' एक अशी केस जिथे चक्क पोलिसांनीच बघितलं भूत आणि केलं रेकॉर्ड! – InMarathi

एक अशी केस जिथे चक्क पोलिसांनीच बघितलं भूत आणि केलं रेकॉर्ड!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाने इतक्यातच बॉक्स ऑफिसवर केलेली बक्कळ कमाई पाहून रसिकांचं भयपटांवरचं प्रेम नव्याने सिद्ध झालं आहे. भयपट पाहणं हा आपल्यासाठी घाबरवणारा, चित्तथरारक आणि तरीही हवाहवासा अनुभव असतो. आपण पाहीलेली ही भुतांची पात्रं दीर्घकाळ आपल्या आठवणीतून जात नाहीत इतका त्यांचा आपल्या मनावर अंमल असतो.

वारल्यानंतर काही लोकांची खरंच भुतं होत असतील का? हा गूढ प्रश्न यानिमित्ताने आपल्या मनात येतो. पण आपण त्याचा फार विचार न करता आपलं रोजचं आयुष्य जगत राहतो.

 

ghost lady inmarathi

 

लहानपणी कधी ना कधीतरी आपण भुतांच्या कहाण्या ऐकलेल्या असतात. पण तरी लहानपणापासून मनात उत्पन्न झालेलं भुतांविषयीचं कुतूहल आयुष्यभर तसंच राहतं. अशी अनेक रहस्यमयी ठिकाणंही असतात जिथे भुतांचा वावर असल्याचं म्हटलं जातं. पण चक्क पोलिसांनाच एखादी भुताची केस हाताळावी लागली असेल तर?

असं कसं होईल? अशा गोष्टी तर फक्त चित्रपटांमध्ये दाखवतात. तऱ्हतऱ्हेच्या गुन्ह्यांचे खटले पोलिसांकडे असतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात पोलिसांना भुताची केस कशी हाताळावी लागेल?

असा प्रश्न आपल्याला पडूच शकतो. पण आपल्याला कितीही आश्चर्य वाटलं तरी एकेकाळी स्पेनमधल्या मद्रीद शहरात अशीच एक भयानक घटना घडली होती.

तिथल्या एका १८ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूनंतर त्या मुलीच्या घरात तिचं भूत संचार करत असल्याचे विचित्र दाखले पोलिसांच्या हाताला लागले आणि ही घटना पोलिसांच्या रेकॉर्डमध्येही आहे. या केसचं गूढ आजतागायत कायम आहे. ही घटना नेमकी होती तरी काय? जाणून घेऊ.

एरव्ही फुटबॉलसाठी म्हणून ओळखलं जाणारं स्पेनमधील मद्रिद हे शहर १९९० च्या दशकात एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आलं होतं. १९७३ साली दक्षिण मद्रिदमधल्या व्हॅलेकसमध्ये एस्टेफानिया गुटेरेझ या मुलीचा जन्म झाला. व्हॅलेकसमधल्या अपार्टमेंटमध्ये ती आपल्या आईवडिलांसोबत राहत होती.

 

spain ghost case IM

 

१८ व्या वर्षापर्यंत एस्टेफानियाचं वागणं इतर कुठल्याही मुलीसारखंच होतं. मात्र ती कॉलेजला गेल्यानंतर अचानक तिचं वागणं बदलल्याचं लक्षात येऊ लागलं.

कधी ती आपल्या भावाकडे बघून गुरगुरायला लागायची तर कधी सापासारखा हिस-हिस आवाज काढायची. तिला भास व्हायचे आणि झटके यायचे. रात्रीच्या वेळी आपल्या खोलीत दुष्ट शक्तीच्या सावल्या फिरतात असं ती आपल्या आईवडिलांना सांगायची.

आपल्या नखांनी भिंतीवर ओरखडेही काढायची. आपली मुलगी एकदम अशी कशी वागायला लागली असं वाटून सहाजिकच तिच्या पालकांना तिची काळजी वाटू लागली आणि एक दिवस त्यांना एस्टेफानिया तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूची पुस्तकं वाचत असल्याचं लक्षात आलं.

 

spain ghost case 2 IM

 

१९९१ च्या ऑगस्ट महिन्यात एस्टेफानियाची प्रकृतीआणखीनच खालावली तेव्हा तिच्या पालकांनी तिला मद्रिदमधल्या एका सरकारी रुग्णालयात नेलं. पण डॉक्टारांनी ३ आठवडे उपचार केल्यानंतरही तिला कुठला आजार असल्याचं त्यांना आढळलं नाही.

