' वाऱ्याच्या वेगानं इंग्रजांवर तुटून पडणारे, महापुरुषांना घडवणारे खरे ‘क्रांतिगुरू’ – InMarathi

वाऱ्याच्या वेगानं इंग्रजांवर तुटून पडणारे, महापुरुषांना घडवणारे खरे ‘क्रांतिगुरू’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सामान्यांना फारशी माहिती नसणारे अनेक क्रांतीकारक या मातीत होऊन गेले. यापैकीच एक लहूजी वस्ताद साळवे. खरंतर त्यांची ख्याती क्रांतिगुरू अशी होती, मात्र इतिहासाच्या पानात त्यांना दुर्दैवानं जागा लाभली नाही.

लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावचा. रक्तातच लढवैय्येपणा असणार्‍या लहुजींच्या घरातच युध्द आणि योध्दे यांच्या चर्चा असत. इतर लहान मुलं जादूच्या, राजाराणीच्या, देवदेवतांच्या गोष्टी ऐकत असताना लहुजी मात्र युध्द कथा ऐकायचे. त्यांना युध्दाचं बाळकडू घरातूनच लाभलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

लहुजींचे वडील राघोजी साळवे अतिशय पराक्रमी पुरुष होते. साक्षात वाघाशी दोन हात करणारा मर्द गडी असा त्यांचा लौकीक होता. युध्द कलेत राघोजींचा हात धरणारं कोणी नव्हतं. पेशव्यांच्या दरबारी असणार्‍या राघोजींनी एकदा साक्षात वाघाशी झुंज करून त्याला खांद्यावर घेऊन पेशव्यांसमोर राजदरबारी सादर केले होते.

छत्रपतींच्या सैन्यात लहुजींचे पूर्व पराक्रम गाजविलेले होते. साळवे घराणं सशस्त्र विद्येत पारंगत होतं. दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी, निशाणेबाजी, तलवारबाजी अशा सर्वच युध्द कलात लहुजी निपूण होते त्याचं कारणही हेच होतं.

ते केवळ युध्दकलेत तरबेज होते असं नाही तर त्यांनी व्यायामानं कमावलेकं दणकट शरीरही होतं. हा भारदस्त इसम जेव्हा शत्रूसमोर काळ बनून उभा राही तेव्हा शत्रूलाही घाम फ़ूटावा असं त्याचं व्यक्तिमत्व होतं.

लहानपणापासूनच लहुजी जीवघेण्या शस्त्रांसोबत अगदी खेळण्यासारखे लिलया खेळत असत. शिवाजी महाराजांनी साळवे घराण्याचा पराक्रम लक्षात घेत त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्यावर पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली होती.

साळवे घराण्याच्या या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना “राऊत” ही पदवी बहाल केली होती.

 

lahuji vastad im

 

५ नोव्हेंबर १८१७ ला खडकी येथे मराठ्यांच्या गादीचे रक्षक असणार्‍या पेशव्यांचे इंग्रजांविरुध्द तुंबळ युध्द झाले. या युध्दात लहुजी आपल्या वडिलांसमवेत इंग्रजांवर तुटून पडले होते.

अवघ्या तेवीस वर्षांचे लहुजी वडील राघोजींसह सतत १२ दिवस आपल्या मावळ्यांना घेऊन लढत होते. वार्‍याच्या वेगानं राघोजी इंग्रजांवर तुटून पडले होते. तलावारीनं सपासप वार करत ते शत्रूला कापून काढत वेगानं पुढे चालले होते.

त्यांचा हा आवेश बघून इंग्रजांच्या तोंडचं पाणी पळालं आणि त्यांनी व्यूह रचून सर्वबाजूंनी हल्ला करून राघोजींना संपविलं. आपल्या डोळ्यादेखत वडिलांना युध्द करता करता धारातिर्थी पडताना पाहून संतापानं लहुजी बेभान झाले. त्यांनी निकरानं लढाई केली मात्र हे युध्द दुर्दैवानं पेशवे हरले.

पुढे १८१८ साली शनिवारवाड्यावरुन मराठ्यांचा अभिमान असणारा भगवा उतरला आणि इंग्रजांचा युनियन जॅक चढला. हे पराभवाचं दु:ख लहुजींना सतत डाचत असे. त्यांच्या ऊरात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली होती.

इंग्रजांविरूध्द लढायचं तर क्रांती मशाल पेटलेले, ऊरात युध्दाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले योध्दे साथीला असणं गरजेचं होतं. ही गरज ओळखून त्यांनी १८३२ साली पुण्यात गंजपेठेत तालीम सुरू केली.

देशातली ही पहिली क्रांती शाळा होती जिथे अनेक क्रांतीकारक घडले. या तालमीचं उदघाटन रास्ते सरकार यांच्या हस्ते करण्यात आलं. या तालमीत अनेक तरून भारावून जाऊन लहुजींकडून तालीम घ्यायला येऊ लागले. इथूनच लहुजींना वस्ताद म्हणून ओळख मिळाली.

तालमीत येणार्‍या तरूणांना लहुजी बारकाईनं निरखत असत. त्यांना मातृभूमीविषयी सांगून त्यांच्यात देशप्रेमाची भावना जागृत करत असत. देशासाठी जीवही द्यायला तयार असणार्‍या तेजस्वी तरूणांचा स्वतंत्र गट बनवून त्यांना इंग्रजांविरुध्दच्या बंडासाठी लहुजींनी तयार केले.

पूर्ण तयारी झाल्यावर बंडाला सुरवात झाली. लहुजींच्या मार्गदर्शनानुसार बंडकरी गुप्तपणे बंड करू लागले. सुरवातीला इंग्रजांनाही हे बंड वाटतच नव्हते.

पुढे महात्मा झालेले फ़ुलेही लहुजींच्या तालमीत येऊ लागले. त्यांच्या शैक्षणिक कार्यात लहुजी हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

 

lahuji vastad im.png1

 

तळागाळातील, बहुजन समाजातील कुटुंबात शिक्षणाचं महत्व पटवून देत त्यांनी फ़ुल्यांच्या शाळेत विद्यार्थी धाडायला सुरवात केली. लहुजींचा आदरयुक्त दराराच असा होता, की कोणी त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता.

दलितांसाठीची पहिली शाळा त्यांच्या पुढाकारानं गंजपेठेत १८५१ साली चालू झाली आणि इथली पहिली विद्यार्थिनी होती, लहुजींची पुतणी, मुक्ता.

लोकमान्य टिळक यांनिही लहुजींच्या तालमीत धडे शिकले. व्यायामाला अनन्यसाधारण महत्व दिलेल्या आणि उत्तम तब्येतीला दागिना मानण्याचा सल्ला दिलेल्या लोकमान्यांना हे धडे लहुजींनी दिले होते.

वासुदेव बळवंतराव फडके हे तर लहुजींचा जीव की प्राण होते. त्यांच्या रुपानं लहुजींना आपल्या मुलकाला स्वतंत्र करण्याचा आशेचा अखेरचा किरण दिसत होता.

वासुदेवानं बंड केलं मात्र पुढे ते पकडले गेले. यानंतर लहुजींनी स्वत: प्रयत्न केले. युध्दभूमीवर वडिलांच्या पार्थिवासमोर घेतलेली, जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठीच ही शपथ त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पाळली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?