' प्रसिद्धीचा स्टंट, स्वप्रेम की विचित्रपणा? ही खुळी करतीये स्वतःशीच लग्न…! – InMarathi

प्रसिद्धीचा स्टंट, स्वप्रेम की विचित्रपणा? ही खुळी करतीये स्वतःशीच लग्न…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा सोहळा असल्यामुळे आपल्याला तो अविस्मरणीय व्हायला हवा असतो. त्यामुळे बरेच जण हौसेमौजेने, थाटामाटात लग्न करतात.

हे सगळं केलं जातं ते नवरा-नवरी एकमेकांसोबत आयुष्य जगण्यासाठी एकत्र येणार हे साजरं करण्यासाठी. लग्नाचा हेतूच मुळात तो असतो. मात्र एका २४ वर्षांच्या तरुणीने आपल्या मनात खोलवर रुजलेल्या लग्नाच्या या संकल्पनेलाच फाटा दिलाय. ती लग्न करतेय. ती हनिमूनलापण जाणार आहे. पण एकटीच.

तिच्या लग्नात किंवा हनिमूनला तिच्यासोबत कुणी जोडीदार नसणार आहे. ‘क्वीन’ चित्रपटात आपण आपल्या हनिमूनला एकट्याच गेलेल्या रानीचं पात्रं पाहिलं होतं, पण तिने तसा निर्णय घेण्यामागे तिच्या तुटलेल्या लग्नाची पार्श्वभूमी होती.

 

queen inmarathi

 

गुजरातमधील बडोदा इथल्या २४ वर्षीय क्षमा बिंदूला मुळातच जोडीदार नकोय आणि तरीही ती लग्न करतेय. लग्नाची, हनीमूनची जय्यत तयारीही तिने केलीये.

स्वतःशीच लग्न करणारी म्हणजेच सोलोगॅमी करणारी क्षमा ही भारतातली पहिलीच मुलगी आहे. जोडीदारासोबतच्या आनंदी आयुष्याची कल्पना करणाऱ्या आपल्यातल्या अनेकांना क्षमाचा हा निर्णय विचित्र वाटेल, पण क्षमाने हा निर्णय नेमका का घेतलाय त्यामागचं कारण जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गुजरातच्या बडोद्यामधील गोत्री येथे राहणाऱ्या क्षमाने एमएस युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. सध्या ती एका खासगी मनुष्यबळ आऊटसोर्सिंग फार्ममध्ये कार्यरत आहे.

क्षमा आता स्वतःच स्वतःशी लग्न करते आहे. तिच्या लग्नात सप्तपदी, पारंपारिक विधींपासून सिंदूर लावण्यापर्यंत सगळे विधी असतील. पण नवरा आणि मिरवणूक मात्र नसेल.

ती स्वतःशीच लग्न करणार असल्यामुळे लग्न केल्यानंतर सासरीही जाणार नाही. मात्र ती एकटीच हनिमूनला जाणार आहे.

“बचपनसे ना मुझे शादी करने का बहोत शौक था” हा जब वी मेटमधल्या गीतचा डायलॉग आपल्याला पटकन आठवेल. पण यात कुणाशीतरी लग्न करणं ही बाब अध्याहृत होती. मात्र क्षमाच्या बाबतीत हे वेगळं आहे.

“तिला लहानपणापासून कधीच लग्न करण्याची इच्छा नव्हती. लग्न ही परंपरा तिला कधीच आवडली नसली तरी तिला नवरी होण्याची इच्छा होती.”, असं तिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं.

 

sologamy im

 

११ जूनला गोत्रीमधल्याच एका मंदिरात ५ विधी करून क्षमा लग्न करणार आहे. त्यानंतर ती गोव्याला २ आठवड्यांकरता हनिमूनलाही जाणार आहे.

स्वतःशी लग्न करण्यामागचा क्षमाचा विचार :

स्वतःशी विवाह करणे ही स्वतःचा स्वीकार करण्याच्या हेतूने केलेली कृती असल्याचे म्हणत क्षमा म्हणाली, “स्व-विवाह म्हणजे स्वतःवर आणि फक्त स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता. हे स्व-स्वीकृतीचे कार्यदेखील आहे. लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे आणि म्हणूनच मी स्वतःशी लग्न करत आहे.”

क्षमाच्या आई वडिलांनी क्षमाचा हा निर्णय मान्य करून तिला पाठिंबा दर्शवला आहे. या कृतीद्वारे आत्मप्रेमाचं उदाहरण समोर ठेवणारी देशातली मी कदाचित पहिलीच मुलगी असेन असं क्षमाचं म्हणणं आहे.

वेबसिरीजमधलं ‘ते’ वाक्य :

क्षमाला जरी लहानपणापासून जोडीदार नको असला तरी नवरी बनायचं होतं आणि एका वेबसिरीजमध्ये एका अभिनेत्रीने म्हटलेल्या एका वाक्यामुळे तिच्या या विचारला अधिक बळकटी मिळाली.

एका वेबसिरीजमध्ये एका अभिनेत्रीने “प्रत्येक स्त्रीला नवरी व्हायचं असतं. पण पत्नी नाही.” हे वाक्य म्हणताना तिने ऐकलं होतं. तेव्हा तिने यादृष्टीने विचार करायला पुन्हा सुरुवात केली.

क्षमा म्हणते, “त्यानंतर मी आपल्या देशात कोणत्याही भारतीय महिलेने स्व-विवाह केला आहे की, नाही हे शोधण्यासाठी ऑनलाईन संशोधन केलं. परंतु, मला अशी एकही घटना आढळली नाही. कदाचित मी आपल्या देशात आत्मप्रेमाचं उदाहरण मांडणारी पहिलीच असेन.

काहींना अशा प्रकारचं लग्न विचित्र वाटेल; पण मी जे करायचा प्रयत्न करते आहे ते महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकतं. माझ्या या विवाहाला माझ्या पालकांनी पाठिंबा आणि आशीर्वाद दोन्ही दिले आहेत. ज्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो त्या गोष्टीसाठी ते तयार असतात.”

लग्नसोहळ्याची तयारी :

९ जूनला क्षमाच्या मेंदीचा सोहळा होणार आहे. मेंदीच्या सोहळ्यासाठी ती पांढरं धोतर आणि कुर्ता घालणार आहे. हळदीला आणि लग्नाच्या दिवशी साडी नेसणार आहे.

 

mehndi suger 1 inmarathi

 

११ जूनला संध्याकाळी ५ वाजता तिचं लग्न होणार आहे. आपल्या लग्नाची निमंत्रणंही तिने पाठवली आहेत. तिचे १५ मित्र आणि सहकारी सोहळ्याचा भाग होणार आहेत. तिच्या आईला प्रवास करणं जमू शकत नसल्याने ती व्हिडियो कॉलवरून लग्नासाठी आपल्या मुलीला आशीर्वाद देणार आहे.

क्षमाकडून प्रेरणा घेऊन आणखी काही मुलीही स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतील असं तुम्हाला वाटतं का? स्वतःवर निरपेक्ष प्रेम करण्यासाठी स्वतःशीच लग्न करण्याचा पर्याय क्षमाप्रमाणे तुम्हालाही योग्य वाटतो का? की जोडीदाराला आपलं सर्वस्व, आपली गरज न बनवताही एकमेकांना आवश्यक ती स्पेस देऊन एकमेकांसोबतचं नातं फुलवत तुम्हाला स्वतःवरही प्रेम करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? स्वप्रेमाची तुमची व्याख्या काय? जरूर सांगा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?