' युरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २ – InMarathi

युरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागील भागाची लिंक : प्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी : इस्रायल- संक्षिप्त इतिहास १

लेखक – आदित्य कोरडे 

इ. सं. १५१६ मध्ये केनान हा प्रांत ओटोमान साम्राज्याच्या हाती गेला. ओटोमान सम्राट/ सुलतान सलीम पहिला ह्याने मामलुक राजवटीचा खात्मा करून हा भाग आपल्या साम्राज्याला जोडला. १५२० मध्ये तो मेल्यावर त्याचा तरणाताठा आणि तडफदार मुलगा गादीवर आला. हाच तो प्रसिद्ध कि कुप्रसिद्ध सुलतान सुलेमान.

 

sultansuleyman-marathipizza

 

हा कडवा मुस्लीम! आणि त्याची राज्यकारभारावरची पकडही चांगलीच मजबूत होती. १५६६ मध्ये सुलेमान मरण पावला. त्यानंतर आलेले सुलतान सलीम दुसरा (राजवट १५६६-७२), त्याचा मुलगा सुलतान मुराद (राजवट १५७२-७४), आणि त्याचा मुलगा सुलतान महमद तिसरा (राजवट १५७४-९५) हे तितके कडवे तसेच कार्यक्षम नव्हते. शिवाय ते बरेचसे उदारमतवादी होते. त्यामुळे त्यांच्या राजवटीत अन्य धर्मियांवरचे अन्याय-अत्याचारही कमी होऊ लागले, तसे हळू हळू यहुदी परत आपल्या प्राणप्रिय केनानच्या पुण्यभूमीत येऊन राहू लागले.

१६व्या शतकापासूनच हि तुर्की ओट्टोमान सत्ता दुबळी होत चालली होती. इंग्लंड, फ्रांस, रशिया आदी युरोपीय सत्ता केव्हापासून तिच्या नाकाभोवती सूत धरून बसल्या होत्या, कि कधी हि शेवटचा आचका देते आणि तिच्या भूभागाचे आपण लचके तोडतो, पण हि तुर्की राजसत्ता तशी बरीच चिवट निघाली.

ती अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत तग धरून होती आणि त्याबरोबर आजची अरब राष्ट्र (पूर्वी हे सगळे रानटी, रासवट आणि टोळ्यात विभागले गेलेले होते.) आणि इस्रायलच्या सर्व भूभागावर नियंत्रण कायम ठेवून होती.

 

israel 1 InMarathi

 

त्यामुळे पहिल्या महायुद्धात सपशेल हार खाई पर्यंत आणि नंतर केमाल पाशा आतातुर्क ह्याने खलिफापद आणि तुर्की साम्राज्य खालसा करून वेगळा आणि आकाराने बराच छोटा तुर्कस्तान निर्माण करेपर्यंत, इथे राहणाऱ्या यहुद्यांना कसलेही भवितव्य नव्हते.

१९व्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपात ओद्योगिक क्रांतीमुळे, विज्ञान, तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे वातावरण हळूहळू निवळू लागले होते. यहुदी हि त्यांच्या बंदिस्त घेटोतून बाहेर पडून नवे शिक्षण, व्यापार, उद्योग, संशोधन ह्यात नशीब अजमाऊ लागले होते.

अशात रशियाचा झार अलेक्झांडर हा यहुद्यांच्या बाबतीत भलताच उदार निघाला आणि त्याने यहुद्यांना व्यापार उद्योग, वित्त पुरवठा, संशोधन आणि महत्वाचे म्हणजे शिक्षण क्षेत्राची द्वारे खुली केली.

 

Zar Alexander InMarathi

 

ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. यहुदी आपल्यातल्या एकी आणि निरलसपणे काम करत राहण्याच्या हातोटीमुळे सधन, संपन्न आणि प्रसिद्ध बनले. मान्यवर संशोधक, विचारवंत, लेखक, कलावंतांची एक पिढीच त्यातून निर्माण झाली.

मागे इजिप्शियन राजे जसे मत्सरग्रस्त झाले, तसेच युरोप रशियातले इतर गैरयहुदी लोक आता परत यहुद्यांचा मत्सर करू लागले. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी.

 

anti_semitic-marathipizza

 

ह्यातून निर्माण झालेल्या यहुदी विरोधी लाटेला Anti-semitism असे नाव आहे. अर्नेस्ट रेनार हा फ्रेंच विचारवंत- मानववंश शास्त्रज्ञ ह्या विचारधारेचा उद्गाता. पण त्याने आपल्या विचारधारेला Anti-semitism हे नाव दिले नव्हते.

मोरीत्झ स्ताईनश्नायडर ह्या जर्मन यहुदी विचारवंताने रेनारचा विरोध करताना Anti-semitism हा शब्द प्रथम वापरला आणि तो अगदी ह्या विचारधारेला फिट्ट बसला. तिथून पुढे रेनारच्या विचारधारेला Anti-semitism हेच नाव पडले.