एक दिवस आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं तिच्या आई वडिलांच्या अचानक लक्षात आलं. समोर आलेल्या अहवालानुसार, कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याचे समजले.

मृत्यूनंतरच्या चित्रविचित्र घटना :

एस्टेफानियाचा मृत्यू होऊन एक आठवडा झाल्यानंतर तिच्या खोलीत तिच्या आईवडिलांना एक विचित्र गोष्ट आढळली. जेव्हा त्यांनी तिची खोली उघडली तेव्हा चादर खाली पडलेली, वस्तू इतस्त: पसरलेल्या त्यांना दिसल्या. हा एकूणच प्रकार त्यांना विचित्र वाटलं तरी त्यांनी सगळ्या गोष्टी पुन्हा जागच्या जागी नीट ठेवल्या.

मात्र त्यानंतर २-४ दिवसांनी त्यांनी तिच्या खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला तेव्हा मात्र ते खरोखरच घाबरले. त्यादिवशी जशा वस्तू इतस्त: पसरलेल्या होत्या तशाच त्या आताही पसरलेल्या त्यांना दिसल्या. तिच्या खोलीतून विचित्र आवाज येत असल्याचेही त्यांच्या कानांवर पडले.

याखेरीज, त्यांना भिंतीवर नखांनी ओरबाडल्याच्या खुणाही आढळल्या. या सगळ्यानंतर खरंच काहीतरी विचित्र घडतंय यावर त्यांचा विश्वास बसला. त्यामुळे खबरदारी घ्यावी या दृष्टीने एस्टेफानियाच्या घरच्यांनी टिपूच्या खोलीचा दरवाजा नट बोल्टने बंद केला. पण एवढं करूनही दुसऱ्या दिवशीही तिच्या खोलीतून तसेच विचित्र आवाज ऐकू येऊ लागले.

कोणीतरी आई-आई अशी हाक मारत असल्याचे आवाजही कानांवर पडले. खोलीत बसवलेले नट आणि बोल्ट काढून टाकले गेलेले होते. काही शेजाऱ्यांनी धैर्य एकवटलं आणि एस्टेफानियाच्या घरी मुक्काम केला तेव्हा त्यांनाही अशाच प्रकारच्या विचित्र गोष्टी दिसल्या आणि विचित्र अनुभव आले.

 

spain ghost case 3 IM

 

एस्टेफानियाच्या शिक्षिकेचा धक्कादायक खुलासा :

एस्टेफानिया मृत्यू होऊन १५ दिवस उलटून गेले होते तेव्हा एक दिवस अचानक तिच्या कॉलेजमधल्या एक शिक्षिका तिच्या घरी पोहोचल्या आणि एस्टेफानियाच्या एका मैत्रिणीचा प्रियकर बाईक अपघातात मरण पावला होता आणि त्यानंतर तिची मैत्रीण नैराश्यग्रस्त झाली होती अशी माहिती त्यांनी दिली.

एस्टेफानिया आणि तिच्या मैत्रिणीची अगदी घट्ट मैत्री होती. एक दिवस जेव्हा त्या कॉलेजच्या मागच्या बाजूला गेल्या होत्या तेव्हा तिथे त्यांना ४ मुली दिसल्या ज्यात एस्टेफानिया आणि बाईक अपघातात जिचा प्रियकर वारला होता ती मैत्रीणही होती. त्यावेळी तिथे एका लाकडी बोर्डावर एकेक करत काचेचे ग्लास उपडे ठेवून मंत्र म्हणणं सुरू होतं.

एस्टेफानिया त्या ग्लासवर आपली बोटं ठेवत होती. एस्टेफानिया काचेवर बोट ठेवलं आणि काचेचा ग्लास अचानक हवेत तरंगू लागला. हा सगळा प्रकार पाहून त्या शिक्षिका त्या सगळ्या मुलींना ओरडल्या आणि त्यांनी तो बोर्ड तोडला.

एस्टेफानिया भुतांशी बोलायची आणि बाईक अपघातात मरण पावलेल्या आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराशीही ती बोलायची हे त्या शिक्षिकेला नंतर कळलं.

