' पृथ्वीराजच नव्हे, तर बॉलिवूडचे हे सिनेमे मुस्लिम देशांमध्ये केले आहेत बॅन – InMarathi

पृथ्वीराजच नव्हे, तर बॉलिवूडचे हे सिनेमे मुस्लिम देशांमध्ये केले आहेत बॅन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अक्षय कुमारचा इतक्यातच प्रदर्शित झालेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ‘पृथ्वीराज चौहान’ या सम्राटाचा उल्लेख असलेला आपल्याला आठवत असेल. पण तरी अतुलनीय कर्तृत्त्व गाजवलेल्या, इतिहासात नोंदी असलेल्या अनेक योद्ध्यांविषयी जशी आपल्याला फारशी माहिती नसते तशीच पृथ्वीराज चौहान यांच्याविषयीही नव्हती.

आता चित्रपटाच्या निमित्ताने हा इतिहास आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. ऐतिहासिक चित्रपट आणि वाद हे काही नवं समीकरण नाही. चित्रपट तयार करणाऱ्यांकडे सिनेमॅटिक लिबर्टी असते. पण ती घेताना त्यांना चित्रपटाच्या मूळ तपशिलांना धक्का लावून चालत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असं असलं तरी कधीकधी चित्रपटांमध्ये मूळ तपशीलांना धक्का लावल्याचा आरोप फिल्ममेकर्सवर होतो आणि धार्मिक भावना दुखावल्या जाणे, ऐतिहासिक व्यक्तिरेखांचं आपल्याला माहीत असतं त्यापेक्षा वेगळं, चुकीचं चित्रण करणे या मुद्द्यांवरून वादांना पेव फुटतं.

 

prithviraj inmarathi
patrika

कधीकधी यामुळे थेट आपल्या देशातही चित्रपटांवर बंदी आणली जाते. कुठलाही चित्रपट स्वदेशात प्रदर्शित होतो तेव्हा तो देशाबाहेरील देशांमध्येही किती कमाई करतो हे महत्त्वाचं असतं. पण चित्रपटाशी जेव्हा अनेक वाद जोडले जातात तेव्हा चित्रपट देशाबाहेर प्रदर्शित होणे, प्रदर्शित झाला तरी चांगली कमाई करणे या बाबी चिंतेच्या ठरतात.

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून आपल्याला अमानुष महम्मद घोरीपासून भारताला वाचवण्यासाठी पृथ्वीराज चौहानने कशी शर्थीची लढत दिली हे दिसेल. या चित्रपटावर कुवेत, ओमन या देशांमध्ये बंदी आणली आहे. पण मुस्लिम देशांमध्ये बंदी घातलेला बॉलिवूडचा हा पहिलाच चित्रपट नाही.

यापूर्वी कधी पाकिस्तानचं चुकीचं चित्रण तर कधी मुस्लिम तरुण दहशतवादी दाखवला या आणि अशा कारणांमुळे बॉलिवूडच्या काही चित्रपटांवर मुस्लिम देशांमध्ये बंदी घातली गेली होती. कुठले चित्रपट आहेत हे? जाणून घेऊ.

१. पद्मावत :

या चित्रपटाच्या बाबतीत अगदी नावावरूनही वाद झाले होते. करणी सेनेने चित्रपटाला चांगलाच विरोध दर्शवला होता. अगदी जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या गेल्या होत्या. पण अनेक वादांना सामोरं गेल्यानंतरही भारतात हा चित्रपट यशस्वी ठरला. पण या चित्रपटावरील वाद केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाहीत.

या चित्रपटात मुस्लिमांचं जे चित्रण केलं होतं त्यावरून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असा वाद मलेशियात निर्माण झाला आणि मलेशियाच्या सेन्सॉर बोर्डाने मलेशियात हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी आणली.

 

padmavat-inmarathi

 

२. फिजा :

ह्रितिक रोशन आणि करिष्मा कपूरच्या ‘फिजा’ या चित्रपटात ह्रितिक रोशनने एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातल्या तरुणाची भूमिका साकारली होती. हा तरुण पुढे जाऊन दहशतवादी बनतो असं चित्रपटात दाखवलं आहे. मलेशियातील सरकारला हे रुचलं नाही त्यामुळे मलेशियातील सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी या चित्रपटावर मलेशियात बंदी घातली होती. ‘मुस्लिम कधीही दहशतवादी होऊ शकत नाहीत.”, असं विधान त्यांनी केलं होतं.

 

fiza im

 

३. बेल बॉटम :

अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम” या चित्रपटावर सौदी अरेबिया, कुवेत आणि कतार या देशांमध्ये बंदी घातली गेली होती. या देशांमधल्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी हा चित्रपट जरी खऱ्या घटनांवर बेतलेला असला तरी चित्रपटात ऐतिहासिक तपशिलांच्या बाबतीत ढवळाढवळ केल्याचा आरोप केला असल्याचं समोर आलं होतं. समोर आलेल्या वृत्तानुसार, ‘बेल बॉटम’ या चित्रपटात अपहरणकर्ते लाहोरहून दुबईला विमान घेऊन जाताना दाखवले आहेत.

