतो आणि पाण्याचं ब्लॉकेजही होत नाही.

४. डॅम्प प्रूफ कोर्स खराब झाला असल्यास प्रोफेशनल व्यक्तींकडून बसवून घ्या :

आपल्याला कधीकधी भिंतींच्या खालच्या बाजूला जी पट्टी असते तिथले भाग पावसाळ्यात ओलसर झालेले दिसतात. बऱ्याच इमारतींमध्ये डॅम्प प्रूफ कोर्सेस असतात. यामुळे जमिनीतील आर्द्रता वर येऊन त्यामुळे भिंती ओलसर होऊन खराब होणं रोखता येतं.

तुम्हाला जर भिंतींच्या खालच्या बाजूला ओलसर पॅचेस आढळत असतील तर प्रोफेशनल व्यक्तीला बोलवून डॅम्प प्रूफ कोर्स बदलण्याची आवश्यक्ता आहे का हे तपासून घ्या आणि तशी गरज असल्यास ते बदलून घ्या.

पावसाळ्यात घर जितकं हवेशीर ठेवता येईल तितकं ठेवा. पावसाच्या पाण्यामुळे भिंतींना बुरशी आली तर ती लगेच साफ करून घ्या नाहीतर त्यामुळे उगीच श्वसनाचे त्रास उद्भवतील.

 

burshi IM

 

अशी सगळी काळजी घेतल्यावरही जर भिंतींना ओल येत असेल, चिरा पडत असतील तर भिंती ओलसर होऊन त्यांचे पोपडे पडू नयेत म्हणून शक्य तितक्या लवकर प्रोफेशनल व्यक्तीची मदत घ्या.

वरकरणी पाहता ही जरी नेहमीची वाटणारी समस्या असली तरी भिंती ओलसर होतात तेव्हा आपल्या हातात करण्यासारखं काहीच राहत नाही. त्यामुळे वेळीच याचं गांभीर्य ओळखून त्यादृष्टीने वर लिहिलंय त्याप्रमाणे काळजी घेऊया.

अगदी पूर्णतः भिंती ओलसर होणं, भिंतींमधून पाणी गळणं आपल्याला थांबवता आलं नाही तरी बऱ्याच अंशी ते करणं शक्य होऊ शकतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?