त्या शिक्षिकेने या मुलींना हे करताना पकडलं तेव्हा अचानक एक पांढऱ्या रंगाचा विचित्र धूर आला आणि तो थेट एस्टेफानियाच्या नाकावाटे तिच्या शरीरात गेला असं तिच्या शिक्षिकेने तिच्या घरच्यांना सांगितलं. हे सगळं ऐकून एस्टेफानियाचे घरचे आणखीनच घाबरले.

पोलिसांना बोलावलं :

घरच्यांनी जेव्हा पुन्हा तिच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा एस्टेफानियाचं चित्र जमिनीवर पडलं असल्याचं त्यांना आढळलं. तिच्या वडिलांनी जेव्हा ते चित्र पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्याला आग लागली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी पुन्हा तिच्या खोलीला कुलूप लावलं.

 

spain ghost case 4 IM

 

त्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्वी कधीच घडली नव्हती अशी एक भयानक घटना घडली. एस्टेफानियाची आई रात्री झोपली होती तेव्हा कुणीतरी आपल्यावर चढून आपल्याला गुदमरवून टाकतंय असं तिच्या आईला वाटलं.

ती एक अदृश्य शक्ती होती. त्या शक्तीपासून आपली सुटका करून घ्यायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. रात्री साधारण ३ वाजता पोलिसांना बोलावलं गेलं. त्यावेळी त्यांच्या घरी पोलीस प्रमुख जोस पेड्रो यांच्यासोबत आणखी ४ सहयोगी पोलीस अधिकारी आले होते.

तपासात पोलिसांच्या हाती काही लागलं नाही :

पोलीस अधिकाऱ्यांनादेखील थंड वारा आणि विचित्र आवाज ऐकू आले. ते एस्टेफानियाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना तिथे वारा जोराने वाहत असल्याचा जाणवला. पण या विचित्र गोष्टी फक्त त्या खोलीतच घडत होत्या. खोलीबाहेर मात्र सगळं शांत होतं.

एस्टेफानियाच्या घरच्यांना पोलिसांनी सगळं समजावून सांगितलं आणि ते तिथून गेले. मात्र हा सगळा प्रकार नेमका काय असावा हा प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळत राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस पुन्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा आपण आपल्या धाकट्या मुलाला बेडच्या उजव्या बाजूला झोपवतो, मग तो हवेत उडून बेडच्या डाव्या बाजूला जातो असा विचित्र प्रकार घडत असल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलं.

पोलीस जेव्हा परत एस्टेफानियाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना तिच्या खोलीत येशूचं चित्र उलटं पडलं असल्याचं दिसलं. पोलिसांनी आपल्या अहवालात या सगळ्या गोष्टींची नोंद केली. ही बातमी मीडियात आली. पोलिसांनीही मुलाखती दिल्या. पण महिनाभर तपास करूनही पोलिसांच्या हाती काही लागलं नाही.

 

police sirene inmarathi

 

पोलिसांनी त्यांना घर सोडण्याचा सल्ला दिला आणि तो ऐकून त्यांनीही घर सोडलं. एस्टेफानियाच्या घरचे दुसऱ्या घरी राहायला गेल्यावर या सगळ्या घटना घडायच्या बंद झाल्या. मात्र या घटनेचं गूढ काही शेवटपर्यंत उकललं नाही. या सगळ्या घटनेवरून ‘वेरॉनिका’ हा चित्रपट तयार केला गेला.

मैत्रिणीवरच्या प्रेमापोटी मैत्रिणीच्या वारलेल्या प्रियकराशी बोलता यावं म्हणून एस्टेफानिया मंत्र-तंत्र आणि काळ्या जादूची पुस्तकं वाचण्याच्या अतिशय अविचारी आणि अघोरी मार्गाला लागली असेल का? या सगळ्याविषयी तिने कुठून माहिती मिळवली असेल? तिला कुणी ही माहिती दिली असेल?

हे सगळेच प्रश्न बुचकळ्यात टाकणारे आहेत. या सगळ्यापायी एस्टेफानियाला आपल्या आयुष्याची किंमत चुकवावी लागलीच, शिवाय तिला स्वतःला आणि घरच्यांनाही त्याचा केवढातरी मनःस्ताप झाला.

घरच्यांची तर अक्षरश: भीतीने गाळण उडाली. या सगळ्याकडे एक तिऱ्हाईक म्हणून पाहणाऱ्या आपल्याला यावर नेमकं काय बोलावं हे कळत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?