 

bell bottom inmarathi

 

१९८४ साली घडलेल्या खऱ्या घटनेनुसार, ‘संयुक्त अरब आमीरातीचे संरक्षण मंत्री’ शेख मोहम्मद बिन रशीद अल् मक्तौम यांनी स्वतः ही परिस्थिती हाताळली होती आणि अपहरणकर्त्यांना पकडल्याबद्दल युएइच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं गेलं होतं.

४. बॉंबे :

अगदी समीक्षकांच्याही कौतुकाची थाप मिळालेला मनी रत्नम यांचा बॉंबे हा चित्रपट एक उत्तम भारतीय सिनेमा होता. ज्या घटनांमुळे १९९२-२३ साली मुंबईत दंगली घडल्या त्या घटनांवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी भारतात हिंसक घटना घडल्या होत्या. या चित्रपटामुळे आपल्या देशात धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात असं सांगून सिंगापूरमध्ये या चित्रपटावर बंदी घातली गेली होती.

 

bombay film manisha inmarathi

 

५. उडता पंजाब :

पंजाबमध्ये ड्रग्जचा पसरलेला व्यवसाय आणि तो व्यवसाय पंजाबमधून मुळापासून उखडून काढण्यासाठी केलं गेलेलं बंड या विषयावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट बेतलेला होता. पंजाबमध्ये येणारे ड्रग्ज पाकिस्तानातून येत असल्याचं चित्रपटात दाखवलं गेलं होतं. या कारणामुळे या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घातली गेली होती.

 

udta punjab inmarathi

 

६. नीरजा :

सोनम कपूरची या चित्रपटातली नीरजाची भूमिका तिच्या आजवरच्या करियरमधली सर्वोत्कृष्ट भूमिका समजली जाते. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना आपल्या प्राणांची आहुती देऊन वाचवलेल्या धाडसी एअर होस्टेस नीरजा बनोतच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला होता. आपल्या देशात हा चित्रपट यशस्वी ठरला होता. मात्र या चित्रपटात पाकिस्तानचं नकारात्मक चित्रण करण्यात आलंय असं म्हणून पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली होती.

 

neerja im

 

७. द काश्मीर फाईल्स :

वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आणि संमिश्र प्रतिक्रिया येऊनही ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. काश्मिरी हिंदू पंडितांवर झालेल्या आत्याचाराचं विदारक वास्तव या चित्रपटातून आपल्या समोर आलं होतं.

 

the kashmir files 6 IM

 

हा चित्रपट बेकायदेशीर असून तो मुस्लिमांचं एकाच बाजूने प्रतिनिधित्त्व करतो, तो प्रक्षोभक ठरू शकतो या मुद्द्यावरून सिंगापूरच्या सेन्सॉर बोर्डाने सिंगापूरमध्ये या चित्रपटावर बंदी आणली होती.

८. देल्ली बेल्ली :

या चित्रपटातल्या बोल्ड कन्टेन्टमुळे भारतात या चित्रपटाला कल्ट स्टेटस मिळालं होतं. या चित्रपटातील अती शिविगाळ आणि अश्लील दृश्य या कारणांमुळे नेपाळमध्ये चित्रपटावर बंदी घातली गेली होती. चित्रपटातून अश्लील दृश्य काढून न टाकल्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोनच दिवसांनंतर चित्रपटावर बंदी घातली गेली होती.

 

delhi belly im

 

९. द डर्टी पिक्चर :

विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला आणि सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटावर विद्या बालनच्या अतिशय बोल्ड भूमिकेमुळे कुवेतसकट अनेक देशांमध्ये त्या देशांच्या सेन्सॉर बोर्डांनी बंदी घातली होती.

 

vidya balan 2 inmarathi

 

१० कुरूप :

दलकीर सलमान, शोबिता धुलीपाला, मनोज वायपेयी यांच्या भूमिका असलेला ‘कुरूप’ हा २०२१ मध्ये आलेला मल्याळम मर्डर थ्रिलर. एक गुन्हेगार भारतातल्या पोलिसांना चुकवायचा प्रयत्न करतो आणि कुवेतमध्ये आसरा शोधतो असं चित्रपटात दाखवल्यामुळे कुवेतमध्ये या चित्रपटावर बंदी घातली गेली होती.

 

kurup im 1

 

११. पॅडमॅन :

हा चित्रपट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं सांगून पाकिस्तानने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ देण्यापासून रोखला होता.

 

padman inmarathi

 

१२. ओ माय गॉड :

धर्मांधतेवर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा चित्रपट भारतात चांगलाच यशस्वी ठरला होता. मात्र लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असं म्हणत बऱ्याच मध्य-पूर्व देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली गेली होती. युएइ सरकारनेही या चित्रपटावर बंदी घातली होती.

 

omg im 1

अशा कितीही वादाच्या फैरी झडल्या तरी ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर चित्रपट येणं यापुढेही सुरूच राहील. पण या वादांचे सगळ्याच दृष्टीने आणि विशेषतः चित्रपटाच्या आर्थिक यशापयशावर पडसाद उमटतात हे नक्की. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षक उचलून घेतील का? देशातल्या बॉक्स ऑफिसवर तो घसघशीत कमाई करू शकेल की नाही? ज्या देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली गेलेली नाही तिथे तो चालेल की नाही? या प्रश्नांची उत्तरं पुढच्याच काही दिवसांमध्ये मिळतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?