' नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा पूर्ण होते असं का म्हणतात? यामागची पौराणिक कथा वाचाच – InMarathi

नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा पूर्ण होते असं का म्हणतात? यामागची पौराणिक कथा वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही पाहिलं असेल तर शिव मंदिरात येणारे भक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा सांगतात आणि महादेवाचं दर्शन घेऊन जातात. साक्षात भगवंत समोर असताना त्याच्या दुताला आपल्या इच्छा सांगण्यामागे काय शास्त्र असावं? यासाठी महादेवाच्या मंदिरात नंदी काय करतो? हे जाणून घ्यावं लागेल.

समुद्र मंथनातून निष्पन्न झालेलं विष प्राशन केल्यानंतर महादेव ध्यानाला बसले मात्र त्यांच्या घशाला या विष प्राशनानं जळजळ होत होती. त्यांना हळूवार फ़ुंकर घालायला म्हणून नंदी महादेवांसमोर बसला. महादेवांच्या ध्यान धारणेत विघ्न, अडथळा येऊ नये म्हणून नंदी राखण करत कायम त्यांच्या समोर बसतो.

 

nandi im

 

नंदी म्हणजे तरी कोण? तर याचि कथा पुराणात अशी सांगितली जाते, की शिलाद मुनींना अपत्य नव्हतं म्हणून त्यानी शंकराची आराधना केली. एक दिवस ते आपल्या आश्रम आवारात चालत होते, तेव्हा त्यांना एक गोरं गोमटं बाळ दिसलं.

त्याचवेळेस आकाशवाणी झाली की ‘या बाळाचा तू अपत्याप्रमाणे सांभाळ कर.’ शिलाद मुनींनी त्याचं नाव नंदी ठेवलं. यथावकाश हे बाळ कुमारवयीन मुलगा झालं. हा मुलगा सर्व विद्यात तरबेज होता.

एके दिवशी आश्रमात मित्र आणि वरुण असे दोन साधू आले. काही दिवस वास्तव्य केल्यानंतर जाताना त्यांनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशिर्वाद दिला मात्र नंदीला आशिर्वाद देताना ते कचरले.

शिलाद मुनींनी याचं कारण विचारता त्यांनी सांगितलं की, या मुलाचं आयुष्य कमी आहे. हे समजल्यावर शिलाद मुनी खुप व्यथीत झाले. नंदीनं पित्याचं दु:ख बघून साक्षात महादेवांची उपासना करायला सुरवात केली आणि अखेर महादेव प्रसन्न झाले.

वर मागण्याची वेळ आल्यावर नंदीनं कायम महादेवांच्या सान्निध्यात रहाण्याची इच्छा व्यक्त केली. महादेवांनी हे मान्य करून त्याला सांगितले, की ‘माझ्याकडे असलेला बैल मरण पावला असल्यानं त्याच्या जागी आजपासून तू बसशिल आणि माझे वाहन बनशिल.’

यानंतर महादेवांनी नंदीला संपूर्ण गण, गणेश आणि वेदांसमोर गणांचा स्वामी म्हणून अभिषेक केला आणि अशा प्रकारे नंदी हा नंदीश्र्वर झाला.

असा हा नंदिश्वर कायम महादेवांसमोर बसलेला आढळतो. त्यांची ध्यान धारणा विना व्यत्यय होईल याची काळजी घेतो. याच कारणास्तव महादेवांचं दर्शन घ्यायला येणारे भक्त देखिल थेट महादेवांना आपल्या मनोकामना सांगत नाही तर त्या नंदीच्या कानात सांगतात.

 

nandi ears im

 

भक्तांची सर्व गार्‍हाणी नंदी महादेवांच्या कानावर घालतो असा समज आहे.

याच संदर्भात आणखिन एक कथा सांगितली जाते ती अशी, एकदा देवी पार्वतीची स्मृती गेली म्हणून महादेवांनी पार्वतीसमवेत ध्यान धारणेला बसण्याचे ठरविले. नंदीनं देखील या दोघांसोबत ध्यानाला बसण्याचं ठरविलं.

तिघंही ध्यानमग्न असतानाच महादेवांचा शत्रू असणार्‍या जालंधरने देवी पार्वतींचे अपहरण केले. महादेव ध्यानमग्न असल्यानं त्यांना याची कल्पानचा आली नाही मात्र घडल्या प्रकारानं सर्व देवीदेवता घाबरल्या. याचे परिणाम काय होतील? या विचारानंच सर्वांची भंबेरी उडाली.

घडला प्रकार महादेवांच्या कानावर कसा घालावा हा पेचही उभा होता. सर्वांनी मिळून गणेशाला साकडं घातलं, की तूच ही वार्ता महादेवांपर्यंत पोहोचव. गणेशांनी महादेवांचं ध्यान भंग करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नाही.

मग गणेशाला एक कल्पना सुचली. त्यानं घडला प्रकार नंदीच्या कानात सांगितला आणि नंदीनं तो महादेवांना सांगितला. अशा प्रकारे महादेव त्यांच्या गहन ध्यानातून बाहेर पडले आणि पुढे देवी पार्वतींची त्यांनी सुटका केली.

यानंतर अशी प्रथा रुढ झाली की, आपलं म्हणणं जर जलद गतीनं महादेवांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर ते नंदीश्वराच्या कानात सांगावं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?