नोवाचे तीन पुत्र शेम, हाम आणि जाफेत, त्यांच्या पासून सेमिटिक, हेमेटिक आणि जाफेटिक असे तीन गट पडले, जे हिब्रू अरबी, आर्मेनियन अशा भाषा बोलतं. हळू हळू हेमेटिक आणि जाफेटिक हि नावं मागे पडली आणि फक्त सेमेटिक नाव उरले.

हे सेमिटिक लोक आर्यकुलीन लाटिन, जर्मन आदी भाषा बोलणाऱ्या आर्यवंशीयापेक्षा हीन आणि म्हणून गुलाम होण्याच्या लायकीचे असे समजले जाई.- हा मुख्यत्वे जर्मनीत प्रचलीत असलेला विचार होता. पण तो हळू हळू इतर राष्ट्र जी पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होती तेथे पसरला आणि रोमच्या पतनाला {अशास्त्रीय आणि अनैतिहासिकदृष्ट्या} ह्या सेमेटिक लोकांना जबाबदार धरले जाऊ लागले.

हि साधारण १८६० च्या सुमाराची गोष्ट. अशात १८८१ साली झार अलेक्झांडर ची हत्या झाली आणि त्यानंतर आलेला झार निकोलस ह्याने परत यहुदी विरोधी भावनेला खतपाणी घातले.

 

zar nikolai-InMarathi

 

तेथे यहुद्यांच्या वंश संहाराचे सत्रच सुरु झाले. हा वंश संहार ‘पोग्रोम’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. ह्याचा परिणाम अपरिहार्य होता. आजचा इस्रायल जो तेव्हा पॅलेस्टाइन म्हणून ओळखला जात होता. तेथे साधारण २५००० यहुदी राहत होते, तेथे युरोप आणि रशियातून निर्वासित यहुद्यांचा ओघ वाहू लागला.

ह्या निर्वासित यहुद्यांच्या लाटेला “आलीया’ असे संबोधन आहे. आलीया म्हणजे झायोनिस्ट यहुद्यांच्या स्थलांतराची लाट.


yahudi InMarathi

१८८५ ते १९१४ ह्या काळात अशा अनेक लाटा आल्या आणि ३० वर्षांच्या छोट्या कालावधीत त्यांची लोकसंख्या वाढून ती जवळपास १ लाख झाली. ह्याचा दबाव तिथल्या मुस्लीम रहिवाश्यांवर पडत होता.

पण फक्त तेवढीच बाब त्यांच्याकरता चिंतेची नव्हती. हे निर्वासित यहुदी पूर्वी प्रमाणे गरीब, दिन दुबळे नव्हते. ते बहुसंख्येने झायोनिस्ट होते. आधुनिक इस्रायलच्या स्थापनेत ह्या झायोनिझमचा वाटा सिंहाचा आहे. तेव्हा जरा ह्या झायोनिझमची आपण माहिती घेणे अगदीच अप्रस्तुत असणार नाही.

झायोनिझम :

शतकानुशतकाच्या परवडीपासून आणि मत्सर छळ ह्यातून सुटका हवी असेल, तर जगभरातल्या सर्व यहुद्यांनी एकत्र येऊन स्वत:चे स्वतंत्र राष्ट्र उभे करणे ह्याला पर्याय नाही. हा झायोनिस्ट विचारधारेचा पाया आहे. हि विचारधारा चूक कि बरोबर, ह्याचा विचार आपण आता करीत बसण्यात अर्थ नाही.

एकतर १९व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्र संकल्पना युरोपात बऱ्यापैकी दृढमूल झाली होती आणि जवळपास सगळीच युरोपीय राष्ट्र नवराष्ट्रवादाच्या नशेने झिंगून गेलेली होती. ह्यातून यहुद्यांमधून नव्याने तयार झालेले विचारवंत बुद्धिवादी सुटणे शक्य नव्हते.

आणि शिवाय इस्रायल ह्या आपल्या पौराणिक ऐतिहासिक पुण्याभूची त्यांची शतकानुशतकी जुनी आस होतीच. त्यालाच ह्या नवराष्ट्रवादाची चुरचुरीत फोडणी दिली आणि झायोनिझमचे खमंग रसायन तयार झाले. ते सर्व यहुद्यांमध्ये जोमाने लोकप्रिय झाले.

जगभरात पसरलेल्या, अनेक शतकांपासून एकमेकांच्या संपर्कात नसलेल्या, भाषा, पोशाख, चालीरीती, खाणेपिणे ह्यात प्रचंड अंतर पडलेल्या सर्व यहुद्यांना एकत्र आणायला ह्या झायोनिझामची मोठी दिलखेचक मांडणी केली गेली. हि संकल्पना १८६२ पासून हळू हळू उत्क्रांत होत गेली.

