' मोदींना पर्याय म्हणून "हा" माणूस २०१९ साली पुढे केला जाऊ शकतो!

मोदींना पर्याय म्हणून “हा” माणूस २०१९ साली पुढे केला जाऊ शकतो!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

केरळ… म्हणजे गॉडस ओन कंट्री…! अगदी वैभवाने अन तितक्याच दिमाखात ऐटीत मिरवणारे राज्य. पण चांगल्या अर्थाने. केरळचे ऐतिहासिक नाव केरलम! केरळ म्हटल्यावर आपल्याला कॉफीच्या बागा आणि मसाल्यांच्या बागा आठवतात. हाउस बोट आठवते. केरळ बॅकवॉटर आठवते. नारळाची झाड आणि विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा. असं हे निसर्गाची देणगी लाभलेल केरळ राज्य. मुळात केरळ हे राज्य होण्याआधी त्रावणकोर आणि कोचीन अशी संस्थानं अस्तित्वात होती. मग पुढे रीतसर कायदा होऊन मलाबार प्रांतासकट मल्याळम भाषा बोलणार्यांचे केरळ हे राज्य १९५७ साली अस्तित्वात आले.

अश्या केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिनारायी विजयन. केरळमध्ये राजकीय दृष्ट्या विचार करायचा झाल्यास ज्याला आपण इंग्रजीमध्ये alliance म्हणू शकतो असे २ फ्रंटस अस्तित्वात आहेत. एक म्हणजे कॉंग्रेसचा युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि दुसरा म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) चा लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट. या एल. डी. एफ. चे मुख्यमंत्री म्हणून श्री पिनारायी विजयान २०१६ ला सत्तेत आले. विजयन यांची ख्याती म्हणजे ते सगळ्यात ज्यास्त काळ सी. पी. आय. एम. या पक्षाचे राज्यीय सचिव होते. हा काळ म्हणजे १९९८ ते २०१५. १९९८ पासून ते पोलितब्युरोचे सदस्य आहेत. त्यांच्या आधी केरळचे मुख्यमंत्री होते यु. डी. एफ. चे श्री. ओमेन चंडी, हे महाशय कॉंग्रेसचे!

pinarayi-vijayan-marathipizza
evartha.in

पिनारायी विजयन यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे कॉलेजचे शिक्षण गव्हर्नमेंट ब्रेनेन कॉलेज मध्ये झाले. कॉलेजच्या दिवसांमध्येच ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या चळवळीत सहभाग घेऊन त्यांचे नेतृत्व करू लागले. याच दिवसात त्यांनी Kerala State Federation चे अध्यक्षपद भूषवले. केरळ विधानसभेमध्ये विजयन पाच वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. १९७०, १९७७ आणि १९९१ साली कुथूपरम्बा, १९९६ साली पय्यंन्नुर आणि २०१६ साली धर्मादॉन मधून विधानसभेवर ते निवडून आले आहेत.

तसे विजयन म्हणजे पक्के डावे. म्हणूनच डाव्या विचारसरणीच्या बुद्धीमन्ताना ते फारच जवळचे वाटतात.नुकतंच, आपल्या देशामध्ये बीफ म्हणजे गायीचे मांस खाण्यावरून एकच हलकल्लोळ माजला. अश्या ‘बीफ बॅन’ विरोधात आवाज उठवून आणि या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जोरदार विरोध करून सगळ्या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना त्यांनी कवेत घेतलं. ते आता डाव्या विचारवंत आणि समस्त मार्क्सवाद्यांचे मसीहा होतात की काय अशीच परिस्थिती आज आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर २ वर्षांनी विजयन सत्तेत आले आहेत. मार्क्सवादी विचारसरणीचे तारणहार बनून ते कार्य करू इच्छितात, नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करायचा आणि डाव्या गटाचे नेतृत्व करायचे आशी त्यांची जणू योजनाच आहे. डाव्या विचारसरणीच्या अधोगतीला थांबवण्यासाठी विजयन काय करतात हे पाहावे लागेल.

केरळ मध्ये प्राबल्य असलेल्या आणि तिथूनच प्रकाशित होणाऱ्या The Week या डाव्या विचारसरणीच्या मासिकाने एक बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी होती मोदींच्या इस्राईल भेटीची आणि बातमीचा मथळा होता “Kerala CM condemns PM Modi’s visit to ‘terrorist’ state Israel!” वास्तविक केरळच्या सी एम नी असा विरोध करणे कम्युनिस्टांच्या दृष्टीने साहजिकच आहे. अर्थात धर्म हि अफूची गोळी आहे असे मानणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना मोदींची इस्राईल भेट रुचली नाही. पण मुद्दा वेगळा आहे –

एका विशिष्ट पद्धतीने पिनारायी विजयन यांना देशातील डाव्या, समाजवादी विचारसरणीतील बुद्धिवंत प्रोजेक्ट करत आहेत. इथे अशी दाट शंका येऊ लागली आहे कि, २०१९ च्या निवडणुकांआधी मोदींना विरोध करणारा एक मजबूत नेत्याच्या उभारणीत तमाम डावी मंडळी लागली आहेत. आणि त्यांचा नेता म्हणजे पिनारायी विजयन यांना प्रत्यक्ष मैदानात उतरवण्याची तयारी होऊ लागली आहे. कारण मोदींच्या प्रत्येक कृतीला विरोध करणे हे धोरण ठेवून विरोध केला जातो आहे.

जर मोदींसारखा माणूस प्रत्यक्ष दिल्लीचा नसताना ही पंतप्रधान बनू शकतो आणि गुजरात ते दिल्ली असा राजकीय प्रवास करून दिल्लीचा होतो, यावरून विजयन यांना केरळ ते दिल्ली असा राजकीय प्रवास करून एक मोठी जबाबदारी देण्याचा विचार याच्यामागे दिसतो. दिल्लीबाहेरील माणसाचा निवडणुकांमध्ये विजय आणि त्याचे पंतप्रधान होणे हे म्हणजे त्या त्या राज्यातल्या बर्याच स्थानिक नेत्यांना एक आशेचा किरण आहे. त्यामुळे अर्थातच विजयन यांचे नाव पुढे आहे असे दिसते.

डावी विचारसरणी जर खरंच प्रभावी असती तर डाव्यानीच केंद्रात सत्ता चालवली असती. किंवा जगभर डाव्यांचीच सत्ता आली असती. भाजपचे उदाहरण कशाला घ्यायचे, इथे कॉंग्रेसचेच उदाहरण बोलके आहे.

२००४ साली ‘इंडिया शायनिंग’ ला नाकारून केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे कॉंग्रेस आणि डाव्यांचे संयुक्त सरकार अस्तित्वात आले. डाव्या नेत्यांनी त्यांच्या आघाडीला नाव दिले लेफ्ट फ्रंट. या ‘लेफ्ट फ्रंट’ च्या चुकीच्या योजनांमुळे कॉंग्रेसचे आणि डाव्यांचे UPA-1 च्या काळातले संयुक्त सरकार खरं संयुक्तपणे चालले नाही. डाव्यांनी बाहेरून दिलेला पाठींबा काढला आणि हे सरकार पाडणार नाही असे वचन दिले. इंग्रजीमध्ये सांगायचा झाल्यास We will bark, but not bite असा एकंदरीत कॉंग्रेसच्या योजनांबद्दल डाव्यांचा सूर होता.

मनमोहन सिंगांच्या अनेक धोरणांना आणि सरकारमधल्या नियुक्त्यांना ‘लेफ्ट फ्रंट’ चा विरोध होता. एवढंच नव्हे – UPA -1 च्या काळात प्लॅनिंग कमिशनच्या उपाध्यक्षपदी आणि त्यांचे सदस्य निवडताना आणि देशातील महत्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये डाव्यांचाच वरचष्मा कसा राहिल याची पुरेपूर काळजी डावे घेत होते. मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांच्या नावाला डाव्यांचा कडाडून विरोध होता. PMO मध्ये सचिव म्हणून पुलोक चटर्जींच्या निवडीवरून हे इथे लक्षात येईल. पुलोक चटर्जी हे मार्क्सवादी होते.

भविष्यात डाव्यांचा नेमका प्रवास कसा असेल हे आताच सांगता येत नाही, कदाचित, जसं भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ ला प्रोजेक्ट केलं, तसं डाव्या आघाडीतील मंडळी २०१९ च्या निवडणुकांमध्ये अश्याच एका व्यक्तीला प्रोजेक्ट करतील हे नाकारता येत नाही. शेवटी, जरी पोलिटब्युरो त्यांचा नेता ठरवत असला तरीही विजयान यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. पण ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की डाव्या विचारसरणीचा आलेख ओसरत चालला आहे. विकासाला जणू मार्क्सवादी नेत्यांचा विरोधच असतो.

नेता निवडीच्या बाबतीत ‘पिनारायी विजयन’ हे नक्कीच सी. पी. आय. एम. चे राष्ट्रीय नेते म्हणून उजवे ठरतील आणि भविष्यातील राजकीय उमेदवार म्हणून डावे त्यांना प्रोजेक्ट करतील अशी शक्यता जाणवते.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page | Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?