 

zayonizam InMarathi

 

मोझेस हेस, लिओ पिन्स्कर, थीओदोर हर्झल अशा अनेक विचारवंतांनी वेळोवेळी ह्यात सुधारणा करून ती आपापल्या परीने यहुदी समाजात प्रसिद्ध केली. हब्बत झीओन ह्या संस्थेने ती उचलून धरल्याने ती झायोनिस्ट चळवळ म्हणून प्रसिद्ध झाली.

Anti-semitism चे पश्चिम युरोपातले प्राबल्य आणि त्यापायी आल्फ्रेड द्रेफूस ह्या फ्रेंच लष्करी अधिकार्यावर झालेला अन्याय ह्या मुळे यहुद्यांमध्ये झायोनिस्त चळवळ लोकप्रिय होणे अपरिहार्य होते. (संदर्भ – The Man on Devil’s Island: Alfred Dreyfus and the Affair that Divided France ले. Ruth Harris)

यहुद्यांवर ते केवळ यहुदी आहेत म्हणून कसा धडधडीत अन्याय होत असे ह्याची हि केस म्हणजे ज्वलंत उदाहरण होती. पण जागा अन औचित्या अभावी त्या संबंधी विस्ताराने लिहित नाही जिज्ञासूंनी वर उल्लेख केलेले पुस्तक वाचावे. ते किंडल वर उपलब्ध आहे.

zionism-marathipizza

 

असो, तर अखेरीस १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले आणि ओट्टोमान साम्राज्य एकदाचे पंचत्वात विलीन पावले. ४०० वर्षानंतर पॅलेस्टाईनाचा भाग प्रथमच इंग्रजांच्या अंमलाखाली आला आणि यहुद्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तत्कालीन परराष्ट्रमंत्री आर्थर बाल्फोर ह्यांच्यापुढे झायोनिस्ट यहुद्यांनी आपली स्वतंत्र इस्रायलची मागणी ठेवली.

इतर युरोपीय राष्ट्राप्रमाणेच इंग्रजानाही हि यहुद्यांची ब्याद देशातून जाईल तर बरे असेच वाटत होते, पण त्यासाठी ते अरबांना दुखवायला तयार नव्हते. अजून तेल सापडले नसले तरी सुवेझ कालव्यामुळे इंग्रजांना व्यापार उदीम निर्धोक राहावा तसेच पूर्वेकडच्या आपल्या वसाहतोंशी संपर्क करणे सुलभ व्हावे म्हणून ह्या भागात शांतता हवी होती म्हणून त्यांनी यहुद्यांना २ पर्याय दिले.

एक तर आफ्रिकेतला युगांडाचा काही भाग घ्या किंवा सायनाई हा इजिप्तच्या अखत्यारीतला पश्चिमेचा वाळवंटी भाग घ्या. (हे दोन्ही भूभाग काही इंग्रजांच्या बापाच्या मालकीचे नव्हते पण हे कावेबाज युरोपियन लोक असेच. मुंबई ह्यांच्या बापाची नव्हती पण पोर्तुगीजांनी ती इंग्रजांना आंदण दिली…असो)

झायोनिस्ट चळवळीची सगळी वाटचाल त्यांच्या पुण्यभू इस्रायलच्या पायावर उभी असल्याने त्यांनी हे दोन्ही पर्याय नाकारले. झायोनिस्ट चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्लंड मध्ये देखिल यहुदी लोक संघटीत होऊ लागले होते, त्यांच्यात नवजागृती येऊ लागली होती हे इंग्लंडला परवडणारे नव्हते, त्यामुळे त्यांना काहीतरी करणे भाग होते.

त्यांनी पॅलेस्टाईनच्या भूभागाची फाळणी करण्याचा प्रस्ताव मांडला तो त्यांच्या संसदेत मंजूर ही करून घेतला (जसा काही हा त्यांचाच भूभाग.) त्यांच्या ह्या कृत्यामुळे अरब जगतात संतापाची लाट उसळली. तर यहुद्यांमध्ये आनंदाची.

आता गम्मत बघा, झायोनिस्तानी भावनेला आवाहन करून यहुदी जनमानसात स्थान मिळवलं, त्यांना गैर याहुद्यांकडून झालेल्या विरोधाने ते स्थान अजूनच पक्क झालं, पण जेव्हा प्रत्यक्षात यहुदी आपल्या पुराणातल्या पुण्याभूमिकडे जाऊ लागले तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला.

हि काही सुजलाम सुफलाम धरती नव्हती ती होती मरुभूमी- वाळवंट. तिथे आयुष्य सोप्प नव्हतं, त्यामुळे तिथून काही लोक अमेरिकेत जाऊ लागले. त्यामुळे अमेरिकेतही त्यांची संख्या लक्षणीय रित्या वाढली. अमेरिकेची द्वारं तेव्हा जगाला नुकतीच उघडली होती, अमेरिका महासत्ता बनण्याच्या वाटेवर होता.

क्रमश:

===

नमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?